Leading International Marathi News Daily

मंगळवार, २१ जुलै २००९

बिल्डर लॉबीचा शासनाला चुना
विकासाचे डोहाळे लागलेल्या नागपूर शहराला आणि आसपासच्या परिसरालाही आता मूषकाच्या रूपातील बिल्डरांनी खणून काढून गब्बर होण्याचा मार्ग अवलंबलेला दिसतो. ओसाड माळरानांसह त्यांची नजर सिंचनाखालील शेतांकडेही वळलेली आहे. नोकरशाहीला हाताशी धरून या सिंचित जमिनी कोरडवाहू असल्याचे कागदोपत्री दाखवून आणि त्यावर भूखंड पाडून सरकारच्या कोटय़वधीच्या मुद्रांक शुल्कालाच त्यांनी बुडवणे सुरू केले आहे. हे असले मूषक या शहरात आणखी काय काय खरडून काढतील, याचा नेमच राहिलेला नाही. नागपूर शहराला पोखरणारी ही वृत्तमालिका-
मनोज जोशी, नागपूर, २० जुलै
एरवी दुपटीने लागणारे मुद्रांक शुल्क वाचवण्यासाठी नागपुरातील बिल्डर लॉबीने काही शासकीय अधिकाऱ्यांशी संगनमत केले आहे. यासाठी सिंचनाखालची जमीन कोरडवाहू दाखवण्यात येत असल्यामुळे शासनाचे नोंदणी शुल्क व मुद्रांकाचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान होत आहे.

बनावट व निकृष्ट दर्जाची औषधे जप्त
लता मंगेशकर हॉस्पिटल परिसरात कारवाई
भारतीय जनता युवा मोर्चाचा दणका
अन्न व औषधे प्रशासन विभागाला टाळे
नागपूर, २० जुलै / प्रतिनिधी
हिंगणा डिगडोह भागातील लता मंगेशकर हॉस्पिटल परिसरात असलेल्या औषधाच्या एका खाजगी दुकानातून अन्न व औषधे प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी निकृष्ट दर्जाच्या औषधांचा मोठा साठा जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. या दुकानातून विकण्यात येत असलेल्या बनावट व निकृष्ट दर्जाच्या औषध विक्रीची तक्रार भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केली होती. या तक्रारीची दखल न घेतल्याच्या निषेधार्थ संतप्त कार्यकर्त्यांनी सोमवारी सदर भागातील अन्न व औषधे प्रशासनाच्या कार्यालयाला कुलूप ठोकल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

मध्यम आणि लघु प्रकल्पातील जलसाठय़ात वाढ
नागपूर, २० जुलै / प्रतिनिधी

जुलै महिन्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे जलसाठय़ांची स्थिती किंचित सुधारली असली तरी, नागपूर विभागातील फक्त दोन प्रकल्प ६० टक्क्यांहून अधिक भरले आहेत. त्यामुळे पाऊस चांगला झाला असला तरी, विभागातील लोकसंख्या आणि कृषी क्षेत्राचा विचार केला तर, सध्या उपलब्ध असलेला साठा तुलनेने फारच कमी आहे. मात्र, असे असले तरी, मध्यम आणि लघु प्रकल्पांतील साठय़ात गेल्यावर्षीच्या तुलनेत चांगली वाढ झाली आहे.

शाळा, महाविद्यालयांसह प्रशासनाजवळही तोडगा नाही
नागपूर, २० जुलै / प्रतिनिधी

विद्यार्थ्यांना ने-आण करणाऱ्या सायकल रिक्षा-ऑटोरिक्षा आणि शाळांच्या बसेसमुळे शहरातील विविध भागातील शाळा, महाविद्यालयांसमोर पार्किंगची समस्या निर्माण झाली आहे. त्यातच अनेक शाळांमध्ये पार्किंगची सोय नसल्यामुळे विद्यार्थ्यांसमोर वाहन कुठे ठेवायचे हा प्रश्न उभा ठाकला आहे. या समस्येवर प्रशासन व शाळा-महाविद्यालयांच्या व्यवस्थापनाने कुठलाही तोडगा काढला नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाताना आणि बाहेर पडताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे शहरात दिसून येत आहे.

अण्णांच्या भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाला पंकृवितून नगण्य प्रतिसाद
ज्योती तिरपुडे, नागपूर, २० जुलै

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचे प्रणेते अण्णा हजारे यांना अकोल्याच्या भाऊसाहेब ऊर्फ डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात एकही लायक कार्यकर्ता मिळू न शकल्याने त्यांना हात हलवत परतावे लागले. त्यांनी उभारलेल्या चळवळीशी युवक जोडण्यासाठी आणि माहिती अधिकार कायद्याविषयी जनजागृती करण्यासाठी अण्णांनी महाराष्ट्रातील युवकांना आंदोलनाशी जोडण्याचा विडा उचलला आहे. या अभियानाची सुरुवात त्यांनी विदर्भातून केली, हे विशेष. मात्र, त्यांच्या जनआंदोलनाचे सभासदत्व पत्करण्यास कृषी विद्यापीठात एकही लायक व्यक्ती पुढे आली नाही.

शहरातील पाच मानकऱ्यांना महिनाअखेर ‘नॅनो’
नागपूर, २० जुलै / प्रतिनिधी

गेल्या शुक्रवारी रतन टाटांच्या हस्ते एका मराठी माणसाला पहिल्या नॅनोच्या चाव्या मिळाल्यानंतर आता नागपुरात नॅनोचा पहिला मानकरी कोण ठरेल याबाबत उत्सुकता आहे. या महिन्याच्या अखेपर्यंत शहरातील पाच ग्राहकांना नॅनो मिळणार असल्याची माहिती आहे. मात्र, या नावांची घोषणा त्याचवेळी करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीच्या सूत्रांनी दिली.

जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ; अधिकाऱ्यांना जाब विचारण्याची मागणी
नागपूर, २० जुलै / प्रतिनिधी
गेल्या दोन महिन्यात जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत झालेल्या प्रचंड वाढीकडे डोळेझाक का केली, याचा जाब विदर्भातील सर्व जिल्हाधिकारी आणि पुरवठा अधिकाऱ्यांना विचारावा, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे विदर्भ प्रांताध्यक्ष सुधाकर जकाते आणि इतर पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

पक्ष बळकटीसाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय व्हावे -बंग
नागपूर, २० जुलै / प्रतिनिधी

येत्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन बुथ पातळीवर पक्ष बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय व्हावे, असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा मंत्री रमेश बंग यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस उत्तर नागपूरचे कार्यकर्ता शिबीर बेझनबाग सांस्कृतिक क्रीडा भवनात अलीकडेच आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. शहराध्यक्ष अशोक धवड अध्यक्षस्थानी तर, खादी ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण ढोबळे आणि माजी आमदार नेताजी राजगडकर प्रमुख पाहुणे होते.

एकसष्टीनिमित्त गिरीश गांधी यांचा रविवारी वरूडमध्ये सत्कार
नागपूर, २० जुलै / प्रतिनिधी

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश गांधी यांच्या कार्याचा गौरव व्हावा व त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करता यावी म्हणून रविवारी, २६ जुलैला सकाळी १० वाजता वरूड येथील यावलकर सभागृहात त्यांचा एकसष्टीपूर्ती सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी तर, प्रमुख पाहुणे म्हणून खासदार दत्ता मेघे, माजी मंत्री अनिल देशमुख, आमदार उल्हास पवार, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे उपस्थित राहतील. विशेष पाहुणे म्हणून आमदार हर्षवर्धन देशमुख, माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे, अनंतराव घारड उपस्थित राहतील. याप्रसंगी अ‍ॅम्बुलन्सचे लोकार्पण करण्यात येईल. नागरिकांनी या सत्कार समारंभाला उपस्थित राहावे, असे आवाहन गिरीश गांधी एकसष्टीपूर्ती सत्कार समारोह समितीने केले आहे.

मदनमोहन यांची पुण्यतिथी
नागपूर, २० जुलै/ प्रतिनिधी

वरिष्ठ नागरिक मंच, प्रतापनगरतर्फेज्येष्ठ संगीतकार दिवंगतमदनमोहन यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी मदनमोहन यांनी संगीतबद्ध केलेली गाणी सादरकरण्यात आली. १९५० यावर्षी ‘आंखे’ या चित्रपटापासून संगीतकार म्हणून कारकीर्दीला सुरुवात करणाऱ्या मदनमोहन यांनी नंतर ७० चित्रपटांना त्यांनी संगीत दिले व त्यातील काही लोकप्रियही झाले. गायक मनोहर ताम्हणकर यांनी ‘भाई भाई’ या चित्रपटातील गीत सादर केले. सिद्धनाथ धामोरीकरयांनी यांनी ‘बहिया न धरो बलमा’ हे गीत सादर केले. कार्यक्रमा्च्या शेवटी ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रशेखर दत्त उपस्थित होते.

४५७ अर्जदारांना २ कोटीवर कर्जाचे वाटप
नागपूर, २० जुलै/ प्रतिनिधी

मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळातर्फे ४५७ अर्जदारांना २ कोटी १२ लाख ७१ हजार रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले. मंडळाचे संचालक व काँग्रेस नेते शेख हुसेन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शब्बीर अहमद विद्रोही यांनी लाभार्थ्यांना कर्जाच्या धनादेशाचे वाटप केले. मौलाना आझाद आर्थिक विकास मंडळातर्फे अल्पसंख्याक समाजातील गरीब नागरिकांना अर्थसहाय्य केले जाते. नागपुरातून अनेकांनी यासाठी अर्ज केले होते. मुंबईत झालेल्या मंडळाच्या बैठकीत अध्यक्ष अमीन पटेल यांनी राज्यातून आलेल्या अर्जाचा आढावा घेतला. महामंडळातर्फे राज्यासाठी २९ कोटी रुपये कर्ज मंजूर केले. त्यात नागपूरचा वाटा २ कोटी १२ लाख ७१ हजार रुपयांचा असून ४५७ अर्जदारांना त्याचा लाभ मिळणार आहे, असे मंडळाचे संचालक शेख हुसेन यांनी एका प्रसिद्धी पत्रकाव्दारे कळविले आहे. १७ जुलैला झालेल्या एका समारंभात शेख हुसेन आणि शब्बीर अहमद विद्रोही यांच्या हस्ते लाभार्थ्यांना धनादेश वितरीत करण्यात आले.

सिद्धकला महिला बचत गट महासंघाचे बुधवारी उद्घाटन
नागपूर, २० जुलै / प्रतिनिधी

सिद्धकला राष्ट्रीय महिला बचत गट महासंघाचे उद्घाटन बुधवारी, २२ जुलैला सीताबर्डीवरील मातृसेवा संघाच्या रंजन सभागृहात दुपारी १ वाजता करण्यात येत आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष प्रभा ओझा व प्रमुख पाहुणे म्हणून आदिवासी विभागाचे आयुक्त दिनेश वाघमारे उपस्थित राहतील. सेल्फहेल्प, बचतगटांच्या लोकसंख्या उभारणे, महिलांना सक्षम करून त्यांना सामाजिक समानता मिळवून देणे, स्वयंसहाय्यता बचतगटांना सुक्ष्म पतपुरवठा उपलब्ध करून देणे, स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण, मार्गदर्शन, विकास व उपजिविका, स्वयंसहाय्य गटांनी तयार केलेल्या उत्पादनासाठी बाजारपेठ शोधणे, प्रकल्पाच्या आधी व नंतर लागणारे सामाजिक संशोधन आणि बाजारपेठेचे सर्वेक्षण करणे आदी महत्वाच्या गोष्टींवर फेडरेशन भर देणार आहे.

विद्यापीठ शिक्षण मंचाची निदर्शने
नागपूर, २० जुलै / प्रतिनिधी

सहावा वेतन त्वरित लागू करण्यात यावा आणि वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या नेट सेट संदर्भातील व इतर मागण्या मान्य करण्यात याव्या या मागणीसाठी विद्यापीठ शिक्षण मंचाने उच्च शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर निदर्शने करून त्यांना निवेदन दिले. मंचाचे विदर्भ सचिव व सी.पी. अ‍ॅन्ड बेरार महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा. सत्यवान मेश्राम यांनी प्रास्ताविकातून आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली. प्रा. प्रभूजी देशपांडे यांचे भाषण झाले. यावेळी डॉ. भास्कर भांदककर, डॉ. दिलीप पेशवे, प्रा. अविनाश दुधे, डॉ. श्याम पुंडे, डॉ. नंदाजी सातपुते, प्राचार्य डॉ. संजय पोहरकर, प्राचार्य उर्मिला डबीर, डॉ. रेखा वाडिखाये, डॉ. अरविंद जोशी, टारझन गायकवाड, अजय कुळकर्णी आदी संघटनेचे सदस्य उपस्थित होते. प्रा. सत्यवान मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने उच्च शिक्षण उपसंचालक देशमुख यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

शववाहिकेसाठी मैत्री परिवाराचे आवाहन
नागपूर, २० जुलै / प्रतिनिधी
मैत्री परिवारातर्फे लवकरच एका शववाहिकेचे लोकार्पण करण्यात येणार असून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या नागरिकांनी या कामासाठी आर्थिक योगदान द्यावे, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. शववाहिकेला पर्यायी नाव देण्याचाही मैत्री परिवाराचा मानस आहे. ‘शववाहिका’ या शब्दाला चपखल पर्याय असल्यास तेच नाव वापरून या वाहनाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. नागरिकांनी तसा शब्द सूचल्यास ३१ जुलैपर्यंत संस्थेला कळवावे. नाव सूचवणाऱ्याचा लोकार्पणाच्या कार्यक्रमात संस्थेतर्फे सन्मान केला जाणार आहे. पर्यायी नाव सूचवण्यासाठी आणि या कार्यात आर्थिक मदत देण्यासाठी मैत्री परिवार, प्रभा निवास, जेलरोड, रहाटे कॉलनी, नागपूर-२२ या पत्त्यावर किंवा ९४२२११२९७९, ९८२३०६०९१०, ०७१२- २४२४६३४ या क्रमांकांवर दुपारी १२ ते ४ या वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सिद्धकलातर्फे विलासराव देशमुखांचा सत्कार
नागपूर, २० जुलै/प्रतिनिधी
सिद्धकला महिला फेडरेशनच्या महिलांनी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. महिलांच्या सक्षमीकरणासाठी व प्रत्येक महिलांचा आर्थिक दर्जा उंचाविण्यासाठी फेडरेशनच्या संस्थापक करूणा पेंडसे यांच्या नेतृत्वाखाली देशमुख यांना निवेदन दिले. याप्रसंगी विलासराव देशमुख यांनी सर्वप्रकारच्या सहकार्याचे आश्वासन दिले. शिष्टमंडळात फेडरेशनच्या पुनम माथूर, आम्रपाली बागडे, माधुरी रामटेके, नंदिता माथूर, छाया मोडक, सुमन मेश्राम, सोनाली ठाणेकर, मोनाली ठाणेकर उपस्थित होत्या.

गैरव्यवहारी अधिकाऱ्यांना तुरुंगात घालण्याची मागणी
नागपूर, २० जुलै / प्रतिनिधी
टोल टॅक्स वसुलीतील हजारो कोटींच्या गैरव्यवहाराला कारणीभूत सार्वजनिक बांधकाम खात्यातील अधिकाऱ्यांना तुरुंगात घाला, अशी मागणी जनमंचचे अध्यक्ष डॉ. अशोक लांजेवार, उपाध्यक्ष प्रमोद पांडे आणि महासचिव राजीव जगताप यांनी केली आहे. रस्ते, पुलांचे बांधकाम खाजगी ठेकेदारांकडून करून घेऊन ठेकेदाराला त्या बदल्यात टोल वसुलीचे अधिकार देण्यात आले. या कामात हजारो कोटींचा गैरव्यवहार सार्वजनिक बांधकाम विभाग व राज्यकर्ते यांच्या संगनमताने सुरू आहे. लोकलेखा समितीने जाहीर केलेल्या अहवालात असे नमूद केले आहे की, ३५७ कोटी रुपयांचा खर्च करून ठेकेदार, अधिकारी व राज्यकर्त्यांनी संगनमताने २,०२३ कोटी रुपये उकळले आहेत. त्यामुळे ही पद्धत ताबडतोब बंद करण्यात यावी. तसेच हे जास्तीचे वसूल केलेले हजारो कोटी रुपये संबंधितांकडून व्याजासहित वसूल करून विकास कामासाठी वापरण्यात यावे, अशी सूचनाही त्यांनी केली आहे. या गैरव्यवहारास जबाबदार असणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी तसेच राज्यकर्ते यांना कठोर शिक्षा देऊन त्यांची सर्व मालमत्ता जप्त करून शासन दरबारी जमा करावी, असेही डॉ. लांजेवार आणि प्रमोद पांडे यांनी म्हटले आहे.

आझाद हिंद एक्स्प्रेसमध्ये चोरी
नागपूर, २० जुलै/ प्रतिनिधी

रेल्वेतील चोरींच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. आझाद हिंद एक्स्प्रेसमधून एका प्रवाशाची ‘बॅग’ चोरी गेली आहे. रायगड येथील गोपाल अग्रवाल हे (२१२९) कोपरगाव येथून पुणे-हावडा आझाद हिंद एक्स्प्रेसमध्ये एससी थ्री टायरमध्ये प्रवासकरीत होते. कोपरगाव -बडनेरा दरम्यान ते गाडीत झोपले असताना त्यांची ‘ट्रॉली बॅग’ पळवण्यात आली. त्यामध्ये महागडी वस्त्रे आणि अन्य सामानसह २० हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याचे अग्रवाल यांनी टी.टी.कडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. नंतर टी.टी.ने नागपूर लोहमार्ग पोलिसांकडे याबाबत तक्रार दाखल केली.

समरगीत स्पर्धेत भंडाऱ्याचे कामगार केंद्र प्रथम
नागपूर, २० जुलै/ प्रतिनिधी

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या गट क्रमांक १ तर्फे घेण्यात आलेल्या समरगीत स्पर्धेत भंडाऱ्याच्या कामगार केंद्राने प्रथम, चंदननगरातील ललित कला भवनाने द्वितीय व साकोलीच्या कामगार कल्याण मंडळाने तृतीय क्रमांक पटकावला. उत्तेजनार्थ पारितोषिक पावनभूमी व ओमनगरच्या कामगार कल्याण केंद्राला देण्यात आले. चंदननगरातील ललित कला भवनच्या सभागृहात या समरगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. एकू ण अकरा संघ त्यात सहभागी झाले होते. स्पर्धेचे परीक्षण नारायण दुर्योधन, दिनेश काळे व छाया वानखेडे यांनी केले. कामगार कल्याण मंडळाचे सदस्य सुभाष खोडे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. कार्यक्रमाला सुजाता कोंबाडे, कल्याण आयुक्त पुरूषोत्तम इखार होते. या स्पर्धेतील स्पर्धकांना रसिकांनी भरभरून दाद दिली.

कोळसा कामगारांना आरोग्य सुविधा देण्याची मागणी
नागपूर, २० जुलै/ प्रतिनिधी

गेल्या कित्येक वर्षांपासून कोळसा खाण कामगारांना असंख्य आजारांनी ग्रासले असून ‘निमोकोनिसिस’ या आजारामुळे त्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. मात्र कोळसा खाण व्यवस्थापन त्यांच्या आरोग्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप लाल सैनिक दलाने केला आहे. ‘निमोकोनिसिस’ या आजारामुळे कोळशाचे कण फुप्फुसाला चिटकून राहतात. त्यानंतर श्वसननलिकेला इजा होऊन त्यापासून होणाऱ्या आजाराबरोबरच कामगारांना जगावे लागते. या आजारामुळे कामगार कधीच पूर्वीप्रमाणे काम करू शकत नाही. थातूरमातूर उपचार करून झाल्यावर त्याला पोट भरण्यासाठी पुन्हा कामावर जावेच लागते. व्यवस्थापनही प्राथमिक चिकित्सा देऊन तो कामावर लवकर रूजू होईल, याची काळजी घेत राहते. कामगाराला एकदा निमोकोनिसिसने जखडले की तो पूर्ण बरा होत नाही. यासंदर्भात लाल सैनिक दलाचे सचिव गगन मिश्रा यांनी केंद्रीय मंत्र्यांना पत्र पाठवून कामगारांच्या या आजाराकडे लक्ष देऊन त्यांना योग्य ते संरक्षण देण्याची मागणी केली असल्याचे, प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

प्र-कुलगुरूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
नागपूर, २० जुलै/ प्रतिनिधी

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू गौरीशंकर पाराशर यांना राजकुमार केवलरामानी कन्या महाविद्यालयातर्फे जन्मदिनानिमित्त पुष्पगुच्छ देऊन पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. महाविद्यालयाचे व्यवस्थापन सचिव विजय केवलरामानी, राजकुमार केवलरामानी, कन्या महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. उर्मिला डबीर, राजकुमार केवलरामानी कनिष्ठ कन्या महाविद्यालयाच्या प्राचार्य नीलम आहुजा, डॉ. रजनी हरोडे, यज्ञ सिंह, गीता सिंह, माधवी मोहरील, अनिता हेमनानी, मोहिनी रामटेके यांनी त्यांचा सत्कार केला.

नवजीवन उज्ज्वलतर्फे तपासणी शिबीर
नागपूर, २० जुलै / प्रतिनिधी

नवजीवन उज्ज्वल सामाजिक संस्थेच्यावतीने रविवारी, २ ऑगस्टला छाप्रुनगरातील छाप्रु सवरेदय मंडळाच्या फुलवानी सभागृहात सकाळी १० ते २ वाजतादरम्यान नि:शुल्क थलेसिमिया तपासणी व मधुमेह, रक्ततपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. राजीव चावला, मधुमेहतज्ज्ञ डॉ. अरविंद मालवीय रुग्णांची तपासणी करतील. शिबिराचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन नवजीवन उज्ज्वल सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रताप मोटवानी यांनी केले आहे.

मनसेच्या मध्य नागपुरातील कार्यालयाचे उद्घाटन
नागपूर, २० जुलै / प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मध्य नागपूरच्या कार्यालयाचे उद्घाटन पूर्व विदर्भ संघटक हेमंत गडकरी यांच्या हस्ते जागनाथ बुधवारी येथे झाले. यावेळी जिल्हा संघटक प्रवीण बरडे, शहर अध्यक्ष मोरेश्वर धोटे, जिल्हाध्यक्ष किशोर सरायकर, नगरसेवक विकास खोब्रागडे आणि सुधीर अघाव प्रमुख पाहुणे होते. जिल्हाध्यक्ष किशोर पराते यांच्या पुढाकाराने विभाग अध्यक्ष राजू पांडे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी अरविंद सावरकर, हर्षल दुरुगकर, आशीष पांढरे, सुमीत वानखेडे, मनोज गुप्ता, धनंजय रेनके, राहुल खंडार, आशीष सावरकर, शशांक गिरडे, चेतन मस्के, हिरालाल हेडाऊ, राजू गुमगावकर, अभिजित दारलिंग आणि संतोष खोडे आदी उपस्थित होते.

विधिशाखेच्या विद्यार्थ्यांचा निकालाबाबत रोष; प्र-कुलगुरूंना निवेदन
नागपूर, २० जुलै/ प्रतिनिधी

नागपूर विद्यापीठाच्या विधी विद्याशाखेतील विविध सत्रांच्या परीक्षा निकालावर विद्यार्थ्यांनी रोष व्यक्त केला. यासंदर्भात आज त्यांनी प्र-कुलगुरू गौरीशंकर पाराशर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
निवेदन देणाऱ्यांमध्ये आठव्या आणि सहाव्या सत्राचे विद्यार्थी मुख्यत्वाने होते. दोन्ही सत्रांमधील विद्यार्थी मोठय़ा संख्येने अनुत्तीर्ण झाले असून त्यांना त्वरित उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्स देण्यात याव्यात आणि आर्थिक दुर्बल घटकांतील असल्याने या विद्यार्थ्यांना शुल्कात सूटही देण्यात यावी, या मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. विद्यार्थ्यांना त्वरित उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्स उपलब्ध करून देण्यात येतील, असे आश्वासन प्र-कुलगुरूंनी दिले. आठव्या सत्रातील ‘इंटरनॅशनल लॉ’ आणि सहाव्या सत्रातील ‘कॉन्ट्रॅक्ट-२’, ‘मुस्लिम लॉ’ आणि ‘ह्य़ुमन रिसोर्स’ या विषयांमध्ये विद्यार्थी मोठय़ा संख्येने अनुत्तीर्ण झाले आहेत.