Leading International Marathi News Daily

मंगळवार, २१ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

मुझे गुनाह कबूल है!
मी स्वत:ला कधीच निर्दोष मानले नाही. पाकिस्तान मला पाकिस्तानी नागरिक म्हणून स्वीकारत

 

नव्हते म्हणून मी गुन्हा मान्य करत नव्हतो व स्वत:ला निर्दोष असल्याचे सांगत होतो. जर मी सुरूवातीलाच आपला गुन्हा मान्य केला असता तर ना मी तिथला (पाकिस्तान) ना इथला (भारत) राहिलो असतो. पण पाकिस्तानने आता मी पाकिस्तानी असल्याचे मान्य केले आहे. तसेच याप्रकरणी पाकिस्तानात खटला चालविण्यात येणार असल्याबद्दल मला कळले आहे. म्हणूनच मी माझा गुन्हा मान्य करीत आहे. हा कबुलीजबाब मी कोणाच्याही दबावाखाली दिलेला नसून स्वेच्छेने दिलेला आहे. तेव्हा न्यायालयाने मला शिक्षा सुनवावी आणि खटल्याला पूर्णविराम द्यावा.
कसाबच्या कबुलीनाम्यातून स्थानिक हात उघड
अबू जुंदल या भारतीयाचा प्रशिक्षणात सहभाग
सुनावणीच्या ६५ व्या दिवशी दिली कसाबने गुन्ह्याची कबुली
मुंबई, २० जुलै / प्रतिनिधी
मी अल्पवयीन आहे, मी कोणताही गुन्हा केलेला नाही अशा अविर्भावात आतापर्यंत ‘तो मी नव्हेच’ म्हणणारा पाकिस्तानी दहशतवादी अजमल अमीर कसाब याने न्यायालयात आज अचानक ‘हाँ.. मैं गुनाहगार हँू, मुझे मेरा गुनाह कबूल हैं’, असे सांगत खटल्याला नवे वळण दिले. खटला एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचलेला असताना कसाबने अचानक आपल्या गुन्ह्याची कबुली दिल्याने सर्वच जण अवाक झाले. अर्थात पाकिस्तानने आपल्याला पाकिस्तानी नागरिक म्हणून मान्य केल्यानेच आपण आज गुन्हा मान्य केल्याचे नंतर त्याने स्पष्ट केले. गुन्हा कबूल केल्यानंतर लष्कर-ए-तैय्यबा या दहशतवादी संघटनेने त्याच्यासह इतर दहा दहशतवाद्यांना मुंबई हल्ल्यासाठी कशाप्रकारे प्रशिक्षण दिले इथपासून ते गिरगाव चौपाटीवर पोलिसांशी झालेल्या झटापटीपर्यंतच्या सर्व घटनाक्रमाचा पाढा कसाबने स्वत:च न्यायालयाच्यासमोर वाचला.
याशिवाय अबू जुंदल हा भारतीय नागरिक लष्कर-ए तैय्यबाच्या प्रमुखांपैकी एक असून मुजाहिदींना प्रशिक्षण देण्यात त्याचा महत्त्वपूर्ण सहभाग असल्याचे आणि मुंबईवर हल्ला करण्यापूर्वी त्यानेच आम्हा सगळ्यांना हिंदी भाषेचे धडे दिल्याचे सांगत कसाबने मुंबई हल्ल्यातील स्थानिक धागेदोरे उघड केले..
दरम्यान, कसाबचा गुन्ह्याचा कबुलीनामा मान्य करायचा की नाही याचा निर्णय आपण उद्या देऊ, असे सांगत विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम. एल. टहलियानी यांनी खटल्याची सुनावणी तहकूब केली.
कसाबने आपल्या कबुलीनाम्यात, लष्कर-ए तैय्यबाच्या अबू कामा, अबू काफा, अबू हमजा, जकी-उर रहमान, अबू जुंदल यांनीच मुंबई हल्ल्याच्या कटाला अंमलबजावणी देण्यासाठी अत्याधुनिक शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण दिल्याचे सांगितले. विशेष म्हणजे कसाबविरुद्ध अभियोग पक्षाने जे प्रत्यक्षदर्शी न्यायालयात हजर केले त्यांच्या साक्षीतही बरीच विसंगती असल्याचे कसाबने स्वत: या वेळी न्यायालयाला सांगितले. कबुलीनाम्यात कसाबने आपण सीएसटी स्थानकात अंदाधुंद गोळीबार केल्याचे मान्य केले. मात्र कुबेरचा नाखवा अमजितसिंह सोलंकी याची हत्या मी नाही तर माझ्या साथीदारांनी केली, असे त्याने सांगितले. एवढेच नाहीतर कामा रुग्णालयातही कुणाचीच हत्या किंवा कुणालाही लुटले नसल्याचे त्याने सांगितले. कामा रुग्णालयातून पळून जातानाही रंगभवन येथे पोलिसांच्या गाडीवर झालेला गोळीबार अबू इस्माईलने केला होता, असा दावा त्याने केला. महत्त्वाचे म्हणजे गिरगाव चौपाटीवर पोलिसांशी झटपट होतानाही मी जखमी अवस्थेत होतो, त्यामुळे त्यांना प्रतिकार करू शकलो नाही. उलट त्यांनीच हातातील बंदूक हिसकावून घेऊन काठय़ांनी बेदम मारहाण केल्याचे तो म्हणाला.
तत्पूर्वी, खटल्याची आजची सुनावणी नेहमीप्रमाणे सव्वाअकराच्या सुमारास सुरू झाली. शहीद झालेले पोलीस निरीक्षक विजय साळसकर यांच्यासोबत २६/११च्या रात्री त्यांच्या गाडीतून दहशतवाद्यांच्या मागावर गेलेले अरुण जाधव यांची महत्त्वपूर्ण साक्ष होणार होती. साडेअकराच्या सुमारास कसाबला न्यायालयात आणण्यात आले. त्यानंतर अभियोग पक्षाचे वकील उज्ज्वल निकम यांनी पोलीस उपनिरीक्षक चव्हाण यांना साक्षीदाराच्या पिंजऱ्यात बोलावले. परंतु त्याचदरम्यान कसाबने न्यायालयाकडे अ‍ॅड. अब्बास काझ्मी यांच्याशी बोलण्याची परवानगी मागितली. अवघ्या तीस सेकंदांच्या बोलण्यानंतर अ‍ॅड. काझ्मी यांनी कसाबला त्याचा गुन्हा कबूल करायचा असल्याचे न्यायालयाला सांगितले आणि न्यायालयात शांतता पसरली. त्यानंतर न्या. टहलियानी यांनी साक्षीदाराला बाहेर जाण्यास सांगत कसाबकडे तुला काही बोलायचे आहे का, अशी विचारणा केली. त्यावर पांढरा कुर्ता-पायजमा घालून न्यायालयात आलेल्या कसाबने ‘मुझे गुनाह कबूल हैं’ असे सांगितले. त्यानंतर न्यायालयाने जर तुला गुन्हा मान्य आहे, तर तुझा जबाब नोंदवून घ्यावा लागेल, असे त्याला सांगितले.
त्यानंतर पुन्हा कसाबने सीएसटी स्थानकावर अबू इस्माईलच्या साथीने गोळीबार केल्याचे सांगितले. तसेच आतापर्यंत गुन्ह्याची कबुली देणाऱ्या ज्या ‘सीडी’ दाखविण्यात आल्या त्या खऱ्या असल्याचे सांगितले.
कसाबला प्रशिक्षण भारतीयाकडूनच
मुंबईवर केलेल्या हल्ल्याचे प्रशिक्षण आम्हाला एका भारतीयानेच दिले असल्याची खळबळजनक कबुली कसाबने न्यायालयात दिली. लष्कर-ए तैय्यबाच्या अबू कामा, अबू काफा, अबू हमजा, जकी-उर रहमान, अबू जुंदल यांनीच मुंबई हल्ल्याच्या कटाला अंमलबजावणी देण्यासाठी अत्याधुनिक शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण आम्हाला पाकिस्तानमध्ये दिले. अबू जुंदल हा भारतीय नागरिक लष्कर-ए तैय्यबाच्या प्रमुखांपैकी एक असून मुजाहिदींना प्रशिक्षण देण्यात त्याचा महत्त्वपूर्ण सहभाग असल्याचे आणि मुंबईवर हल्ला करण्यापूर्वी त्यानेच आम्हा सगळ्यांना हिंदी भाषेचे धडे दिल्याचे सांगत कसाबने मुंबई हल्ल्यातील स्थानिक धागेदोरे उघड केले..