Leading International Marathi News Daily

मंगळवार, २१ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

प्रकाश महाजन यांची मनसेतून हकालपट्टी
मुंबई, २० जुलै/ खास प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस व दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन यांचे बंधू प्रकाश

 

महाजन यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल त्यांची आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातून हकालपट्टी केली तर पक्षशिस्त मोडल्याबद्दल कर्ण (बाळा) दुनबळे यांना सर्व पदांवरून बडतर्फ केले.
बीड येथे दोन दिवसांपूर्वी कर्ण दुनबळे व प्रकाश महाजन यांत हमरीतुमरी होऊन पर्यावसान मारामारीत झाले होते. या घटनेची गंभीर दखल घेत राज यांनी महाजन यांची हकालपट्टी केली. मराठवाडय़ातील मनसेत मोठय़ा प्रमाणात गटबाजी निर्माण झाल्याने गेल्या वर्षी राज ठाकरे यांनी तेथील संपूर्ण कार्यकारिणीच बरखास्त केली होती. राज यांनी या संदर्भात आज एक पत्रक प्रसिद्धीला दिले आहे. त्यात असे म्हटले आहे की, एकीकडे मनसेकडे मोठय़ा प्रमाणात तरुण वर्ग वळत असताना असुरक्षिततेच्या भावनेतून काही पदाधिकारी त्यांना येऊ देत नाहीत. किरकोळ वाद तसेच मानापमानाला मोठय़ा भांडणाचे स्वरूप देऊन पक्षाला बदनाम करणे हा काही पदाधिकाऱ्यांचा उपक्रम दिसतो. इतर पक्षांसारखी बेशिस्त आपण खपवून घेणार नाही.
यापुढेही वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांच्या कामाचा आढावा घेऊन मोठय़ा प्रमाणात फेरबदल करण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मनसेच्या सर्व सरचिटणीसांची आज ‘राजगड’ येथे राज यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली तसेच प्रकाश महाजन यांना काढण्याचा निर्णय घेण्यात आला.