Leading International Marathi News Daily

मंगळवार, २१ जुलै २००९

लोकमानस

मोडका ‘पुल’ आणि धडका पूल!
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे कधीच पुरा झाला. वापरात यायला लागला. प्रवास वेगात व्हायला लागला. लोक त्याचं कौतुक करू लागले.
या महामार्गाला नाव नाही हे जाम लक्षातच आलं नाही कोणाच्या. ‘कोणाच्या’ म्हणजे सामान्य

 

लोकांच्या, जनतेच्या. परंतु राजकीय पक्षांच्या पक्कं लक्षात होतं बरं ते. त्यातल्या काँग्रेस पक्षाने- ‘यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग’ असं नाव देऊन टाकलं त्यांनी त्याला.
हे नाव ‘शिवसेने’ला मान्य नाही. शिवसेना म्हणते साक्षात बाळासाहेबांनी ‘पु. ल. देशपांडे’ यांचं नाव द्यायचं जाहीर केलं होतं, त्यामुळे तेच नाव दिलं जायला हवं. दुसऱ्या कुठल्याही नावाला ‘शिवसेने’चा असेल विरोध.
मला अचानक आठवण झाली तेरा वर्षांपूर्वी शिवसेना-भाजप युती शासनाने पु. ल. देशपांडे यांना ‘महाराष्ट्र-भूषण’ पुरस्कार समारंभपूर्वक दिला त्या प्रसंगाची.
पु. ल. देशपांडे आजारी होते. तरी आले कसेबसे समारंभाला. सन्मान स्वीकारला. त्यांचं उत्तराचं भाषण (सुनीताबाईंनी) वाचून दाखवलं. त्यात, महाराष्ट्रातल्या त्यावेळच्या भयग्रस्त वातावरणाबद्दल आणि सामान्य माणसांच्या होणाऱ्या होलपटीबद्दल खंत व्यक्त केली होती.
जोडीला सुनीताबाईंनी गोविंदाग्रजांचं ‘मंगल देशा, पवित्र देशा’ हे महाराष्ट्र-गीत म्हटलं आणि ती खंत अधिक तीव्र केली.
युती-शासनावर टीका करून पु. ल. देशपांडे यांनी समारंभाचा अनुचित बेरंग केला, अशी प्रतिक्रिया झाली शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची. त्यांनी या पहिल्या ‘महाराष्ट्र-भूषणा’ला आपली जागा दाखवून दिली.
ते म्हणाले, ‘‘सरकारच्या विरोधात बोलायचं होतं तर घेतली कशाला पदवी?—- या साहित्यिकांना काय कळतंय? उपयोग काय यांचा समाजाला?..‘‘या मोडक्या ‘पुला’कडून कोण ऐकणार उपदेश?..‘‘खरं म्हणजे हे सरकार पहिला ‘महाराष्ट्र-भूषण’ पुरस्कार मलाच द्यायला निघालं होतं!’’
यावर अधिक काही कशाला लिहायचं?
तेव्हा, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गासारख्या धडधडीत धडक्या पुलाला मोडक्या पु.लं.चं नाव देण्यासाठी शिवसेना आंदोलन करते आहे. गंमत आहे!
अनंत भावे, माटुंगा, मुंबई

‘लवासा’ सर्वत्रच घडत आहे
‘लवासा लेक सिटी: चंगळवादाचा विनाशकारी रस्ता’ (१७ जुलै) या सुलभा ब्रrो यांच्या अप्रतिम लेखाबद्दल त्यांचे अभिनंदन. हा पर्दाफाश सुबोध ओघवत्या भाषेत जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम त्यांनी केले आहे. या लेखाचा इंग्रजी, गुजराती, हिंदी, कन्नड, मल्याळम इत्यादी सर्व भाषांत अनुवाद होऊन सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे. जे लवासाच्या बाबतीत घडले ते सर्वत्र होत आहे. हा विकासाचा मलिन, अभद्र चेहरा आहे. विकासाच्या चकचकीत चेहऱ्याला भुलणाऱ्यांना तो कधीच दिसत नाही.
खरे तर पार्लमेंटरी डेमॉक्रसीमध्ये हे काम विरोधी पक्षांनी करायला पाहिजे. पण त्यांचे हातही बरबटलेले असतात आणि कुठल्या तरी नामांकनासारख्या पोकळ, पोचट प्रश्नात ते जनतेला गुंतवून ठेवतात. मग चळवळी सुरू होतात. चळवळीत आक्रस्ताळेपणा येतो व चळवळ चालवणाऱ्यांना हटवादी आणि वेडे ठरवले जाते. मुद्यांची जागा गुद्दे घेतात.
विचारवंतांचे डोके ठिकाणावर असले तरच विकास होऊ शकतो. इंजिनीअरिंग माव्‍‌र्हल्स घडवण्याची तंत्रकुशलता आपल्याकडे आहे. पर्यावरण, पुनर्वसन, मानवकल्याणाच्या तीव्र जाणिवा ठेवून विकास साधता येतो. अहिंसेच्या, असहकाराच्या शस्त्राने ब्रिटिश साम्राज्यशाहीला शह देणारा हा देश. आपल्याला? शुद्ध, विकास साधणार नाही? सुलभा ब्रह्मे यांनी सर्वाना खडबडून जागे केले आहेत. पुन्हा एकदा अभिनंदन.
आशा दामले, माहीम, मुंबई

शाळा भरताना.. सुटताना..
नव्याने शाळा सुरू झाल्यावर, सांताक्रूझ पश्चिम येथील एका प्रसिद्ध शाळेत जाण्याचा योग आला आणि तेथील शाळा सुटण्याच्या व भरण्याच्या वेळची परिस्थिती बघून छातीत धडकी भरली.
या शाळेत ठराविक अंतरावर राहणाऱ्या ज्यु. के.जी.च्या (वय ३-४ वर्षे) मुलांसाठीही शाळेची बस सक्तीची आहे व त्यासाठी वर्षांची सुमारे १० हजार रु. फी सुरुवातीलाच भरणे सक्तीचे आहे. याशिवाय टय़ूशन फी, हॉबी क्लास फीच्या नावाखाली भरमसाठ पैसे उकळले जातात ते वेगळेच.
शाळा भरण्याच्या वेळी व सुटण्याच्या वेळीही शाळेच्या परिसरातल्या अरुंद रस्त्यावर प्रचंड गोंधळ चालू असतो. शाळेच्या दहा-पंधरा बसेस, रिक्षा, दुचाकी वाहने, खासगी वाहने, पालक त्यांची तीन-चार वर्षांची चिमुरडी मुले यांची कोंडी होत असते. त्यातच कोणतेही नियम माहीत नसलेले, प्रशिक्षण नसलेले भाडोत्री सुरक्षारक्षक उगीचच शिटय़ा वाजवत गोंधळात भर घालत असतात.
अशा परिस्थितीत कितीही काळजी घेतली तरी मुले हरवणे, लहान मुलांचे अपघात, आगीसारखी आणीबाणी उद्भवल्यास प्रचंड गोंधळ उडून जीवितहानी होण्याचा संभव आहे.
असे प्रसंग आल्यावर मग जागे होऊन थातुर मातुर उपाय योजण्यापेक्षा आधीच सावध होऊन पालक, शाळाचालक व शिक्षण खाते यांनी या समस्येवर सर्व बाजूंनी साधकबाधक विचार करून उपाययोजना आखणे व त्याची अंमलबजावणी नीट होते की नाही हे पाहणे आवश्यक आहे. बहुतेक शाळांमध्ये अशीच परिस्थिती असणार. त्यासाठी केजीच्या मुलांना बसची सक्ती न करणे मुलांना घेऊन येणारी खासगी वाहने थोडी दूर उभी करणे, वाहतूक पोलीस नेमणे इ. उपाययोजना येतील.
ज्ञान वाघ, वांद्रे, मुंबई
wagh@hotmail.com

‘दिसते मजला..’ शांताबाईंचे गीत
दिवंगत गीतकार शांताराम नांदगावकर यांच्यावरील व्यक्तिवेध (१३ जुलै) म्हणजे शांताराम नांदगावकरांचे अर्कचित्रच होय.
परंतु यामध्ये आपण दिले त्या गाण्याचा संदर्भ सदोष आहे. ‘अष्टविनायक’ चित्रपटातील ‘दाटून कंठ येतो’ हे गाणे शांता शेळकेंचे आहेच, परंतु ‘दिसते मजला सुखचित्र नवे’ हेदेखील शांता शेळके यांचेच आहे. या चित्रपटातील सुरुवातीचे ‘तू सुखकर्ता’ व ‘आली माझ्या घरी ही दिवाळी’ ही दोन गाणी मधुसूदन कालेलकरांची तर शेवटचे ‘अष्टविनायक’ गीत जगदीश खेबुडकरांचे आहे.
यातील पं. वसंतराव देशपांडे यांनी अजरामर केलेले ‘प्रथम तुला वंदितो’ हेच गीत कै. शांताराम नांदगावकर यांचे होते.
अमेय प्रमोद रानडे, मुलुंड, मुंबई

आक्षेपार्ह जाहिरात
खाजगी टीव्ही वाहिन्यांवर गेले अनेक दिवस बजाज पल्सार २२० सी या वाहनाची जाहिरात प्रदर्शित होत असते. विचार करणाऱ्या कुणाही भारतीयाला ती खटकेल. या जाहिरातीत एक भारतीय माणूस हातात बंदूक नसताना केवळ दहशतीच्या जोरावर पैसे पळवून नेत असतो, त्या भागातले पोलिस मोटारी व हेलिकॉप्टरनेसुद्धा त्या ठिकाणी येत असतात; मात्र ते पोहोचायच्या आत केवळ इंजिनाच्या क्षमतेच्या जोरावर तो त्यांच्या हातावर तुरी देऊन पळून जाऊ शकतो. एवढेच नव्हे तर ‘द फास्टेस्ट इंडियन’ असे बिरुद स्वत:मागे लावून घेतो. जाहिरातकर्त्यांना यातून काय दाखवायचे आहे? एक भारतीय माणूस चोर आहे.. तो पोलिसांना मूर्ख बनवतो आणि सहज निसटून पळून जाऊ शकतो.?
डॉ. संतोष सायनेकर,कल्याण