Leading International Marathi News Daily

सोमवार, २० जुलै २००९

व्यक्तिवेध

वॉल्टर लेलँड क्रॉन्काईट यांचे नुकतेच निधन झाले. वॉल्टर लेलँड क्रॉन्काईट हे नाव ‘कोलंबिया ब्रॉडकॉस्टिंग सिस्टिम’ म्हणजेच ‘सीबीएस’ या ‘टेलिव्हिजन नेटवर्क’शी जोडले गेले होते. सलग १९ वर्षे संध्याकाळच्या ‘सीबीएस’च्या बातम्या देणाऱ्या या वृत्तनिवेदकाने जेवढय़ा प्रचंड आणि थरारक घटनांचे साक्षीदार म्हणून काम केले, तेवढे फारच थोडय़ा जणांनी केले असेल. अपवाद ‘सीएनएन’च्या लॅरी किंग यांचा! १९६२ ते १९८१ या १९ वर्षांमध्ये ‘सीबीएस’चे उत्कृष्ट वृत्तनिवेदक म्हणून त्यांनी मान मिळवला. विद्यार्थिदशेत हय़ूस्टनच्या आपल्या शाळेच्या पहिल्या वृत्तपत्राचे संपादन त्यांनी केले होते. ऑस्टिनच्या युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासमध्ये शिक्षण घेत असतानाच त्यांना वृत्तपत्रात काम कराव असे वाटू लागले. १९३५ मध्ये त्यांनी महाविद्यालयाला रामराम ठोकून अनेक वृत्तपत्रांमध्ये क्रीडाविषयक, तसेच अन्य विषयांवर बातम्या द्यायला सुरुवात केली. ओक्लाहामा सिटीमध्ये त्यांनी ‘डब्ल्यूकेवाय’ या नभोवाणी केंद्रावर निवेदकाची भूमिका स्वीकारली. तिथेच त्यांची आपल्या भावी पत्नीशी - मेरी एलिझाबेथ मॅक्स्वेलशी - गाठ पडली. कन्सास सिटीच्या

 

‘केसीएमओ’ नभोवाणी केंद्रावरही त्यांनी काम केले. त्यावेळी निवेदक या नात्याने त्यांचे ‘वॉल्टर विलकॉक्स’ म्हणून नाव ठेवले गेले. त्यावेळच्या नभोवाणी केंद्रांवर खरी नावे सांगितली जात नसत. कारण ती सांगितली गेली तर या निवेदकाला बाहेर फिरणे मुश्किल होईल, असा तेव्हाचा समज. कन्सास सिटीमधूनच त्यांनी १९३७ साली युनायटेड प्रेसमध्ये नोकरी पत्करली. दुसऱ्या महायुद्धाचे सर्वश्रेष्ठ बातमीदार म्हणून पुढे त्यांनी नावलौकिक मिळवला. जर्मनीवर बॉम्बफेक करणाऱ्या विमानातून नेण्यात आलेल्या आठ पत्रकारांमध्ये त्यांचा समावेश होता. त्यामुळेच युद्धानंतर त्यांनी युनायटेड प्रेससाठी न्यूरेन्बर्गच्या खटल्याची रोजच्या रोज बातमीदारी केली. १९५० मध्ये क्रॉन्काईट ‘सीबीएस न्यूज’मध्ये दाखल झाले. सुरुवातीला त्यांनी रात्री उशिराच्या बातम्यांसाठी निवेदक म्हणून काम केले. जुलै १९५२ मध्ये पहिल्यांदाच ‘अँकर’ हा शब्द दूरचित्रवाणी निवेदकासाठी वापरण्यात येऊ लागला. १९५२ च्या अध्यक्षीय निवडणुकांच्या रिपब्लिकन आणि डेमॉक्रॅटिक पक्षांच्या अधिवेशनांना हजर राहून त्यांनी वृत्तनिवेदन केले. १९६४ मध्ये त्यांना दूर करून रॉबर्ट ट्राऊट आणि रॉजर मड यांना ‘सीबीएस’ने नेमले. पण आपली चूक लक्षात येताच व्यवस्थापनाने क्रॉन्काईट यांना पक्षीय अधिवेशनांसाठी पुन्हा संधी दिली. १९५३ ते १९५७ या दरम्यान ‘यू आर देअर’ हा कार्यक्रमही त्यांनी सादर केला. डग्लस एडवर्ड्स यांच्यानंतर १९६२ मध्ये ‘सीबीएस’च्या संध्याकाळच्या बातम्यांसाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली. २० वर्षांच्या ‘अँकर’पदाच्या कार्यकाळात ते अमेरिकेतले सर्वाधिक विश्वासार्ह व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले गेले. अनेकजण त्यांना ‘अंकल वॉल्टर’ म्हणून ओळखत. त्यांनी ज्या महत्त्वाच्या घटनांचे साक्षीदार म्हणून आपली ओळख साऱ्या जगाला करून दिली, त्यात क्युबाच्या क्षेपणास्त्रांचा पेचप्रसंग, अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांचा खून, व्हिएतनाम युद्ध, ‘अपोलो-११’ची चांद्रमोहीम, वॉटरगेट घोटाळा आदी घटनांचा समावेश होता. त्या काळी इतर निवेदक दर मिनिटाला २०० शब्दांचा मारा, या वेगाने बातम्या सांगत असता त्यांनी आपला बातम्या सांगण्याचा वेग मिनिटाला १२४ शब्द एवढाच ठेवला. त्यांचे म्हणणे असे, की सर्वसाधारण अमेरिकन जेव्हा मिनिटाला १६५ शब्द एवढय़ा वेगाने बोलतो, तेव्हा त्याचे बोलणे अनाकलनीय ठरते. आपण मिनिटाला २०० शब्दांचा मारा का करावा? केनेडींच्या खुनाची बातमी सर्वप्रथम दिली क्रॉन्काईट यांनी. ती देताना ‘अध्यक्ष केनेडींच्या मोटारींच्या ताफ्यावर हल्ला झाल्या’चे त्यांनी सांगितले. केनेडी जखमी झाल्याचे सांगून त्यांनी केनेडींच्या निधनाची बातमी देण्याची घाई केली नाही. बडय़ाबडय़ा नेतेमंडळींत उठबस असली तरी ती त्यांनी डोक्यावर स्वार होऊ दिली नाही. राजकीय उमेदवारांना दूरचित्रवाणीवर मोफत वेळ द्यावा, ही मागणी करणारे पत्रकारही ते पहिलेच! अरिझोना प्रांतात क्रॉन्काईट यांच्या नावाचे ‘स्कूल ऑफ जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन’ उभे आहे. क्रॉन्काईट यांचे यापेक्षा सुंदर स्मारक ते कोणते?