Leading International Marathi News Daily

मंगळवार, २१ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

मुंबईकरांची धक्कादायक कुचंबणा!दर माणशी केवळ १.७ मीटर मोकळी जागा!
बंधुराज लोणे , मुंबई, २० जुलै

राज्यकर्ते आणि नोकरशहा यांच्या अभद्र युतीने मुंबईच्या पर्यावरणाचे संतुलन धोक्यात आले असून

 

मुंबईत सध्या दर माणशी केवळ १.७ मीटर मोकळी जागाच शिल्लक असल्याचे धक्कादायक वास्तव सामोरे आले आहे. केंद्र सरकारच्या ‘नॅशनल बिल्डिंग कोड’च्या नियमानुसार दर माणशी तीन मीटर मोकळी जागा असणे आवश्यक आहे.
मुंबईतील ३ हजार १०६ राखीव हरित भूखंडांपैकी ४० टक्के जागांवर राज्यकर्त्यांच्या आशीवार्दाने बांधकाम करण्यात आले आहे. हे एकूण बांधकाम विचारात घेतल्यास त्यांचे क्षेत्रफळ ६५ ओव्हल मैदानांएवढे भरते. दिवसेंदिवस हरित भूखंडांचा घास वेगाने घेतला जात असल्याने मुंबईकरांच्या आरोग्यावर या बाबीचा दूरगामी परिणाम होणे अटळ असल्याचे पर्यावरणतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
मुंबईच्या विकास आराखडय़ानुसार ३ हजार १०६ राखीव हरित भूखंडापैकी २८.४४ चौरस किमी जागा मुंबईकरांसाठी मोकळी ठेवण्यात आली होती. म्हणजेच मुंबईच्या एकूण क्षेत्रफळाच्या केवळ सहा टक्के ! मात्र हरित भूखंडांवर मोठय़ा प्रमाणावर बांधकामे करण्यात आल्याने विकास आराखडय़ानुसार ठेवण्यात आलेली ही जागाही मुंबईकरांसाठी मोकळी राहिलेली नाही. मुंबईची लोकसंख्या आणि एकूण मोकळ्या जागांचे प्रमाण लक्षात घेतले तर प्रत्येक मुंबईकरांसाठी फक्त १.७ मीटर जागाच आता मोकळी आहे, अशी माहिती ‘अर्बन डिझाईन रिसर्च इन्स्टिटय़ूट’चे कार्यकारी संचालक पंकज जोशी यांनी दिली. मुंबईचे शांघाय करण्याच्या घोषणा राज्यकर्त्यांंनी केल्या. मात्र शांघायमध्ये दर माणशी ११ मीटर मोकळी जागा आहे. १९९० मध्ये शांघायमध्ये हे प्रमाण फक्त १.०२ मीटर होते. नंतरच्या काळात शांघायमध्ये विकास धोरण बदलण्यात आले आणि दर माणशी मोकळी जागा मोठय़ा प्रमाणात वाढविण्यात आली. ती न्यूयॉर्कच्या (दर माणशी ४.७६ मीटर) जवळजवळ दुप्पट आहे. मात्र मुंबईतील हे भयानक चित्र बदलता येईल, असा ‘अर्बन डिझाईन रिसर्च इन्स्टिटय़ूट’चा दावा आहे. मुंबईत सध्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ४६.५ कि.मी, तिवरांचे जंगल ३७.३ किमी, १०.६८ कि.मी मिठागरे, १३.३५ कि.मी. दलदलीची मोकळी जागा आहे. यापैकी बऱ्याच जागेवर बांधकामे झालेली आहेत. मात्र तरीही सरकारने ठरविले आणि या जागांचे संरक्षण केले तरी ती मुंबईकरांच्या आरोग्यासाठी मोठी दिलासा देणारी बाब ठरेल, अशी सूचना या संस्थेने केली आहे. मुंबईतील २६ प्रभागांत मोकळ्या जागांची तुलनात्मक स्थिती काय आहे याची माहिती ‘अर्बन डिझाईन रिसर्च इन्स्टिटय़ूट’च्या अहवालात देण्यात आली आहे. त्यानुसार शहरातील नऊ प्रभागांत आता ४,४४०,७३८ मीटरच मोकळी जागा शिल्लक आहे. तर पश्चिम उपनगरातील नऊ प्रभागांत ९,३५३,४५८ मीटर मोकळी जागा शिल्लक आहे. पूर्व उपनगरात ९,३८९,८०६ मीटर मोकळी जागा असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.