Leading International Marathi News Daily

सोमवार, २० जुलै २००९

विविध

मुंबई हल्लाप्रकरणी लखवीची रावळपिंडी येथे सुनावणी सुरू
इस्लामाबाद, १९ जुलै/पी.टी.आय.

मुंबई हल्ला प्रकरणात अटक झालेले लष्कर-ए-तय्यबाचे पाच दहशतवादी व या संपूर्ण कटाचा सूत्रधार झाकी उर रहमान लखवी यांनीच २६ नोव्हेंबरला झालेल्या या हल्ल्यात वाहतूक, निवास व आर्थिक सुविधा पुरवल्या होत्या, असे रावळपिंडी येथील दहशतवादविरोधी न्यायालयात त्यांच्यावर दाखल झालेल्या पुरवणी आरोपपत्रात म्हटले आहे.

निर्दोष असूनदेखील ३४ वर्षे गजाआड..; उत्तर प्रदेशच्या प्रभुनाथची परवड
नवी दिल्ली, १९ जुलै /पी.टी.आय.
उत्तर प्रदेशच्या बस्ती जिल्ह्यातील पट्टाखोरी या गावचा प्रभुनाथ याला १४ मे १९७४ रोजी राजस्थानात भारत-पाकिस्तान सीमेवर संशयित हालचाली केल्याच्या आरोपाखाली पकडण्यात आले होते. तुरुंगात रवानगी झाल्याने खंगून तो मानसिक रुग्णही बनला. मात्र चौकशीत त्याने कोणताही गुन्हा केला नसल्याचे लक्षात आले आणि अखेर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने त्याची सोडवणूक तर केलीच पण त्याला पाच लाख रुपये भरपाईही देण्याचा आदेश राजस्थान सरकारला दिला आहे.

डॉ. आंबेडकर जयंती ही राष्ट्रीय सुटी नाही
नवी दिल्ली, १९ जुलै/वृत्तसंस्था

‘शिका, संघटित व्हा व संघर्ष करा’ असा संदेश देत वंचित समाजाला नवी जीवनदृष्टी देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी दरवर्षी केंद्र सरकारतर्फे सुटी दिली जात असली तरी सरकारच्याच नियमांमुळे ती राष्ट्रीय सुटी म्हणून जाहीर करता येत नाही, असे माहितीच्या अधिकाराखाली कार्मिक मंत्रालयाकडून मिळालेल्या नोंदींवरून स्पष्ट झाले आहे.

मान्सूनच्या विलंबामुळे तांदळाचे उत्पादन १५ टक्क्यांनी घटणार
कृषीतज्ज्ञ स्वामिनाथन यांचे मत
नवी दिल्ली, १९ जुलै/पीटीआय
मान्सूनच्या विलंबामुळे तांदळाचे उत्पादन यंदाच्या मोसमात १५ टक्क्यांनी कमी होईल, असे मत ख्यातनाम कृषिशास्त्रज्ञ एम. एस. स्वामिनाथन यांनी आज व्यक्त केले. ते म्हणाले, की खराब मान्सूनमुळे परिस्थिती गंभीर असून, पेरण्यांची स्थितीही फारशी चांगली नाही, त्यामुळे तांदळाचे उत्पादन खरिपात १५ टक्क्यांनी घटण्याची शक्यता आहे.

ब्रिटनी स्पीअर्सला जीवे मारण्याची धमकी
लंडन, १९ जुलै / पी.टी.आय.

येत्या आठवडय़ात रशियात दोन कार्यक्रमासाठी सज्ज होणाऱ्या पॉप गायिका ब्रिटनी स्पीअर्सला जीवे मारण्याची धमकी आली आहे. त्यामुळे रशियातील या कार्यक्रमांना आपल्या दोन मुलांना सोबत न नेण्याचा निर्णय तिने घेतला आहे. याचप्रमाणे परतीच्या प्रवासात खासगी विमानाचा वापर करण्याचाही ती विचार करीत आहे, असे ‘सन ऑनलाइन’च्या वृत्तात म्हटले आहे. ब्रिटनीसोबत तिची दोन्ही मुले रशियाला जाणार होती. परंतु सध्याच्या धमकीच्या पाश्र्वभूमीवर तिने त्यांना न नेण्याचे ठरविले आहे, असे दौऱ्याच्या प्रवक्त्याकडून समजते. ब्रिटनीला ई-मेलद्वारे वारंवार धमक्या येत असल्यामुळे रशियातील कार्यक्रमांसाठी तिच्या सुरक्षा व्यवस्थेकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. २७ वर्षीय ब्रिटनीचे सेंट पीटर्सबर्ग आणि मॉस्को येथे पुढील आठवडय़ात कार्यक्रम होणार आहेत.

कोटय़वधी खर्चूनही गंगा-यमुना प्रदूषितच
नवी दिल्ली, १९ जुलै/वृत्तसंस्था

हिंदू धर्मियांच्या दृष्टीने अतिशय पवित्र असलेल्या गंगा आणि यमुना नद्यांच्या शुद्धीकरणासाठी कोटय़वधी रुपये खर्चूनही या नद्यांचे प्रदूषण रोखण्यात अपयशच आले आहे. ‘गंगा कृतीयोजने’वर केंद्र सरकारने तब्बल ८१७ कोटी रुपये तर ‘यमुना कृतीयोजने’वर एक हजार ३०६ कोटी रुपये खर्च केले आहेत. लोकसभेत भारतीय जनता पक्षाचे योगी आदित्यनाथ यांनीही हा प्रश्न शुक्रवारी उपस्थित केला होता. पर्यावरण व वनराज्यमंत्री जयराम रमेश यांनीच सरकारी आकडेवारी जरी प्रदूषण रोखले जात असल्याचा दावा करीत असली तरी वीस वर्षांपूर्वीपेक्षा या नद्या आज आणखी प्रदूषित आहेत, याची कबुली दिली होती. सरकारच्या मते या नद्यांमध्ये सोडल्या जाणारे ७५ टक्के सांडपाणी वा कचरा हा महापालिकांचा असतो तर २५ टक्के औद्योगिक असतो. केवळ ३५ महापालिकांच्या कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया होते लहान गावे व खेडय़ांमध्ये याबाबतीत ढिसाळ कारभार आहे.

लालगढजवळ माकप नेत्याची हत्या
मिदनापूर, १९ जुलै/वृत्तसंस्था
जंगल महाल भागात आदिवासींनी तीन दिवसांचा बंद पुकारल्याच्या पाश्र्वभूमीवर काल मध्यरात्री अशांत लालगढजवळील झारग्राम आणि गौलतोर भागात संशयित माओवाद्यांनी मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या एका स्थानिक नेत्याची व एका कार्यकर्त्यांची हत्या केली. माकपच्या विभागीय समितीचे सदस्य जालधर महातो (वय ५०) यांची झारग्राम येथे दुचाकीवरून आलेल्या अतिरेक्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. गौलतोर येथे अशोक घोष (वय ४०) या मार्क्‍सवादी कार्यकर्त्यांची हत्या झाली.

मलेशियात भारतीयांचा पक्ष
क्वालालम्पूर, १९ जुलै/वृत्तसंस्था

मलेशियातील हिंदू व भारतीय वंशीयांसाठी कार्यरत असलेल्या ‘हिंदूराफ’ (िहदू राइट्स अ‍ॅक्शन फोर्स) संघटनेचे नेते पी. उदयकुमार यांनी आज ‘ह्यूमन राइट्स पार्टी’ (एचआरपी) या नव्या राजकीय पक्षाची स्थापना केली. मलेशियातील हिंदूंच्या हक्कांसाठी त्यांनी उभारलेल्या आंदोलनाला सरकारने अवैध ठरविले होते आणि त्यांना अटक केली होती. गेले १७ महिने तुरुंगात असलेल्या उदयकुमार यांची मे महिन्यात सुटका झाली. त्यानंतर दोन महिन्यांनी त्यांनी या नव्या पक्षाची घोषणा केली आहे. मलेशियातील सत्तारूढ आणि विरोधी पक्ष हे हिंदूंच्या हक्कांबाबत आणि त्यांच्या समस्यांबाबत उदासीन आहेत. त्यामुळेच हा पक्ष आपण स्थापला असल्याचे उदयकुमार यांनी सांगितले.

सौदी चित्रपट महोत्सवावर गंडांतर
रियाध : सौदी अरेबियातला एकमेव चित्रपट महोत्सव उद्घाटनाआधीच बारगळला आहे. इस्लामी कट्टरपंथियांनी चित्रपटांना विरोध दर्शविल्याने जेद्दा येथे होणाऱ्या या महोत्सवास प्रशासनाने परवानगी नाकारली. आठवडाभर चालणाऱ्या या महोत्सवात आठ चित्रपट दाखविले जाणार होते.

कराचीतील अतिवृष्टीत १३ मृत्यूमुखी
कराची : पाकिस्तानच्या कराची शहरात आज झालेल्या अतिवृष्टीत १३ लोक मृत्युमुखी पडले तर ४० हून अधिक जखमी झाले. यातील बहुसंख्य मृत्यु हे विजेचा धक्का बसल्याने तसेच पडझड झाल्याने ओढवले. पावसाने कराची तसेच सिंध प्रांतातील अनेक भागांतील जनजीवन पूर्णपणे कोलमडले. शहरातील वीजपुरवठाही खंडित झाला होता तसेच मोबाइलसेवाही बंद पडली होती.

रेल्वेअपघातात ४७ प्रवासी जखमी
सॅनफ्रान्सिस्को : अमेरिकेच्या सॅनफ्रान्सिस्को स्थानकात दोन रेल्वेगाडय़ांची टक्कर होऊन काल अनेक प्रवासी जखमी झाले. यातील एक गाडी स्थानकात उभी होती तर दुसरी मागून येऊन तिच्यावर आदळली. या गाडय़ा प्रवाशांनी भरल्या होत्या मात्र या प्रवाशांपैकी कुणीही गंभीर जखमी मात्र झालेले नाही.

पोलीस व जवानांसाठी एड्स जागृती
नवी दिल्ली : पोलीस व निमलष्करी दलांतील जवानांमध्ये एड्सची लागण वाढत असल्याची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली असून पुढील महिन्यात त्यांच्यासाठी खास शिबिराचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. एड्स रोखण्यासाठीचा कृतीकार्यक्रम आणि काही योजना या शिबिरात जाहीर होणार आहेत. सात निमलष्करी दले व सर्व राज्यांतील पोलीस यात सहभागी होतील.

महाराष्ट्रातील भाविकाचा मृत्यू
जम्मू : वैष्णोदेवी यात्रेदरम्यान आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने जम्मू आणि काश्मीरमधील रिसाई जिल्ह्यात महाराष्ट्रातील शंकर विठ्ठल (वय ३५) आणि छत्तिसगढचे बी. वेंकटरामन (वय ६०) या दोघांचा मृत्यु ओढवला. हृदयविकाराचा त्रास होऊ लागताच त्यांना रुग्णालयात दाखल केले गेले पण वाटेतच त्यांनी प्राण सोडले होते. त्यांचे मृतदेह त्यांच्या आप्तांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.