Leading International Marathi News Daily

सोमवार, २० जुलै २००९

शेतीवाडी
(सविस्तर वृत्त)

सीडलेस कलिंगडाचे पराग संवर्धन
बिनबियाची फळे निर्माण करण्यात नव्या तंत्रज्ञानाने मोठे यश मिळवून दिले आहे. कधी-काळी बियांसह असलेली द्राक्षे खाताना बिया टचा-टच दाताखाली फुटायच्या. आता अनेक वर्षांमध्ये

 

सीडलेस द्राक्षे व त्याचे नवे वाण आले. त्याचे उत्पादनही सहज उपलब्ध झाले व बियांची द्राक्षे जणू इतिहासजमा झाली. आजही काही जातींची बियांसह द्राक्षे उपलब्ध असली, तरी बिनबियांच्या द्राक्षांकडेच अधिक कल राहतो. कोकण कृषी विद्यापीठात बिनकोयीचा आंबा तयार करण्यात यश आले. बिनबियाची पपई उपलब्ध झाली. आता बिनबियाचे कलिंगडही अधिक मोठय़ा प्रमाणात उपलब्ध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण जपानमधील एका संशोधन संस्थेने अशा बिनबियाच्या कलिंगडाच्या फुलांचे संयुगीत परागकण किमान वर्षभर टिकवून ठेवता येतील, असे तंत्रज्ञान विकसित केले आहे. खरे तर पन्नास वर्षांपूर्वीच बिनबियाचे कलिंगड विकसित करण्यात आले होते. मात्र त्याचे संयुगीत परागकण फार काळ टिकवता येत नव्हते.
जपानच्या संशोधन संस्थेच्या मते त्यांच्या नव्या तंत्रज्ञानामुळे व्यापक प्रमाणावर बिनबियाची कलिंगडे उत्पादन करणे व नवे उत्पन्नाचे साधन मिळविणे सहजशक्य आहे. बिनबियाचे कलिंगड तयार केले जाते ते कलिंगडाच्या नर फुलातील परागकणांचे क्ष-किरण संयुगातून. मात्र हे परागकण अवघे काही दिवसच फलनयोग्य राहू शकतात. कृत्रिमरीत्या करण्यात येत असलेल्या या फलधारणा प्रक्रियेत जादा प्रमाणात शेतमजुरांचीही आवश्यकता पडते. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात अशी लागवड करणे अवघड बनत जाते. हे पराग अधिक काळ टिकविण्यावर गेली काही वर्षे संशोधन चालू होते. नव्या संशोधनानुसार बिनबियाचे हे क्ष-किरण संयुगीत परागकण आता नत्रासह पिशवीत ठेवता येतात. नंतर पिशवीतील परागाचे तापमान उणे २५ अंशांपर्यंत खाली आणण्यात येते. एखाद्या मोठय़ा कंपनीने ही प्रक्रिया हाती घेतली, तर शेतक ऱ्यांचा उत्पादन खर्च वाचवितानाच व्यापक प्रमाणावर बिनबियांच्या कलिंगडांचे उत्पादन शक्य होईल, असा विश्वास संशोधन संस्थेने व्यक्त केला आहे. कलिंगड हे उन्हाळ्यातील लोकप्रिय फळ असले, तरी बिनबियाचे कलिंगड हे सध्या जगभरात बाजारात उपलब्ध असते केवळ एक टक्काच. पण नव्या तंत्रामुळे त्याचे प्रमाण झपाटय़ाने वाढू शकते.
बिनबियांचे फळ घडविण्याची ताकद असते जनुकांमध्ये. सर्वसाधारण कलिंगडामध्ये असतात २२ क्रोमोझोन्स. या क्रोमोझोन्समध्ये असतेय ती सजीवतेची वैशिष्टय़े व त्याच्या गुणविशेषांची जनुकीय माहिती. बिनबियाचे कलिंगड बनविण्यासाठी पर्यायी तसलेच व तेवढेच क्रोमोझेन्स तयार करू शकणाऱ्या इतर वनस्पतींचा वापर केला जात असे. अशा कलिंगडात मग ४४ क्रोमोझोन्स तयार होतात. नंतर या नव्या कलिंगडाच्या परागकणांचे सर्वसाधारण कलिंगडाच्या रोपटय़ाच्या परागांशी मधमाशांच्या साहाय्याने संयोगीकरण होते. जेव्हा मधमाशा ४४ क्रोमोझोन्स असलेल्या कलिंगडाच्या फुलांचे २२ क्रोमोझोन्स असलेल्या कलिंगडाच्या वेलाच्या फुलाशी परागीकरण, फलन करतात, तेव्हा तेथे तयार होते बिनबियाचे कलिंगड. अर्थात काही वेळा अशा किलगडांमध्ये अत्यल्प प्रमाणात बीदेखील राहू शकते.
फिरस्ता