Leading International Marathi News Daily

मंगळवार, २१ जुलै २००९


पावसाळ्याला सुरुवात झाली की, त्र्यंबकेश्वर परिसरात दृष्टीस पडणारे हे ‘उलटे धबधबे’ आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतात. डोंगर कडय़ांवरुन कोसळणारा जलप्रपात वाऱ्याच्या जोरदार प्रवाहामुळे प्रथम वरच्या दिशेने जातो व धबधबे ऊध्र्वगामी असल्याचा भास निर्माण होतो. एरवी जूनच्या प्रारंभी येणाऱ्या गडगडाटी पावसामुळे हे दृश्य सहज पहावयास मिळते. यंदा मात्र, पावसाचे आगमन खूपच लांबल्याने हे दृश्य नजरेत साठवून घेण्यासाठी जुलैच्या तिसऱ्या आठवडय़ापर्यंत प्रतीक्षा करावी लागली. छाया : विवेक बोकील

जळगाव : अवैध प्रवासी वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

वार्ताहर / जळगाव

जिल्ह्य़ातील एरंडोल गावाजवळ मुंबई-नागपूर महामार्गावर टॅक्सीच्या झालेल्या भीषण अपघातात दहा जणांचा झालेला मृत्यू म्हणजे अवैध प्रवासी वाहतुकीचे बळी असल्याचे निष्पन्न होताच संपूर्ण जिल्ह्य़ात पोलीस प्रशासनाने अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात मोहीम तीव्र केली आहे. तथापि, पोलिसांची ही कारवाई तात्पुरती म्हटली जात असून पोलिसांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

चांदोरकर प्रतिष्ठानच्या ‘अध्र्य’ मैफलीत नृत्य-संगीताचा अनोखा आविष्कार
जळगाव, २० जुलै / वार्ताहर

येथे वसंतराव चांदोरकर यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून चांदोरकर प्रतिष्ठानतर्फे आयोजित शास्त्रीय नृत्य व संगीताची ‘अध्र्य’ ही एक अनोखी मैफल चांगलीच रंगली. भय्यासाहेब गंधे सभागृहात प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त दीप चांदोरकर यांनी गुरूवंदना सादर केली. उद्योगपती अशोक जैन व रूस्तुमजी शाळेच्या संस्थापक इटावसी पेसुना यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. शंभु पाटील यांनी प्रास्तविक केले. राष्ट्रीय स्तरावरील नृत्य स्पर्धेत तीन प्रथम पुरस्कार पटकावणाऱ्या नुपूर चांदोरकरने सरस्वती वंदना सादर केली. मनोज कुलकर्णी (तबला), जुईली कलभंडे (गायन), डॉ. अर्पणा भट व संवादिनीवर अमेय रावतोळे यांनी संगीत साथ केली. २१ ऑगस्ट रोजी युरोपमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय युवक महोत्सवात नुपूर भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे.

‘औद्योगिक नगरी’ निमित्ताने जळगावचे उद्योजक जैन गटाविरोधात
वार्ताहर / जळगाव
स्वतंत्र औद्योगिक नगरी स्थापन करण्यासाठी सर्व उद्योजक एकवटले असून शहराच्या गेल्या २५ वर्षांच्या इतिहासात उद्योजक प्रथमच सुरेश जैन गटाविरोधात गेल्याचे चित्र दिसत आहे. महापालिका प्रशासनाने उद्योजकांना विकासाचा करारनामा करून देण्याची तयारी दर्शविली असतानाच त्या विरोधात प्रसंगी न्यायालयात जाण्याचा इशाराही दिला आहे.

जातीयवादी विचाराच्या पक्षांना थारा देऊ नये- खा. समीर भुजबळ
लासलगाव / वार्ताहर

विकास हाच पक्ष मानून येवला-लासलगाव विधानसभा मतदार संघातील जागरूक जनता उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या पाठिमागे आतापर्यंत उभी राहिली असून यापुढेही जनतेने जातीयवादी विचारांना थारा देऊ नये, असे प्रतिपादन खा. समीर भुजबळ यांनी केले. लासलगाव भागाचा दौरा करून भुजबळ यांनी विकास कामांची माहिती करून घेतली.


सटाणा तालुक्यातील बागलाण अकॅडमी अ‍ॅण्ड हेल्थ सोसायटीतर्फे आयोजित पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबीरात युवकांना मार्गदर्शन करताना संचालक आनंदा महाले (छाया- रोशन खैरनार)

मद्यपीकडून पत्नीचा खून
लासलगाव / वार्ताहर

विंचूर शिवारातील खडी क्रशरवर काम करणाऱ्या मजुराने घरगुती भांडणातून दारूच्या नशेत पत्नीवर धारदार शस्त्राने वार करून ठार मारल्याची घटना घडली आहे. चांदवड तालुक्यातील मंगरूळचा रहिवासी रोहिदास भीमराज गोधडे (३०) हा खडी क्रशर कारखान्यात गेल्या दोन दिवसांपासून काम करीत होता. दारूच्या व्यसनामुळे गोधडे यास यापूर्वी कामावरून कमी करण्यात आले होते. दोन दिवसांपासून तो पुन्हा कामावर आला होता. १८ जुलै रोजी रात्री रोहिदास व त्याची पत्नी गंगुबाई उर्फ अनिताबाई यांच्यात भांडण झाले. रोहिदासने मद्यधुंदीत पत्नीवर शस्त्राने वार केले. त्यातच तिचा मृत्यू झाल्याची फिर्याद खडी क्रशरचा मुकादम कांतीलाल जाधव यांनी दिली. पोलिसांशी संपर्क साधून गोधडे याला जाधव यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वीज चोरटय़ास सक्तमजुरी
मालेगाव / वार्ताहर

मुख्य वाहिनीवर आकडा टाकून वीज चोरणाऱ्या मालेगाव तालुक्यातील मेहुणेशिवार येथील निंबा येसा अहिरे (४८) यास येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन महिन्यांची सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंड सुनावला आहे. मेहुणे शिवारात महावितरणचे कनिष्ठ अभियंता तिरूपती पाटील हे २५ मे २००५ रोजी तपासणी करीत असताना निंबा अहिरेने मुख्य विद्युत वाहिनीवर आकडा टाकून स्वत:च्या घरात अनधिकृत वीज जोडणी घेतल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. वीज चोरी रंगेहात पकडल्यानंतर पुढील तपासणीत अहिरेने ९,७०० रुपयांच्या ३३१२ वीज युनिटची चोरी केल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात फौजदारी तक्रार दाखल करण्यात आली. पोलीस चौकशीनंतर प्रकरण न्यायप्रविष्ट करण्यात आले. उपलब्ध साक्षीपुराव्यानुसार न्यायालयाने अहिरे यास वीज चोरी प्रकरणी दोषी ठरविले. दंडाची रक्कम न भरल्यास त्यास आणखी ४५ दिवसांच्या सक्तमजुरीची शिक्षा निकालपत्रात नमूद आहे.

बनावट रेशनकार्डाची चौकशी करण्याची मागणी
मनमाड / वार्ताहर

नांदगाव तालुक्यात सध्या बोगस बीपीएल रेशन कार्ड तयार करणारी टोळी कार्यरत असून गरजूंकडून एक ते दोन हजार रुपये घेतले जातात व बनावट सही शिक्के मारून कार्ड दिले जाते, या प्रकाराची चौकशी करावी अशी मागणी रिपाइं शहर शाखेने केली आहे. नागरिक कार्ड घेऊन रेशन दुकानांवर गेले असता त्यांना परत पाठविले जाते, व रेशन कार्ड बोगस आहे, असे सर्रास सांगितले जाते, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. गरजुंना त्वरित बीपीएल रेशनकार्ड वाटप करावे, बोगस रेशन कार्ड बनविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करावा, अन्यथा रिपाइंतर्फे आंदोलन केले जाईल असा इशारा रिपाइंते ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजाभाऊ अहिरे, राजाभाऊ पगारे, महिला आघाडी प्रमुख पुष्पलता मोरे यांनी दिला आहे.