Leading International Marathi News Daily

मंगळवार, २१ जुलै २००९

जिल्हय़ातील साडेतीन हजार वीज कर्मचारी संपात सहभागी
नगर, २० जुलै/प्रतिनिधी
राज्य सरकारच्या विरोधात पुकारलेल्या राज्यव्यापी संपात जिल्ह्य़ातील सुमारे साडेतीन हजार वीज कर्मचारी सहभागी होणार आहेत. रात्री बारानंतर विजेची कुठलीही समस्या निर्माण झाल्यास जनतेने सरकारलाच जबाबदार धरावे, असे आवाहन आज सायंकाळी झालेल्या वीज कर्मचारी संघटनांच्या द्वारसभेत करण्यात आले.

सभापतींविरुद्ध काळे गटाचा अविश्वास ठराव ; कोपरगाव बाजार समिती
कोपरगाव, २० जुलै/वार्ताहर
राष्ट्रवादीचे माजी आमदार शंकरराव क ोल्हे यांचे समर्थक बाजार समितीचे सभापती संभाजीराव रक्ताटे यांच्याविरूद्ध आमदार अशोक काळे गटाने अविश्वास ठराव दाखल केला असून त्यांना परजणे गटाने मदत केली आहे. बाजार समितीमध्ये काळे गटाचे सहा, कोल्हे गटाचे सहा व परजणे गटाचे तीन, व्यापारी दोन, हमाल मापाडी एक असे संचालक आहेत. समितीत काळे, कोल्हे व परजणे गटात युती झाली होती. युती करताना सभापतिपद कोल्हे तर उपसभापतिपद परजणे गटाला देण्याचे ठरले होते.

निळवंडे धरणात यंदा तीन टीएमसी पाणी अडविणे शक्य
अकोले, २० जुलै/वार्ताहर

उत्तरनगर जिल्ह्य़ाच्या दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणात यंदा जवळपास तीन टीएमसी पाणी अडविणे शक्य होणार आहे. दरम्यान कालपासून पाणी अडविण्यास सुरवात झाली आहे. निळवंडे धरणात यावर्षी ६२४ मीटर तलंकापर्यंत म्हणजे सुमारे ३७ मीटर उंचीपर्यंत पाणीसाठा करता येऊ शकणार आहे.

‘नॅनो’साठी नगरकरांना सप्टेंबपर्यंत प्रतीक्षा
सागर वैद्य, नगर, २० जुलै

अवघ्या एक लाखाची कार म्हणून देशाचेच नव्हे, तर जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या सर्वसामान्यांच्या कुतूहलाचा विषय ठरलेली टाटांची ‘नॅनो’कारसाठी नगरकरांना सप्टेंबपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. शहर व जिल्ह्य़ातील ३२५ ग्राहकांना टप्प्याटप्प्याने ‘नॅनो’चे वितरण करण्यात येणार आहे.

शिर्डीच्या आबासाहेब गोंदकरने खुनाची सुपारी दिली ; आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ
नगर, २० जुलै / प्रतिनिधी
जेऊरनाक्याजवळ झालेल्या गोळीबार प्रकरणातील दोघा आरोपींच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने दोन दिवसांनी वाढ केली. दरम्यान, या प्रकरणात शिर्डीच्या आबासाहेब ऊर्फ ज्ञानदेव भागचंद्र गोंदकरसह आणखी दोघांच्या सहभाग असल्याचे आरोपी दीपक ढाकणे याने पोलिसांना सांगितले.

इच्छुकांच्या आक्रमक भूमिकेमुळे नेत्यांची कोंडी
श्रीरामपूर, २० जुलै/प्रतिनिधी

विधानसभेकरिता इच्छुक उमेदवारांनी दौरे सुरू क रून ग्रामीण भागात भेटीगाठींना प्रारंभ केला आहे. इच्छुकांच्या आक्रमक भूमिकेमुळे नेत्यांची मात्र कोंडी झाली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, सेना-भाजपा युती तसेच अन्य प्रमुख पक्षाचे उमेदवार अद्याप निश्चित झालेले नाहीत. विविध पक्षांनी अद्याप इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतलेल्या नाहीत. असे असूनही विधानसभेची निवडणूक लढवायची असा निर्धार केलेले उमेदवार मतदारसंघात जावून प्रमुख कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत.

महाविद्यालयीन विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्त्या
राहाता, २० जुलै/वार्ताहर

महाविद्यालयीन विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्त्या केली. काल (रविवारी) संध्याकळी ५.३० वा. हा प्रकार लोणीबुद्रुक येथील मुसळे वस्ती येथे घडला. प्रियंका मनसिंग परदेशी (वय १९) असे मयत विद्यार्थिनीचे नाव आहे. प्रियंका ८९ टक्के गुण मिळवून १२ वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाली होती. सरकारी कोटय़ातून तिला पुणे येथील कृषी महाविद्यालयात प्रवेश मिळाला होता. काल घराच्या जिन्याच्या स्लॅबला असलेल्या लोखंडी हुकास ओढणीने गळफास घेऊन प्रियंकाने आत्महत्या केली. त्यावेळी तिचे आई, वडील घरी नव्हते. तिच्या आत्महत्येचे निश्चित कारण मात्र समजू शकले नाही. किरण पवार यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिसांनी आकस्मात मृत्युचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास हवालदार घोडे करीत आहेत.

जेऊर कुंभारी सेवा संस्थेच्या सभासदांचा उपोषणाचा इशारा
कोपरगाव, २० जुलै/वार्ताहर

जेऊर कुंभारी सेवा संस्थेने कर्जवितरण करावे या मागणीसाठी सभासद मंगळवारपासून जिल्हा बँकेच्या तालुका विकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहेत. संस्थेच्या ६६५ सभासदांपैकी ८८ सभासदांना कर्जवितरण झाले असून काही मोजक्या सभासदांना कर्जवितरण केले जाते. २१९ शेतकऱ्यांच्या सभासदांचा वाद न्यायालयात सुरू आहे. संस्थेवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली. परंतु सचिवाअभावी कर्जवितरण ठप्प आहे. कर्जवितरणाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याकरिता उपोषणाचा निर्णय घेतला आहे.

आनंदऋषीमहाराज जयंतीनिमित्त आजपासून विविध कार्यक्रम
पाथर्डी, २० जुलै / वार्ताहर

श्री आनंदऋषीमहाराज यांच्या १०९ व्या जयंतीनिमित्त तीन दिवस विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. मुख्य सोहळा चिंचोडी शिराळ या महाराजांच्या जन्मगावी गुरुवारी (दि. २३) होणार आहे, अशी माहिती श्री तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव रमेश गांधी यांनी दिली. संस्थेच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी विश्वस्त सतीश गुगळे, विश्वजित गुगळे आदी उपस्थित होते. उद्या (मंगळवार) दुपारी माणिक दौंडी येथून शोभायात्रेस प्रारंभ होणार आहे. त्याबरोबर मोटारसायकल रॅलीही असेल. बुधवारी सकाळी सहा वाजता जैन स्थानकापासून पायी दिंडी निघेल. त्यात विज्ञान शाखेचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. पाथर्डीतही शोभायात्रा आयोजित केली आहे. तिसगाव करंजी मार्गे सायंकाळी चिंचोडीला पोहोचेल. या वेळी शिरूर येथील विवेकानंदमहाराज याचे हरिकीर्तन होणार आहे.आनंदऋषींची चिंचोडीही जन्मभूमी, मिरी दीक्षाभूमी, कर्मभूमी पाथर्डी तर माणिकदौंडी गुरुभूमी आहे. जयंतीदिनी चिंचोडी येथील दवाखान्यात क्ष किरण मशिन व डोळे तपासणी साहित्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

मटका अड्डय़ांवर कोपरगावमध्ये छापा
कोपरगाव, २० जुलै/वार्ताहर
अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने शहरातील मटका अड्डय़ांवर धाड टाकून आठ जणांना अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक दत्ता नाळे, पोलीस कर्मचारी आर. जी. शिंदे, जितेंद्र ढवळे, बी. बी. शिंदे, किरण शेलार, इरफान शेख, राजू गोडगे, हवालदार माळवदे, कणसे यांनी जुगार व मटका अड्डय़ांवर धाडी टाकल्या. पोलिसांनी शाम बाबुराव लकारे, अशोक बारकू जाधव, चंद्रकांत विश्वनाथ उकाडे, प्रकाश रेवणनाथ करपे, विठ्ठल काशिनाथ कोकणे, विजय अंबादास गवळी, लक्ष्मण सायन्ना ताला, चंद्रकांत नामदेव रक्ताटे, विष्णू चांगदेव टेके, निवृत्ती दगडू गुडघे, इसाक अब्बास शेख, गणेश शिवाजी कर्डीले यांना अटक क रून २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मटका चालवणारी बुकी बाबुराव देवराम सातपुते व भरत गंगवाल यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, ते फरार आहेत.

गटारी अमावास्येमुळे बंदोबस्तात वाढ
श्रीरामपूर, २० जुलै/प्रतिनिधी

काही विशिष्ट जमातीतील गुन्हेगार अमावस्येला चोऱ्या करतात. गटार अमावस्येला जिल्ह्य़ात यापूर्वी चोऱ्या व दरोडय़ाच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढविली आहे. उत्तर नगर जिल्ह्य़ातील प्रमुख महामार्गांवर तपासणी नाके तयार करण्यात आले आहेत.
बेलापूरला चोरी बेलापूरनजीक पाण्याच्या टाकीजवळ दीपक नाथाजी प्रधान यांच्या घरी चोरी झाली. चोरीत सखुबाई नाथाजी प्रधान ही ७० वर्षांची वृद्ध महिला जखमी झाली असून तिला औषधोपचाराकरिता खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घरासमोर झोपलेल्या सखुबाईच्या कानातील दागिने काढण्याचा प्रयत्न केला. त्यात तिचा कान तुटला. प्रधान कुटुंबीयांनी आरडाओरडा केल्याने चोर पळून गेले. पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविण्यात आली आहे.

कोपरगावमध्ये पावसाची हजेरी
कोपरगाव, २० जुलै/वार्ताहर

शहर व तालुक्यात आज पावसाने हजेरी लावली. अर्धा तास तुरळक पाऊस झाला. आज आठवडे बाजार होता. पावसाची रिपरिप सुरू असल्याने बाजारात चिखल झाला. त्यामुळे बाजारकरूंचे हाल झाले. जेऊरकुंभारी येथे १२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

बेलापूरला गुरुवारी रक्तदान शिबिराचे आयोजन
श्रीरामपूर, २० जुलै/प्रतिनिधी

जनकल्याण समिती, जनसेवा पतसंस्था व कला महाविद्यालयाच्या वतीने गुरुवारी (दि. २३) बेलापूर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरास डॉ. जयराम खंडेलवाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत सहकार्यवाह नानासाहेब जाधव, जनकल्याण समितीचे जिल्हाध्यक्ष अशोक सराफ, सरपंच शरद नवले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. शिबिरात रक्तदात्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन डॉ. शशिकांत कडेकर, अशोक साळुंके, मोहन खानविलकर, गोपीनाथ अंबिलवादे यांनी केले आहे.

नाभिक समाजाचा मेळावा
श्रीरामपूर, २० जुलै/प्रतिनिधी

नाभिक समाजाचा सोमवारी (दि. २७) सकाळी १० वाजता मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती तालुकाध्यक्ष संजय जगताप यांनी दिली. मेळाव्यात नाभिक महामंडळाचे अध्यक्ष भगवान बिडवे, बाबासाहेब कुटे, बाळासाहेब शेजुळ, बाळासाहेब वाकचौरे, पांडुरंग वाघमारे हे मार्गदर्शन करणार आहेत. मेळाव्यास उपस्थित रहावे असे आवाहन नाभिक समाज संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब वाकचौरे यांनी केले आहे.

‘भास्कराचार्य’च्या कार्यशाळेत सूर्यग्रहणासंबंधी मार्गदर्शन
नगर, २० जुलै/प्रतिनिधी

येत्या बुधवारी होणारे शतकातील सर्वात मोठे खग्रास सूर्यग्रहण कसे पहावे, त्याच्या नोंदी कशा घ्याव्यात आदीसंबंधी मार्गदर्शन करणारी कार्यशाळा काल भाऊसाहेब फिरोदिया विद्यालयात झाली. भास्कराचार्य अ‍ॅस्ट्रॉनॉमी रिसर्च सेंटरने या कार्यशाळेचे आयोजन केले होते. कार्यशाळेत स्लाईड शो व चित्रफितींद्वारे ग्रहण म्हणजे काय? ते कसे पहावे? प्रत्येक अमावस्येला सूर्यग्रहण का होत नाही? नगर, पाटणा आदी ठिकाणांहून हे ग्रहण कसे दिसेल? हे दाखविण्यात आले. ‘भास्कराचार्य’चे दिनेश निसंग व विक्रम एडके यांनी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले. सूर्यग्रहणाविषयीच्या अधिक माहितीसाठी मोबाईल ९८६०३०८५३०वर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी अमोल घोडके, नीलेश घोडके, कैलास बेलेकर आदींनी परिश्रम घेतले.

भिंगार खंडणी प्रकरणातील आरोपींच्या कोठडीत वाढ
नगर, २० जुलै/प्रतिनिधी

भिंगार येथील खंडणी प्रकरणातील दोन आरोपींच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने दोन दिवसांची वाढ केली. नंदकिशोर ऊर्फ राजेंद्र पलाटे व फय्याज खलील खान या आरोपींना भिंगार पोलिसांनी आज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी स्वरुपा ढोलम यांच्यासमोर उभे केले. खंडणी प्रकरणात आणखी आरोपी आहेत का, तसेच अन्य काही गुन्हे त्यांनी केलेले आहेत का, हे शोधण्यासाठी पोलीस कोठडी वाढवून मिळावी, अशी विनंती भिंगार ठाण्याचे सहायक निरीक्षक साईनाथ ठोंबरे यांनी न्यायालयास केली. न्यायालयाने आरोपींना दि. २१पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. या आरोपींनी भिंगार येथील लॉरेन्स दोरेस्वामी यांच्याकडून ४० हजारांची खंडणी घेतल्याचा आरोप आहे.

व्यवसायाचा परवाना न दिल्याने पशुवैद्यकांचे आंदोलन
नगर, २० जुलै / प्रतिनिधी

व्यवसाय करण्यास परवाना न दिल्यास पशुवैद्यक सरकारी दवाखान्यांना टाळे ठोकतील, असा इशारा क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. कृषिराज टकले, पशुवैद्यकीय संघटनेचे कार्याध्यक्ष डॉ. शंकर मुठे व अध्यक्ष डॉ. संजय फरगडे यांनी पत्रकाद्वारे दिला. नगर जिल्ह्य़ात पशुवैद्यकांची संख्या पाच हजार आहे. मात्र व्यवसाय करणाऱ्या सरकारने परवानगी नाकारल्याने या पशुवैद्यकांवर उपासमारीची वेळ येऊ शकते. पशुवैद्यकांनी सध्या काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे शेतक ऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. सरकार पशुवैद्यकांना खासगी व्यवसाय करण्यास परवाना देत नाही, तोपर्यंत संघटनेचे आंदोलन चालूच राहील, असे पत्रकात म्हटले आहे.

वाहनाची धडक बसून मोटरसायकलस्वार ठार
नगर, २० जुलै/प्रतिनिधी

अज्ञात वाहनाची धडक बसून मोटारसायकलवरील एकजण ठार, तर एकजण जखमी झाला. नगर-कल्याण रस्त्यावर काल संध्याकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला.
श्रावण आसाराम माळी (वय २३, रा. मोरे चिंचोली, ता.नेवासे) असे मृताचे नाव आहे. रेवणनाथ रभाजी भिसे (रा.खोसपुरी, ता.नगर) हे या अपघातात जखमी झाले आहेत. त्यांनी नगर तालुका ठाण्यात फिर्याद दिली आहे. भिसे व माळी मोटारसायकलवरून (एमएच-१६ एपी-७५४८) भीमाशंकरला दर्शनासाठी गेले होते. नगरला परतत असताना जखणगाव शिवारात समोरून वेगात आलेल्या वाहनाची त्यांना धडक बसली. या प्रकरणी हवालदार गायकवाड तपास करीत आहेत.