Leading International Marathi News Daily

सोमवार, २० जुलै २००९


पुणे, १९ जुलै/प्रतिनिधी
दंड करणाऱ्या वाहतूक पोलिसाच्याच अंगावर एक उन्मत्त उच्चभ्रू व्यक्ती मोटार घालते.. वायपरच्या आधारे मोटारीच्या बॉनेटवर लटकलेल्या वाहतूक पोलिसाच्या जिवाची पर्वा न करता सत्तर ते ऐंशीच्या वेगाने चालवत मोटारचालक रस्त्यामध्ये येणाऱ्या मोटारसायकलींना चिरडतो.. आजूबाजूचे नागरिकही संतप्त होतात व मोटारीचा पाठलाग करतात.. तेवढय़ात रस्त्यावरून जाणारा एक वरिष्ठ पोलीस अधिकारी हे दृश्य पाहून मोटारीचा पाठलाग करतो.. अखेर पिस्तुलातून सहा गोळ्या हवेत झाडून वरिष्ठ पोलीस अधिकारी मोटारचालकाला ताब्यात घेतो.. एखाद्या हिंदी किंवा इंग्रजी चित्रपटाला साजेशा या पाच मिनिटांच्या थरारनाटय़ाचा अनुभव लष्कर भागातील नागरिकांनी आज (रविवारी) सकाळी सव्वाअकराच्या सुमारास घेतला.

लाडका ‘राजा’ गेला..!
पिंपरी, १९ जुलै/प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बहिणाबाई चौधरी उद्यानातील कर्मचाऱ्यांचा जीव की प्राण.. बालचमूंचा लाडका.. कात्रजच्या उद्यानातील ‘बाबा’ या बिबटय़ाचा राजबिंडा वारस अन् खेळकर स्वभावाचा ‘राजा’ आज सर्वाना चुटपूट लावून काळाच्या पडद्याआड गेला.
पुण्यातील कात्रज येथील प्राणी संग्रहालयात ‘राजा’चा जन्म झाला होता. अवघ्या पुण्यनगरीला लळा लावणाऱ्या ‘बाबा’ या बिबटय़ाचा तो वारस. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिंचवड येथे निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी उद्यान विकसित करण्यात आल्यानंतर १९९६ मध्ये ‘बाबा’च्या छाव्याला येथील उद्यानात आणण्यात आले. त्याचे नामकरण ‘राजा’ करण्यात आले.

वेळापत्रकाला सर्वसाधारणपणे यश, तर कोठे फटकाही!
पुणे, १९ जुलै / प्रतिनिधी

टंचाईच्या काळातील पाणीकपातीचे वेळापत्रक प्रत्यक्ष अमलात आणण्यात महापालिका प्रशासनाला बऱ्यापैकी यश आले असले तरी या वेळापत्रकाचा काही भागांना फटका बसला असला आहे, तरी काही भागांना ‘फायदा’ ही झाला आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये अत्यल्प प्रमाणात पाणीसाठा शिल्लक राहिल्यामुळे शहराच्या पाणीपुरठय़ात २० टक्के कपात करण्यात आली होती. त्यानंतरही पावसाने ओढ दिल्यामुळे कपातीचे प्रमाण ४० टक्के करण्यात आले.

दोषींवर कारवाईचे आयुक्तांचे आदेश
विशेष सभा बोलावण्याची विरोधी पक्ष नेत्यांची मागणी
पिंपरी महापालिकेतील २४८ कोटींचा घोळ

अविनाश चिलेकर, पिंपरी, १९ जुलै

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील गेल्या बावीस वर्षांच्या लेखापरीक्षणात तब्बल २४८ कोटी रुपयांचा महाघोटाळा उघडकीस आल्याचे ‘लोकसत्ता’ ने नुकतेच उघडकीस आणले. पालिका प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेतली असून आयुक्त आशिष शर्मा यांनी संबंधित दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाईचे स्पष्ट आदेश दिले आहेत.

‘एचआयव्ही’ग्रस्तांना जगण्याचा ‘मार्ग’ देणारे संकेतस्थळ!
पुणे, १९ जुलै/प्रतिनिधी

एचआयव्ही किंवा एड्सग्रस्त आहोत म्हणून समाज आपल्याला वाळीत टाकेल की काय या भीतीपोटी त्यांच्यापासून दूर राहणाऱ्या रुग्णांच्या समस्या, एचआयव्ही, एड्स म्हणजे काय? त्याविषयीच्या शंकाकुशंका, नोकरीच्या संधी, आरोग्य विमा, विवाहपूर्व चाचणी योग्य की अयोग्य यासारख्या प्रश्नांची उत्तरे आता सहजगत्या मिळणार आहेत..!

‘स्वाइन फ्लू’ साठी आता ‘वायसीएम’मध्ये स्वतंत्र कक्ष
सुविधा उपलब्ध करण्याचे आदेश
पुणे, १९ जुलै / प्रतिनिधी
‘स्वाइन फ्लू’ च्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने नायडू संसर्ग रुग्णालयातील कक्षावर येणारा ताण पाहता आता पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालय आणि औंधमधील जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र दोन कक्ष सुरू करण्याचे आदेश उपसंचालक डॉ. यशवंत डोईफोडे यांनी दिले आहेत. त्यानुसार प्रत्येकी सहा खाटांची क्षमता सुरू करण्यात येणार आहे.

कुऱ्हाडीने वार करून पत्नीचा खून
चाकण, १९ जुलै/वार्ताहर

किरकोळ कारणावरून पत्नीच्या डोक्यात व अंगावर कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची घटना आज (दि. १९) दुपारी अडीचच्या सुमारास निघोजे (ता. खेड) येथील कुरणवस्तीत घडली.
ताराबाई अशोक येळवंडे (वय ३७ वर्षे, रा. कुरणवस्ती, निघोजे, ता.खेड) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव असून याप्रकरणी पती अशोक काशिनाथ येळवंडे (वय ४० वर्षे) यास पोलिसांनी खुनात वापरलेल्या हत्यारासह ताब्यात घेतले आहे. या संदर्भात चाकण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज (दि. १९) दुपारी अडीचच्या सुमारास पती अशोक येळवंडे याने घरात कुणीही नसताना किरकोळ कारणावरून पत्नी ताराबाई येळवंडे हिच्या डोक्यात, मानेवर, पाठीवर, हातावर धारदार कुऱ्हाडीने वार करून खून केला.

‘पब’ परवानगीबाबत भाजपकडून निषेध
पुणे, १९ जुलै / प्रतिनिधी
सेनापती बापट रस्त्यावरील इमारतीत ‘पब’ सुरू करण्यास ‘ना हरकत प्रमाणपत्र’ घेण्यासाठी तेथील नागरिकांवर पोलिसांनी टाकलेल्या दबावाच्या कथित घटनेचा निषेध भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चातर्फे करण्यात आला आहे. संघटनेचे अध्यक्ष व नगरसेवक मुरली मोहोळ यांनी याबाबतचे निवेदन पोलीस आयुक्त यांच्या नावाने आयुक्तालयामध्ये दिले आहे. पोलिसांनी नागरिकांवर दबाव टाकला असल्यास तो गंभीर प्रकार असून त्याची चौकशी करण्याची मागणी मोहोळ यांनी निवेदनामध्ये केली आहे.

दहावी-बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
पुणे, १९ जुलै/प्रतिनिधी
देशाचा विकास करू इच्छिणारी पिढी घडवायची असेल तर सध्याच्या शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल घडवायला हवा, असे प्रतिपादन प्राचार्य सुधाकर जाधवर यांनी केले. भारतीय जनता पक्षाच्या प्रभाग क्र.१३६ व १४२ च्या वतीने दहावी-बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते. आमदार दिगंबर भेगडे, नगरसेवक अनिल शिरोळे आदी या प्रसंगी उपस्थित होते. या वेळी आमदार भेगडे, नगरसेवक शिरोळे, मंदाकिनी साबळे, शिवाजी जाधव यांनीही उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दिगंबर डवरी यांनी प्रास्ताविक केले.

आर्थिक मदतीचे आवाहन
पुणे, १९ जुलै / प्रतिनिधी

राजू साळवी (राहणार वडगाव बुद्रुक) हे पेपर विकण्याचा व्यवसाय करतात. साळवी यांचा मुलगा अजिंक्य (वय ६ वर्षे) हा हृदयास छिद्र असल्यामुळे आजारी असून, इनलॅक्स बुधरानी हॉस्पिटल येथे या मुलाच्या हृदयावर शस्त्रक्रिया होणार आहे. साळवी यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असून, त्यांनी आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे. याबाबत ९४२२२८२२७६ वर संपर्क साधावा.

शालनताई शिंदे यांचे निधन
पुणे, १९ जुलै/प्रतिनिधी
एकता महिला मंडळाच्या अध्यक्षा शालनताई उल्हास शिंदे (वय ६५) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्यामागे पती, दोन मुलगे, एक मुलगी असा परिवार आहे.

भोसरीचे नियोजित नाटय़गृह ‘बीओटी’वर देण्याचा निर्णय
िपपरी, १८ जुलै / प्रतिनिधी

चिंचवडगावातील बसस्टॉपजवळील वादग्रस्त बहुउद्देशीय इमारत आणि भोसरीचे कोटय़वधी रुपये खर्चाचे आलिशान नाटय़गृह बीओटीवर देण्याचा निर्णय अखेर आज िपपरी पालिकेच्या बैठकीत घेण्यात आला. महापौर अपर्णा डोके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आजच्या बैठकीत आयुक्त आशिष शर्मा, अतिरिक्त आयुक्त सुभाष डुंबरे, शहर अभियंता एकनाथ उगिले, पक्षनेते जगदीश शेट्टी, समन्वयक नीलकंठ पोमण आदी उपस्थित होते. या दोन्ही जागा मोक्याच्या आहेत, त्या बीओटीवर गेल्यास िपपरी पालिकेच्या उत्पन्नात चांगल्याप्रकारे भर पडेल, असा युक्तिवाद करण्यात आला. याशिवाय, रस्त्यावरच्या खड्डय़ांची माहिती मिळण्यासाठीचे एक सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे, त्याचे सादरीकरण या बैठकीत करण्यात आले. या कामासाठी नियुक्त करण्यात आलेली माणसे शहरभर फिरणार असून खड्डय़ांची अचूक जागा संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याला एसएमएसद्वारे कळविण्याची व्यवस्था त्यामध्ये असल्याचे सांगण्यात आले.

विजेच्या लपंडावाने लघुउद्योजक त्रस्त
पिंपरी, १७ जुलै / प्रतिनिधी

विजेच्या लपंडावामुळे पिंपरी-चिंचवडचे लघुउद्योजक भयंकर त्रस्त असल्याची तक्रार, लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष सुरेश म्हेत्रे यांनी राज्याचे ऊर्जामंत्री सुनील तटकरे यांच्याकडे केली. भोसरी येथे डिस्ट्रीक सेंटर जवळच्या ‘२२० केव्ही उपकेंद्रा’चे भूमिपूजन तटकरे यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. या वेळी लघुउद्योजकाचे शिष्टमंडळ त्यांना भेटले. म्हेत्रे यांच्यासह संघटनेचे सचिव नितीन बनकर व काही प्रमुख पदाधिकारी या शिष्टमंडळात सहभागी झाले होते. शहर परिसरातील चिखली, कुदळवाडी, शेलार वस्ती, मोशी तसेच भोसरी, आनंदनगर, गुळवेवस्ती, तळवडे, ज्योतिबानगर, मोहननगर या भागात सुमारे सात हजार लघुउद्योजक आहेत.

सेवा बँक निवडणुकीत शैलेश पालवे विजयी
पिंपरी, १९जुलै / प्रतिनिधी
येथील सेवा विकास बँकेच्या संचालक मंडळाच्या एका जागेसाठी झालेल्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत विकास पॅनेलचे उमेदवार शैलेश भीमराव पालवे हे निवडून आले. या बँकेचे संचालक जयराज पालवे यांचे अपघाती निधन झाल्याने या जागेसाठी आज पोटनिवडणूक घेण्यात आली. बँकेतील सत्तांतरासाठी ही एका जागा महत्वाची असल्याने या निवडणुकीत भलतीच चुरस होती.नगरसेवक अमर मूलचंदानी यांच्या नेतृत्वाखालील सेवा पॅनेलचे सुरेश अमरसिंह राजपूत हे पालवे यांच्या विरोधात रिंगणात होते. पालवे यांना १६८७ तर राजपूत यांना १५०७ मते मिळाली.

चाकणजवळ तबलावादकाची आत्महत्या
चाकण, १९ जुलै/वार्ताहर

चाकण-शिक्रापूर रस्त्यावर असलेल्या ‘साबळेवाडी (ता. खेड) गावच्या हद्दीतील त्रिमूर्ती कलाकेंद्रातील तबलावादक कलावंताने कलाकेंद्राच्या मुख्य प्रवेशद्वाराला साडी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. विक्रम सुदाम मोहरकर असे आत्महत्या केलेल्या कलावंताचे नाव आहे, अशी माहिती चाकण पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार प्रभाकर बनकर यांनी दिली. येथील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चाकण-शिक्रापूर रस्त्यावर साबळेवाडी गावच्या हद्दीत त्रिमूर्ती कलाकेंद्र आहे. या कलाकेंद्रातील तबलावादक कलाकार विक्रम सुदाम मोहरकर (वय २९ वर्षे, रा. त्रिमूर्ती तमाशा थिएटर कला केंद्र, साबळेवाडी, ता. खेड) याने कलाकेंद्रातील मुख्य प्रवेशद्वाराला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मोहरकर याने आत्महत्या केल्याने तर्कवितर्काना उधाण आले असून, परिसरात हा चर्चेचा विषय झाला आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजले नसून, त्याचे थोरले बंधू ज्ञानेश्वर सुदाम मोहरकर (वय ३१ वर्षे, रा. आर्यभूषण तमाशा थिएटर, गणेश पेठ, पुणे) यांनी या घटनेची खबर चाकण पोलीस ठाण्यात दिली.