Leading International Marathi News Daily

मंगळवार, २१ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

कृतीसमिती वीज संपावर ठाम ; आज तोडगा निघण्याची अपेक्षा
मुंबई, २० जुलै / प्रतिनिधी
राज्य वीज मंडळातील अधिकारी, अभियंते आणि कर्मचारी संघटनांच्या कृती समितीची

 

व्यवस्थापनाबरोबर सुरू असलेली वेतनवाढीबाबतची चर्चा फिस्कटल्याने आज मध्यरात्रीपासून कृती समितीच्या सदस्यांनी संप पुकारला आहे. त्यामुळे महाराष्ट्राला पाणीटंचाईबरोबरच अंधाराच्या साम्राज्याचाही सामना करावा लागणे अपरिहार्य ठरणार आहे. दरम्यान, कृती समितीमधील संघटनांनी संप पुकारला असला तरी उद्या त्यामध्ये ऊर्जामंत्री सुनील तटकरे हे हस्तक्षेप करणार असल्याने मागण्यांबाबत उद्याच तोडगा निघेल, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात येत आहे.
व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांना प्रथम १८ टक्के वेतनवाढ देण्याचे मान्य केले होते. कृती समितीने त्याला विरोध करताना ही वाढ एकतर्फी असल्याचे जाहीर केले. त्यामुळे व्यवस्थापनाने कृती समितीला चर्चेसाठी पाचारण केले. आज दुपारी तीन वाजल्यापासून सुरू झालेल्या चर्चेत व्यवस्थापनाने २२ टक्के वेतनवाढ देण्याचा निर्णय घेतला. मात्र कृती समितीला ही वाढ मंजूर नसल्याने बोलणी फिस्कटली आणि कृती समितीने आज मध्यरात्रीपासून संपावर जाण्याचा निर्णय घोषित केला.
दरम्यान, आजच्या चर्चेच्या वेळी विविध संघटनांचे एकून २५ प्रतिनिधी चर्चेला उपस्थित होते. व्यवस्थापन १८ टक्क्यांवरून २२ टक्क्यांवर आल्याने आणखी काही टक्के दरवाढ मंजूर होईल, अशी आशा व्यक्त करून काही संघटनांनी संपाचे हत्यार उपसण्यास विरोध केला. त्याउपरही कोणताही तोडगा निघाला नाही तर ऊर्जामंत्री अथवा मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे पर्याय आपल्यापुढे खुले आहेत, असे काही संघटनांच्या प्रतिनिधींचे म्हणणे होते. मात्र कृती समितीने आज मध्यरात्रीपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला.
पॉवर फ्रण्ट, बेस्ट वर्कर्स युनियन, विद्युत श्रमिक काँग्रेस, अधिकारी संघटना, चतुर्थश्रेणी संघटना, भाकासे आदी १२ संघटनांनी या संपला विरोध केला. तर एसईए, वर्कर्स फेडरेशन, कामगार महासंघ, इंटक, तांत्रिक कामगार संघटना (दोन्ही) यांनी संपावर जाण्याचा निर्धार केल्याने हा संप यशस्वी होईल, असा दावा करण्यात येत आहे. दरम्यान, सुनील तटकरे हे उद्या या संपात हस्तक्षेप करणार असल्याने उद्याच मागण्यांबाबत तोडगा निघेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.