Leading International Marathi News Daily

मंगळवार, २१ जुलै २००९

विठ्ठल-रुक्मिणीची रोजची पंचामृत महापूजा उत्सवमूर्तीवर करणार
पंढरपूर, २० जुलै/वार्ताहर
विठ्ठल-रुक्मिणी यांना रोज होणाऱ्या सहा पंचामृतयुक्त महापूजेमुळे स्वयंभू विठ्ठलाच्या मूर्तीची झीज होत असून, पुरातत्त्व खात्याची पाहणी व अहवालानंतर रोज होणाऱ्या महापूजा बंद करण्याचा निर्णय घेण्यात येऊन महापूजा उत्सवमूर्तीवर केल्या जातील. पुरातत्त्व संशोधन खात्याची पाहणी झाल्यावर महापूजा बंद करण्यात येणार आहेत, असे अध्यक्ष शशिकांत पागे यांनी पत्रकारांना सांगितले.

शिक्षण संस्था बंद पाडण्याचा ‘जनसुराज्य शक्ती’ चा इशारा ; एटीकेटी अंमलबजावणी आराखडा जाहीर करण्याची मागणी
कोल्हापूर, २० जुलै / प्रतिनिधी

इयत्ता दहावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाने एटीकेटीचे धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे इयत्ता अकरावी आणि इयत्ता बारावीच्या स्तरावर काही व्यावहारिक समस्या निर्माण होणार असून एटीकेटी अंमलबजावणीबाबतचा आराखडा जाहीर करावा अन्यथा विद्यार्थी आणि पालकांची आर्थिक कोंडी करणाऱ्या शैक्षणिक संस्था बंद पाडण्यात येतील, असा इशारा जनसुराज्य शक्तीच्या वतीने आज विभागीय शिक्षण उपसंचालक सर्जेराव जाधव यांना देण्यात आला.

तीस लाख साखर पोत्यांच्या साठय़ाची तातडीने चौकशीची मागणी
सांगली, २० जुलै / प्रतिनिधी

राज्यातील खुल्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या सुमारे ७५० कोटी रुपये किमतीच्या वायदे बाजारातील गोदामात असलेल्या ३० लाख साखर पोत्यांच्या साठय़ाची तातडीने चौकशी करावी, अशी मागणी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे केल्याची माहिती साखर व्यवसायातील तज्ज्ञ, माजी आमदार कन्हैय्यालाल गिडवाणी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

पंचगंगेचे प्रदूषण रोखण्याच्या ७५ कोटींच्या प्रकल्पाला केंद्र सरकारची मंजुरी
कोल्हापूरसह साठ गावांतील नागरिकांच्या दुर्दैवाचे दशावतार संपण्याच्या मार्गावर
कोल्हापूर, २० जुलै / विशेष प्रतिनिधी
पंचगंगेच्या प्रदूषणामुळे गेल्या पंधरा वर्षाहून अधिक काळ रोगराईच्या विळख्यात सापडलेल्या कोल्हापूरवासियांसह आजूबाजूच्या साठ गावातील नागरिकांच्या दुर्दैवाचे दशावतार संपण्याच्या मार्गावर आहेत. पंचगंगेचे प्रदूषण रोखण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेने प्रस्तावित केलेल्या ७५ कोटी रुपयांच्या प्रकल्पाला सोमवारी केंद्र शासनाच्या अर्थव्यवहार समितीच्या बैठकीत मंजुरी दिली असून, याबाबतचे लेखी आदेश लवकरच प्रश्नप्त होतील अशी माहिती महापौर उदय साळोखे यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.

सौरऊर्जेचा जय हो!
गेल्या काही वर्षाच्या सौरऊर्जेचा वापर पाहता तरी आता तुम्हा- आम्हाला नवीन राहिली नाही. मुख्य मुद्दा आहे, की तिचे वापराचे प्रमाण अजूनही अल्प आहे. तिचा वीजनिर्मितीसाठी वापर जसा वाढेल, तशी ती पारंपरिक पद्धतीच्या विद्युतऊर्जेला पर्याय देऊ शकेल. तोही प्रदूषणमुक्त ऊर्जेचा! सध्या संशोधकांचे निरंतर प्रयत्न सौरऊर्जेचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि ती किफायतशीर करण्यासाठी चालू आहेत आणि ते यशस्वीही होत आहेत. सौर विद्युतऊर्जा किफायतशीर बनवायची असेल तर त्यामधील उष्णतेचा वापर फायदेशीर ठरणार आहे, याबद्दल सर्वाचे एकमत आहे. सूर्यप्रकाशापासून विद्युतऊर्जेचे प्रयत्न जिथे विजेची कमी गरज आहे, अशा ठिकाणी यशस्वी होत आहेत. खेडेगावात त्याचा प्रचारही होत आहे. त्यासाठी लागणारी फोटोव्होल्टाइक सेल्सची यंत्रणा व्यावहारिकदृष्टय़ा खर्चिक ठरत आहे.

शास्त्रज्ञांनी मिळविले नवीन मूलद्रव्य!
निसर्गात एकूण ९१ मूलद्रव्ये कमी अधिक प्रमाणात आढळतात व काही मूलद्रव्ये शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत प्रयोग करून मिळविली आहेत. अणुक्रमांकानुसार निसर्गात आढळणारे अखेरचे मूलद्रव्य आहे. ९२ अणुक्रमांक असणारे युरेनियम! ४३ अणुक्रमांक असणारे मूलद्रव्य (टेक्निशियम) निसर्गात आढळत नाही. परंतु शास्त्रज्ञांनी ते प्रयोगशाळेत कृत्रिमरीत्या मिळविले आहे व कृत्रिमरीत्या मिळविलेले ते पहिले मूलद्रव्य होय!

मॅक्सवेल - भाग २
जेम्स क्लार्क मॅक्सवेलविषयी आपण गेल्या वेळी बोललो. प्रकाश हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरींचाच एक प्रकार असल्याचं समजण्यापूर्वी मॅक्सवेलनं त्याची चिरफाड करायला सुरवात केली. रंगाची छटा, तीव्रता, प्रमाण आणि वर्ण या ४ गोष्टींच्या आधारे कुठल्याही रंगाचं वर्णन करायची पद्धत त्यानं तयार केली. लाल, हिरव्या आणि निळ्या रंगाचे फिल्टर्स वापरून जगातलं पहिलं रंगीत छायाचित्रही त्यानंच काढलं होतं! त्याला त्याच्या रंगांविषयीच्या संशोधनाबद्दल १८६० सालचं ‘रमफर्ड’ पारितोषिक मिळालं.

मृद्गंधाचा फंडा
पावसाचे आगमन हा आबालवृद्धांसाठी एक सोहळ्याचा क्षण असतो. पाऊस म्हणजे गरमगरम भजी आणि वाफाळलेले चहाचे कप, पाऊस म्हणजे छत्र्यांची भाऊगर्दी आणि वाजणारे छत हे समीकरण आपल्या डोक्यात पक्कं बसलेलं असतं. आषाढातल्या या सोहळ्याची सुरुवात निसर्गच मृद्गंधाचे अत्तर शिंपडून करतो. मात्र अनेक कवींना मोहात पाडणारा हा मृद्गंध मातीतील सूक्ष्मजिवांमुळे तयार होतो हे ऐकून आपल्यापैकी अनेकांना आश्चर्य वाटेल. मातीत अ‍ॅक्टिनोमायसिट्स (Actinomucetes) हे जिवाणू प्रश्नमुख्याने आढळून येतात. केवळ ओल्या मातीतच हे जिवाणू वाढू शकतात.
----------------------------------------------------------------------------

वाईत भांडय़ांच्या कारखान्यावर सात लाखांचा दरोडा
वाई, २० जुलै / वार्ताहर
वाई औद्योगिक वसाहतीमध्ये भांडय़ाच्या कारखान्यावर सात लाख बारा हजारांचा दरोडा टाकण्यात आला. येथील औद्योगिक वसाहतीमध्ये हेमंत मिठालाल जैन यांचा अ‍ॅल्युमिनियम भांडी बनविण्याचा कासवा मेटल इंडस्ट्रीज हा कारखाना आहे. या कारखान्यात रविवारी मध्यरात्री दहाबारा दरोडेखोरांनी तेथील कामगारांना एका खोलीत डांबून ठेवून अ‍ॅल्युमिनियमच्या शीट, प्लेट, सर्कल आदी माल पळवून नेला. या मालाची किंमत ७ लाख १२ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक घाडगे, सपोनि अमृत देशमुख, पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे व रामदास भोर तपास करीत आहेत.

सांगली बाजार समिताच्या सभापतीची आज निवड
सांगली, २० जुलै / प्रतिनिधी

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती-उपसभापतींच्या निवडीचा निर्णय मंगळवार दि. २१ जुलै रोजी गृहमंत्री जयंत पाटील देणार आहेत. त्यामुळे नेत्यांच्या बरोबर कार्यकर्त्यांनी फिल्डिंग लावली आहे. बाजार समितीच्या नव्या सभापती-उपसभापतींच्या निवडीसाठी दि. २४ जुलै रोजी निवडणूक होणार आहे. त्यामुळे परिवर्तन आघाडीतील अनेक इच्छुकांनी नेत्यांकडे आपली फिल्डिंग लावली आहे. आघाडीचे नेते आमदार अजित घोरपडे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष विलासराव जगताप, संभाजी पवार, दिनकर पाटील या नेत्यांकडे संचालकांनी आपली मोर्चेबांधणी केली आहे. या वेळी सभापतीच्या शर्यतीत जतचे प्रकाश जमदाडे, रमेश बिराजदार, महादेव अंकलगी यांच्याबरोबर माजी उपसभापती वैभव पाटील यांची नावे चर्चेत आहेत. गृहमंत्री हे मंगळवारी आघाडीच्या नेत्यांबरोबर चर्चा करणार आहेत. या वेळी सभापती व उपसभापती यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे. नेत्यांनी दोन्ही पदांची नावे यापूर्वीच निश्चित केली आहेत. त्यामुळे आता फारसा संघर्ष होण्याची चिन्हे नाहीत. दरम्यान, अजून नावे घोषित केली नसल्यामुळे प्रत्येकाने आपली ताकद पणाला लावली आहे.

सातारा जिल्ह्य़ात १७८ गोदामांवर छापे , १७ हजार क्विंटलच्यावर माल जप्त
सातारा, २० जुलै/प्रतिनिधी

सातारा जिल्हा प्रशासनाने साठेबाजीद्वारे कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या गोदामांवर छापे टाकण्याची जोरदार मोहीम उघडली असून, जिल्ह्य़ात एकूण १७८ गोदामांवर धाडी टाकून १७ हजार क्विंटलच्यावर अन्नधान्य, साखर, तेलाचा अतिरिक्त साठा जप्त करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी अपूर्वा वानखेडे यांनी दिली. या धाडींमध्ये अतिरिक्त साठा करण्यात आलेल्या गोदामांना तसेच धान्याने भरून माल घेऊन जाणाऱ्या ट्रक्सना सील ठोकण्यात आले आहे. एकूण धाडींमध्ये सातारा शहरात १९, कोरेगावात २६, जावळीत १२, कराड ९, पाटण, २२, फलटण १७, वडूज १२, माण ३१, वाई १०, खंडाळा १, महाबळेश्वर १९ गोदामांचा समावेश आहे.

वाठारच्या दारूबंदीसंबंधीची आजची सुनावणी महत्त्वाची
पेठवडगाव, २० जुलै / वार्ताहर

वाठार (ता.हातकणंगले) गावात दारूबंदीसाठी गुरुवार, २३ जुलै रोजी घेण्यात येणारे मतदान प्रक्रियेची बाब ही आता न्यायप्रवीष्ट झाली असून मंगळवारच्या (२१ जुलै) या न्यायालयीन प्रक्रियेकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान बारचालक व दारूदुकानचालक यांनी घेतलेल्या या निर्णयाचा दारूबंदी कृती समितीच्या वतीने निषेध करून आमचा हा लढा चालूच राहील असे या समितीच्या स्वाती क्षीरसागर यांनी सांगितले. वाठार येथे दारूबंदी व्हावी यासाठी महिलांनी चालू केलेल्या आंदोलनानंतर २९ जून रोजी घेण्यात आलेल्या मतदानात १७ मते कमी पडून बाटली उभीच राहिली. या पराभवाने खचून न जाता या महिलांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पुन्हा दाद मागितली. सुधारित अध्यादेशानुसार २३ जुलैला गुप्त मतदान घेण्याचे आदेश कोल्हापूरचे जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी दिले.

आमदार आडम यांचा उद्या सोलापुरात सत्कार
सोलापूर, २० जुलै/प्रतिनिधी

मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार नरसय्या आडम मास्तर यांना उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा येत्या २२ जुलै रोजी नागरी सत्कार करण्यात येणार आहे. हुतात्मा स्मृतिमंदिरात बुधवारी सायंकाळी पाच वाजता आमदार आडम मास्तर सत्कार समितीच्यावतीने त्यांचा सत्कार शेकापचे ज्येष्ठ नेते प्रश्न. एन. डी. पाटील यांच्या हस्ते, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य चिटणीस डॉ. अशोक ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि माथाडी कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे. या नागरी सत्काराचे आयोजन रवींद्र मोकाशी, अ‍ॅड.रा. गो. म्हेत्रस, अशोक इंदापुरे, एम. एच. शेख, ए. आय. अलीम, जयप्रकाश पल्ली, हणमंतू जंगम प्रभृतींच्या समितीने केले आहे.

‘वसुंधरा बचाव, कन्या बचाव’ अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद
सांगली, २० जुलै / प्रतिनिधी
सांगली, मिरज व कूपवाड महापालिका व युवक बिरादरी यांच्या वतीने आयोजित केलेल्या ‘वसुंधरा बचाव, कन्या बचाव’ या अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दीनानाथ मंगेशकर नाटय़गृहात युवक बिरादरीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान जनजागरण मोहीम युवक बिरादरीच्या वतीने राबविण्यात येत आहे. यामध्ये कार्यकर्त्यांनी प्रदूषण, रोगराई, लोकसंख्येचा भस्मासूर, अज्ञानाचा अंधकार, स्त्रीभ्रूण हत्या या विषयावर प्रबोधनपर कलाविष्कार सादर केले. समृध्दीचा व स्वच्छतेचा विचार सर्वत्र पोहोचविण्यासाठी वैचारिक गाणी व नाटय़छटा, पारंपरिक नृत्ये सादर करण्यात आली. यावेळी आरोग्य अधिकारी राम हंकारे, जनसंपर्क अधिकारी चंद्रकांत आडके यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.