Leading International Marathi News Daily

मंगळवार, २१ जुलै २००९

जीवन दर्शन
दुष्टाला अडवू नका

ख्रिस्ताने शिष्यांना सांगितले, ‘दुष्टाला अडवू नका. कोणी तुझ्या उजव्या गालावर मारले तर त्याच्यापुढे डावाही कर. कोणी तुझे अंगडे घेतले तर त्याला कांबळेही दे. कोणी तुला सक्तीने एक मैल जायला लावले तर त्याच्याबरोबर दोन मैल जा. जो मागतो त्याला दे. जो उसने घेऊ पाहतो त्याला पाठमोरा होऊ नकोस.’ (मॅथ्यू ५:३९.४२)दीनबंधू अ‍ॅण्ड्रय़ूज यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधीजी नवीन कराराचे वाचन करीत होते. ‘दुष्टाला अडवू नका’ या वाक्यापाशी गांधीजी आले आणि थबकले. ते विचारमग्न झाले. खूप दिवस त्यांनी या वाक्याबरोबर झटापट केली. त्याचे मर्म शोधण्याचा कसोशीने प्रयत्न केला.
त्याच वेळी गांधीजी जुलमी ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढत होते. ख्रिस्ताच्या शिकवणीप्रमाणे वागायचे म्हणजे आत्मक्लेशाचा मार्ग अवलंबला पाहिजे. हा मार्ग जटील आहे, त्रासाचा आहे, दीर्घ

 

पल्ल्याचा आहे; परंतु समाजाच्या समस्यांवर तोच कायम टिकणारा उपाय आहे याची जाणीव गांधीजींना झाली आणि त्यांनी जगाला सत्याग्रहाच्या अस्त्राची देणगी दिली.
कोणीही शंभर टक्के दुष्ट नसतो. प्रत्येक व्यक्तीला चांगुलपणाचा किंचित तरी लवलेश शिल्लक असतो. सोन्याच्या खाणीतून टनभर माती काढावी तेव्हा त्यात कणभर सोने सापडते. त्याप्रमाणे दुष्टाच्या अंत:करणात भलाईचा अंश असतोच. दुष्टाला प्रतिकार करायचा नाही म्हणजे त्याच्यातील सज्जनपणाला आवाहन करायचे. त्याच्याकडून प्रतिसाद मिळण्यासाठी खूप कालावधी लागण्याची शक्यता असते. पाण्याचा थेंब दुर्बल असतो; परंतु त्याची संततधार कठीण कातळावर पडत राहिली तर एक दिवस त्या पत्थराला तडा गेल्याशिवाय राहात नाही. दुष्टाच्या छातीत तर माणसाचे हृदय असते. त्याला एक दिवस पाझर फुटल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास आपण अंतरी बाळगणे आवश्यक असते. ‘दुष्टाला अडवू नका’ असा उपदेश करून येशूने सज्जनाच्या हृदयातील माणुसकीची आणि देवपणाची ज्योत प्रज्वलित केली. दुष्टाला अडवू नका म्हणजे तुमच्यातील चांगुलपणाचा स्फोट घडवून आणा! हे आव्हान स्वीकारण्यासाठी पाहिजेत जातीचे!
फादर फ्रान्सिस दिब्रिटो
francised43@gmail.com

कुतूहल
एका रेषेत ग्रह

सर्व ग्रह सूर्याच्या एका बाजूला एका रेषेत आले तर त्याचा काय परिणाम होऊ शकतो?
सन २००० साली मे महिन्यात पाच ग्रह पृथ्वीच्या संदर्भात विशिष्ट कोनात एकत्र येणार म्हणून एकच खळबळ उडाली होती. त्यांच्या गुरुत्वाकर्षणाच्या एकत्र परिणामामुळे पृथ्वीवर भूकंप, ज्वालामुखी, उधाणाची भरती यांचे थैमान माजेल, अशी भाकितेही करण्यात आली. पण प्रत्यक्षात अशी कोणतीही दुर्घटना घडली नाही. खरंतर एका शतकात किमान दोन वेळा सूर्य आणि अनेक ग्रह हे पृथ्वीच्या संदर्भात, जरी एका बाजूला एका रेषेत नाही, पण एखाद्या विशिष्ट कोनात एकत्र येतात. दिनांक ५ मे २००० रोजी सूर्य, चंद्र, बुध, शुक्र, मंगळ, गुरू आणि शनी एवढी मंडळी पृथ्वीच्या संदर्भात सुमारे २६ अंशांत एकत्र आली होती. दिनांक ९ सप्टेंबर २०४० रोजी ते पुन्हा अशाच प्रकारे एकत्र येतील.
ग्रहांचे भ्रमणकाळ काही दिवस ते काही र्वष इतके विविध आहेत. सूर्याला सर्वात जवळ असलेल्या बुधाचा सूर्याभोवतीचा भ्रमणकाळ ८८ दिवस, तर नेपच्यूनचा भ्रमणकाळ १६५ वर्षे आहे. त्यामुळे पृथ्वीच्या संदर्भात सर्व ग्रह आणि सूर्य एकाच रेषेत येण्याची संभाव्यता जवळजवळ शून्य आहे. पण समजा, तसं झालं तरी विशेष काही घडणार नाही. कारण पृथ्वीवर होणारा सर्वात महत्त्वाचा परिणाम हा भरती-ओहोटीचा आहे. त्यातही सूर्य हा पृथ्वीला चंद्रापेक्षा खूपच दूर असल्याने, सूर्यामुळे होणारा भरती-ओहोटीवरील परिणाम हा चंद्राच्या तुलनेत निम्म्याने आहे. गुरू, शनि वगैरे सर्व महाकाय ग्रह हे पृथ्वीपासून इतके दूर आहेत, की अगदी सगळे ग्रह हे पृथ्वीच्या संदर्भात एका रेषेत आले तरीही त्यांच्यामुळे होणारा भरती-ओहोटीचा परिणाम हा चंद्रामुळे होणाऱ्या परिणामापेक्षा नगण्य असेल.
मोहन आपटे
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

दिन विशेष
साहित्यिक अर्नेस्ट हेमिंग्वे

आपल्या हयातीतच मान, सन्मान, पैसा, प्रतिष्ठा, प्रसिद्धी मिळण्याचे भाग्य अर्नेस्ट हेमिंग्वे या अमेरिकन लेखकाला लाभले. त्यांचा जन्म २१ जुलै १८९९ रोजी शिकागोजवळ झाला. शिक्षण संपल्यावर त्यांनी ‘कॅन्सार सिटी स्टार’ या वृत्तपत्रात बातमीदाराची नोकरी पत्करली. याच सुमारास युद्ध सुरू झाले. युद्धाचं त्यांना विलक्षण आकर्षण असल्याने सैनिक म्हणून प्रवेश नाकारल्यावर एका रुग्णवाहिकेचे चालक म्हणून ते इटालियन आघाडीवर गेले. युद्धातील तेथील अनुभव कादंबरी लेखनाला उपयोगी पडले. त्यावर आधारित ‘द सन ऑल्सो राइझेस’ ही कादंबरी लिहिली. युद्धोत्तर काळातील हरवलेली पिढी या विषयावरील ही कादंबरी खूप गाजली. ‘फिएस्टा’ ही कादंबरी बैलाशी झुंज लावणाऱ्या एका युवकाची आहे. ‘अ फेअरवेल टू आम्र्स’ या त्यांच्या कादंबरीवर चित्रपटही निघाला. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात स्पेनमध्ये यादवी युद्ध सुरू होते. या यादवीत एका अमेरिकन क्रांतिकारकाला हौतात्म्य आले. त्यावर ‘फॉर हूम द बेल टोल्स’ ही कादंबरी लिहिली. लेखनाबरोबर बैलांच्या झुंजी, शिकार, प्रवास हे त्यांचे आवडते छंद. यासाठी वेळ काढून ते टांगानिकाला गेले. तेथील खेळांवर ‘डेथ इन द आफ्टरनून’, प्रवासवर्णनांवर ‘ग्रीन हिल्स ऑफ आफ्रिका’ हे ग्रंथ लिहिले. त्यांच्या कथा-कादंबऱ्यांवर पुढे अनेक चित्रपट निघाले. ‘ओल्ड मॅन अ‍ॅण्ड द सी’ या कादंबरीत महाकाय मर्लिन मासा जिवाची बाजी लावून पकडणाऱ्या एका म्हाताऱ्या कोळ्याची कथा आहे. या कादंबरीला नोबेल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
संजय शा. वझरेकर

गोष्ट डॉट कॉम
न आवडणारी मुलगी

‘ए आई, पटकन दार लावून घे. ती वेडी विजू आपल्याकडेच येतेय वाटतं.’ खिडकीपाशी अभ्यास करीत बसलेली मी, विजूला पाहून घाईने आईला म्हणाले. विजू आमच्या शेजारच्या घरात राहायची. भलंमोठं घर, त्यात तीन भाऊ आणि त्यांचा परिवार. सगळय़ांत मोठय़ा भावाची, नानांची विजू मुलगी. लहानपणी म्हणे तिला ताप आला आणि त्यावेळी मेंदूत पाणी झाले. विजू आजारातून वाचली, पण ती पूर्वीसारखी राहिली नाही. मधेच हसायची, फटकन काहीतरी बोलायची. मला ती अजिबात आवडायची नाही. मी नेहमी तिला टाळायचे. विजू माझ्याच वयाची होती. शाळेत जात असती तर आठवीतच असती माझ्याबरोबर. पण शाळेत तिला प्रवेश देण्यात आला नव्हता. नानाकाका आणि विजूच्या आई दोघे तिला घरीच लिहायला, वाचायला शिकवायचे.
विजू खिडकीपाशी पोहोचली. बाहेरून गज पकडून म्हणाली, ‘माझ्याशी खेळायला ये ना. आपण गाण्यांच्या भेंडय़ा खेळू. मला येतात गाणी.’ आणि मग तिला कुठलेतरी गाणे आठवले. ‘तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू माळा..’ म्हणत उडय़ा मारत ती निघून गेली. मी म्हटले, गेली एकदाची ब्याद. नाहीतर खूप वेळ बडबड करीत राहिली असती.
त्या दिवशी रांगोळी स्पर्धा जाहीर झाल्या. आमच्या वर्गातून माझी निवड बाईंनी केली. संध्याकाळी घरी येऊन मी व्हरांडय़ात आईचा रांगोळीचा डबा घेऊन बसले. चिमटीत रांगोळी धरून रेघ मारली ती कुठे जाड कुठे बारीक. सरळ रेघ यायला रांगोळी बोटांच्या चिमटीतून सारख्या प्रमाणात पडेचना. खूप वेळ माझा प्रयत्न चालू होता. शेवटी रडू यायला लागले. कुणाचातरी मागून पाठीवर हात ठेवलेला जाणवला. मागे पाहते तो विजू उभी. ‘थांब, मी शिकवते’, असे म्हणून चार बोटांच्या मधून सहजपणे रांगोळी सोडत तिने भराभर चांगली दोन बाय दोनची रांगोळी काढली. रंग भरले. मी चकित झाले. माझ्या हातात रांगोळी देऊन तिने ती कशी सोडायची दाखवले. म्हणाली, ‘ही सोपी पद्धत आहे. मी शिकलेय. उद्या सकाळी पुन्हा सराव करू’ आणि नेहमीसारखी नाचत उडय़ा मारत ती निघून गेली.
आपल्याला न आवडणारे, आपलं न पटणारे काहीजण नेहमीच असतात. एखाद्याचा तिरस्कार करण्यात आपली बरीच शक्ती वाया जाते. त्यांच्याशी मैत्री करा, पाहा काय घडते!
आजचा संकल्प : ज्यांना मी आवडत नाही त्यांच्याशी मी आपणहून प्रयत्नपूर्वक मैत्री करेन.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com