Leading International Marathi News Daily

सोमवार, २० जुलै २००९

शेतीवाडी
(सविस्तर वृत्त)

जीएम पिके : समज-गैरसमज
येत्या तीन वर्षांत वांगी, टोमॅटो व फ्लॉवर या तीन भाज्यांचे जीएम वाणांचे उत्पादन देशात सुरु होत

 

आहे. जीएम पिकांबद्दल अनेक उलट-सुलट चर्चा होतात. याबाबतचे लेख ‘शेतीवाडी’तून देण्याचा प्रयत्न आहे. समर्थक व विरोधक अशा दोन्ही बाजूंना येथे स्थान दिले जाईल.
कोल्हापूरच्या बगलेतील कसबा बावडा येथील कृषी खात्याच्या जमिनीत तज्ज्ञांच्या देखरेखीखाली एक एकर नवीन मक्यांच्या वाणाचे चाचणी प्रयोगासाठी लागवड केली होती. सदर मका जी.एम. (जेनेटिकली मॉडीफाईड) असून त्याचा मानवी आरोग्याला, पर्यावरणाला धोका असल्याचे आरोप करून ते ताबडतोब उपटून टाकावे, प्रयोग बंद करावे, अशी मागणी करीत काही लोकांनी आंदोलन उभे केले. या आंदोलनाला प्रसार माध्यमांनी प्रसिद्धीही खूप मोठी दिली.
या मक्यासंबंधी केलेले आरोप खरोखरच अतिशय गंभीर होते. उदा.- विजातीय जनुकांचा वापर केल्याने अन्न विषारी व नत्रे, मानव, पशू आणि पर्यावरणास घातक टर्मिनेटर बियाणे शेतकऱ्यांना परावलंबी बनवते. जगातील १२२ देशांनी या बियाणाला बंदी घातली आहे. ऑस्ट्रिया येथील अभ्यास यामुळे मानवी प्रजननावर परिणाम होतो म्हणून बंदी घातली. बी.टी. कापूस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांनी मोठय़ा प्रमाणात आत्महत्या केली. महिला आणि मुलींच्या वाढीवर परिणाम होतो. कोल्हापुरातील जी.एम. मक्याच्या प्रयोगासाठी एक एकर जमीन प्रतिमहिना एक लाख रुपये दराने भाडय़ाने दिली आहे. त्यावर खासगी सुरक्षारक्षकाचा पहारा आहे. तारेचे कुंपणही घातले आहे. त्यातून जनुके बाहेर पडल्यास त्याचा इतर मक्यात शिरकाव होण्याची शक्यता आहे. म्हणून १०० मीटर परिसरातील इतर मका काढण्यात आला. तरीही आजूबाजूच्या शेतकऱ्यांची पिके धोक्यात आली आहेत. मक्याच्या प्रदूषणाची तीव्रता १ कि.मी.पर्यंत जाणवेल. मक्याच्या सेवनाने महिलांना वंधत्व तर इतरांना मानवी अवयव खराब होण्याचा धोका. हे अनेक देशात सप्रयोग सिद्ध केले आहे. मोन्सॅटो बियाणाबरोबर तणनाशकही घेण्यास भाग पाडते. मोन्सॅटो टोमॅटोच्या साली कठीण करण्यासाठी डुकराचे जीन्स वापरते. वगैरे वगैरे..
बी.टी. काय आहे? जमिनीत, मातीत सापडणाऱ्या जीवाणूतील जनूक आहे. हा जनूक बोंडआळी वर्गातील आळ्यांच्या पचनसंस्थेला घातक असणाऱ्या प्रथिनाची निर्मिती करतो. सदर प्रथिन बोंडअळी वगळता अन्य कोणत्याही जीव, जंतू, प्राणी आणि मानवाला अजिबात अपायकारक नाही. कारण इतरांची पचनसंस्था बोंडअळीपेक्षा वेगळी आहे. मक्याचे कणीस पोखरणारी अळी किंवा मुळ्या खाणाऱ्या अळीने मक्याच्या झाडाचा रस चोखला की मरते. सदर प्रथिन फक्त अळीलाच मारक असल्याने जनावरे आणि माणसे यांना अजिबात अपायकारक नाही. हे भारतातही प्रचंड मोठय़ा प्रमाणात सिद्ध झालेले आहे. आज भारतात ७० लाख हेक्टर बी.टी. कापूस घेतला जातो. कापसाची सरकी जनवारे खात आहेत. त्याचा तेलाचा वापर माणसं करीत आहेत. तरीही कोणतेही दुष्परिणाम झाल्याचे उदाहरण नाही. सदर बी.टी. मका मुळ्या खाणाऱ्या आणि कणीस पोखरणाऱ्या आळ्यांपासून पूर्णपणे सुरक्षित आहे. म्हणून त्यांच्या नियंत्रणासाठी कीटनाशक अजिबात वापरावे लागत नाही. त्यामुळे कीटकनाशकांचा खर्च वाचतो. पिकाचे १०० टक्के संरक्षण होते. कीटकनाशकावरील अवलंबित्व कमी होते.
या मक्यात ग्लासफॉसेट तणरोधक जनूक आहे. मक्याचे पीक घेताना तणाचे नियंत्रण करण्यासाठी उगवणीपूर्वी तणनाशक वापरावे लागते, उगवल्यानंतर पिकाला मारणार नाही अशा पद्धतीने तणनाशके वापरावी लागतात. तरीही पिकाशेजारी तणे उगवतातच. ती हाताने खुरपावी लागतात. यामुळे तणनाशक आणि मजुरी याचा खर्च वाढतो. पण ग्लायफॉसेट तणरोधक जनूक असलेल्या मक्यात उगवण झाल्यानंतर फक्त एकदाच ग्लायफॉसेट तणनाशक फवारणीने तणांचे नियंत्रण होते. कारण या तणनाशकाने तण मरतात पण मका मरत नाही.
बी.टी. आणि ग्लायफॉसेट प्रतिरोधक जनूक असलेला मका माणसे आणि जनावरे यांना अपायकारक नाही हे स्पष्ट आहे. सदर मका अमेरिकेत, ब्राझीलमध्ये लाखो हेक्टर जमिनीत पिकवला जातो. सदर मका गेली दहा वर्षे तेथे माणसं आणि जनावरं खाताहेत. काहीही दुष्परिणाम झाल्याचा पुरावा नाही. कोणतेही जी.एम. वाण शेतकऱ्यांना देण्यापूर्वी त्यासंबंधी कसून वैज्ञानिक चाचणी करून सुरक्षित असल्याची खात्री करण्याचे अधिकार कृषी खात्याला आहेत. सर्व नियमांची पूर्तता करून चाचणी प्रयोग केले जात आहेत. या प्रयोगाचा खर्चही कंपनी करते. कोल्हापुरात संबंधित शेताजवळ झाडे खूप असल्याने आणि त्या परिसरात माकडांची संख्या मोठी असल्याने प्रयोगात अडचण निर्माण झाली. माकडापासून मका पीक सुरक्षित ठेवण्यासाठी कुंपण आणि सुरक्षा व्यवस्था मोन्सॅटे कंपनीने केली. यात मानवी आरोग्याला या मक्यापासून धोका असण्याशी काहीही संबंध नाही. सदर प्रयोगातील शेतापासून १०० मीटर अंतरात असलेल्या शेतकऱ्याला इतर मक्याच्या वाणाचे पीक काढण्यास सांगितले. त्याबद्दल नुकसान भरपाईसुद्धा कंपनीने दिली. चाचणी घेताना सदर वाण सुरक्षित नसल्याची शक्यता गृहीत धरूनच काळजी घेतली जाते. परागीभवनातून याचे पराग इतर पिकात जाण्याची शक्यता असते. तसेच इतर पिकातील पराग येथे येण्याची शक्यता असते. दोन्हीमुळे प्रयोगातील निष्कर्ष चुकीचे निघण्याचा संभव असतो. म्हणूनच १०० मीटर अंतरातील मका पीक वाढले गेले. यात गैर काही नाही.
पण शेतकरी संघटनेने शेतकऱ्याच्या हिताचा वैज्ञानिक प्रयोग बंद होतो आहे, असे दिसल्यानंतर त्याला विरोध करण्याची भूमिका घेतली. जी.एम. संबंधी केलेले आरोप सिद्ध करण्याचे आव्हान दिले. हे आरोप कसे खोटे आहेत हेही संघटनेने स्पष्ट केले. मात्र काही देशात जी.एम. वाणावर बंदी आहे, या विरोधकांच्या विधानात तथ्य आहे. मुख्यत: युरोपमध्ये जी.एम.वर अद्याप बंदी आहे. मात्र बंदीचा हा निर्णय वैज्ञानिक निकषावर झाला नाही.
मका हे गहू आणि भातानंतर तिसरे महत्त्वाचे अन्न पीक आहे. आफ्रिकेत मका हेच महत्त्वाचे अन्न आहे. जागतिक तापमानवाढीच्या कल्पनेत तथ्य असेल तर थंडी कमी होईल तसे गव्हाचे पीक घेणे अशक्य होणार आहे. त्यावेळी मका हेच पर्यायी अन्न पीक असेल. आजही विदर्भात खरिपात ज्वारी ऐवजी मका वाढतो आहे. पावसाने ज्वारी काळी पडते. मात्र मका सुरक्षित राहतो. कीटकनाशकाची गरज नसलेले तण नियंत्रण सहज करता येईल असे मक्याचे वाण शेतकऱ्यांना मिळत असेल तर ते थांबवणे यापेक्षा मोठा दुष्टपणा नाही. देशातील केवळ शेतकऱ्यांनीच नव्हे तर सूज्ञ लोकांनी याला विरोध केला पाहिजे. कोणतेही जी.एम. वाण सुरक्षित आणि फायदेशीर असेल तर भारतीय शेतकऱ्यांना ताबडतोब उपलब्ध झाले पाहिजे.
मक्याचा कारखानदारीतही मोठा वापर होतो. मक्यापासून स्टार्च, खाद्य तेल, प्रोटिन, मध, गोडवा देणारे पदार्थ, सौंदर्यप्रसाधन आणि आता इंधनही बनते. पशुखाद्यासाठीही मोठय़ा प्रमाणात वापर केला जातो. तसेच खाण्यासाठीही वापरला जातो. बेबीकॉर्न आणि गोड मका चवीने खाल्ला जातो. मुख्यत: कोरडवाहू उष्ण भागातील शेतकऱ्यांचे आधार पीक मका हेच आहे. विदर्भातही मका वाढतो आहे. कोल्हापुरातील प्रयोगात केवळ चांगल्या तण नियंत्रणामुळे ३० टक्के उत्पादन वाढेल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. केवळ या वाढीव उत्पादनामुळे देशातील मका शेतकऱ्यांना ५१६० कोटी रुपये जादा मिळतील, तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ४३० कोटी रुपये जादा मिळतील. मुख्य म्हणजे मका शेतकऱ्यांच्या स्पर्धा क्षमतेत मोठी वाढ होईल. खरिपात कोरडवाहू भागात पेरणी आणि तणांची खुरपणी एकाच वेळी येत असलेले मजूर मिळत नाहीत. त्यांच्या दृष्टीने जी.एम. मका खूपच लाभदायक ठरू शकेल. संपर्क- ९८२२४५३३१०
अजित नरदे