Leading International Marathi News Daily

सोमवार, २० जुलै २००९

आकडे समाधानकारकच!
एक निर्थक अर्थसंकल्प प्रसिद्ध झाल्यानंतर शेअर बाजाराचा निर्देशांक १३४०० पर्यंत उतरला होता. पण त्याला कारण कंपन्यांचे मूलभूत स्थैर्य कमी झाले असे नाही. कुठल्याही स्थितीचा फायदाच उठवायला टपलेल्या अस्वल-बैलांच्या झुंजीत अस्वलाने केलेल्या गुदगुल्या त्याला कारणीभूत आहेत. हा बाजार मागणी-पुरवठा, आर्थिक स्थिती वगैरेंमुळे कमीजास्त होतो असे तत्त्वज्ञान उराशी, त्यामुळे बाजारात थोडीफार गुंतवणूक करणाऱ्या सामान्य निवेशकानी भीती बाळगायचे कारण नाही. काठावर बसून नदीच्या पात्रात दगड फेकणाऱ्या व्रात्य मुलांमुळे तिथल्या बेडकांना.. ‘तुमचा खेळ होतो पण आमचा जीव जातो’ असं म्हणायला लागतं, अशी गोष्ट नेहमीच सांगितली जाते. तसाच हाही प्रकार आहे. त्या दगडफेकीपासून जमेल तितके बाजूला रहाणेच इष्ट असते. गेल्या बुधवारी निर्देशांक पुन:

 

१४२५३ पर्यंत चढला होता. तो हेच सांगतो.
अर्थसंकल्पानंतर दोन मोठय़ा कंपन्यांचे जून ०९ च्या तिमाहीचे आकडे प्रसिद्ध झाले आहेत. सॉफ्टवेअर क्षेत्रातली अग्रेसर कंपनी, इन्फोसिस टेक्नॉलॉजी व खासगी बँकांतील प्रमुख बँक, अ‍ॅक्सिस बँक यांचे आकडे अपेक्षेपेक्षाही उत्तम आहेत. इंफोसिसची या तिमाहीची विक्री ५४७२ कोटी रुपये झाली व नक्त नफा १५२७ कोटी रु. आहे. जून ०८ तिमाहीच्या ४८५४ कोटी रुपयांच्या विक्रीवर १३०२ कोटी रुपये नक्त नफा होता. म्हणजे या वर्षाच्या तिमाहीत विक्रीत साडेबारा टक्के वाढ होती, तर नफा १७.३६ टक्के जास्त होता. मार्च १० वर्षाची अपेक्षित विक्री २२००० कोटी रुपये असावी असे वाटते. इन्फोसिसला दर तिमाहीत नवे ग्राहक मिळत आहेत तसे ते या तिमाहीतही मिळाले. या वेळी नवीन ग्राहकांची संख्या २७ असली तरी वर्षअखेरपेक्षा ग्राहकांची संख्या १० ने कमी झाली आहे. सुमारे २५० कोटी रुपयांची गुंतवणूक करून युबीएस या स्विस आर्थिक कंपनीचा काही व्यवहार ती घेण्याचे प्रयत्न करीत आहे. भारत व पोलंडमध्ये १५०० कर्मचारी यात गुंतले आहेत. त्यामुळे पूर्व युरोपात तिचा व्यवसाय वाढेल.
इन्फोसिसने यंदा अकार्यक्षम कर्मचाऱ्यांना कमी केल्याने खर्चात कपात झाली आहे. मार्च १० वर्षासाठी तिचे शेअरगणिक उपार्जन १०० रुपये असेल. सध्याच्या १७५० रुपये भावाला किं/उ गुणोत्तर १७.५ पट दिसते. अशा कंपन्यांना २२ ते २५ पट गुणोत्तर वाजवी धरले तर वर्षभरात तेजीची लाट येईल तेव्हा भाव २२०० रुपये व्हावा; ही वाढ २५ टक्क्य़ांवर असेल. अ‍ॅक्सिस बँकेचे जून ०९ तिमाहीचे व्याज व अन्य उत्पन्न मिळून एकूण उत्पन्न २९०५ कोटी रुपये झाले. जून ०८ च्या मागल्या तिमाहीचे हेच उत्पन्न २२६६.४४ कोटी रुपये होते. म्हणजे यंदाची वाढ २८ टक्के वाढ. या वर्षाचा तिमाही नफा ५६२ कोटी रुपये आहे, तो जून ०८ तिमाही ३३०.१४ कोटी रुपयापेक्षा ७० टक्के जास्त आहे. बँकेचे भांडवल ३०८.७६ कोटी रुपये असल्याने वार्षिकीकृत शेअर गणिक उपार्जन ६२ रुपये पडेल. आकडे प्रसिद्ध होण्यापूर्वी ७०० रुपये असलेला भाव लगेच ७५० रुपयावर गेला असला तरी किं/उ गुणोत्तर १२ पट पडते. उपार्जन वाढून ७० रुपये व्हावे. त्यामुळे हेच गुणोत्तर १०.७५ पट पडेल. गेल्या बारा महिन्यातील कमाल भाव ९०० रुपये होता, तर किमान भाव २८० रुपये होता. इतका कमी भाव आता होणार नसला तरी ५०० रुपयाला जर कधी हा भाव आला तर जरूर खरेदी करावी. बँकेच्या भांडवलाची पर्याप्तता (capital adeqacy) १५.४ टक्के आहे. अन्य बँकांचेही आकडे समाधानकारक राहतील अशा अपेक्षा आहे.
एच.डी.एफ.सी. बँकेचा नफा ३० टक्क्य़ाने वाढला असला तरी अ‍ॅक्सिसच्या तुलनेने ती टक्केवारी कमी आहे. या तिमाहीत नक्त व्याज ७.७ टक्क्य़ाने वाढले. एकूण उत्पन्न ५१३६ कोटी रुपये झाले. जून ०८ तिमाहीसाठी ते ४२१५ कोटी रुपये होते. नक्त नफा ६०६.११ कोटी रुपये आहे. गत वर्षातील याच तिमाहीसाठी तो ४६४.३५ कोटी रुपये होता. शेअरगणिक उपार्जन १४.२० रुपये आहे. जून ०८ ला ते ११ रुपये होते. भाग भांडवल ४२६.१८ कोटी रुपये आहे. भांडवलाची पर्याप्तता १५.४ टक्के आहे. बाजारभाव मात्र अ‍ॅक्सिसपेक्षा ८० टक्के जास्त आहे. कारण आकाराने ती अ‍ॅक्सिसपेक्षा मोठी आहे. तो भाव १३८५ रुपयांपर्यंत आहे.
बँकामध्ये अ‍ॅक्सिसप्रमाणे स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक व बँक ऑफ बडोदा या बँकांच्या मार्च १० वर्षासाठीच्या नफ्यात जास्त वाढ व्हावी. कारण यूटीआयच्या अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनीचे जे २६ टक्के शेअर्स या बँका व भारतीय आयुर्विमा मंडळाकडे आहेत, त्यापैकी तीन्ही बँका आपले शेअर्स सुमारे ७०० कोटी रुपयांना विकतील. म्हणजे प्रत्येक बँकेचा नफा निदान २०० कोटी रुपयाने वाढेल. स्टेट बँक आपल्या शाखांची व एटीएमची संख्या मोठय़ा प्रमाणावर वाढवीत आहे. अर्थव्यवस्था ऑक्टोबरनंतर सुधारेल व कर्जाला भरपूर मागणी येईल. तसेच व्याज दर त्यामुळे खाली येणार नाहीत असे व्यवस्थापनाला वाटत आहे. स्टेट बँकेत यंदा आणखी एक सहयोगी बँक विलीन होणार आहे. तिचा नफा स्टेट बँकेच्या नफ्यात अंतर्भूत होईल. पुढील दोन तीन वर्षात आणखी काही बँका विलीन झाल्या की तिचे सामथ्र्य आणखी वाढेल. मार्च ०९ वर्षाचे तिचे शेअरगणिक उपार्जन १७० रुपये होते. ते मार्च २०११ मध्ये २४० रुपये व्हावे अशी अपेक्षा आहे. सध्या भाव १५५० ते १५७५ रुपयाच्या मध्ये आहे. पण तो दीडदोन वर्षात २४०० रुपयांपर्यंत जायला हवा. भाववाढ दिसली नाही असे जरी धरले तरी या शेअर्समध्ये सध्याच्या खरेदीत तोटा होणार नाही.
अर्थसंकल्पानंतर सात दिवस बाजारात घसरण होती. पण गेल्या मंगळवार-बुधवारी ९०० अंकांची दोन दिवसात वाढ दिसली व भाव पुन: थोडे स्थिरावले. ४ जुलैला अ‍ॅक्सिस बँक ८७६ रुपये होता, इंफोसिस १८१६ रुपयावर स्थिरावला होता. लार्सेन टुब्रो १६०७ रुपयाला, स्टेट बँक १८०९ रुपयाला तर टाटा स्टील ४३७ रुपयाला मिळत होता. पण बजेटनंतर ते दहा टक्क्य़ाने उतरले व गेल्या बुधवारी परत बरेच वर गेले. अशी घट वध दिसत असली तरी ज्यांनी वरील सर्व शेअर्समध्ये घसरण झाल्यावर थोडी थोडी खरेदी करून ज्यांनी दीर्घ गुंतवणुकीसाठी बेगमी करून ठेवण्याची संवय अगीकारली असेल त्यांना सतत त्यात वाढच दिसेल. काही गुंतवणूक अशा वधघटीचा तात्पुरता फायदा घेण्यासाठीही करण्याचे धोरण ठेवता येईल. पण त्याला थोडाफार अभ्यास हवा. नाही तर एकदा हातातून सुटलेला शेअर कायम सुटून जातो.
अ‍ॅबन ऑफशोअरने गेल्या तीन महिन्यांपूर्वी बऱ्याच निवेशकाना झटका दिला होता. मार्च ०९ या तिमाहीचा तोटा अनेक रिग्ज रिकाम्या असल्याच्या बातम्या व १३००० कोटी रुपयांची कर्जे या तीन कारणांमुळे एकदम २४० रुपायंपर्यंत कोसळलेला अ‍ॅबन ऑफ पुन: वर जायला लागला आहे. बँका, कंपनीच्या कर्जाचे फी२३१४ू३४१्रल्लॠ करायला राजी झाल्याची बातमी त्याला कारणीभूत असली तरी या शेअरमधली जोखीम लक्षात घेता तो टाळायला हवा. त्याऐवजी भाव कमी होतात तेव्हा सेंच्युरी टेक्स्टाइल्स, ग्रासिम व जेके लक्ष्मी सीमेंटचा अजूनही विचार केला तर दीड वर्षात भरपूर फायदा होईल.
वसंत पटवर्धन
०२०-२५६७०२४०