Leading International Marathi News Daily

मंगळवार, २१ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

समलिंगी संबंध कायदेशीर ठरवण्याच्या निर्णयाला स्थगिती नाही
नवी दिल्ली, २० जुलै/वृत्तसंस्था

सरकार आपली भूमिका स्पष्ट करीत नाही तोवर, सज्ञान प्रौढ व्यक्तिंमधील समलिंगी संबंध वैध

 

ठरविण्याच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या दोन जुलैच्या निकालास अंतरिम स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज नकार दिला. याप्रकरणी १४ सप्टेंबरला पुढील सुनावणी होणार आहे.
दिल्लीतील एक ज्योतिषी सुरेशकुमार कौशल यांनी उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला बाजू मांडण्यास सांगितले आहे. उच्च न्यायालयात या प्रकरणात सहभागी झालेल्या ‘नाझ फाऊंडेशन’ व अन्य काहींनाही नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. लैंगिक संबंध हा सर्वस्वी व्यक्तिगत मुद्दा असून दोन प्रौढ व्यक्तिंमधील खाजगीतील समलिंगी संबंध हा गुन्हा नाही, असा निकाल दिल्ली उच्च न्यायालयाने दिला होता. त्यानंतर समलिंगींच्या हक्कांसाठी लढा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी ‘आनंदोत्सव’ साजरा केला होता तर धार्मिक क्षेत्रात एकमुखी विरोधाची प्रतिक्रिया उमटली होती. मानसशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञांमध्येही याबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. राजकीय क्षेत्रातही सावध प्रतिक्रिया उमटली होती. दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय स्वीकारायचा तर समलिंगी संबंधांना गुन्हा मानून फौजदारी कारवाईची तरतूद करणाऱ्या कलम ३७७ मध्ये दुरुस्ती आवश्यक आहे. त्यामुळे या प्रश्नावर केंद्र सरकारला ठाम भूमिका घेणे भाग होते. प्रत्यक्षात केंद्र सरकारला याबाबतीत प्रतिज्ञापत्रदेखील तयार करणे साधलेले नाही.