Leading International Marathi News Daily

मंगळवार, २१ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

तलत आणि शमशादच्या आवाजाची जादू..
रफी, मुकेश आणि किशोर यांच्याप्रमाणेच हिंदी चित्रपटसृष्टीत जबरदस्त कर्तृत्व गाजविणारे गायक म्हणजे तलत मेहमूद आणि मन्ना डे..तलतचा आवाज मधाळ, मखमली, रेशीम स्पर्शी तर मन्ना डेचा खुला, तयार आणि भारदस्त..दोन्ही गुणी गायक असूनही त्यांचे दुर्दैव म्हणजे त्यांना आघाडीचे नायक मिळाले नाहीत. दिलीपकुमारला रफी, मुकेशला राज कपूर आणि किशोरला राजेश खन्ना हे जसे हिरो मिळाले तसे पक्के हिरो यांना मिळाले नाहीत. दोघांचेही सर्व संगीतकारांशी घरोब्याचे आणि जिव्हाळ्याचे संबंध..त्यामुळेच दोघे आघाडीवर नसले तरी आपल्या गुणांवर इथे टिकून राहिले. शेमारू कंपनीने तलत मेहमूद, शमशाद बेगम आणि मन्ना डे यांनी गायलेल्या गीतांच्या दोन व्हीसीडी नुकत्याच बाजारात आणल्या असून त्यातील गाणी नक्कीच

 

चांगली आहेत. शमशाद, तलतचे एकत्र नाव पाहून कोणत्याही रसिकाला ही द्वंद्वगीते आहेत असे वाटेल, पण या दोघांची ही युगुल गीते नाहीत, तर स्वतंत्र आहेत. मन्ना डेची सर्व १२ गाणी त्याची एकटय़ाची आहेत. शमशाद बेगम या ज्येष्ठ गायिकेला यंदा पद्म पुरस्कार देण्यात आला आणि या गायिकेच्या आजपर्यंतच्या कर्तृत्वाला मानवंदना देण्यात आली. खरे तर हा पुरस्कार केव्हाच मिळावयास हवा होता..पण प्रकाशझोतात असणाऱ्यांनाच या देशात प्रथम पसंती दिली जाते हे कलाकारांच्या दृष्टीने दुर्दैव आहे..लाहोरच्या पांचोली आर्ट्सच्या सिनेमांमधून आपल्या गायनाला सुरुवात करणारी शमशाद तशी ६८ ते ७० पर्यंत गात होती, नंतर मात्र ती पडद्याआड गेली. या व्हीसीडीच्या निमित्ताने शमशाद बेगम यांच्या सूरांना पुन्हा एकदा उजाळा मिळून जातो.
‘तेरी मेहफल में किस्मत आजमा कर हम भी देखेंगे’ (मुगल-ए-आझम), ‘काहे कोयल शोर मचाये रे’ (आग), ‘रेशमी सलवार कुर्ता जाली का’ (नया दौर), ‘शरमाये काहे घबराये काहे’ (बाजी), ‘एक दो तीन, आजा मौसम है रंगीन’ (आवारा), ‘कही का दीपक’ (आग) अशी काही शमशादची गाणी यात निवडण्यात आली आहेत. मिलते ही आँखे दिल हुआ दिवाना किसीका हे बाबुल चित्रपटात संगीतकार नौशाद यांनी दिलेले गाणे तलत आणि शमशादचे गाजलेले द्वंद्वंगीत आहे. पण या व्हीसीडीत ते घेण्यात आलेले नाही. बाबुलमध्ये नौशाद यांनी तलतच्या आवाजाचा दिलीपकुमारसाठी सुरेख वापर केला होता. शमशादचीही काही खास गाणी होती. जलते है जिसके लिए (सुजाता), ये नयी नयी प्रीत है (पॉकेटमार), ये मेरे अंधेरे उजाले न होते (प्रेमपत्र), आ हा रिमझिम के ये प्यारे प्यारे (उसने कहा था), जाये तो जाये कहाँ (टॅक्सी ड्रायव्हर) ही तलतची अन्य स्वतंत्र गाणी यामध्ये दिसतात. पैकी शशी कपूर-साधना यांचा चित्रपट प्रेमपत्र हा बिमल रॉय यांचा अखेरच्या दिवसातील चित्रपट होता, पण त्यांच्या इतर चित्रपटांना जसे यश लाभले तसे मात्र या चित्रपटाला मिळाले नाही. दोघांची एकत्र द्वंद्वगीते या व्हीसीडीत नाहीत, आहेत ती स्वतंत्र आहेत. त्यामुळे दोघांच्या नावाचा एकत्र वापर ही व्यावसायिक चलाखी आहे, हे लगेच लक्षात येते.
बेस्ट ऑफ मन्ना डे
लपक झपक तू आ रे बदरवाँ (बुट पॉलिश), तेरे नैना तलाश करे (तलाश), आयो कहाँ से घन:श्याम (बुढ्ढा मिल गया), तुम बेसहारा हो तो किसी का सहारा बनो (अनुरोध), दैय्या रे दैय्या रे चढ गया पापी बिछुआ (मधुमती) कहनी है इक बात (तलाक), सांझ ढली दिल की लगी (कालाबाजार) आणि मोहम्मद शहा रंगीले (जब से तुम्हे देखा है) ही अशी काही मन्ना डे यांची खास गाणी पाहताना रसिकांना मजा येईल. शास्त्रीय बाजाचे कोणतेही गाणे खुलविण्यात मन्ना डे यांचा हात कोणीही धरू शकत नव्हता. अनेक संगीतकारांनीही अशी आपली खास चोखंदळ रचना मन्नादांच्या हाती विश्वासाने सोपविल्या होत्या. लपक झपक, आयो कहाँ से घन:श्याम, मोहम्मद शहा रंगीले, तेरे नैना तलाश करे ही गाणी खास शास्त्रीय बाजाची आहेत. पैकी मोहम्मद शहा रंगीले ही सवाई गंधर्व यांनी लोकप्रिय केलेली खास चीज आहे. जब से तुम्हे देखा है या एका पडेल चित्रपटांत त्यावर बेतलेले हे गाणे घेण्यात आले आहे. हास्य अभिनेते आगा यांच्यावर ते चित्रित झाले होते. खाली डब्बा खाली बोतल (नीलकमल), देखिये तो क्या अजीब हाल है (कल आज और कल), क्रोध, लोभ, माया मै (क्रोध) अशी अन्य गाणी यात दिसतात. रसिकांनी ही व्हीसीडी आवर्जून पाहण्याजोगी.
तस्वीर ८ बाय १०
डोर, इक्बाल आणि हैद्राबाद ब्ल्यूजसारखे खास सिनेमे देणाऱ्या दिग्दर्शक नागेश कुकनूर यांची निर्मिती असलेल्या तस्वीर ८ बाय १० या चित्रपटाची व्हीसीडी शेमारू कंपनीनेच सादर केली आहे. जेव्हा मल्टीप्लेक्सच्या मालकांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन पुकारले होते त्याचवेळी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता व तो तसा दुर्लक्षितही राहीला. या चित्रपटामध्ये अक्षयकुमारसोबत आयेशा टाकिया होती. बऱ्याच कालावधीनंतर अक्षयकुमारने यात विनोदी अभिनय न करता नेहमीच्या थाटणीचा रोल केला होता. फॉरेस्ट ऑफीसर असलेल्या अक्षयकुमारच्या वडिलांचा मृत्यू होतो, पण ती एक हत्याच आहे हे नायक शोधून काढतो असे या चित्रपटाचे कथानक होते. नायक छायाचित्रांच्या पाश्र्वभूमीवर भूतकाळात घडलेली कोणतीही घटना पाहू शकतो व ती त्याला दैवी देणगी असते. अर्थात या चित्रपटातील हा खास कुकनूर टच होता, पण प्रेक्षकांच्या मनाला तो फार भावलेला दिसत नाही. ९९ रुपये अशी या व्हीसीडीची किमत आहे.
किस से प्यार करू
अर्शद वारसी, आशिष चौधरी आणि आरती छाबरिया यांच्या भूमिका असलेल्या किस से प्यार करू या चित्रपटाची व्हीसीडीही शेमारूनेच बाजारात आणली आहे. तीन तरुण आणि तीन तरुणींवर ही तरुणाईची प्रेमकथा नेहमीच्या वळणानेच गेली आहे. मित्रावर नव्हे तर त्याच्या मालमत्तेवर प्रेम करणाऱ्या प्रेमिकेपासून दोघे आपल्या मित्राला कसे वाचवतात, याची मनोरंजक कहाणी या चित्रपटांत आहे. या व्हीसीडीची किमतही ९९ रुपये आहे.
satpat2007@rediffmail.com