Leading International Marathi News Daily

सोमवार, २० जुलै २००९

नवनीत

ज्याप्रमाणे बंगाल्यातील साहित्यकलेचे आद्य प्रवर्तक चैतन्य महाप्रभू, त्याचप्रमाणे असम प्रदेशातील साहित्य, चित्र, संगीत इत्यादी कलांचे उद्धारक शंकरदेव. एक श्रीकृष्णभक्त, दुसरे श्रीरामभक्त. एकाने श्रीकृष्णलीला वर्णनाने सारा बंगाल-उरिसा (ओरिसा) भारावून सोडला, तर दुसऱ्याच्या रामकथा गायनाने सारा असम प्रदेश ढवळून काढला. हे दोघेही नानकदेवांचे समकालीन. असम प्रदेशात वावरत असताना गुरुजींनी शंकरदेवांची भेट न घेतली तरच नवल! गुरुजींनी ब्रह्मपुत्रेच्या तटवर्ती प्रदेशात प्रवास करताना बहुधा धुबरी येथेच शंकरदेवांशी

 

विचारविनिमय केला. येथून पुढे ते पूर्वेला गुवाहाटी-मणिपूरच्या बाजूला गेले. दोन महापुरुषांनी काय चर्चा केली, हे कळावयास प्रमाण आजतरी उपलब्ध नाही. पण पारंपरिक जनमसाखीकार दोहोंच्या स्नेहभेटीचे वृत्त लिहितात. जादूटोण्यामुळे आणि तांत्रिकांच्या अड्डय़ांमुळे त्या काळी ग्रासलेला असम समाज अनेक गावी नानकदेव-मरदानाशी फार चमत्कारिक वागला. लोक त्यांना गावात राहणे अशक्य करीत. राहिले तर ते ठिकाण धूत असत. बिसिअर नावाच्या गावी याचा कसा अतिरेक झाला याची वर्णने मिळतात. एकूण लोक मंत्रतंत्र चमत्कारांच्या इतके अधीन होते, की त्यांना अन्य मार्गाशी कर्तव्यच उरले नव्हते. शिवाय हा प्रदेश देशाच्या अन्य भागापासून अगदीच एका बाजूला आणि दुर्गम आहे. या ठिकाणी गुरुजी मरदानासह जिद्दीने आले-फिरले हेच आश्चर्यकारक आहे. या भागात अन्य कोणी संतसत्पुरुष येऊन त्याने प्रबोधनकार्य केल्याचे इतिहासाला ज्ञात नाही. बहुधा असम प्रदेशातील एकमेव प्रभावशाली संत म्हणून गुरुजी शंकरदेवांना भेटले.
नामदेव-नानकदेव-शंकरदेव यांच्यात नामसाम्यही आहे. या साऱ्यांचा ध्येयवाद एकच होता. सामान्यजनांना आत्मविश्वासपूर्वक ज्ञान आणि भक्ती यांचा खरा मार्ग स्वीकारण्यासाठी प्रवृत्त करायचे. जे सामान्य वा प्रतिष्ठाप्राप्त लोक हुशारीने सामान्यांना सामान्यच ठेवतात आणि त्यांचा उपयोग आपल्या स्वार्थासाठी करू पाहतात, त्यांनाही योग्य मार्गावर आणायचे.
नानकदेवांचे कार्य अधिक सुकर व्हावे म्हणून बहुधा शंकरदेवांनी आपले अनुभव कथन केले असेल. त्यांना जनजागरण यज्ञात साथ दिली असेल.
अशोक कामत

पृथ्वीवरून चंद्राची एकच बाजू दिसते? इतर ग्रहांच्या बाबतीतही असाच परिणाम संभवतो का?
चंद्राची कला कोणतीही असो, पृथ्वीवरून आपल्याला चंद्राची नेहमी एकच बाजू दिसते. समजा तुम्ही चंद्राच्या पृथ्वीवरून दिसू शकणाऱ्या बाजूवर गेलात, तर तुम्हाला पृथ्वी दिसेल आणि ती स्वत:भोवती फिरते ही गोष्टही तुमच्या लक्षात येईल. पण जर तुम्ही चंद्राच्या पृथ्वीवरून न दिसणाऱ्या बाजूकडे गेलात तर मात्र तुम्हाला पृथ्वीचे कधीही दर्शन होणार नाही. चंद्राची सतत एकच बाजू आपल्याकडे रोखली असण्यामागचं कारण समजणं फारसं अवघड नाही. चंद्र हा २७.३ दिवसांत स्वत:भोवतीची प्रदक्षिणा पूर्ण करतो. महत्त्वाची गोष्ट अशी, की त्याच कालावधीत तो पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. अशी कल्पना करा, की चंद्र स्वत:भोवती ९० अंशांतून फिरला. आता याच कालावधीत तो पृथ्वीभोवतीही ९० अंशांतूनच फिरला असल्यामुळे त्याची एकच बाजू सतत पृथ्वीकडे रोखलेली राहील.
असाच प्रकार आपल्या सूर्यमालेतील अनेक ग्रह आणि उपग्रहांच्या बाबतीत घडतो. मंगळ, गुरू, शनि, युरेनस यांच्या उपग्रहांपैकी अनेक उपग्रहांची ठरावीक बाजूच सतत मूळ ग्रहाकडे रोखलेली असते. या उपग्रहांचा स्वत:भोवती फिरण्याचा काळ हा मूळ ग्रहाभोवतीच्या प्रदक्षिणा काळाइतकाच आहे. आपल्या सूर्यमालेतील खुजा ग्रह असणाऱ्या प्लूटो आणि त्याचा उपग्रह कॅरन यांची जोडी तर विलक्षण आहे. प्लूटो आणि कॅरन या दोघांचा स्वत:भोवती फिरणाऱ्याचा आणि जोडीदाराभोवती फिरण्याचा काळ हा सारखाच आहे. त्यामुळे आपण प्लूटोवर उभे राहिलो तर कॅरनची सतत एकच बाजू आपल्याला दिसेल आणि कॅरनवर उभे राहिलो तर प्लूटोची सतत एकच बाजू आपल्या समोर असेल. आपल्या सूर्यमालेत घडणारे अशा प्रकारचे परिणाम इतर सूर्यमालांतील ग्रहांच्या बाबतीतही नक्कीच घडत असणार.
मोहन आपटे
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

ब्रिटिश हिंदुस्थानचा पहिला व्हॉइसरॉय लॉर्ड कॅनिंग यांच्यानंतर लॉर्ड जेम्स एल्जिन हा व्हॉइसरॉय झाला. त्याचा जन्म २० जुलै १८११ रोजी लंडन येथे झाला. शालेय शिक्षण ईटन महाविद्यालयातून, तर महाविद्यालयीन शिक्षण ऑक्सफर्ड विद्यापीठातून झाले. हाऊस ऑफ कॉमन्समध्ये ते निवडून आले होते. १८४२ च्या सुमारास जमैकाचे गव्हर्नरही ते झाले. त्या सुमारास जमैकातील गुलामगिरी नुकतीच नष्ट झाल्याने काही समस्या, विशेषत: गुलामांच्या पुनर्वसनाच्या निर्माण झाल्या होत्या. त्या त्यांनी समर्थपणे हाताळल्या. तथापि त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला तो हिंदुस्थानचे व्हाइसरॉय असताना!
वहाबी आंदोलन या कट्टर मुसलमान टोळीचे बंड ही त्यांच्या कारकीर्दीतली व्हाइसरॉय असतानाची महत्त्वपूर्ण घटना. या आंदोलकांच्या पुढे काही काळ चक्क इंग्रजांनी माघार घेतली. पण नंतर मात्र एल्जिनने मोठय़ा कुशलतेने परिस्थितीचा सामना केला. भारताच्या वायव्य सीमेजवळील मलक्का या ठिकाणी इंग्रज आणि वहाबी यांच्यात जोरदार लढाई झाली. त्यात वहाब्याचा पराभव होऊन इंग्रजांनी मलक्का येथील त्यांचा किल्ला सुरुंग लावून फोडून टाकला. देशी संस्थांनिकांनी इंग्रजांचे विश्वासपात्र व्हावे म्हणून एल्जिननेही आग्रा, कानपूर, वाराणसी येथे शाही दरबार भरवले. तथापि वहाबी आंदोलकांची दगदग त्याला सहन न झाल्याने २० नोव्हेंबर १८६३ रोजी भारतातच त्याचे निधन झाले.
संजय शा. वझरेकर

चिमुकली, बोटाएवढी सुंदर परी आपल्या पाठीवरचे चमकदार निळे-जांभळे पंख घेऊन फुलात राहायची. पंखांवर चंदेरी खडीची नक्षी होती. परीच्या हातात जादूची कांडी असायची. पहाट झाली, की जादूची कांडी हातात घेऊन परी पंख पसरायची. दिवसभर फिरायची अन् अंधार पडायला लागला, की फुलात परत यायची. मध प्यायची आणि गाढ झोपून जायची.
आजही सकाळी ती उठली. दवाच्या थेंबांनी अंघोळ केली. दोन थेंब मध प्यायली. पाकळीची वस्त्रे घालून, केस मोकळे सोडून परी निघाली. जादूची कांडी हातात चमकायला लागली.
एका इमारतीपाशी छोटे मूल रडत होते. त्याला भूक लागली होती. आई पाहिजे होती. आई इमारतीच्या बांधकामात डोक्यावरून घमेल्यातून विटा वाहात होती. परीने जादूची कांडी फिरवली. मुलाच्या हातात बेसनाचा लाडू आला. त्यात बेदाणे होते. मूल हसायला लागले. परीने मुलाच्या गालावरून हात फिरवला आणि ती पुढे गेली.
एक आजोबा फुटपाथवर रस्ता ओलांडण्यासाठी कितीतरी वेळ उभे होते. रस्त्यावर मुंगीच्या ओळीसारखी आपली सारखी वाहने चालूच होती. आजोबा थकून गेले होते, उभे राहून राहून. परीने जादूच्या कांडीने वाहने थांबवली. आजोबांनी चष्मा नाकावर ओढला आणि काठी टेकत रस्ता ओलांडला. परीने आजोबांचा सुरकुतलेला हात रस्ता ओलांडताना घट्ट धरला होता.
एका दुकानाबाहेर छोटा मुलगा आणि त्याची ताई काचेमधून चपलांकडे पाहात होते. मुलगा म्हणाला, ‘ताई, मी पैसे जमवलेत ते घे. तुझ्याकडे किती आहेत? आईला चपला नाहीत. पायाला चटके बसतात तिच्या.’ परीने ते ऐकले आणि मुलीच्या फ्रॉकच्या खिशात हळूच आणखी पैसे ठेवले. जरावेळाने चपलांचे खोके घेऊन हसत, गप्पा मारत ती भावंडे दुकानाबाहेर पडलेली परीने पाहिली.
दिवसभर परीने अशी लोकांची दु:खे दूर केली. हळूहळू अंधार पडायला लागला. परीला वेलीतल्या घराची आठवण झाली. ती गाणे गात आपल्या फुलांच्या घरात शिरली.
स्वत:साठी जगतानाच इतरांनाही मदत केली तर संध्याकाळी घरी परतताना आनंदाचे, समाधानाचे गाणे आपल्याही मनात घुमत राहील. जे शक्य असेल ते इतरांसाठी करण्यातला आनंद मोठा आहे.
आजचा संकल्प - मी इतरांना मदत करेन.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com