Leading International Marathi News Daily

मंगळवार, २१ जुलै २००९

औरंगाबाद जिल्ह्य़ात दमदार पाऊस
औरंगाबाद, २० जुलै/प्रतिनिधी

जिल्ह्य़ात काल सायंकाळपासून सर्वदूर दमदार पाऊस झाला. शहरात आज सूर्यदर्शन झाले नाही. दुपारी एक वाजता भिज पावसाला सुरुवात झाली. रात्री उशिरापर्यंत सरी कोसळत होत्या. सायंकाळी साडेपाच वाजण्यापर्यंत चिकलठाणा वेधशाळेत २९.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती.

काँग्रेस इच्छुकांच्या विधानसभेसाठी मुलाखती
लातूर, २० जुलै/वार्ताहर

विधानसभेच्या निवडणुकीसाठी जिल्ह्य़ातील पाच मतदारसंघांतील काँग्रेसच्या इच्छुकांनी पक्षश्रेष्ठांसमोर आपल्या नावाचा दावा काल सादर केला. लातूर शहर व ग्रामीण या दोन्ही मतदारसंघांतून काँग्रेस कार्यकारिणीचा ठराव घेऊन अमित देशमुख यांनी उमेदवारी मागितली. शालेय शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे, आरोग्य खात्याच्या राज्यमंत्री शोभा बच्छाव, काँग्रेसचे सरचिटणीस आमदार संजय दत्त यांनी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या.

स्वयंपाकाच्या गॅसशी निवडणूक आयोगाचा संबंध काय? - भोगे
दत्ता सांगळे, औरंगाबाद, २० जुलै

‘‘निवडणूक आयोगाने गॅससाठी मतदार ओळखपत्र सक्तीचे करण्याचा निर्णय घेतलाच कसा हे मला काही उमगले नाही. गॅसची व्यवस्था करणे सरकारचे कर्तव्य आणि निवडणुका घेणे हे आयोगाचे काम. या दोघांचा संबंध येतोच कोठे? जीवनावश्यक वस्तूंमध्ये आयोग कसे काय हस्तक्षेप करू शकतो?’’, असा सवाल मानवविकास अभियानचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ निवृत्तसनदी अधिकारी कृष्णा भोगे यांनी आज ‘लोकसत्ता’शी बोलताना केला. आयोग तर आता सरकारचे काम करू लागले आहे, असा टोलाही त्यांनी लगावला!

शेतकरी दांपत्याची आत्महत्या
गेवराई, २० जुलै/वार्ताहर

सरकारी व सावकारी कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या वृद्ध शेतकरी दांपत्याने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. गंभीर भाजलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीचे आज बीडच्या जिल्हा रुग्णालयात निधन झाले. तिच्या पतीचे काल निधन झाले. तालुक्यातील बेलगाव येथे गेल्या बुधवारी (दि. १५) या दोघांनी पेटवून घेतले.

लातूरमध्येही मनसेतील वाद उफाळला
सहा वेळा प्राणघातक हल्ला झाला - पाटील
लातूर, २० जुलै/वार्ताहर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत बीडपाठोपाठ लातूरमध्येही वाद उफाळून आला. आपल्यावर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनीच सहा वेळा प्राणघातक हल्ला केल्याची तक्रार म. न. से.चे माजी जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील-चाकूरकर यांनी आज पत्रकार बैठकीत केली.

वीज कर्मचारी आजपासून बेमुदत संपावरलातूर, २० जुलै/वार्ताहर
वीज कामगारांच्या वेतनवाढीकडे महावितरण दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे उद्यापासून विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनने बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. वीज मंडळाचे कंपनीत रूपांतर होऊन चार वर्षे झाली आहेत. या काळात वीज कंपनीतील प्रत्येक कामगार तणावाखाली काम करीत आहेत. अनेकांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारल्याने एक लाख २० हजारांवरून आता ८० हजार कर्मचारी राहिले आहेत. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर प्रशासनाची भूमिका आडमुठेपणाची असल्याने २१ जुलैपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. या संपात कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन युनियन मंडळ सहसचिव बब्रुवान गुराळे यांनी केले आहे.

मृतदेह आढळला
गंगाखेड, २० जुलै/वार्ताहर
शहरातील गोदावरी नदीच्या पुलाखाली धारखेड शिवारात आज सकाळी एक मृतदेह आढळला. मृताचे वय अंदाजे ३५ असून, त्याची ओळख पटली नाही. शिरच्छेद करून मृतदेह पोत्यात गुंडाळून टाकण्यात आला. आज सकाळी ११ वाजण्यच्या सुमारास धारखेडचे पोलीस पाटील सखाराम चोरघडे यांनी गंगाखेड पोलीस ठाण्यात ही माहिती दिली. मृताच्या अंगावर लाल रंगाचा शर्ट असून त्यावर परभणीच्या ‘ताडेश्वर टेलर्स’चे स्टीकर आहे. पोलीस उपनिरीक्षक झुंबरलाल लोंढे तपास करीत आहेत.

दोन लाखांचा ऐवज चोरला
जिंतूर, २० जुलै/वार्ताहर

सरगम म्युझिक सेंटरमधील २५ हजारांचा ऐवज पळविल्यावर लागोपाठ दुसऱ्या दिवशीही गणेशनगर भागातील प्राध्यापक विजय घोडके यांच्या घरातून अज्ञात चोरांनी पावणेदोन लाख रुपयांचा ऐवज पळविला. मुख्य रस्त्यावरील सरगम म्युझिक सेंटरवरील पत्रा वाकवून दुकानात प्रवेश मिळवून दुकानातील एक रंगीत दूरचित्रवाणी संच व ७०० सी.डी. असा एकूण २५ हजारांचा माल चोरटय़ांनी पळविला. दुसऱ्या दिवशी गणेशनगर भागातील ज्ञानोपासक महाविद्यालयाचे प्रा. विजय घोडके यांच्या घरात प्रवेश करुन पर्समधील साडेआठ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण १ लाख ७५ हजार रुपयांचा ऐवज चोरटय़ांनी पळविला. या प्रकरणी जिंतूर पोलीस निरीक्षक जीवन मुंडे यांना माहिती मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळी भेट दिली. वरील दोन्ही चोऱ्यांच्या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

महिलेचे मंगळसूत्र पळविले
औरंगाबाद, २० जुलै/प्रतिनिधी

घरासमोर उभे असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी महिलेच्या गळ्यातील ३० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र पळवून नेले. ही घटना काल रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास हडको एन-११ येथील दीपनगरात घडली. सुषमा हेमंत बागेकर (वय २४) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार रात्री खरेदी करून आल्यानंतर त्या पतीसह रस्त्यावर उभ्या होत्या. पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. बागेकर दाम्पत्याने आरडाओरड केली मात्र तोपर्यंत चोर पसार झाले होते. या प्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

निळू फुले यांना श्रद्धांजली
लातूर, २० जुलै/वार्ताहर

दिवंगत ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांना शहरातील रंगकर्मीनी श्रद्धांजली अर्पण केली. याप्रसंगी गिरीश सहदेव, भारत थोरात, शैलेश गोजमगुंडे, डॉ. संजय जमदाडे, प्रा. किरण माने, विवेक सौताडेकर, बालाजी शेळके, अप्पासाहेब माने, जितेंद्र पाटील, शिवाजी कसबे, सुनील साळुंके, डॉ. ऋतुजा अयाचित, डॉ. वर्षां पाटील आदी उपस्थित होते. जनसुराज्य शक्ती पक्षाच्या कार्यालयात फुले यांच्या तैलचित्रास हार घालून व दोन मिनिटे स्तब्धता पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

माहेश्वरी समाजातील गुणवंतांचा आज सत्कार
लातूर, २० जुलै/वार्ताहर

जिल्हा माहेश्वरी सभेतर्फे समाजातील गुणवंतांचा उद्या (मंगळवारी) सत्कार करण्यात येणार आहे. दहावी, बारावी कला, वाणिज्य, विज्ञान, कृषी, विधी आणि डी. एड्., बी.एड्., बीसीए, अभियांत्रिकी, वैद्यकीय, एमबीए, सीए आदी शाखांतील पदवी, पदव्युत्तर, पीएच.डी., नेट, सेट, सीईटीेत ८५ टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला आहे. जिल्ह्य़ातील सर्व माहेश्वरी समाजातील गुणवंतांच्या पालकांनी आपल्या पाल्याच्या गुणपत्रकाची सत्यप्रत तुलसी डिपार्टमेंटल, करवा क्लॉथ, आनंद मिल्क एजन्सी येथे जमा करावे, असे आवाहन सत्कार समितीचे संयोजक बालकिशन मुंदडा, श्याम भट्टड यांनी केले आहे.

अपघातात वृद्धा ठार
नांदेड, २० जुलै/वार्ताहर

जीपची धडक बसून अंजना रानबा गव्हाणे (वय ६५, आंबेसांगवी) जागीच ठार झाल्या. नांदेड-लोहा रस्त्यावर आंबेसांगवी पाटीजवळ काल दुपारी हा अपघात झाला.

पळसखेडा येथे आज कार्यशाळा
सोयगाव, २० जुलै/वार्ताहर

तालुक्यातील पळसखेडा येथे भुलस्थानी जलसंधारणाची जिल्हास्तरीय कार्यशाळा उद्या (मंगळवारी) आयोजित केली आहे. उद्घाटन विभागीय आयुक्त भास्कर मुंडे यांच्या हस्ते होणार आहे.

राजपत्रित अधिकारी महासंघाची संपाच्या तयारीसाठी आज बैठक
औरंगाबाद, २० जुलै/प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ येत्या ४ ऑगस्टपासून बेमुदत संपावर जात असून याची तयारी करण्यासाठी उद्या (मंगळ-वार) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात महासंघाची बैठक बोलविण्यात आली आहे. महासंघाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सरचिटणीस ग. दि. कुलथे हे या वेळी मार्गदर्शन करणार असल्याचे जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष डॉ. एन. आर. शेळके यांनी सांगितले. सहाव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करताना महाराष्ट्र शासनाने सर्व कर्मचारी, अधिकाऱ्यांवर अन्याय केला असून वेळोवेळी केलेल्या मागण्यांचाही विचार केला नाही. त्यामुळे महासंघाला संपावर जाण्याची वेळ आली आहे. अपरिहार्य परिस्थितीमुळेच ४ ऑगस्टपासून आम्ही संपावर जात असून अधिकारी संपात सहभागी होण्याची राज्यातील ही पहिलीच वेळ असावी, असेही डॉ. शेळके यांनी म्हटले आहे. उद्या सायंकाळी पाच वाजता श्री. कुलथे हे अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. जिल्ह्य़ातील अधिकाऱ्यांनी येथे मोठय़ा संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

पाण्यासाठी एकतानगरमधील महिलांचा आयुक्तांना घेराव
औरंगाबाद, २० जुलै/प्रतिनिधी
पिण्याचे पाणी मिळावे यासाठी गेल्या पंधरा दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या एकतानगर येथील महिलांनी आज थेट आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनाच घेराव घातला. ते स्थायी समितीच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी पालिका मुख्यालयात येत असतानाच महिलांनी त्यांना अडविले आणि जोरदार घोषणाबाजी केली. अचानक महिलांनी घेराव घातल्यामुळे काय झाले हे भापकर यांना समजले नाही. नहरीमधून मोटारीने पाणी उपसत असताना विद्युत धक्का लागल्यामुळे येथील एका महिलेचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून येथील महिला पाण्यासाठी आंदोलन करत आहेत. गेल्याच आठवडय़ात या महिलांनी रास्तारोको आंदोलन केले होते. आज स्थायी समितीची बैठक होणार असल्याचे समजल्यानंतर नवीन आयुक्तांना भेटण्यासाठी एकतानगरमधील महिला मोठय़ा संख्यने येथे आल्या होत्या. आयुक्त येताच त्यांनी घोषणा देत त्यांना घेराव घातला. आयुक्तांनी आंदोलक महिलांविरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले. मात्र पाण्यासाठी हे आंदोलन होत असल्याचे समजल्यानंतर त्यांचे निवदेन भापकर यांनी स्वीकारले.

दोन चंदनचोरांना बोरीजवळ अटक
बोरी, २० जुलै/वार्ताहर

बोरी-वालूर रस्त्यावर गुळखंड फाटय़ावर चंदनचोरी करणाऱ्या दोघांना बोरी पोलिसांनी काल सायंकाळी मुद्देमालासह ताब्यात घेतले. न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश आज दिला. पोलिसांनी सांगितले की, गुळखंड फाटय़ावर अज्ञात व्यक्तीजवळ चंदनाचे लाकडाचे पोते असल्याची माहिती खबऱ्यामार्फत पोलिसांना मिळाली. त्यावरून काल सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास जमादार नसीर अहमद आणि पोलीस कॉन्स्टेबल रोकडे यांनी सापळा रचून अनसरखान युसूफखान (वय ३५, निसरवाडी, औरंगाबाद) व अहमदखान अब्दुल्लाखान (वय २०, भटोरा, भोकरदन, जालना) यांना अटक केली. त्यांच्याकडे चंदनाच्या झाडाचे ४० किलो लहान-मोठे तुकडे (किंमत अंदाजे २० हजार रुपये) होते. त्याच्यासह त्यांची मोटरसायकल पोलिसांनी जप्त केली.

परतूरमध्ये दोन नगरसेवकांना नोटीस
परतूर, २० जुलै/वार्ताहर

नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पक्षादेश डावलून गैरहजर राहणाऱ्या दोन नगरसेवकांना जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस बजावली आहे. सात दिवसांच्या आत खुलासा करण्यास त्यांना सांगण्यात आले आहे. गेल्या महिन्यात नगराध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. काँग्रसचे नगरसेवक ब्रिजलाल होलाणी आणि अंकुशराव तेलगड हे पक्षादेश डावलून मतदानास गैरहजर राहिले. ते गैरहजर राहिल्याने काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार निलिमा काळे आणि उपनगराध्यक्षपदाचे उमेदवार नाजेमोद्दीन काजी यांचा पराभव झाला. काँग्रेसचे गटनेते विनायक काळे यांनी होलाणा व तेलगड यांच्याविरुद्ध तक्रार केली. जिल्हाधिकाऱ्यांनी होलाणी व तेलगड या दोन नगरसेवकांना नोटीस बजावून खुलासा करण्यास सांगितले आहे.

जिंतूरमध्ये आज मोर्चा
जिंतूर, २० जुलै/वार्ताहर

तालुक्यातील निराधारांचे अनुदान गेल्या दोन वर्षांपासून थकले आहे. त्याचे त्वरित वाटप करावे, प्रलंबित असलेल्या लाभार्थीच्या प्रकरणाला मंजुरी देऊन त्यांनाही अनुदान देण्यात यावे या मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय भांबळे यांच्या नेतृत्वाखाली उद्या (मंगळवारी) तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. पक्षच्या कार्यालयासमोरून दुपारी ११ वाजता मोर्चाला सुरुवात होईल.