Leading International Marathi News Daily

मंगळवार, २१ जुलै २००९


बेलापूर पट्टीतील गावांच्या समस्यांसंबंधात सोमवारी आमदार मंदा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्यात आला. याप्रसंगी मंदाताईंनी आयुक्त विजय नाहटा यांची भेट घेऊन त्यांना नवी मुंबईतील प्रश्नांसंबंधात निवेदन सादर केले.

विविध मागण्यांसाठी मंदा म्हात्रे यांची पालिकेवर निदर्शने
बेलापूर/वार्ताहर - बेलापूर विभागास नागरी कामांबाबत सापत्न भावाची वागणूक दिली जात असल्याचा आरोप करत आमदार मंदा म्हात्रे यांनी सोमवारी पालिका मुख्यालयासमोर निदर्शने केली. बेलापूरमध्ये ५० खाटांचे रुग्णालय व्हावे, समाजमंदिर बांधावे, खेळाची मैदाने तयार करावी, भाजी व मच्छी बाजार उभारावा, रस्ते रुंद करावेत, व्यायामशाळा व पथदिवे उभारावे आदी मागण्या म्हात्रे यांनी पालिका आयुक्त विजय नाहटा यांना दिलेल्या निवेदनात केल्या. यावेळी म्हात्रे यांनी ९ ऑगस्टपूर्वी रुग्णालयाचे भूमिपूजन न झाल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. पालिकेची कामे प्रगतिपथावर असून, रुग्णालय बांधण्याचा प्रस्ताव आजच्या महासभेपुढे ठेवण्यात आला आहे. त्या मंजुरीनंतर त्वरित कार्यवाही सुरू करू, असे नाहटा म्हणाले. शहरात उद्याने, मैदाने, समाजमंदिर व भाजी बाजार, रस्ते रुंदीकरणाची कामे मोठय़ा प्रमाणावर झाली आहेत, असेही त्यांनी सांगितले. यावेळी सीबीडीतील दुकानदारांनी या निदर्शनांना पाठिंबा देण्यासाठी दुकाने बंद ठेवली होती.

उरण परिसर अद्याप तहानलेलाच
मधुकर ठाकूर, उरण/वार्ताहर :
उरण परिसरात पडणाऱ्या पावसाला जोर नाही. यामुळे दरवर्षी जून, जुलै या दोन महिन्यात पडणाऱ्या सरासरी पावसापेक्षाही यावर्षी निम्म्याने पाऊस कमी झाला आहे. यामुळे पाणीसाठय़ावर विपरीत परिणाम झाला असून, चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या वर्षी पावसाचे आगमन सर्वच ठिकाणी लांबले. पावसाला विलंबाने सुरुवात झाली असली तरी अद्याप पावसाला जोर नसल्याने समाधानकारक पाऊस पडला नाही. उरण तालुक्यात जून, जुलै या दोन महिन्यात मागील चार वर्षांत जोरदार पाऊस पडल्याच्या तहसील दप्तरी नोंदी आहेत.

गटारीच्या धामधुमीत राष्ट्रवादीचे वृक्षारोपण
शहरात एकाच दिवशी दोन लाख रोपे लावली

नवी मुंबई (प्रतिनिधी) : श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी अखेरचा रविवार म्हणून सर्वत्र गटारीची धूम असतानाच, ठाणे जिल्ह्णााचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी मात्र आपल्या समर्थकांना रविवारी दिवसभर शहरात वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात गुंतवून ठेवले होते. नाईक यांचे पुत्र व महापालिकेचे स्थायी समिती सभापती संदीप नाईक यांच्या ग्रीन होप या संस्थेच्या माध्यमातून काल दिवसभरात शहरातील वेगवेगळ्या उपनगरांमध्ये सुमारे दीड लाखांहून अधिक रोपे लावण्यात आली.