Leading International Marathi News Daily

मंगळवार, २१ जुलै २००९

मुझे गुनाह कबूल है!
मी स्वत:ला कधीच निर्दोष मानले नाही. पाकिस्तान मला पाकिस्तानी नागरिक म्हणून स्वीकारत नव्हते म्हणून मी गुन्हा मान्य करत नव्हतो व स्वत:ला निर्दोष असल्याचे सांगत होतो. जर मी सुरूवातीलाच आपला गुन्हा मान्य केला असता तर ना मी तिथला (पाकिस्तान) ना इथला (भारत) राहिलो असतो. पण पाकिस्तानने आता मी पाकिस्तानी असल्याचे मान्य केले आहे. तसेच याप्रकरणी पाकिस्तानात खटला चालविण्यात येणार असल्याबद्दल मला कळले आहे. म्हणूनच मी माझा गुन्हा मान्य करीत आहे. हा कबुलीजबाब मी कोणाच्याही दबावाखाली दिलेला नसून स्वेच्छेने दिलेला आहे. तेव्हा न्यायालयाने मला शिक्षा सुनवावी आणि खटल्याला पूर्णविराम द्यावा.
कसाबच्या कबुलीनाम्यातून स्थानिक हात उघड
अबू जुंदल या भारतीयाचा प्रशिक्षणात सहभाग
सुनावणीच्या ६५ व्या दिवशी दिली कसाबने गुन्ह्याची कबुली
मुंबई, २० जुलै / प्रतिनिधी
मी अल्पवयीन आहे, मी कोणताही गुन्हा केलेला नाही अशा अविर्भावात आतापर्यंत ‘तो मी नव्हेच’ म्हणणारा पाकिस्तानी दहशतवादी अजमल अमीर कसाब याने न्यायालयात आज अचानक ‘हाँ.. मैं गुनाहगार हूँ, मुझे मेरा गुनाह कबूल हैं’, असे सांगत खटल्याला नवे वळण दिले. खटला एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचलेला असताना कसाबने अचानक आपल्या गुन्ह्याची कबुली दिल्याने सर्वच जण अवाक झाले.

मुंबईकरांची धक्कादायक कुचंबणा!दर माणशी केवळ १.७ मीटर मोकळी जागा!
बंधुराज लोणे , मुंबई, २० जुलै

राज्यकर्ते आणि नोकरशहा यांच्या अभद्र युतीने मुंबईच्या पर्यावरणाचे संतुलन धोक्यात आले असून मुंबईत सध्या दर माणशी केवळ १.७ मीटर मोकळी जागाच शिल्लक असल्याचे धक्कादायक वास्तव सामोरे आले आहे. केंद्र सरकारच्या ‘नॅशनल बिल्डिंग कोड’च्या नियमानुसार दर माणशी तीन मीटर मोकळी जागा असणे आवश्यक आहे. मुंबईतील ३ हजार १०६ राखीव हरित भूखंडांपैकी ४० टक्के जागांवर राज्यकर्त्यांच्या आशीवार्दाने बांधकाम करण्यात आले आहे. हे एकूण बांधकाम विचारात घेतल्यास त्यांचे क्षेत्रफळ ६५ ओव्हल मैदानांएवढे भरते. दिवसेंदिवस हरित भूखंडांचा घास वेगाने घेतला जात असल्याने मुंबईकरांच्या आरोग्यावर या बाबीचा दूरगामी परिणाम होणे अटळ असल्याचे पर्यावरणतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

प्रकाश महाजन यांची मनसेतून हकालपट्टी
मुंबई, २० जुलै/ खास प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस व दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन यांचे बंधू प्रकाश महाजन यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल त्यांची आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातून हकालपट्टी केली तर पक्षशिस्त मोडल्याबद्दल कर्ण (बाळा) दुनबळे यांना सर्व पदांवरून बडतर्फ केले. बीड येथे दोन दिवसांपूर्वी कर्ण दुनबळे व प्रकाश महाजन यांत हमरीतुमरी होऊन पर्यावसान मारामारीत झाले होते. या घटनेची गंभीर दखल घेत राज यांनी महाजन यांची हकालपट्टी केली. मराठवाडय़ातील मनसेत मोठय़ा प्रमाणात गटबाजी निर्माण झाल्याने गेल्या वर्षी राज ठाकरे यांनी तेथील संपूर्ण कार्यकारिणीच बरखास्त केली होती.

समलिंगी संबंध कायदेशीर ठरवण्याच्या निर्णयाला स्थगिती नाही
नवी दिल्ली, २० जुलै/वृत्तसंस्था

सरकार आपली भूमिका स्पष्ट करीत नाही तोवर, सज्ञान प्रौढ व्यक्तिंमधील समलिंगी संबंध वैध ठरविण्याच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या दोन जुलैच्या निकालास अंतरिम स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज नकार दिला. याप्रकरणी १४ सप्टेंबरला पुढील सुनावणी होणार आहे.

कृतीसमिती वीज संपावर ठाम ; आज तोडगा निघण्याची अपेक्षा
मुंबई, २० जुलै / प्रतिनिधी
राज्य वीज मंडळातील अधिकारी, अभियंते आणि कर्मचारी संघटनांच्या कृती समितीची व्यवस्थापनाबरोबर सुरू असलेली वेतनवाढीबाबतची चर्चा फिस्कटल्याने आज मध्यरात्रीपासून कृती समितीच्या सदस्यांनी संप पुकारला आहे. त्यामुळे महाराष्ट्राला पाणीटंचाईबरोबरच अंधाराच्या साम्राज्याचाही सामना करावा लागणे अपरिहार्य ठरणार आहे. दरम्यान, कृती समितीमधील संघटनांनी संप पुकारला असला तरी उद्या त्यामध्ये ऊर्जामंत्री सुनील तटकरे हे हस्तक्षेप करणार असल्याने मागण्यांबाबत उद्याच तोडगा निघेल, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात येत आहे.

दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी भारताला सर्वतोपरी साह्य - हिलरी
नवी दिल्ली, २० जुलै/खास प्रतिनिधी

दहशतवादाचा मुकाबला करणे हे सर्वात मोठे आव्हान असून दहशतवादामुळे भारतासह सर्व देशांना अमेरिका सर्वतोपरी साह्य करेल, अशी ग्वाही आज अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांनी आज येथे दिली. भारत-अमेरिका द्विपक्षीय व्यापारात अमेरिका आपले हित जोपासण्यासाठी बचावात्मक पवित्रा घेत असून त्यामुळे भारतीय उद्योगसमुहांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असल्याची भावना पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी क्लिंटन यांच्यासोबत झालेल्या चर्चेत व्यक्त केल्याचे समजते. पाच दिवसांच्या भारत भेटीवर आलेल्या क्लिंटन यांचा आज राजधानीत भरगच्च कार्यक्रम होता. सकाळी त्यांनी दिल्ली विद्यापीठाला भेट दिली. त्यानंतर त्यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते लालकृष्ण अडवाणी यांच्या निवासस्थानी जाऊन भेटी घेतल्या. सायंकाळी हैदराबाद हाऊस येथे परराष्ट्र मंत्री एस. एम. कृष्णा आणि क्लिंटन यांच्या उपस्थितीत काही महत्त्वपूर्ण द्विपक्षीय करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

पाणीकपात कमी होण्याची शक्यता
मुंबई, २० जुलै / प्रतिनिधी
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्याच्या पातळीत थोडी वाढ झाल्यामुळे सध्या सुरू असलेली ३० टक्के पाणीकपात कमी होण्याची शक्यता आहे. आज स्थायी समितीत पाणीसाठय़ाचा आढावा घेण्यात आला. या वर्षी तलावांच्या क्षेत्रात पुरेसा आणि वेळेवर पाऊस न झाल्यामुळे आठ जूनपासून पाणीकपात करण्यात आली. मात्र गेल्या काही दिवसांत तलावांच्या क्षेत्रात पाऊस झाला आहे. त्यामुळे प्रमुख तलावांतील पाण्याची पातळी वाढली आहे. तलावांतील साठा वाढत असल्याने आता ३० टक्के सुरू असलेली पाणीकपात कमी करण्याचा विचार पालिका प्रशासन करीत आहे.

अकरावीच्या प्रवेशासाठी एक दिवसाची मुदतवाढ
मुंबई, २० जुलै / प्रतिनिधी
अकरावी प्रवेशाच्या पहिल्या गुणवत्ता यादीतील तब्बल ५६ हजार विद्यार्थ्यांनी आज शेवटच्या दिवसअखेर प्रवेश घेतले नसल्यामुळे या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी एक दिवसाची मुदतवाढ देण्याचा निर्णय शिक्षण उपसंचालकांनी घेतला आहे. त्यानुसार मंगळवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतील. मुदतवाढ दिल्याने आता येथून पुढील संपूर्ण प्रवेश प्रकिया एक दिवसाने लांबणीवर पडणार आहे. त्यामुळे दुसरी यादी २४ ऐवजी २५ जुलैला तर तिसरी यादी ३१ जुलै ऐवजी १ ऑगस्टला जाहीर होणार असल्याचे शिक्षण उपसंचालक वि. ख. वानखेडे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. गुणांमध्ये तसेच जातप्रवर्गात चूक असल्यास त्यातही बदल करण्याची संधी देण्यात आल्याचे ते म्हणाले. ‘महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेने’च्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मागणीची दखल घेत शिक्षण उपसंचालकांनी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा
मुंबई, २० जुलै / प्रतिनिधी

वरळी येथील पोलीस कँटीनमध्ये जेवण केल्यानंतर ३० प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा झाली. त्यांना तात्काळ नागपाडा येथील रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यापैकी काही जणांची प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना जे.जे. रुग्णालयात हलविण्यात आले. आज रात्री नेहमी प्रमाणे वरळी येथील पोलीस कँटीनमध्ये पोलिसांनी जेवण केले. काही वेळातच त्यांच्या पोटात दुखायला लागले व उलटय़ा झाल्या. त्यांना पोलीस रुग्णालयात भरती करण्यात आले. पोलीस कँटीनमध्ये निकृष्ट दर्जाचे जेवण देण्यात येते, अशी तक्रार प्रशिक्षणार्थी पोलिसांनी केली होती. काही पोलिसांना जास्त त्रास झाला तरी कोणाचीही प्रकृती चिंताजनक नाही, असे सागंण्यात आले.

 

प्रत्येक शुक्रवारी