Leading International Marathi News Daily

मंगळवार, २१ जुलै २००९

पाऊस तेव्हाचा आणि आताचा..
पावसाळा.. आपल्या महाराष्ट्रासाठी आणि एकूणच भारतासाठी अतिशय महत्त्वाचा ऋतू! जगाच्या बहुतांश भागात केवळ दोनच ऋतू असताना आपल्याकडे मात्र पावसाळ्याच्या रूपात तिसरा स्वतंत्र ऋतू अनुभवायला मिळतो. पण अशा या महत्त्वाच्या पावसाळ्यात आता अनेक बदल होत असल्याचे बोलले जाते. पावसाचा कालावधी, त्याची वैशिष्टय़े, त्याची लहर अशा सर्वच गोष्टींमध्ये बदल होत असल्याचे बोलले जाते आणि आता पूर्वीचा पावसाळा राहिला नाही, असाही सूर ऐकायला मिळतो. त्याबाबतचे वास्तव काय आहे, हे समजून घेण्यासाठी ‘लोकसत्ता’च्या वाचकांनी खास ‘भवताल’च्या व्यासपीठावर आपली पावसाबाबतची निरीक्षणे पाठवली आहेत. त्यावरून ‘तेव्हाचा आणि आताचा’ पाऊस यामध्ये काही फरक आहे का, हे लक्षात येईल. पाऊस खरंच बदलला आहे का, हे जाणून घ्यायलाही मदत होईल!

कालाय तस्मै नम:
आठवतोय पावसाळा तेव्हाचा, ५० वर्षांपूर्वीचा! जूनच्या पहिल्या आठवडय़ात, शाळा सुरू होता होता विजा चमकत, ढगांचा गडगडाट करीत, भन्नाट वाऱ्यासहित हलक्या सरींनी मृद्गंध पसरवत

 

लाडका पाऊस आगमनाचा सुखद अनुभव देत असे. त्या काळी उंच इमारतींचे जंगल नसल्याने झिमझिम पावसाचे मुसळधार पावसात रूपांतर होताना स्पष्ट दिसायचे. एकदा सुरू झालेला पाऊस चार-चार दिवस संततधारेने पडायचा. सूर्यदर्शनही होत नसे. त्यामुळे अन्नधान्य, जळण यांची बेगमी करून ठेवावी लागे. रस्त्यावरील तळय़ांतून पायाने पाणी उडवत आणि गळे फुगवून डराँव डराँव ओरडणाऱ्या पिवळय़ाधमक बेडकांच्या खोडय़ा काढत शाळेत जाताना गंमत वाटे. अगदी सकाळी उबदार गोधडीतून बाहेर पडून मुलं परसदारीच्या विहिरीकडे धाव घेत. उन्हाळय़ात तळ दिसणारी खोल विहीर हाताला पाणी लागेल इतकी तुडुंब भरलेली पाहून होणारा आनंद अवर्णनीय! मग कमरेला डबे बांधून आरडाओरडा करत पोहण्याचा कार्यक्रम सुरू होई. तुडुंब भरलेल्या शेतातून पानांची इरली घालून शेतकऱ्यांची (भात) लावणी सुरू होई. शेतांकडेच्या ओहळात कागदी होडय़ा सोडून स्पर्धा लागायची. झाडे हिरवीकंच होत. शेतातल्या मासोळय़ा खाण्यासाठी अचानक पांढऱ्याशुभ्र बगळय़ांचा थवा झाडावर येई अन् झाड बगळय़ांनी भरून जाई. उडणाऱ्या पांढऱ्याशुभ्र बगळय़ांची माळ पाहून बालकवींच्या ‘श्रावणमास’ कवितेचा प्रत्यय येई. हळूहळू पावसाचा आवेग कमी होऊन ऊन-पावसाचा खेळ सुरू होई. आभाळात इंद्रधनुष्य स्पष्ट दिसे. प्राजक्त, चाफा फुलून घमघमाट सुटे. सणांचे उत्सव सुरू होऊन पक्वान्नांचा सुवास दरवळे, पाऊस हलके हलके रजा घेई..
आता हल्लीच्या पिढीची जीवनपद्धती बदलली. शहरीकरण झालं. उंच इमारती झाल्याने हवेचे प्रदूषण, पर्यावरणाचा ऱ्हास, वृक्षतोड झाल्याने पाण्याच्या, पशुपक्ष्यांच्या निवाऱ्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. पूर्वी आसुसून येणारे ऋतू, तळपणारा उन्हाळा, तोंडातून वाफ काढणारा कुडकुडायला लावणारा हिवाळा, ‘नेमेचि येणारा’ पावसाळा आहेत कुठे, असा प्रश्न पडतो. नावालाच त्यांची हजेरी असते. त्याला आपणच कारणीभूत आहोत, या दु:खद वास्तवामुळे व्यथित अंत:करणाने आमची ज्येष्ठ पिढी ‘कालाय तस्मै नम:’ म्हणून मनाला समजावतेय, त्याचबरोबर ‘पर्यावरण वाचविण्याची बुद्धी माणसाला दे’ हे मागणं देवाजवळ मागतेय!
- विजया ना. आजगावकर, डोंबिवली (पूर्व)

‘वाहनांची’ ऐशीतैशी!
जून महिन्यात पावसाचे वेध लागतात. अपेक्षा असते ती गडगडाटासह येणाऱ्या दमदार पावसाची! आमच्या लहानपणी विशेषत: आषाढी एकादशीला शाळेमार्फत काढण्यात येणाऱ्या दिंडीत पावसाने नखशिखान्त भिजवले नाही, असे एकदाही झाले नाही. मग नंतरच्या दिवसांगणिक सूर्याला गायब करत मुसळधार, संततधार, हाहाकार उडविणारा पाऊस, नंतर श्रावणातला ऊनाबरोबर लपंडाव खेळणारा पाऊस, मग सणांच्या रेलचेल असलेल्या भाद्रपद महिन्यात देवादिकांची कृपा असल्याप्रमाणे पडणारा व हिरवाईला अधिक तजेला देणारा पाऊस हे समीकरण गेल्या दशकापर्यंत टिकून होते. या वेळापत्रकात थोडा जरी बदल झाला, पाऊस लांबला की आम्ही आईकडे धाव घेऊन विचारायचो, की पाऊस कुठे गडप झाला म्हणून! मग आई पंचांग उघडून सध्या ‘नक्षत्र’ व ‘वाहन’ कोणते आहे ते पाहायची नि मग पंचांगानुसार म्हणायची, ‘सध्या कोल्हा वाहन सुरू आहे, तेव्हा पावसाची शक्यता कमीच, पण नंतर म्हैस वाहन असेल तेव्हा अगदी मनसोक्त पाऊस पडणार. ‘नि मग त्याप्रमाणे घडायचेही. म्हणजेच मोर, म्हैस, बेडूक, हत्ती ही वाहने असलेल्या प्रत्येक नक्षत्रात १३/१४ दिवसांत भरपूर पाऊस. तर गाढव, कोल्हा, मेंढा, घोडा, उंदीर या प्राण्यांना (वाहनांना) पाऊस-पाण्याचे वावडे. म्हणजेच या वाहनांच्या काळात पावसाची शक्यता कमीच. शिवाय नैर्ऋत्येकडून येणारा पाऊस टिकणारा, प्रत्येक नक्षत्राचे व पावसाबरोबरचे सख्य, (उदा., मघा नक्षत्राच्या वेळी पावसासाठी टकामका बघा!) ही समीकरणे सालाबादाप्रमाणे चालत राहिली..
पण सुमारे गेल्या दशकापासून ग्लोबल वॉर्मिगचा जसा प्रभाव वाढू लागला, तसे त्यांनी वाहनांची ऐशीतैशी करून टाकली. या वर्षीच पाहा ना- ७ जूनपासून मोर, तर २१ जूनपासून हत्ती ही पाऊसप्रिय वाहने होती, पण या वेळी पावसाचा ठणाणाच होता. पावसाने हजेरी लावली ती ५ जुलैपासून. मेंढा वाहन लागायच्या आदल्या दिवसापासून म्हणजेच हत्ती वाहनसमाप्तीच्या आदल्या दिवशी मेंढा वाहन १८ जुलैपर्यंत होते. म्हैस हे पाऊसप्रिय वाहन १९ जुलै ते १ ऑगस्ट दरम्यान आहे. पाहूया या दिवसांत पाऊस कोणता रंग दाखवितो? नंतर २ ऑगस्ट ते १४ ऑक्टोबपर्यंत कोल्हा, उंदीर, घोडा, मेंढा, गाढव ही पाऊस अप्रिय वाहने आहेत. या काळात ग्लोबल वॉर्मिगच्या प्रभावाने ऋतुबद्दल होऊन मुसळधार पाऊस वाहनांची ऐशीतैशी करतो का हेच पाहणे आपल्या नशिबी!
- किरण प्र. चौधरी, वसई

नक्षत्रांशी बांधिलकी असलेला पाऊस!
‘बदल’ हा सृष्टीचा अलिखित नियमच! तो पावसाला लागू आहे. मान्सून येणार किंवा मान्सून आला असं आपण म्हणतो. परंतु वास्तव वेगळंच असतं. कुठंतरी चार थेंब सडा शिंपल्यासारखा पडतो. पावसाळा सुरू झाला म्हणता म्हणता टळटळीत ऊन पडतं. त्याच वेळी प्रत्येकजण मनानं भूतकाळात पोहोचतो नि भविष्याच्या काळजीनं अस्वस्थ होतो. मी पावसाळा अनुभवलाय तो गावकुसावरचा! पावसाळी ओलेचिंब दिवस आठवले, तरी अंगावर रोमांच उभे राहतात. नव्यानं शाळेला जाण्याची आतुरता, जिज्ञासा होती नि पाऊस येण्याची एकच घाई. अरे बापरे! संततधार पाऊस सुरू झाला की आठ-आठ दिवस बरसे, अविश्रांत! आनंद, हुरहुर, नित्यकामात अडचण असं त्याचं स्वरूप असे. ग्रामीण भागातले रस्ते चिखलानं माखायचे. आतासारख्या आकर्षक विविधरंगी नाजूक छत्र्या त्या वेळी नव्हत्याच! मोठय़ा आकाराच्या काळय़ाभोर छत्र्या, नाहीतर पोत्याची खोळ डोक्यावर चढवून घराबाहेर पडावं लागे. आई बंबाच्या उबेवर कपडे सुकवे. माझे डॉक्टर वडील रोग्यांना तपासायला चिखलाच्या वाटेने घोडय़ावरून रपेट करीत पंचक्रोशीत जात. ते घरी येईपर्यंत आम्ही अगदी चिंतातुर अवस्थेत. कारण त्यांच्या वाटेत ओढय़ाचं वेगवान पाणी नि डोंगराच्या कडय़ावरून घोडय़ाचा पाय घसरला तर? एकेकदा पाऊस नकोसा वाटे.
कॉलेजला शहराच्या ठिकाणी जायचं, तर पलीकडच्या गावातून एखादी एसटी असे. मध्येच दुथडी भरून वाहणारी नदी. पुरात नाव चालवायला सराईत नावाडीही घाबरे. पण दुसरं दळणवळणाचं साधन नसे. कधीतरी ओढय़ातून एसटी जाताना अचानक पाण्याचा लोंढा येई. त्यात एसटी वाहून गेल्याची घटना आजही कमालीच्या अस्वस्थ करतात. पावसाळा सुरू झाला, की वृद्ध असलेल्या घरातील लोकांचा जीव टांगणीला लागे. पण शेतीला पुरेसा पाऊस झाल्यानं मुबलक अन्नधान्य पिके. शेतकरी समाधानी असे. मृग नक्षत्रात सुरू झालेला पाऊस, साधारणपणे दसऱ्यापर्यंत असे. त्याची नक्षत्राची बांधीलकी होती. काही अपवाद वगळता निसर्ग आपलं कर्तव्य आखीवरेखीव कालावधीमध्येच पूर्णत्वाला नेई.
आज आपण सारे पावसाची वाट पाहतो, चिंतातुर बनतो. निसर्गानं आपलं चक्र बदललेलं असेल. कदाचित तो म्हणत असेल- आपणही आता बदल करूया. परंतु आपल्याला हा बदल थोडाच मानवणार आहे? माझी आजी म्हणायची, ओला दुष्काळ परवडला, परंतु सुका दुष्काळ नको रे बाबा! आजीचा थरथरत्या ओठातला कातर स्वर हृदयात घुमत राहतो आणि माझ्या ओठातून अलगद बालगीत येते-
ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा,
पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा।।
- प्रतिभा आळतेकर

माणसालाही बुरशी यावी!
२६ जून १९५९ रोजी सकाळी ठाण्याहून लोणावळय़ास नोकरीवर रुजू होण्यास गेलो. लोणावळा स्टेशन समोरच्याच रेल्वे कार्यालयात पोहोचेपर्यंतच छत्री असूनही नखशिखान्त भिजलो. दिवसभर कोसळणारा जोराचा पाऊस, त्यामुळे हिवाळय़ापलीकडचा गारवा! पुढे बिऱ्हाड थाटल्यावर कपडे वाळवण्यासाठी रेल्वे इंजिनचा अर्धा जळलेला दगडी कोळसा आणून शेगडी पेटवावी लागे. हवेमध्ये कोरडेपणा किंचितही नसायचा. गवसणी घातलेल्या तंबोऱ्यालाही बुरशी लागे. माणूस जर दिवस-रात्र प्रदीर्घ काळ झोपून राहिला, तर त्याच्या अंगालाही बुरशी येईल असे सगळेजण म्हणत.
वर्षांपूर्वीच विवाह झाला असल्यामुळे श्रावणात मंगळागौरीसाठी मुंबई-ठाण्यातून मोठय़ा हौसेने नातेवाईक आले होते, पण उंबरठा ओलांडून बाहेर पडायची हिंमत कोणाला होईना. यदाकदाचित पाऊस थांबला आणि सरळ रांगेतले घराचे दरवाजे उघडले, तर ढगच घरामधून आरपार जायचे (अतिशयोक्ती नाही!) एके दिवशी चोवीस तासांमध्ये चक्क १९ इंच पाऊस कोसळला.
हे असे प्रमाण सातत्याने असायचे. (हल्ली पर्यावरण संतुलनामधील बिघाडामुळे कोकणपट्टीत असे केव्हा तरी अचानक घडते.) हल्ली मात्र औद्योगीकरण व हॉटेल्स, रिसॉर्ट्स इत्यादींमुळे इमारतींचे जंगल लोणावळय़ातही उभे राहिले. त्यामुळे ‘थंड हवेचे ठिकाण’ ही त्याची प्रतिमा बिघडली. आता लोणावळय़ाच्या पावसाचा धसका कोणीच घेत नसतील. अतिपावसामुळे पूर्ण जुलै व अर्धा ऑगस्ट अशा ‘आवणी’ (पावसाळी) सुटीचीही मजा काही वेगळीच होती.
- बाळकृष्ण वा. भागवत, बोरिवली

अतितीव्र बनलेला पाऊस
पावसाळय़ाच्या चार महिन्यांत ९७ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज होता. परंतु जूनमध्ये पाऊस पडला नाही. पाऊस अतितीव्रतेने पडत आहे व पाणी मुरण्याऐवजी जमिनीची धूपच करतो. पाणी मुरण्याची क्रिया न झाल्याने भूजलाचे पुनर्भरण होत नाही. वाढत्या शहरीकरणामुळे पावसाचे पाणी जमिनीवर पडण्याऐवजी काँक्रीटच्या छतावर साठले जाते व पाईपच्या माध्यमातून वाहायला सुरुवात होते. जास्त क्षेत्रातील पाणी पाईपच्या माध्यमातून खूपच वेगाने वाहायला सुरुवात होते व सखल भाग वेगाने पाण्याखाली जातो.
दुसऱ्या बाजूला सांडपाणी निचऱ्याची व्यवस्था पुरेशी सक्षम नसल्याने ते पाणी जमिनीत मुरत आहे व खराब पाण्याने सखल भागाची भूजल पातळी वाढत आहे. पावसाचे शुद्ध पाणी धारण करण्याची क्षमता कमी झाल्याने थोडा पाऊस पडला तरी पाणी वाहायला लागते. हे पावसाचे बदलणे आपण स्वीकारले पाहिजे. कुठल्याही प्रकारचा बाऊ न करता परिस्थितिनुरूप आपल्या जीवन व आहारशैलीत बदल केले पाहिजेत.
- गोवर्धन कुलकर्णी,
ओझर (मिग), नाशिक

पुलाला टेकणारी पांझरा ते..
सुमारे पन्नास वर्षांपूर्वीचा काळ. गावात हायस्कूल नसल्याने धुळे शहरात आठवीत प्रवेश घेतला. ‘पाण्यापावसाचं सांभाळून रहा’ असं वारंवार सांगताना, आईच्या डोळय़ांत पाऊस असायचा. ओढूनताणून शोधून काढलेल्या दूरच्या नातेवाइकांकडे वळकटीसह मुक्काम! हायस्कूलला जाताना-येताना बहुधा रोज किंवा दोन-तीन दिवसांच्या अंतराने पाऊस रस्त्यातच गाठायचा. मित्रांसह मग आडोशाला जायचो. भिजण्याची तक्रार नव्हतीच. काळजी वाटायची ती फक्त वहय़ा-पुस्तके भिजण्याची. ओणवे होऊन पोटाखाली पुस्तके धरायचो, पण ती धडपड वायाच जात असे. भिजलेली पुस्तके आणि वहय़ा उलगडून कोपऱ्यात वाळवायला ठेवले की झाले. प्रत्येक घरात एक मोठी लांब दांडय़ाची छत्री असायची. तिच्यावर हक्क फक्त घरातील मालकाचा! असंच एखाद्या दिवशी कुणीतरी मित्र लगबगीने येऊन बातमी द्यायचा ती पांझरा नदीला पूर आल्याची. ताबडतोब नदीकडे आमचा मोर्चा वळायचा. पांझरा नदीवरील धुळे शहर आणि देवपूर भागाला जोडणारा तो विशाल पूल आजही वयाचं शतक पूर्ण करून भक्कमपणे उभा आहे. फरक एवढाच की आम्ही लहानपणापासून बाराही महिने त्याखालून पाणी वाहताना पाहात होतो आणि आता मात्र येथे कधीकाळी दुथडी भरून वाहणारी नदी होती हा इतिहास सांगण्याचे काम तो पूल करतोय भकास पात्र आणि दगडगोटय़ांच्या साक्षीने! दुसऱ्या दिवशी पूर ओसरल्यावर आम्ही नदीच्या काठाकाठाने वरवर जायचो. झाडाच्या फांद्या, लाकडे, शेळीमेंढीचं फुगून पांढरं पडलेलं पिलू, काडीकचरा, काटय़ाच्या फांद्या असं काय काय न्याहाळत दिवस घालवायचो. दुसऱ्या दिवशी पुलावरून वाहतूक सुरू व्हायची. मुख्यत: एस.टी. गेली म्हणजे सुरक्षित वाटायचं. या पुराची बातमी एसटीमुळेच गावी पोहोचायची. मग माझी आई माझी खबरबात घेण्यासाठी वडिलांना धुळय़ास पाठवायची. सोबत धोतराच्या फडक्यात बांधून दिलेला खाऊ आणि कळकळीच्या सूचना!
असे दोन-तीन मोठे पूर प्रत्येक पावसाळय़ात यायचेच. तिचं पात्र आजच्यासारखं कोरडं पडल्याचं मला तरी आठवत नाही. पावसाळय़ात दुथडी भरून वाहणारी, पुलाच्या कमानींना स्पर्श करणारी आणि प्रत्येक पावसाळय़ात एकदा तरी धोक्याच्या रेषेला स्पर्शून जाणारी, माझ्या आठवणीतली पांझरा नक्की कधी रोडावली हे मात्र समजलंच नाही. आता तर स्थिती अशी आहे, की केवळ प्रचंड पूल आहे त्याअर्थी कधीकाळी येथे तशीच मोठी नदी असणार असं म्हणायची वेळ आली आहे!
- श्रीराम महादेव जोशी, औरंगाबाद

संपन्नता घेऊन येणारा
ते वर्ष फार वेगळं होतं १९४२चं. भारतीय स्वातंत्र्याचं रणशिंग फुंकलेलं! अंगणातून पापड, सांडग्यांची वाळवणं पडलेली. उन्हं उतरती व्हायला आणि वाऱ्याचा भवरेपिंगा सुरू व्हायला एकच गाठ, रस्त्यांवरून धुळीचे भवरे उंच उंच उडत धावत सुटलेले, वाळवणं गडबडीने गुंडाळून घरात.. आले आले म्हणताना काळेशार गजमेघ थंडावा गुंडाळून आकाशभर धावताहेत टप्टप् टप्टप् थेंब मृगाचे तप्त धरतीवर शिंपडताहेत. विजांच्या चमक् रेषा तळपून जाताहेत. मातीच्या गंधानं मन कस्तुरीमृगासारखं वेडंपिसं होतंय..नेहमीप्रमाणेच मग पागोळय़ांचं पाणी ओंजळीत घेऊन उंच उडवायचं आणि वेगगतिमुळे एकवटलेला पाण्याचा मोठ्ठा गोलक अचूक थप्पड देऊन उडवायचा. गोलकांतून चौफेर मोती उधळायचे. हा मनसोक्त खेळ! वरुणराजाचं आगमन मात्र धूमधडाक्यात व्हायचं. गुपचूप नव्हे! रिपरिप शिंपडला गेला असं नाही. कडाक्यातल्या मेघगर्जनांसह, मस्तीत धावणाऱ्या वाऱ्यासह, प्रचंड तेज तडीन् चमचमाटासह वर्षांधारा कोसळणार. वृक्ष माना वाकवून वरुणराजाला मानवंदना करणार.. असा तो पर्जन्यराज येणार. नद्या फेसाळ, गढूळ पाण्याचे लोंढे घुसळत दुथडी भरून वाहताहेत, धावत सुटल्याहेत. प्रवाहात कुणाला ठरू देत नाहीत. पुराची रुद्रसुंदर गंमतही प्रतिवर्षीप्रमाणे नजरेत साठवणारी उत्सुक मनं!
कडधान्य कापणी झाली, की वाल, चवळी, उडीद, मूग इत्यादी सांडलेलं धान्य दोन-दोन पोपटी पानं धरून तरारून आलेलं. याशिवाय रानात भुईफोडं (जमिनीलगत उगवणारी गोल आकाराची भुईफळं) उगवायची. यांना कोकणात भोपडं पण म्हणतात. या भोपडांची भाजी अश्शी सुंदर चविष्ट की तुमचे दमआलू बिलू एकदम फिके. जोडीला आळंबी (मशरूम) कुर्डू, तेलपट, चिंचार्डी, भारंगी, झरस, शेवळं, लोद, कुडऱ्याच्या शेंगा, पेंढरं, मोहोर, मोदुडय़ा, दिंडं, शिंपी, खापरी अशा असंख्य स्वादिष्ट व सकस रानभाज्या फुक्कट मिळणार..
तेव्हाच्या पावसातली लालमखमली मृगपाखरं माळरानातून रांगू लागली. तेरडय़ांचे कुसुंबी गालीचे मनमुराद डोलू लागले. वईवईवर भवरीचे वेल फोफावले. त्याच्या पानांच्या पातवडय़ा खाऊन तृप्ती आली. वहाळाला मुरी मासे, मळे मासे थव्याथव्यांनी जमले. परतलेल्या मुरी व महाडीची लालभाकरी कष्टकऱ्यांची क्षुधा शमवत गेली. तेव्हाचा पाऊस काय विचारता यार? संपन्नता घेऊन यायचा- दूधदुभतं, भाजीपाला, रानमेवा, रानफुलं, सतत आठ-आठ दिवस धबाधबा कोसळणारा पाऊस. घरात चुलीच्या उबदार भवतालात, नाहीतर हुडहुडी भरवणाऱ्या पाऊस रानात. सारा वर्षांकाळ बिनधास्त सरायचा. आताचा पाऊस? कसा खोटारडा आहे. ते आपण सर्वजण जाणतोच!
- वनिता देशमुख, पाचपाखडी, ठाणे