Leading International Marathi News Daily

मंगळवार, २१ जुलै २००९

केदारेश्वर टाकीचीही दुरवस्था ; रोज हजारो लिटर पाण्याची गळती; विजेचीही सोय नाही !
समस्या अशी आहे..

केदारेश्वर टाकीला साधा जिनाही नाही
टाकीची अनेक झाकणे उघडीच
गळती दुरुस्तीबाबतही वाद
वादात महिनोन्महिने गळती सुरूच
कर्मचाऱ्यांसाठी पिण्याचे पाणी नाही
विनायक करमरकर, पुणे, २० जुलै
पाणीटंचाईमुळे पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करा, अशी सूचना पुणेकरांना वारंवार देणाऱ्या महापालिकेला मात्र हा नियम लागू नसल्याचे जागोजागी दिसत आहे. कात्रज येथील केदारेश्वर टाकीच्या मुख्य व्हॉल्व्हच्या गळतीमुळे रोज हजारो लिटर पाणी वाया जात असून या टाकीच्या देखभालीतही गंभीर उणिवा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

‘मोकळेपणाने विचार मांडता येत नाहीत’ डॉ. अवचट यांची खंत
पुणे, २० जुलै / प्रतिनिधी

‘पुरोगामी महाराष्ट्रात आता मोकळेपणाने विचार मांडण्याची सोय नाही’, अशा शब्दांत खंत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांनी व्यक्त केली. त्याचवेळी या महाराष्ट्राचे कसे होणार अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या ‘विवेकाची पताका घेऊ खांद्यावरी’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. अवचट यांच्या हस्ते रविवारी झाले.

रुग्णांच्या मूलभूत हक्कांचे कायद्यात रुपांतर करायला हवे
डॉ. नरेद्र दाभोलकर यांचे मत
पुणे, २० जुलै/प्रतिनिधी
उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या मूलभूत हक्कांची बूज डॉक्टरांनीच राखायला हवी मात्र डॉक्टरांच्या संघटना याबाबत उदासीन असल्याने रुग्णांच्या मूलभूत हक्कांचे कायद्यात रुपांतर करायला हवे, असे मत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी आज व्यक्त केले.

पीडित-अत्याचारित महिलांबद्दल सरकारला अनास्था - नीलम गोऱ्हे
पिंपरी, २० जुलै / प्रतिनिधी

राज्य सरकार पीडित व अत्याचारित महिलांसाठी जी धोरणे राबविण्याचे ठरविते त्यामध्ये प्रचंड अनास्था असल्याचा आरोप शिवसेनेच्या प्रवक्तया आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज येथे केला.
निगडी ओटास्कीम येथील एका तरुणीवर घरातील साफसफाई करण्यासाठी बोलावून तिच्यावर बलात्कार केला गेला.त्या पीडित मुलीची डॉ.गोऱ्हे यांनी आज पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात भेट घेतली . यावेळी शिवसेनेच्या महापालिकेतील गटनेत्या सुलभा उबाळे तसेच लीला जाधव, सुनीता चव्हाण या उपस्थित होत्या. यादरम्यान त्यांनी रुग्णालयाच्या सभागृहात पत्रकार परिषद घेतली.

रस्ता ढासळल्याने विद्यार्थ्यांना धोक्याची शक्यता
हडपसर, २० जुलै/वार्ताहर

हडपसर येथील जुन्या कालव्याशेजारी साधना शाळेकडे जाणारा नव्यानेच डांबरीकरण केलेला रस्ताच कालव्याच्या बाजूने ढासळल्याने विद्यार्थ्यांबरोबर नागरिकांच्या दृष्टीने गैरसोयीचा व धोकादायक झाला आहे. हडपसर गाडीतळावरून साधना विद्यालयाकडे जाणारा रस्ता विद्यार्थी व नागरिकांच्या दृष्टीने सोयीचा व्हावा यासाठी पूर्ण रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. रस्त्याच्या एका बाजूला रहिवासी गाळे तर दुसऱ्या बाजूला जुना कालवा आहे. परंतु या कालव्याच्या बाजूला कुठलीही संरक्षक कठडे व भिंत नसल्याने रस्ता धोकादायक झाला असल्याची बातमी या पूर्वी (निवडणुका होण्याअगदोर) ‘लोकसत्ता’मधून प्रकाशित करण्यात आली होती. कारण या रस्त्यावरून अनेक विद्यार्थी पायी व सायकलवर ये-जा करतात. या रस्त्यावरून जड वाहनांची वर्दळ वाढल्याने संपूर्ण रस्ता कालव्याच्या बाजूने खचला असून धोकादायक बनला आहे.

दरोडय़ाच्या तयारीतील सातजणांना अटक
पुणे, २० जुलै / प्रतिनिधी

शिक्रापूर येथे ‘एमआयडीसी’ मधील कंपनीत दरोडा टाकण्यासाठी आलेल्या सात जणांच्या टोळीला जिल्हा पोलिसांनी अटक केली. जीपान कंपनीजवळ आज पोलिसांनी ही कारवाई केली. मुरलीधर ज्ञानदेव घुगे (वय २३, रा. कळंबोली, वाशी), लल्लू अब्दुलखालीद चौधरी (वय २५, रा. कुदळवाडी, चिखली, मूळ रा. जि. बस्ती, उत्तर प्रदेश), शफी अब्दुल रहमान चौधरी (वय २५, रा. कुदळवाडी, चिखली, मूळ रा. जि. बस्ती, उत्तर प्रदेश), सिराज मोहम्मद हनीफ चौधरी (वय २५, रा. कुदळवाडी, चिखली, मूळ रा. जि. बस्ती, उत्तर प्रदेश), मोहम्मद हुसैन शेख (वय २५, रा. दिघी गाव), चंदू ऊर्फ नागेश मंजुनाथ शिंदे (वय २१, रा. विष्णुपुरी, जि. नांदेड) आणि उदय कालाप्पा शिंदे (वय १९, रा. विष्णुपुरी, जि. नांदेड) अशी या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या सातजणांची नावे आहेत. त्यांच्याकडील टेम्पो, मोबाईल, गज, मिरची पूड आदी ऐवज पोलिसांनी जप्त केला. अंगावर घाण टाकून ऐवज चोरणारे चंदू शिंदे आणि उदय शिंदे तर इतर पाच जण कंपनीतील रखवालदाराला मारहाण करून कॉपर वायर चोरणारे सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

शेतक ऱ्याला नुकसानभरपाईचा आदेश
पुणे, २० जुलै/प्रतिनिधी

करमाळा येथील आदिनाथ सहकारी साखर कारखान्यास न्यायालयाने शेतकऱ्याच्या नुकसानभरपाईपोटी ७ लाख २८ हजार रुपये देण्याचा निर्णय दिला आहे. जिंती (ता. करमाळा) येथील शेतकरी सदानंद देशपांडे यांनी याबाबत आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे सभासद शेतकरी जगन्नाथ देशपांडे व सदानंद देशपांडे यांचा १९९९ साली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा राग धरून राजकीय सूड उगविण्याच्या हेतूने त्यावेळच्या संचालक मंडळाने देशपांडे कुटुंबीयांचा सुमारे ३२ एकर ऊस गाळपासाठी नेण्यास नकार दिला होता. आर्थिक नुकसान मोठय़ा प्रमाणावर झाल्यामुळे देशपांडे कुटुंबीयांनी सोलापूर येथील न्यायालयात दावा दाखल करून नुकसानभरपाईची मागणी केली होती. या दाव्याचा निकाल २००५ मध्ये देशपांडे यांच्या बाजूने लागला होता. नंतर नुकसानभरपाईची रक्कम अपुरी वाटल्याने त्यांनी नागपूर येथील न्यायालयात अपील दाखल केले. त्या अपिलाचा निकाल लागून न्यायालयाने कारखान्यास देशपांडे यांना ७ लाख २८ हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी व १५ जून १९९९ पासून रक्कम मिळेपर्यंत त्यावर सहा टक्के व्याज द्यावे असा आदेश दिला.

‘गरवारे बालभवनसमोरील वाहतूक बंद ठेवावी ’
पुणे, २० जुलै/ प्रतिनिधी

गरवारे बालभवन ते ऊर्जापार्क पेशवे उद्यान या रस्त्यावर शनिवार व रविवारी सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी येणाऱ्यांमुळे मोठी गर्दी होते. अशा परिस्थितीत या रस्त्यावर या दिवशी अनेकांना अपघात होतात. त्यामुळे या दोन दिवशी या रस्त्यावरील वाहतूक बंद ठेवावी, अशी मागणी इंडियन यूथ फोरमच्या वतीने करण्यात आली आहे. फोरमचे अध्यक्ष अविनाश बागवे व सचिव प्रफुल कोठारी यांनी वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांना निवेदन दिले आहे. या संदर्भात आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. शनिवारी व रविवारी सुट्टीमुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, युवक-युवती, महिला मोठय़ा प्रमाणावर या भागामध्ये येत असतात. त्यामुळे या परिसराला जत्रेचे स्वरूप येते. अशा परिस्थितीत या रस्त्यावरील वाहतुकीला या नागरिकांना सामोरे जावे लागते. मोठय़ा प्रमाणावरील रहदारीमुळे लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी अपघात होत आहेत.

संदीप लोणकर उपसरपंचपदी कायम
हडपसर, २० जुलै / वार्ताहर

केशवनगर ग्रामपंचायतीचे उपसरपंच संदीप मारुती लोणकर यांच्या राजीनाम्याप्रकरणी जिल्हाधिकारी चंद्रकांत दळवी यांनी त्यांच्या बाजूने निर्णय दिला असून, ते आपल्या पदावर कायम राहतील, असा आदेश त्यांनी दिला आहे. केशवनगर येथील ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी यांच्यासह काही सदस्यांनी चुकीच्या पद्धतीने आपला राजीनामा घेऊन तो मंजूर केल्याची तक्रार उपसरपंच संदीप लोणकर यांनी जिल्हाधिकारी दळवी यांच्याकडे दोन महिन्यांपूर्वी केली होती. त्याबाबत चाललेल्या खटल्यात जिल्हाधिकारी यांनी उपसरपंच यांच्याबाजूने निर्णय दिला आहे. केशवनगर ग्रामपंचायतीचे उपसरपंच संदीप लोणकर हे आपल्या पदावर कायम राहतील, अशा आदेशाचे पत्र नुकतेच त्यांना मिळाले आहे.

बिबवेवाडी भागातील दूरध्वनी सेवा ठप्प
पुणे, २० जुलै/प्रतिनिधी

भूमिगत केबलमध्ये बिघाड झाल्याने बिबवेवाडी भागातील ‘बीएसएनएल’ची दूरध्वनी सेवा ठप्प झाली आहे. दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्यात आले असल्याचे ‘बीएसएनएल’कडून कळविण्यात आले आहे. बिबवेवाडी गाव, सयोग आदित्य रेसिडेन्सी, शारदा हॉस्पिटल, युनिटी हाईट्स, राजयोग अपार्टमेंट, माया मित्र मंडळ, हील रॉक सोसायटी, महेश हाऊसिंग सोसायटी, गणेश कॉर्नर आदी भागातील दूरध्वनी सेवा बंद झाली आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण करून लवकरच ही सेवा पूर्ववत केली जाईल, असे ‘बीएसएनएल’च्या वतीने सांगण्यात आले.

पुणे-निजामुद्दीन रेल्वे ३१ जुलैपर्यंत धावणार
पुणे, २० जुलै/ प्रतिनिधी

पुणे-निजामुद्दीन या विशेष रेल्वे गाडीची सेवा ३१ जुलैपर्यंत वाढविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे रेल्वेकडून कळविण्यात आले आहे. पुणे-निजामुद्दीन गाडी २४ ते ३१ जुलै या कालावधीत दर शुक्रवारी, तर निजामुद्दीन-पुणे ही गाडी २३ ते ३० जुलै या कालावधीत दर गुरुवारी धावणार आहे. पुण्यातून शुक्रवारी दुपारी दोन वाजून दहा मिनिटांनी सुटणारी ही गाडी शनिवारी दुपारी चार वाजून चाळीस मिनिटांनी निजामुद्दीनला पोहोचेल. निजामुद्दीन येथून गुरुवारी सकाळी आठ वाजून ५५ मिनिटांनी सुटणारी ही गाडी शुक्रवारी सकाळी ११ वाजून पाच मिनिटांनी पुण्यात पोहोचेल.

वाकड पोलीस वसाहतीत गॅस गळती
पिंपरी, २० जुलै / प्रतिनिधी

वाकड येथील कावेरीनगर पोलीस वसाहतीमध्ये आज सायंकाळी एका पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात गॅस सििलडरमधून गळती होऊन पेट घेतला. घरातील महिलेच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. रामदास भगवान पाटील यांच्या पोलीस वसाहतीतील २५ क्रमांकाच्या इमारतीमधील सहाव्या घरामध्ये महिला स्वयंपाक करीत असताना गॅस सििलडरमधून अचानक गळती होऊन सििलडरने पेट घेतला. त्यांनी धाडसाने घरातील पाण्याची बादली सिलिंडरवर ओतली. मात्र, आग विझली नाही. त्यांनी अग्निशमन दलाला बोलावले. पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग आटोक्यात आणली. कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

बाळासाहेब चिंचवडे यांचे निधन
पिंपरी २० जुलै / प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापलिका कर्मचारी महासंघाचे उपाध्यक्ष बाळासाहेब किसनराव चिंचवडे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. महापालिकेच्या क्रीडा विभागात लिपिक पदावर ते कार्यरत होते. गेली २० वर्षे ते पालिकेच्या सेवेत होते. कर्मचारी सेवक पतसंस्थेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले.

बहुचर्चित ‘स्वरसागर’ संगीत महोत्सव ऑगस्टमध्ये
िपपरी, १६ जुलै / प्रतिनिधी

िपपरी-चिंचवड महापालिकेचा बहुचर्चित स्वरसागर संगीत महोत्सव यंदा ११ ते १४ ऑगस्ट दरम्यान चिंचवड येथे आयोजित करण्यात येणार आहे. मागील वर्षी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले नव्हते. िपपरी पालिकेच्या वतीने चिंचवड येथे ११ ते १४ ऑगस्ट दरम्यान स्वरसागर संगीत महोत्सव होणार असून त्याची संपूर्ण जबाबदारी पालिकेचे सहशहर अभियंता व दरवर्षीचे मुख्य संयोजक प्रवीण तुपे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. मागील वर्षी ‘काही कारणास्तव’ या महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले नव्हते. त्यामुळे त्यामध्ये प्रथमच खंड पडला होता. तथापि, यंदाच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून उद्घाटनासाठी पालकमंत्री अजित पवार यांना आमंत्रित करण्यात आले आहे.

घोळवे यांचे घर व कार्यालयावर छापा
पिंपरी, २० जुलै / प्रतिनिधी

औरंगाबादच्या वाळुंज एमआयडीसीतील लीला सन्स कंपनीच्या संचालकास २५ लाखांची खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या आरोपी अनंत घोळवे यांच्या पिंपरीतील घर व कार्यालयावर पोलिसांनी आज दुपारी छापा टाकून संशयास्पद कागदपत्रे जप्त केली. औरंगाबाद गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रताप बावीस्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी औरंगाबाद पोलिसांचे आठ जणांचे पथक पिंपरीमध्ये दाखल झाले. पिंपरी पोलीस ठाण्याच्या मदतीने आरोपी अनंत मदन घोळवे (वय ३४) यांच्या पिंपरी मोरवाडी येथील हॉटेल घरोंदाच्या मागे असलेल्या कार्यालय व चिंचवड शाहूनगर येथील घरी छापा टाकला. या झडतीत संशयास्पद कागदपत्रे, कार्यालयातील संगणक असा ऐवज जप्त करण्यात आला आहे. घोळवे हे केंद्रीय कामगार, कर्मचारी आरोग्य सुरक्षा व कल्याण समितीचे उपाध्यक्ष आहेत. त्यांनी अधिकार नसताना लाल दिव्याच्या गाडीचा वापर केला असाही आरोप आहे.

तेरा कोटींची देणी अद्याप बाकी
चाकण, २० जुलै / वार्ताहर

कामगारांची सुमारे १३ कोटी रुपयांची देणी द्यावीत, असा आदेश औद्योगिक न्यायालयाने चाकण येथील पथेजा फोर्जिग कंपनीला देऊनही तब्बल चार वर्षे लोटली तरी कंपनीने न्यायालयीन आदेशाला अक्षरश: वाटाण्याच्या अक्षता लावून अद्याप कोणत्याही कामगाराला देणी दिलेली नाहीत. त्यामुळे या कंपनीच्या २१४ कामगारांनी पुन्हा एकदा संघटितपणे संघर्ष करण्याचा पवित्रा घेतला आहे. चाकण औद्योगिक वसाहतीतील एकेकाळची सर्वात मोठी मानली जाणारी पथेजा ब्रदर्स फोर्जिग अ‍ॅण्ड स्टॅम्पिंग ही कंपनी व्यवस्थापक व मालक गुरुविंदरसिंग पथेजा यांनी २००० साली रातोरात बेकायदेशीरपणे बंद करून शेकडो संसार उघडय़ावर आणले. कंपनी बंद करताना कामगार कायद्याला मूठमाती देणाऱ्या कंपनी व्यवस्थापनाने कामगारवर्गाला कुठलीही देणी दिलेली नाहीत. यामुळे कामगारांनी औद्योगिक न्यायालयाची दारे ठोठावली.

पशुधन अधिकाऱ्यांवर अतिरिक्त जबाबदारी
जुन्नर, २० जुलै / वार्ताहर

जुन्नर तालुक्यातील पशुधनावर उपचार करण्यासाठी दहा पशुधन अधिकाऱ्यांवर २० गावांची अतिरिक्त जबाबदारी दिली आहे. तालुक्यातील पशुधन पर्यवेक्षकांनी काम बंद आंदोलनावर उपाययोजना म्हणून ही जबाबदारी देण्यात आली आहे.

सुशीलाबाई काटे यांचे निधन
पिंपरी, २० जुलै / प्रतिनिधी

दापोडी येथील पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नगरसेवक राजेंद्र काटे यांच्या मातु:श्री श्रीमती सुशीलाबाई भिकनशेठ काटे (वय ७०) यांचे आज दुपारी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुलगे, चार मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. रात्री दापोडी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.