Leading International Marathi News Daily

सोमवार, २० जुलै २००९

अप्पर वर्धा धरणात समाधानकारक साठा
अमरावती, १९ जुलै/ प्रतिनिधी

अमरावती विभागातील आठ मोठय़ा सिंचन प्रकल्पांच्या जलसाठय़ात गेल्या आठवडाभरात पाच टक्क्यांनी वाढ झाली असली तरी मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये अजूनही पुरेसा जलसंचय झालेला नाही. जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार विभागातील सर्वात मोठय़ा अप्पर वर्धा धरणाच्या पाणीसाठय़ात आठवडाभरात ११ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या या धरणात ४२ टक्के एवढे पाणी साठवले आहे.

गंधर्व आणि अभिषेकी युगात नेणारा कार्यक्रम
डॉ. सुलभा पंडित

स्थानिक पं. जितेंद्र अभिषेकी स्मृती समारोह समितीच्या वतीने नुकताच एक कार्यक्रम संपन्न झाला. पं. जितेंद्र अभिषेकी यांचे ज्येष्ठ शिष्य पं. राजेश्वर बोबडे नागपूरमध्ये असतात. एकेकाळी पं. अभिषेकींचे पट्टशिष्य म्हणूनच ते ज्ञात होते. पंडितजींसमवेत राहून त्यांनी संगीत विद्या ग्रहण केली आहे, हे सर्वश्रृतच आहे. त्यावेळी त्यांचे गाणेही ऐन बहरात होते. बऱ्याच वर्षानंतर ते पुन्हा एकदा रसिकांसमोर गाणार म्हणून त्यांच्या गायनाविषयी उत्सुकता होतीच.

कुलगुरू कसा असावा!
ज्योती तिरपुडे

महाराष्ट्रातील विद्यापीठांच्या कुलगुरूपदाच्या उमेदवारांसाठी नवीन पात्रता निकष ठरवण्यात आले आहेत. असे असले तरी विदर्भातील विविध विद्यापीठांच्या विद्यमान किंवा आगामी कुलगुरूंसाठी स्वतंत्र निकष बनवण्याची नितांत गरज आहे, असे शिक्षण आणि शिक्षण क्षेत्राविषयी मनापासून कळकळ असणाऱ्या अनेकांशी बोलल्यावर स्पष्ट झाले. त्यांच्याशी झालेल्या चर्चेतून त्यानुसार ‘कुलगुरू कसा असावा’ याचे काही निकष पुढील प्रमाणे-

पश्चिम विदर्भातही संकट
यवतमाळ, १९ जुलै / वार्ताहर

लाल्या आणि लष्कर अळीच्या आक्रमणामुळे कापूस उत्पादक गेल्या दोन वर्षापासून त्रस्त असतानाच यंदा उंटअळीने सोयाबीनवर हल्ला चढवला आहे. यवतमाळ जिल्ह्य़ात यावर्षी सव्वा लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. आद्र्रा नक्षत्राच्या उत्तरार्धात पावसाने पाहिजे तशी साथ न दिल्याने शेतकरी आनंदी होऊन सोयाबीनच्या भरवशावर मालामाल होण्याचे स्वप्न पाहात असतानाच उंटअळीने केलेल्या हल्लाबोल मुळे शेतकरी धास्तावून गेला आहे.

पावसाअभावी पेरणी थांबली; धानाची रोवणी मंदावली
चंद्रपूर, १९ जुलै/ प्रतिनिधी

आठवडाभरापासून पाऊस नसल्याने आणि सिंचन प्रकल्प, मामा तलाव व बोडय़ांमध्ये अत्यल्प साठा असल्याने दीड लाख हेक्टरमधील धान रोवणीची कामे मंदावली आहेत. या आठवडय़ात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला नाही तर यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांच्या हातून धानाचे पीक सुटणार असल्याची भीती कृषी खात्याने वर्तविली आहे. जून पूर्णत: कोरडा गेला. जुलैमध्येही पावसाचा ठावठिकाणा नाही. गेल्या आठवडय़ात दोन दिवस पाऊस पडल्यानंतर या आठवडय़ात पावसाने पूर्णत: विश्रांती घेतली आहे.

वरोरा तालुक्यात लष्करी अळीचा प्रश्नदुर्भाव
चंद्रपूर, १९ जुलै/प्रतिनिधी

वरोरा तालुक्यात लष्करी अळीची लक्षणे दिसून येत असल्यामुळे शासनाने योग्य ते उपाय करून शेतकऱ्यांना संकटातून वाचवावे, अशी मागणी जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. गेल्या वर्षी वरोरा तालुक्यात सोयाबीन पिकांवर लष्करी अळीचा फार मोठय़ा प्रमाणात प्रश्नदुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते व शेतकरी हवालदिल झाला होता. या संकटामध्ये राज्य शासनाने जिल्ह्य़ातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते नरेश पुगलिया यांनी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या नजरेत ही बाब आणून दिल्यानंतर भरीव मदत सुद्धा केली होती. यावेळी विदर्भात उशिरा मान्सूनचे आगमन झाल्यामुळे पेरणी उशिरा झाल्या व सोयाबीन तसेच कपाशीची पेरणी केली परंतु, वरोरा तालुक्यातील तुमगाव, खांबाडा, फत्तापूर, मसाळा, आंजनगाव आदी गावात लष्करी अळीची लक्षणे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत दिसत आहेत. कृषी विभाग पाहिजे त्या प्रमाणात उपाययोजना करण्यास असमर्थ ठरत असल्याचे दिसून येत आहे.

खाजगी बसेसला पर्यटन परवाने, शासनाचे कोटय़वधीचे नुकसान
चंद्रपूर, १९ जुलै/प्रतिनिधी

पर्यटनाचा विकास व चालना देण्यासाठी केंद्र व राज्याने खाजगी बसेसला पर्यटन परवाने दिले आहेत परंतु, परवान्याच्या नावाखाली हे खाजगी बसचालक राज्य परिवहन बसेसारखी टप्पे वाहतूक सर्रास करीत आहे. त्यामुळे शासनाचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान होत आहे. शासनाने एस.टी ला १७ टक्के प्रवासी कर लावलेला आहे व प्रवाशी तिकीट फाटल्यावर त्वरित शासन तिजोरीत जमा होतो. याउलट खाजगी बसेसला असा कोणताही कर नाही. इंदोर ते मुंबई असे बस परवाना काढून हे बसचालक जळगाव ते मुंबई, धुळे ते मुंबई अशा हजारो फेऱ्या करतात. आज एस.टी.च्या शिवनेरी बसला वर्षाला २२ लाख रुपये प्रवासी कर द्यावा लागतो. याउलट खाजगी बस १.२५ लाख रुपये कर भरते. याशिवाय चालक व वाहकाची पिळवणूक अवैध सामान व टपाल वाहतूक यापासून त्यांना वेगळे उत्पन्न मिळते. तरी यावर आपण योग्य ती चौकशी करून शासनाचे करापोटी होणारे नुकसान थांबवावे, अशी विनंती केली आहे.

बल्लारपूर रेल्वे स्थानकावर सुविधांची मागणी
बल्लारपूर, १९ जुलै/ वार्ताहर

भारतीय रेल्वेकडून बल्लारपूर रेल्वे स्थानकावर सर्वप्रकारच्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा दावा करण्यात येत असला तरी काही मूलभूत सुविधा देखील येथे नाहीत. याकडे चंद्रपूर जिल्हा रेल्वे यात्री असोसिएशन विभागीय प्रबंधकाचे लक्ष वेधून त्यांना एक निवेदन सादर केले.
बल्लारपूर रेल्वे स्थानकावरील फलाटावर तसेच एंट्री हॉलमध्ये पंखे व विद्युत लाईट बंद स्थितीत आहेत. फलाटांवर पेय जलाकरिता ठिकठिकाणी वॉटर स्टँडस् लावलेले असले तरी त्यांची नियमित स्वच्छता करण्यात येत नाही. परिणामत: नळाखालील टाक्यांमध्ये घाण व पाणी साचून असल्याने प्रवाशांना दूषित पिण्याचे पाणी प्यावे लागत आहे. वस्ती विभागातून रेल्वे स्थानकावर येण्यासाठी ओव्हर ब्रिजची व्यवस्था आहे. मात्र, रात्रीच्या वेळी या पुलावर असामाजिक तत्त्वांचा प्रवाशांना त्रास होतो. या सर्व प्रश्नांकडे लक्ष घालून संरक्षण व सुधारणा व्यवस्था करण्याची मागणी असोसिएशनतर्फे विभागीय अधिकारी अजय डॅनियल यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली. श्रीनिवास सुंचुवार, अब्दुल रफीक, सीताराम सोमानी, अशोक गुप्ता, नरहरी तोटावार, गणेश सौंदाने आदींचा शिष्टमंडळात समावेश होता.

विविध संघटनांतर्फे निळू फुलेंना श्रद्धांजली
वर्धा, १९ जुलै/ प्रतिनिधी

ज्येष्ठ कलावंत दिवंगत निळू फुले यांना विविध संघटनांतर्फे एका समारंभातून श्रद्धांजली वाहण्यात आली. यशवंतराव दाते स्मृती संस्थेत आयोजित श्रद्धांजली सभेच्या अध्यक्षस्थानी समाजसेवी व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रश्नचार्य भाऊसाहेब देशमुख हे होते.
दिवंगत निळू फुले हे केवळ एक नाटय़ किंवा सिनेकलावंत नव्हते. सामाजिक कार्यकर्त्यांना मदतीचा हात देणारा व प्रसंगी जनजागृतीसाठी रस्त्यावर उतरणारा माणूस होता. फुलेंच्या जाण्याने वंचिताचा एक मोठा आश्रयदाता आपल्यातून हरविला आहे. कलावंताने सामाजिक बांधिलकीचे भान तेवढय़ाच समरसतेने ठेवण्याचे ते एक विरळ उदाहरण होय. अशा शब्दात विविध वक्तयांनी श्रद्धांजली अर्पण केली. यापसंगी आयोजक संस्थेचे प्रदीप दाते, प्रश्न. शेख हाशम, लेखिका दीपमाला कुबडे, नाटय़कर्मी हरीश ईथापे, प्रश्न. राजेंद्र मुंढे, कवी संजय इंगळे तिगावकर, डॉ. अनवर सिद्दीकी, पत्रकार संघाचे प्रवीण धोपटे, राजू गोरडे व मनोज भोयर, महात्मा गांधी हिंदी विद्यापीठाचे बी.एस. मिरगे, अंनिसचे पंकज वंजारे, प्रभाकर पाटील, श्रीराम शेंदरे यांनी निळू फुलेंच्या आठवणींना उजाळा दिला.

आयकर चुकवणाऱ्या व्यापाऱ्यांना नोटीस
खामगाव, १९ जुलै / वार्ताहर

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काही अडत्यांद्वारा होत असलेल्या आयकर चोरीबाबत आयकर अधिकाऱ्यांकडे एका सामाजिक कार्यकर्त्यांने तक्रार केल्यानंतर आयकर विभागाने अडत्यांना नोटीस पाठवल्या आहेत. बाजार समितीतील काही अडते आयकर चोरी करत असल्याची तक्रार एका सामाजिक कार्यकर्त्यांने केली. या तक्ररीची दखल न घेतल्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांने नागपूर येथील आयुक्तांकडे १ जुलैला तक्रार केली. दरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांचा बडगा आल्यानंतर येथील आयकर अधिकाऱ्यांनी १५ जुलैला बाजार समितीतील अडते व व्यापाऱ्यांना नोटीसेस बजावून गेल्या २ आर्थिक वर्षातील आयकराबाबत खुलासा करण्यास सुचवले आहे. यात २००८-०९, २००९-१० या आर्थिक वर्षातील आयकर रिटर्न फाईल कार्यालयात सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच रिटर्न फाईल केल्या नसतील तर ७ दिवसाच्या आत सादर करण्याचे आदेश स्थानिक आयकर अधिकारी नानोटी यांनी दिले आहे. त्यामुळे बाजार समितीमध्ये खळबळ उडाली असून आयकर चुकवणाऱ्या व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

सामूहिक विवाह सोहोळ्यातील वर-वधूंच्या पालकांना मदतीचे वाटप
वर्धा, १९ जुलै/ प्रतिनिधी

बापूरावजी देशमुख फाऊंडेशनतर्फे आयोजित सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहोळ्यातील वर-वधूंच्या पालकांना एका कार्यक्रमातून मदतीचे धनादेश प्रदान करण्यात आले. वर्धा बाजार समितीच्या सभागृहात हा धनादेश वाटप सोहोळा झाला. लाभार्थी पालकांनी या मदतीचा योग्य तो विनियोग करावा, असे आवाहन सोहोळा आयोजक व जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुनील राऊत यांनी याप्रसंगी केले. जिल्हा बँकेचे अध्यक्ष समीर देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शशांक घोडमारे, पणन महासंघाचे संचालक बाबाराव झलके, महिला बालकल्याण अधिकारी वाळके, पंचायत समिती उपसभापती शरयू वांदिले यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन प्रश्न. विकास खोडके यांनी केले.

आदिवासी शेतकऱ्यांच्या विकासाचा मार्ग सुकर
चंद्रपूर, १९ जुलै/प्रतिनिधी

आदिवासी उपयोजना विशेष घटक योजनेच्या धर्तीवर राबवण्याचा निर्णय माजी आमदार सुदर्शन निमकरांच्या प्रयत्नांना यश आले असून आदिवासी शेतकऱ्यांच्या विकासाचा मार्ग सुकर झाला आहे.
राज्यातील आदिवासी शेतकऱ्यांच्या विकासासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत राबवण्यात येणारी आदिवासी उपयोजना ही विशेष घटक योजनेच्या धर्तीवर राबवण्याचा निर्णय राज्याच्या कृषी व जलसंधारण विभागाने २० मे २००९ रोजी घेतला. त्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांना भेडसावणारी मोठी अडचण सोडवण्यास माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या प्रयत्नांना यश आले असून आदिवासी शेतकऱ्यांच्या विकासाचा मार्ग सुकर झाला आहे. जिल्हा परिषद सदस्य गोदरू पाटील जुमनाके, सीताराम कोडापे, राजुरा येथील आदिवासी कार्यकर्ते बापुराव मडावी, कोरपनाचे बंडू सोयाम, माजी पंचायत समिती सभापती भीमराव मेश्राम सह आदिवासींच्या शिष्टमंडळाने माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे कृषिमंत्री बाळासाहेब थोरात, आदिवासी विकास मंत्री विजय कुमार गावीत यांची २४ डिसेंबर २००८ रोजी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान भेट घेऊन योजना विशेष घटक योजनेच्या धर्तीवर राबवण्याची मागणी करणारे निवेदन सादर केले होते.

हिंगणा सवरेदय विद्यालयात गुणवंतांचा सत्कार
हिंगणा, १९ जुलै/ वार्ताहर

येथील सवरेदय विद्यालयाचा दहावीचा ९५.४० टक्के निकाल लागला असून विद्यालयातील सर्वाधिक गुण मिळवल्याबद्दल संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी गुणवंतांचा सत्कार केला. विद्यालयात आशीष मुरलीधर चक्रवर्ती हा ८० टक्के गुण घेऊन प्रथम आला तर आशीष धनराज आदे हा (७७ टक्के) दुसरा व सौरभ सुनील सिंह सेंगर (७६ टक्के) हा तिसरा आला. बारावी परीक्षेचा निकाल ७२ टक्के असून यात प्रियंका विजय वैद्य ही प्रथम आली आहे. कार्यक्रमाला उपस्थितीत संस्थेचे सचिव व संस्थापक प्रश्नचार्य राजेंद्र सिंह चंदेल, संस्थेच्या अध्यक्षा व संस्थापक प्रश्नचार्या माया चंदेल यांच्या हस्ते गुणवंत- विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला प्रश्नचार्य बाबाराव उंबरकर, पर्यवेक्षिका पुष्पा लांजेवार, चापले उपस्थित होते. विद्यालयात परीक्षा केंद्र नसतानाही विद्यार्थ्यांनी दुसऱ्या शाळेत परीक्षा देऊन निकालात उच्चांक गाठल्याबद्दल संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचालन एल.सी. बुधे यांनी तर एफ.एन. शेंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. प्रश्नस्ताविक प्रश्नचार्य उंबरकर यांनी केले.

दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना मोफत बियाणे द्या -टेमुर्डे
वरोरा, १९ जुलै/ वार्ताहर

परिसरात पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने कापूस व सोयाबीन पेरलेल्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पेरलेले बियाणे उगवले नसल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावल्याने शासनाने शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी तात्काळ मोफत बियाणे उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अॅड. मोरेश्वर टेमुर्डे यांनी केली आहे. मागील वर्षी लष्करी अळीमुळे आर्थिक संकटात सापडलेला या भागातील शेतकरी यावर्षीच्या हंगामासाठी कर्जे काढून उधारीवर बियाणे खरेदी केली. मात्र, पेरलेली बियाणे न उगवल्यामुळे शेतकरी बांधव आता पुरता, हतबल झाला असून राज्यशासनाने शेतकऱ्यास तातडीने मोफत बियाणे द्यावे, अशी आग्रही मागणी टेमुर्डे यांनी केली आहे.

संघर्ष युवक संघटनेचा मेळावा
हिंगणा, १९ जुलै / वार्ताहर

संघर्ष युवक संघटनेच्यावतीने तालुका युवक कार्यकर्ता मेळावा नुकताच लाडगाव येथे पार पडला.
या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रमेश बंग उपस्थित होते. राजेंद्र वाघ, सुवर्णा खोबे, प्रमोद बंग, गोवर्धन प्रधान, पुरुषोत्तम डाखळे, सुरेश काळबांडे, महेश बंग, शेख हुसेन, अनिल चानपूरकर आदी उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीसाठी युवक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन बंग यांनी यावेळी केले. या कार्यक्रमाचे संचालन शशिकांत थोटे यांनी केले. याप्रसंगी जावेद महाजन, इसराईल शेख, नंदकिशोर बांदरे, पंकज गौर, रवी राठोड, हमीद खान, प्रवीण रंगारी, विलास मसराम, भावेश कैकाडे आदी उपस्थित होते.

रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी स्थापन केली आंबेडकरी एकत्रित समाज संघटना
गोंदिया, १९ जुलै / वार्ताहर

जिल्ह्य़ातील रिपब्लिकन पक्षाच्या विविध गटाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आंबेडकरी एकत्रित समाज संघटना स्थापन केली आहे. या संघटनेची पुढील भूमिका रविवार, १९ जुलैला येथे होणाऱ्या सभेत निश्चित करण्यात येणार आहे. गोंदिया जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) गटही आंबेडकरी एकत्रित समाज संघटनेत सहभागी होणार असल्याचे अशोक चव्हाण यांनी कळवले आहे. रिपब्लिकन पक्षाच्या विविध गटाच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक, धार्मिक, राजकीय गटतट विसरून एकत्र येण्याचा निर्णय घेतला असून संघटनेच्या माध्यमातून पुढील वाटचाल व भूमिका याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) गोंदिया जिल्ह्य़ाच्यावतीने १९ जुलैच्या सभेनंतर कोणतीही सभा आयोजित केली जाणार नाही व आंबेडकरी समाज एकत्रीकरणातून तयार करण्यात येणाऱ्या संघटनेच्या माध्यमातून कार्य करेल, असे स्पष्ट केले आहे.

पत्रकारसंघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
अकोला, १९ जुलै/प्रतिनिधी

अकोला जिल्हा पत्रकारसंघातर्फे जिल्हाधिकारी मुथ्थुकृष्णन यांना निवेदन सादर करण्यात आले.
जाहिरातींसाठी एबीसी प्रमाणपत्राची अट लादण्याच्या शासन निर्णयाचा विरोध करण्यात आला. जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत या विषयावर चर्चा करण्यात आली. यामध्ये शासनाच्या धोरणाचा निषेध करण्यात आला. जिल्हा माहिती अधिकारी मडावी यांच्याशीही शिष्टमंडळाने यावर चर्चा केली. भगवंतराव इंगळे, सिध्दार्थ शर्मा, शौकतअली मिरसाहेब, रामकिशोर श्रीवास, अजय चव्हाण आदी यामध्ये सहभागी झाले.

ऋषीसंकुलात बुधवारी विविध धार्मिक कार्यक्रम
खामगाव, १९ जुलै / वार्ताहर

ऋषीसंकुलात २२ जुलैला खग्रास सूर्यग्रहणानंतर विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सूर्यग्रहणानंतर अभिषेक, पूजा, दानधर्म व्हावे या उद्देशाने भैयुजी महाराजांच्या उपस्थितीत २२ जुलैला सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत सिद्धीविनायक, कालिका माता, स्वामी समर्थ, गजानन महाराज, कालभैरव, शेषनाग आदी देवीदेवतांची महापूजा व अभिषेक होणार असून दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत भैयुजी महाराजांचे प्रवचन होणार आहे. त्यानंतर येणाऱ्या सर्व भाविक भक्तांच्या समस्या, अडीअडचणी सोडवण्यासाठी दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. भक्तांनी महापूजेचा, दर्शनाचा व प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ऋषीसंकुलच्या संचालक मंडळाने केले आहे.

सहकारी बँकेच्या आर्णी शाखेकडून ११.५० कोटींचे कर्जवाटप
आर्णी, १९ जुलै/ वार्ताहर

मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेच्या वतीने सुमारे चार हजार शेतकरी सभासदांना ११ कोटी, ५० लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आल्याची माहिती बँकेचे व्यवस्थापक व्ही.एन. व्यवहारे यांनी दिली. बँकेकडून कर्जवाटप सुरू आहे. बँकेचा व्याप मोठा असल्याने व सभासदांची संख्या सुद्धा वाढत आहे. शेतकऱ्यांच्या सोईसाठी नवीन शहर शाखा व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र, भारतीय रिझव्र्ह बँकेची परवानगी मिळत नसल्याने हा प्रस्ताव मंजूर होऊ शकला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. शहर शाखा नसल्याने शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. बँकेत कर्मचाऱ्यांचा पूर्ण कोटा नसल्याने शेतकऱ्यांचे अनेक कामे रखडली आहेत. केवळ १३ कर्मचारी आहेत. यामुळे कर्जवाटप करण्यात मोठा अडथळा निर्माण झाला. बँकेचे अध्यक्ष मनीष पाटील यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करावे, अशी मागणी होत आहे.