Leading International Marathi News Daily

मंगळवार, २१ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

टेलिस्कोप
सुनील नांदगावकर
‘सच का सामना’मध्ये विनोद कांबळी आणि उर्वशी ढोलकिया

स्टार प्लसवर सुरू झालेल्या ‘सच का सामना’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये सोमवारी क्रिकेटपटू विनोद कांबळी आला. आता आज, मंगळवारीही आपल्या कुटुंबातील सदस्यांसमोर ‘सच का सामना’मधील प्रश्नांची उत्तरे देणार आहे. अलीकडेच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी दोघेही आपले गुरू रमाकांत आचरेकर यांच्या सत्कारप्रसंगी एका मंचावर आले होते. सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीच्या मैत्रीविषयी प्रश्न विचारला जाणार आहे. यावर ‘सचिन तेंडुलकरच्या विरोधात मला काही बोलायचे नाही’ असे उद्गार विनोदने या कार्यक्रमात काढले आहेत. राजीव खंडेलवाल या रिअ‍ॅलिटी शोचा सूत्रधार असून सगळे काही खरे बोलायचे असल्यामुळे हा शो सुरू झाल्यापासूनच चर्चेचा विषय बनला आहे. या शोमध्ये प्रथमच सेलिब्रिटी म्हणून विनोद कांबळीला आमंत्रित करण्यात आले आहे. एक प्रकारे लाखो प्रेक्षक आणि स्टुडिओत उपस्थित असलेले लोक, शिवाय आपल्या कुटुंबातील सुहृदांसमोर सूत्रधाराने विचारलेल्या खाजगी आणि नाजूक प्रश्नांना उत्तरे

 

देण्याचा हा कार्यक्रम असल्यामुळे तो लोकप्रिय झाला आहे. विनोद कांबळी सोबतच मंगळवारी टीव्हीवरील लोकप्रिय कलावंत आणि ‘कसौटी जिदंगी की’ या मालिकेमुळे गाजलेली अभिनेत्री उर्वशी ढोलकिया हीसुद्धा राजीव खंडेलवालच्या २१ प्रश्नांना आपल्या आईसमक्ष उत्तरे देणार आहे. तिने राजीव खंडेलवालसोबतही मालिकांमधून कामे केली असल्यामुळे ती त्याच्या प्रश्नांना कशाप्रकारे सामोरी जाते हे पाहणेही रंजक ठरणार आहे. हा रिअ‍ॅलिटी शो रात्री १०.३० वाजता स्टार प्लसवर दाखविला जातो.
आता मराठमोळे रामायण
रामानंद सागर यांनी दूरदर्शनवर रामायण मालिका आणली त्याला आता २०-२५ वर्षे उलटून गेली असली तरी अजूनही रामायण म्हटले की अरुण गोविल आणि दीपिका चिखलिया व रावणाच्या भूमिकेतील अरविंद त्रिवेदी हे लगेच आठवते. हीच मालिका आता मराठीत डब करण्यात आली असून सोमवारपासून ‘मी मराठी’वर दाखविली जात आहे. दर सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ७.३० वाजता पुन्हा एकदा रामायण पाहता येणार आहे. त्या काळी गाजलेली ही मालिका आजच्या पिढीलाही आवडेल का ते लवकरच समजेल. त्या काळी दूरदर्शन हे एकच चॅनल होते आणि जगभरातील सर्वाधिक पाहिली गेलेली पौराणिक मालिका अशी या मालिकेची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली होती. त्यानंतरच्या काळात बी. आर. चोप्रा यांनी ‘महाभारत’ मालिका छोटय़ा पडद्यावर आणली आणि तीसुद्धा तुफान लोकप्रिय ठरली. आता सध्या टीव्हीवरून अनेक पौराणिक कथांवर आधारित मालिका दाखविल्या जात आहेत. पौराणिक मालिकांची लोकप्रियता ओळखूनच ‘रामायण’ मालिका मराठीत डब करून दाखविण्याचा ‘मी मराठी’चा प्रयत्न कितपत यशस्वी होतो ते पाहायचे.
निक गॉगल्स
स्पॉन्जीबॉब स्क्वेअरपॅण्ट्स ही बच्चेकंपनीची अतिशय आवडती व्यक्तिरेखा. निक चॅनलवरून दाखविण्यात येणाऱ्या लोकप्रिय मालिकेद्वारे आता २२ जुलै रोजी दिसणाऱ्या सूर्यग्रहणानिमित्त बच्चेकंपनीला निक गॉगल्सचे वाटप करण्यात येत आहे. निकइंडिया डॉट कॉमवर लॉगऑन करून अथवा ५६८८२ या नंबरवर स्वत:चे नाव, नंतर स्पेस सोडून solar असे टाइप करून एसएमएस पाठवून निक गॉगल्स मिळविता येतील.
‘क्राइम डायरी’मध्ये नगर जिल्ह्य़ातील घटना
ई टीव्ही मराठीवरच्या ‘क्राइम डायरी’मध्ये २३ जुलैपर्यंत नगर जिल्ह्य़ात घडलेल्या सत्य घटनेचे नाटय़ रुपांतर दाखविण्यात येत आहे. ‘काळ्या मातीत मातीत’ असे या नाटय़ रुपांतराचे शीर्षक असून क्रूरकर्मा अण्णा वैद्यच्या सत्यकथेचे नाटय़रूपांतर दाखविले जात आहे. हा कार्यक्रम दुपारी १ वाजता दाखविण्यात येतो. क्राइम डायरीमध्ये प्रथमच ही ९ भागांची मालिका प्रसारित केली जात असून विवेक देशपांडे यांनी या मालिकेचे दिग्दर्शन केले आहे. स्वार्थाध माणूस कोणत्या थराला जाऊ शकतो याचे चित्रण यात आहे.
राखी का स्वयंवरमध्ये आता अंतिम स्पर्धा
हृषिकेश येथील मनमोहन तिवारीच्या घरी राखी सावंत जाणार

एनडीटीव्ही इमॅजिनवर सुरू असलेल्या ‘राखी का स्वयंवर’ या राखी सावंतच्या रिअ‍ॅलिटी शोमध्ये आता मानस कटयाल, क्षितीज जैन, इलेश पारूजानवाला आणि मनमोहन तिवारी असे चार स्पर्धक अंतिम फेरीपर्यंत पोहोचले आहेत. सुयोग्य वर निवडीच्या या स्पर्धेत सुरुवातीला १६ वर स्पर्धेत सहभागी झाले होते. सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता दाखविण्यात येणाऱ्या या कार्यक्रमात राखी सावंत आता चारही भावी वरांच्या घरांना भेटी देणार आहे.