Leading International Marathi News Daily

सोमवार, २० जुलै २००९

राज्य

‘जाणता राजा’समोर पुन्हा ‘संघर्षां’तून ‘समन्वया’चा प्रयोग
२६ जुलैचा मुहूर्त
राजीव कुळकर्णी

दिल्लीचे तख्त मिळविण्यासाठी राष्ट्रवादीच्या ‘जाणता राजा’ने लोकसभा संग्रामाच्या काळात विविध डावपेच आखले. संघर्ष अन् समन्वय यांच्यातील खणखणाट टाळण्यासाठी समन्वयवाद्याला मोठी कुमक देऊन कल्याणच्या स्वारीवर पाठविले तर संघर्षशील नेत्याला शत्रूच्या ताब्यातील ठाण्याचा बालेकिल्ला मिळविण्याच्या अवघड मोहिमेवर धाडले. फंदफितुरीमुळे कल्याणचा गड सर करणे समन्वयवादी सरदाराला शक्यच झाले नाही, तर संघर्षवाद्यांचे नेतृत्व करणाऱ्या सुभेदाराने युद्ध जिंकण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व आधुनिक अस्त्रांचा वापर केल्याने अभेद्य मानल्या गेलेल्या ठाण्याच्या गडावर राष्ट्रवादीचा गजर घुमला.

वृक्षतोड करणाऱ्यांना साग लागवडीची ‘शिक्षा’
चिपळूण, १९ जुलै/वार्ताहर
वृक्षतोड करणाऱ्यांकडून वनविभागाने तालुक्यात तब्बल ४० हजार सागांची लागवड करून घेतली. वृक्षतोडीमुळे पर्यावरणाच्या ढासळणाऱ्या संतुलनाचा समतोल राखण्यासाठी वनविभागाने राबविलेल्या या उपक्रमाला प्रथमच मोठय़ा प्रमाणावर प्रतिसाद मिळाला आहे. चिपळूण तालुक्यात दरवर्षी मोठय़ा प्रमाणावर वृक्षतोड केली जाते. सार्वजनिक क्षेत्रातील वृक्षतोड मोठय़ा प्रमाणात होते, अशी ओरड होत असते. मात्र खासगी क्षेत्राचाही वृक्षतोडीत समावेश अधिक दिसून येतो.

‘मच्छिमारांचीही कर्जे माफ होणार’
पालघर, १९ जुलै/वार्ताहर

शेतकऱ्यांप्रमाणेच मच्छिमारांचीही कर्जे माफ झाल्याखेरीज राहणार नाही, अशी नि:संदिग्ध ग्वाही मत्स्यविकास सभेची रवि पाटील यांनी सातपाटी येथे आयोजित कार्यक्रमात दिली. त्यांच्या या घोषणेचे कार्यक्रमास उपस्थित शेकडो मच्छिमार बंधू-भगिनींनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. मत्स्यविकास मंत्र्यांनी दातिवरे-एडवण-केळवे-वडराई, तसेच सातपाटी येथे कोकण पॅकेजअंतर्गत विविध प्रकल्पांचे भूमिपूजन सर्वत्र मोठय़ा उत्साहाच्या वातावरणात पार पडले. काँग्रेसच्या राज्य अनुसूचित जमाती सेलचे अध्यक्ष राजेंद्र गावित यांनी या दौऱ्याचे आयोजन केले होते.

परिवहन मंडळाची महत्त्वाच्या स्थानकांमधील उपाहारगृहे बंद
संगमेश्वर, १९ जुलै/वार्ताहर

समुद्रमार्गे होणारी प्रवासी वाहतूक बंद झाल्यावर कोकणात येण्यासाठी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग हा एकमेव पर्याय शिल्लक राहिला. सुमारे १२ वर्षांपूर्वी कोकण रेल्वे धावू लागली व वाहतुकीचा एक नवा पर्याय उपलब्ध झाला. त्याचा सर्वाधिक फटका राज्य परिवहन मंडळाला बसला असून, या धक्क्यातून सावरणे मंडळाला अजूनही शक्य झाले नसल्याचे महत्त्वाच्या स्थानकांमधील बंद उपाहारगृहांवरून लक्षात येत आहे.

वाइनवरील व्हॅट कमी करण्याचे शरद पवारांचे राज्य सरकारला आदेश
नाशिक, १९ जुलै / प्रतिनिधी

वाइनवरील व्हॅट कमी करण्याबरोबरच राज्यातील वाइन द्राक्ष उत्पादक शेतकरी व वाइन उद्योगाबाबत महत्त्वाचे निर्णय राज्य सरकारने त्वरीत घ्यावेत, असे आदेश केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी मुंबईत आज झालेल्या बैठकीत दिल्याची माहिती नाशिकचे खासदार समीर भुजबळ यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आर. आर. पाटील, अर्थमंत्री दिलीप वळसे पाटील, उत्पादन शुल्क मंत्री गणेश नाईक, खा. समीर भुजबळ, वाइन असोसिएशनचे प्रतिनिधी शाम चौघुले, उत्पादनशुल्क सचिव संगीतराव आदी यावेळी उपस्थित होते.

संगमेश्वर चाळकेवाडी रस्ता धोकादायक
संगमेश्वर, १९ जुलै/वार्ताहर

संगमेश्वरहून असुर्डेमार्गे चाळकेवाडीकडे जाणारा रस्ता असुर्डे गावापासून अत्यंत धोकादायक बनला असून रस्ता खचणे, असंख्य खड्डे पडणे, दरडीची माती सैल होणे, गटारे अस्तित्वात नसणे यासारख्या प्रकारांमुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बांधकाम विभागाने रस्त्याच्या दुरुस्तीबाबत हतबलता दर्शविल्याने उपसरपंच राकेश जाधव यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

भाज्या ५० रुपये किलोवर, तूरडाळीने गाठले शतक!
नागपूर, १९ जुलै/ प्रतिनिधी
महागाईने सर्वसामान्य नागरिकच नव्हे तर मध्यमर्गीय भरडून निघत असून महागाई कमी होण्याची कुठलीही शक्यता दिसून येत नाही, उलट ती वाढतच चालली आहे. पेट्रोलची दरवाढ आणि शेतकऱ्यांनी न केलेली लागवड याचा फटका भाज्यांना बसला असून कांदे-बटाटे सोडले तर एकही भाजी ५० रुपये किलोच्या खाली नाही, गेल्या आठवडय़ात ९० रुपये किलो विकली जाणारी तूरडाळही आता १०० रुपये झाली आहे, त्यामुळे सर्व सामान्यांच्या घरच्या जेवणातून वरण हळूहळू कमी होत चालले आहे.

मोकाट गुरांच्या हल्ल्यात शाळकरी मुली जखमी
संगमेश्वर, १९ जुलै/वार्ताहर

संगमेश्वरमधील मोकाट गुरे, गाढवे आणि कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असून, मोकाट गुरांच्या भांडणात दोन शाळकरी मुली गंभीर जखमी झाल्याची घटना बाजारपेठेत घडल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. सर्व मोकाट प्राण्यांचा ग्रामपंचायतीने तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

प्रस्तावित महापालिकाविरोधात ‘गाव वाचवा जनआंदोलन’!
सोपान बोंगाणे, ठाणे, १९ जुलै

जनतेच्या व ग्रामसभांचा विरोध डावलून वसई-विरार महापालिकेत समाविष्ट केलेल्या ग्रामीण भागाला महापालिका हद्दीतून वगळण्याच्या मागणीसाठी आता या परिसरातील सर्व राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी एकत्रितपणे लढा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्वपक्षीय लढय़ासाठी ‘गाव वाचवा जनआंदोलन’ या नव्या सर्वपक्षीय संघटनेची स्थापना करण्यात आली असून, सोमवार, २० जुलैपासून संपूर्ण ग्रामीण पट्टय़ात दोन दिवसांची जनजागरण यात्रा काढण्याचा निर्णय कामण येथे झालेल्या नेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला.

महामुंबई ‘एसईझेड’ च्या पाण्याच्या स्रोताची मान्यता रद्द
रिलायन्सला शासनाचा आणखी एक धक्का
अलिबाग, १९ जुलै/प्रतिनिधी
रिलायन्स कंपनीचा ‘महामुंबई विशेष आर्थिक क्षेत्र’ प्रकल्प सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाअंती अडचणीत आलेला असतानाच, या प्रकल्पासाठी पाण्याचा स्रोत म्हणून राज्य शासनाने ६ जानेवारी २००७ रोजी तत्त्वत: मान्यता दिलेल्या पेण तालुक्यातील बाळगंगा नदीवरील धरण प्रकल्पाची मान्यता व त्या संबंधीचे सर्व निर्णय रद्द करून रिलायन्स कंपनीस आणखी एक धक्का दिला आहे.

निखिल वेल्हाळचे यश
देवरुख, १९ जुलै/वार्ताहर

साखरपा येथील श्रीराम तुकाराम गणशेट गांधी विद्यालयाने दहावी परीक्षेत यावर्षी विद्यालयाच्या आजवरच्या इतिहासातील उच्चांक मोडला असून, निखिल वेल्हाळ याने ९३.६९ टक्के गुण मिळवून स्पृहणीय यश मिळवले आहे. एवढे गुण शाळेत यापूर्वी कोणीही मिळविले नव्हते. सर्वसामान्य कुटुंबातील असणाऱ्या निखिलचे त्याची मेहनत आणि यशाबद्दल उत्स्फूर्त अभिनंदन होत आहे. अभ्यासासमवेत निखिलने विज्ञान प्रकल्प, कविता, वैज्ञानिक पुस्तके वाचणे या आवडी जोपासल्या आहेत. विद्यालयाच्या नव्या उच्चांकाबद्दल संस्था व शिक्षकवृंदाचेही पालकांमधून विशेष अभिनंदन होत आहे.

रसायनी परिसरात वृद्धेचा खून
खोपोली, १९ जुलै/वार्ताहर

रसायनी-मोहोपाडा येथील श्रीराम मंदिराजवळील बंगल्यात राहणाऱ्या सुनीता विनायक सोमण या ६२ वर्षांच्या वृद्ध महिलेचा अज्ञात इसमाने आज सकाळी खून केल्याचे आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली असून, नागरिक भयग्रस्त झाले आहेत. विनायक सोमण व त्यांच्या पत्नी सुनीता हे वृद्ध दाम्पत्य मंदिरालगतच्या या बंगल्यात गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्य करून आहेत. शनिवारी सोमण बाहेरगावी गेल्यामुळे सुनीता घरी एकटय़ाच होत्या. आज सकाळी दूधवाला आला तेव्हा ही घटना उघडकीस आली. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

हा आठवडा पावसाचा..
पुणे, १९ जुलै / खास प्रतिनिधी
बंगालच्या उपसागरात पुन्हा हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून, त्याचा परिणाम म्हणून येत्या आठवडय़ात राज्यात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. येत्या दोन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्रात आणि त्या पाठोपाठ राज्याच्या इतर भागांत पाऊस वाढण्याचा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आला आहे. हा अंदाज खरा ठरला तर आगामी आठवडा पावसाचा असेल. महाराष्ट्रात मागचा आठवडा पावसाचा गेला. आठवडय़ापूर्वी बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबामुळेच हे घडले होते. अशी अनुकूल स्थिती या हंगामात पहिल्यांदाच निर्माण झाली होती. त्यानंतर आता पुन्हा असेच अनुकूल चित्र आहे. बंगालच्या उपसागरात या हंगामातील दुसरे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे बंगालचा उपसागर व त्याला लागूनच असलेल्या ओरिसावर मोठय़ा प्रमाणात ढग जमा झाले आहेत. त्याचबरोबर ओरिसामध्ये पावसाचा जोरही आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम आता महाराष्ट्रात जाणवण्याची शक्यता आहे. परिणामी, येत्या आठवडय़ात राज्याच्या बहुतांश भागात चांगला पाऊस अपेक्षित आहे.

सौजन्या जाधव प्रकरणी आरोपींना जामीन
बेलापूर, १९ जुलै/वार्ताहर

कोपरखैरणे येथील सौजन्या जाधव या तरुणीची छेडछाड व तिच्या कुटुंबियांना मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या आरोपावरून अटक केलेल्या आठ आरोपींना वाशी दिवाणी न्यायालयाने आज जामिनावर सोडले.राष्ट्रवादी काँग्रेसचे विलास सणस, सुरेश सणस यांच्यासह आठ जणांनी केलेल्या मानसिक छळवणुकीमुळे सौजन्याने आत्महत्या केल्याचा आरोप जाधव कुटुंबियांकडून करण्यात आला होता. गेल्या सहा महिन्यांपासून हे समाजकंटक नवी मुंबईतील सत्तेच्या जोरावर जाधव कुटुंबियांना सातत्याने सतावत होते.या प्रकरणी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात तक्रार केल्यावर राजकीय दबावामुळे सदर आरोपींवर कारवाई न करता उलट जाधव कुटुंबियांनाच पोलीस खाक्यास सामोरे जावे लागले होते. त्यामुळे सौजन्याने आत्महत्या केल्याचे कुटुंबियांचे म्हणणे होते.