Leading International Marathi News Daily

सोमवार, २० जुलै २००९

क्रीडा

क्लार्कचे शतक; हॅडिनसह १८५ धावांची भागीदारी; ऑस्ट्रेलियाचा तगडा बचाव
ऑस्ट्रेलिया ५ बाद ३१३
लंडन, १९ जुलै / वृत्तसंस्था

५ बाद १२८ अशा अवस्थेनंतर ऑस्ट्रेलियाचा संघ इंग्लंडविरुद्धच्या अ‍ॅशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटीत एक दिवस शिल्लक असतानाच पराभूत होणार की काय, असा हमखास अंदाज वर्तविला जात असताना मायकेल क्लार्क (१२५) व ब्रॅड हॅडिन (८०) यांनी केलेल्या १८५ धावांच्या अभेद्य भागीदारीमुळे ऑस्ट्रेलियाने निदान चौथ्या दिवशी तरी पराभवाचे संकट दूर सारले. ऑस्ट्रेलियाने ५ बाद ३१३ धावा करून उद्या विजयासाठी आणखी २०९ धावा करायच्या आहेत. इंग्लंडने आपल्या दुसऱ्या डावात ३११ धावा करून एकूण ५२१ धावांची आघाडी घेतल्यानंतर चौथ्या दिवशी न खेळता डाव सोडला व ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ५२२ धावांचे आव्हान ठेवले. त्यांची ही चाल यशस्वीही ठरू लागली. फ्लिन्टॉफने सलामीच्या जोडीला झटपट माघारी धाडल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे खंदे मोहरे रिकी पॉन्टिंग (३८), माइक हसी (२७), मार्कस नॉर्थ (६) हेदेखील तंबूत परतल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ पाचवा दिवस पाहणार नाही, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. पण मायकेल क्लार्क (नाबाद १२५) व हॅडिन (नाबाद ८०) यांनी सहाव्या विकेटसाठी १८५ धावांची भागीदारी करून इंग्लंडचे हे स्वप्न पूर्ण होऊ दिले नाही. ऑस्ट्रेलियाची हीच भरवशाची जोडी शिल्लक आहे. ती जोडी सकाळच्या सत्रात फोडण्यात इंग्लंडला यश आले तर सामन्याचे चित्र पालटू शकेल.

बलजितसिंगच्या दुखापतीमुळे हॉकीपटूंच्या विम्याचा प्रश्न ऐरणीवर
नवी दिल्ली, १९ जुलै / वृत्तसंस्था

भारतीय हॉकी संघाचा गोलरक्षक बलजित सिंग याला सरावावेळी झालेल्या डोळ्याला झालेल्या दुखापतीमुळे भारतीय हॉकी खेळाडूंना मिळणाऱ्या तुटपंज्या सुविधांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

वेस्ट इंडिज ५ बाद १२४; शाकिबचे तीन बळी, केमार रोचनेही दाखविली गोलंदाजीत चमक
सेंट जॉर्ज (ग्रेनाडा), १९ जुलै / एएफपी

शाकिब अल हसनने ४० धावांत घेतलेल्या ३ बळींमुळे वेस्ट इंडिजची बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात ५ बाद १२४ अशी स्थिती झाली होती. पाऊस मदतीला धावल्यामुळे वेस्ट इंडिजला थोडी उसंत मिळाली. पहिल्या डावात बांगलादेशने २३२ धावा करीत वेस्ट इंडिजला चांगली टक्कर दिली होती. विंडीजला त्या डावात केवळ पाच धावांची आघाडी मिळाली.

मालिकाविजयासाठी श्रीलंका सज्ज; संघाच्या खेळाबद्दल संगकारा नाराज
कोलंबो, १९ जुलै / एएफपी

पाकिस्तानविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-० असा विजय मिळविलेला असताना आता उद्यापासून सुरू होत असलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटीतही ही विजयाची मालिका कायम ठेवत मालिका ३-० अशी जिंकण्याचा निश्चय श्रीलंका संघाने केला आहे. श्रीलंका संघाचा कर्णधार कुमार संगकारा मात्र आपल्या संघाच्या कामगिरीबाबत फारसा समाधानी नाही. ‘आम्ही आमच्या दर्जाला साजेसा खेळ करू शकलेलो नाही. संपूर्ण मालिका खिशात घालणे हे अभिनंदनास पात्रच आहे, पण तुम्ही तुमच्या दर्जाला साजेसा खेळ न करता जर ही कामगिरी केलीत तर त्याला महत्त्व नाही. श्रीलंकेचा खेळ असाच खराब झालेला आहे आणि पाकिस्तानचाही.’

वास म्हणतो आता बस!
वासची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती

कोलंबो, १९ जुलै / वृत्तसंस्था

पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेनंतर आपण कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचे श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज चामिंडा वास याने आज जाहीर केले. श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील तिसरी कसोटी उद्यापासून सुरू होत आहे.
श्रीलंका निवड समितीचे प्रमुख असांथा डिमेल यांनी पंधरा दिवसांपूर्वीच वास हा कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याचे सांगितले होते. वास याने तातडीने त्याचा इन्कार केला होता. दोनच दिवसांपूर्वी पाकिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम कसोटीसाठी वास याची श्रीलंका संघात निवड करण्यात आली आणि आज त्याने आपण कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले.

बीसीसीआयच्या आंतरकंपनी क्रिकेटसाठी आणखी पाच संघ उत्सुक
मुंबई, १९ जुलै / क्री. प्र.

भारतीय क्रिकेट बोर्डाच्या आंतरकंपनी क्रिकेट स्पर्धेत खेळण्यास आणखी पाच कंपन्यांनी इच्छा प्रदर्शित केल्यामुळे या स्पर्धेत आता १६ संघ सहभागी होणार आहेत. याआधी, एकूण १२ संघ सहभागी झाले होते. जे संघ या स्पर्धेत खेळणार आहेत त्यात टाटा, एअर इंडिया (मुंबई), इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम, ओएनजीसी, एअर इंडिया (दिल्ली), सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस, कम्बाइन्ड पब्लिक सेक्टर टीम, आयटीसी, एमआरएफ व भारत सीमेंट्स यांचा समावेश आहे.

बर्मिगहॅम अ‍ॅथलेटिक्समध्ये भारतीयांची चमक; पूनिया, अब्राहमला सुवर्ण
नवी दिल्ली, १९ जुलै / पीटीआय

थाळीफेकपटू कृष्णा पूनिया व ४०० मीटर अडथळा शर्यतीतील जोसेफ अब्राहम यांनी ब्रिटन येथे सुरू असलेल्या बर्मिगहॅम विश्व अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेतील आपापल्या क्रीडाप्रकारात सुवर्णपदके पटकाविली. १६ ते २१ ऑगस्टदरम्यान बर्लिन येथे होणाऱ्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या अब्राहमने ४०० मीटर अडथळा शर्यतीत ५१.५० सेकंद अशी वेळ दिली, पण त्याची ही कामगिरी राष्ट्रीय विक्रमाजवळ पोहोचणारी नव्हती.

डेक्कन जिमख्यान्यास सर्वसाधारण विजेतेपद
पुणे, १९ जुलै/ प्रतिनिधी

बी.व्ही.भिडे स्मृती राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत डेक्कन जिमखाना संघाने सर्वच गटात प्रभावी कामगिरी करत २१४ गुणांसह सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. स.प. महाविद्यालयाच्या तलावावर पार पडलेल्या या स्पर्धा शिक्षण प्रसारक मंडळीतर्फे आयोजित करण्यात आल्या आहेत.

इंग्लिश संघावर प्रसारमाध्यमांची स्तुतिसुमने
लंडन, १९ जुलै/वृत्तसंस्था

अ‍ॅशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटीत इंग्लंड संघ विजय मिळविणारच, या अपेक्षेने येथील वृत्तपत्रांनी इंग्लंड संघावर स्तुतिसुमनांचा वर्षांव चालू केला आहे. ऑस्ट्रेलियावर लॉर्ड्स मैदानावर इंग्लंडला १९३४ नंतर कधीच विजय मिळविता आलेला नाही. त्यामुळे या कसोटीत इंग्लंडने निर्विवाद वर्चस्व मिळविल्यावर विजयाच्या अपेक्षेने येथील वृत्तपत्रे उत्साहित झाली आहेत.

सोमदेव उपान्त्य फेरीत पराभूत
अ‍ॅप्टोस (अमेरिका), १९ जुलै / पीटीआय

येथे सुरू असलेल्या ७५ हजार अमेरिकन डॉलरच्या एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेतील भारताच्या सोमदेव देववर्मनची घोडदौड अखेर उपान्त्य फेरीत थांबली. ऑस्ट्रेलियाच्या ख्रिस गुसिओनने त्याला ६-२, ६-१ असे सरळ सेटमध्ये सहज पराभूत केले. या पराभवानंतरही सोमदेवला २९ एटीपी गुण मिळविण्यात यश आले तर ३७६५ डॉलरचे इनामही त्याने मिळविले. या वर्षांतील सोमदेवची ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम कामगिरी होती. याआधी, चेन्नई ओपनमध्ये तो अंतिम फेरीपर्यंत पोहोचला होता.याच स्पर्धेत भारताच्या हर्ष मंकडचे दुहेरीतील आव्हानही संपुष्टात आले. हर्ष मंकड व त्याचा अमेरिकेतील सहकारी डेव्हिड मार्टिन यांनी पुरुष दुहेरीच्या उपान्त्य फेरीत प्रवेश केला होता. पण या जोडीला ऑस्ट्रेलियाच्या गुसिओन व कार्स्टन बेल यांच्याकडून ३-६, ३-६ असा सरळ सेटमध्ये पराभव सहन करावा लागला.

पॉन्टिंगवर टीका
मेलबर्न, १९ जुलै / वृत्तसंस्था

दुसरी कसोटी ऑस्ट्रेलियाने अजून गमाविलेली नसली, तरी ऑस्ट्रेलियाच्या प्रसारमाध्यमांनी आतापासूनच ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पॉन्टिंग याला लक्ष्य करणे चालू आहे. या कसोटीत पॉन्टिंगचे वर्तन त्याच्यासारख्या अनुभवी कर्णधाराला शोभणारे नव्हते, अशी टीका ऑस्ट्रेलियातील वृत्तपत्रांनी केली आहे. ‘संडे टेलिग्राफ’ या वृत्तपत्रातील लेखात म्हटले आहे, की या कसोटीत पॉन्टिंग याने एका निर्णयावरून पंचांशी वाद घातला. त्याचबरोबर केविन पीटरसन याच्याशीही त्याची शाब्दिक चकमक उडाली. कर्णधारच अशा पद्धतीने वागू लागला, तर तो आपल्या सहकाऱ्यांपुढे काय आदर्श ठेवणार? या खेळाची मूल्ये जपण्याची सर्वाधिक जबाबदारी कप्तानावर असते. पॉन्टिंग याला आपल्यावरील जबाबदारीचे भान राहिलेले नाही.

आशिया युवा बॅडमिंटन : प्रणव-प्राजक्ताला कांस्य
नवी दिल्ली, १९ जुलै / पीटीआय

प्रणव चोप्रा व प्राजक्ता सावंत या भारताच्या मिश्र दुहेरीच्या जोडीने १९ वर्षांखालील मुलांच्या आशिया युवा बॅडमिंटन स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली. उपान्त्य फेरीत त्यांना चीनच्या लु काई व बाओ यिक्सिन यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. उपान्त्यपूर्व फेरीत मलेशियाच्या जोडीला नमविणाऱ्या भारतीय जोडीला आज मात्र आपल्या त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करता आली नाही. त्यांना ही लढत १२-२१, १५-२१ अशी गमवावी लागली.क्वालालंपूर येथून दूरध्वनीवरून बोलताना प्राजक्ता म्हणाली की, आम्ही चांगला खेळ केला, पण त्यांचा खेळ आमच्यापेक्षा सरस ठरला. सुरुवातीला आम्ही अटीतटीची झुंज दिली, पण नंतर त्यांचा गुण घेण्याचा वेग वाढला.आशिया युवा बॅडिमटन स्पर्धेत पदक मिळविण्याची भारताची ही पहिलीच वेळ आहे. भारतीय संघ २० जुलैला मायदेशी परतणार आहे.