Leading International Marathi News Daily

मंगळवार, २१ जुलै २००९

सत्तेची संगीत खुर्ची.. सत्तेच्या सारीपाटात खुर्चीचे महत्त्व अनन्यसाधारण असेच. त्यामुळेच या खुर्चीची ऊब सगळ्यांना हवीहवीशी वाटते आणि त्यामुळेच आपली खुर्ची कायम राखण्यासाठी जो-तो धडपडताना दिसतो. त्यामुळेच की काय, नाशिकला होऊ घातलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीची पूर्व तयारी करताना खुच्र्याची सर्वाधिक काळजी घेतली जात होती. विधानसभेची आगामी निवडणूक तोंडावर येऊन ठेपलेली असताना सत्तेच्या संगीत खुर्चीसाठी लगबग सुरू झाल्याचेच तर हे निदर्शक नव्हे?

नाशिक येथे येत्या बुधवारी होत असलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या पाश्र्वभूमीवर शासकीय विश्रामगृहास चढविला जाणारा नवीन साज.

मंत्रिमंडळ बैठकीसाठी प्रशासनाचे सूक्ष्म नियोजन
* कडेकोट सुरक्षा व्यवस्था * वाहतूक मार्गातही बदल

प्रतिनिधी / नाशिक

साधारणत: तपभरानंतर राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीच्या निमित्ताने सिंहस्थ नगरीत येत्या बुधवारी एकाच वेळी दाखल होत असलेल्या सत्ताधाऱ्यांच्या आदरातिथ्यामध्ये कोणतीही उणिव भासू नये, या दृष्टीकोनातून अवघी प्रशासकीय यंत्रणा कार्यप्रवण झाल्याचे दिसत आहे. बैठकीनिमित्त, येथील शासकीय विश्रामगृहाचा परिसर तसेच त्या दिशेने जाणाऱ्या साऱ्या प्रमुख रस्त्यांना नवा साज चढवितानाच बैठकीच्या दिवशी वाहतुकीचे नियमन, पार्किंग व्यवस्था, कडेकोट सुरक्षा व्यवस्था आदी बाबींचे अतिशय सूक्ष्म पातळीवर नियोजन करण्यात आले आहे.

मंत्रिमंडळ बैठकस्थळी विविध संघटनांचे मोर्चे
डबघाईस आलेल्या बँका व पतसंस्थांना शासनाने एक हजार कोटीचे सॉफ्ट लोन मंजूर करावे आणि या सहकारी संस्थांमधील गैरव्यवहारास जबाबदार असणाऱ्या संचालकांविरुद्ध तात्काळ फौजदारी गुन्हे नोंदवावेत या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी नाशिक ठेवीदार हितसंवर्धन व बँक बचाव समितीतर्फे ‘जबाब दो’ मोर्चा.

नाशिकमधील मंत्रिमंडळ बैठकीच्या निमित्ताने..
नाशिक येथे होऊ घातलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जाहीर केल्या जाणाऱ्या नाशिक महसूल विभाग विकास पॅकेजमध्ये नाशिक लोकसभा मतदार संघाशी संबंधित तसेच, नाशिक जिल्ह्य़ाच्या सर्वागीण विकासासाठी महत्वाच्या ठरणाऱ्या विविध विकास प्रकल्पांच्या मागणीचे निवेदन खा. समीर भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण, उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना सादर केले आहे.

कृतार्थ ज्येष्ठ नागरिक संघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
नाशिक / प्रतिनिधी

इंदिरानगर येथील कृतार्थ ज्येष्ठ भवनमध्ये कृतार्थ ज्येष्ठ नागरिक संघातर्फे दहावी व बारावीच्या परीक्षेत उत्कृष्ट यश मिळविणाऱ्या परिसरातील गुणवंतांचा सत्कार संघाचे अध्यक्ष प्रा. चंद्रकांत तळवेलकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. विद्यार्थ्यांनी स्वबळाबर आवडीच्या क्षेत्रामध्ये सखोल ज्ञान संपादन करून जीवन फुलवावे, अभ्यासासाबरोबरच अवांतर वाचन, एखादी कला अवगत करून जीवनाचा एकांगीपणा घालवावा, असे विचार तळवेलकर यांनी मांडले. यावेळी देणगीच्या रूपाने पुस्तक स्वरूपात पारितोषिक देत गुणवंतांना गौरविण्यात आले. सरस्वती तळवेलकर स्मृतिप्रित्यर्थ परिसरात मुलींमध्ये ९३.३८ टक्के गुण मिळवत पहिली आलेली तितिक्षा परांजपे, विनायक तळवेलकर स्मृतिप्रित्यर्थ मुलांमध्ये पहिला आलेला आकाश कुलकर्णी (९२.३०), गणितात सर्वाधिक गुण मिळाले म्हणून यशवंत माशाळकर स्मृति पारितोषिकाने लेखा सोहोनी, चिन्मय मुळे यांना गौरविण्यात आले. विजया देशपांडे स्मृतिप्रित्यर्थ मराठीमध्ये सर्वाधिक गुण मिळवलेले अभिषेक हिंगणे, निवेदिता केंगे, पवन रहाणे, दुर्वा पटवर्धन यांना पारितोषिक देण्यात आले. सूत्रसंचालन मो. ए. कुलकर्णी यांनी केले.

अगणित भाषांचे मूळ संस्कृतमध्ये - डॉ. कृष्णचंद्र गोस्वामी
नाशिक / प्रतिनिधी

काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत असंख्य प्रांतांमधील अगणित भाषांचे मूळ संस्कृत भाषेमध्ये आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय साहित्य परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. कृष्णचंद्र गोस्वामी यांनी केले. येथील हुतात्मा स्मारकमध्ये आयोजित सभेत ते बोलत होते. जनतेच्या सोयीनुसार लिपीचे स्वरुप बदलत जाते आणि उच्चारांमध्ये किरकोळ फरक पडत जातो. हिंदी भाषेवर देखील परकीय आक्रमकांच्या अरबी, फारसी लिपी व त्यांचे व्याकरण यांचा प्रभाव शेकडो वर्षांपासून पडलेला सहज लक्षात येतो. या साऱ्यातून भाषेचे स्वरुप स्थिर ठेवणे व ती विद्वान तसेच सामान्यांपर्यंत पोहोचविणे यासाठी प्राध्यापक, लेखक व शिक्षक यांना सतत प्रयास करावे लागतात, असेही गोस्वामी म्हणाले. याप्रसंगी चंद्रिकाप्रसाद मिश्रा, शीला डोंगरे व्यासपीठावर उपस्थित होते.

नाईक शिक्षण संस्था: श्रीविजय पॅनल आघाडीवर
नाशिक, २० जुलै / प्रतिनिधी

येथील क्रांतिवीर वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या मतमोजणीत माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांच्या नेतृत्वाखालील श्रीविजय पॅनल नऊ तर समाज परिवर्तन पॅनल दोन जागांवर आघाडीवर होते.
तुकाराम दिघोळे व अशोक धात्रक यांच्या नेतृत्वाखालील श्रीविजय पॅनल आणि प्रल्हाद कराड पाटील व कोंडाजी आव्हाड यांच्या नेतृत्वाखालील समाज परिवर्तन पॅनल यांच्यात सत्ता स्थापण्यासाठी चूरस आहे. २७ जागांकरीता रविवारी मतदान झाल्यानंतर मतमोजणीस आज सकाळी सुरूवात झाली. अध्यक्षपदाकरिता श्रीविजय पॅनलचे तुकाराम दिघोळे, समाज परिवर्तन पॅनलचे प्रल्हाद पाटील तर उपाध्यक्षपदाकरिता अशोक धात्रक व अ‍ॅड. अशोक आव्हाड, सरचिटणीसपदाकरिता हेमंत धात्रक, कोंडाजी आव्हाड, संजय सांगळे, सहचिटणीसपदाकरिता पुंडलीक गीते, बाळासाहेब पालवे, उल्हास पोटे हे उमेदवार रिंगणात आहेत. गटातील दोन जागांसाठी रमेश वाघ व पोपट आव्हाड या दोघांची यापूर्वीच अविरोध निवड झाली आहे.