Leading International Marathi News Daily

मंगळवार, २१ जुलै २००९

राज्य

संगमेश्वर तालुक्यातील धरणे भरली
संगमेश्वर, २० जुलै/ वार्ताहर

गत १५ दिवसांत पडलेल्या समाधानकारक पावसाने तालुक्यातील छोटी धरणे भरून वाहू लागली आहेत. पावसाने आजवर २५१८ मिमीची सरासरी पूर्ण केली असून, हे प्रमाण हंगामातील निम्म्यापर्यंत पोहोचले आहे. यावर्षी लावणी हंगाम काहीसा उशिरा सुरू झाल्याने लावणीची ८० टक्के कामे पूर्णत्वास गेली आहेत. गेले १५ दिवस तालुक्यात दमदार परंतु सरीवर पडणाऱ्या पावसाने मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे. सरींवरील पावसामुळे यावर्षी आतापर्यंत तालुका पुराच्या फटक्यापासून बचावला आहे. जुलै महिन्यातील उर्वरित दिवस पुरापासून बचाव झाला तर यावर्षी पुरापासून होणाऱ्या नुकसानाची भीती संपुष्टात येईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

संकरित बियाणांचा वापर आता शेतकऱ्यांच्या मुळावर
चिपळूण, २० जुलै/ वार्ताहर

भातशेतीतून अधिकाधिक उत्पन्न मिळविण्याच्या हव्यासापोटी शेतकरी संकरित बियाणांच्या विळख्यात सापडत चालला आहे. ही बियाणे शेतकऱ्यांच्याच अंगलट येऊ लागली असून, तालुक्यातील सुमारे ४० गावांमध्ये रोपांवर करपा जाण्याबरोबर त्यांची वाढही खुंटली आहे. त्यामुळे हजारो शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असून, काहींनी ही रोपे चक्क फेकून दिली आहेत. मुंबई येथील विकास सहयोग प्रतिष्ठान आणि कोकणातील सहयोगी संस्था यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘शेती वाचवा-शेतकरी वाचवा’ या अभियानांतर्गत हा प्रकार उघडकीस आला.

कुपेकर घडामोडींचे अद्यापही तीव्र पडसाद
आंबोली पर्यटनस्थळावरील गर्दीकडे प्रशासनाचे दुर्लक्षच..

सावंतवाडी, २० जुलै/ वार्ताहर

आंबोली येथील पर्यटनस्थळावर प्रचंड गर्दी होत असूनही प्रशासन खबरदारी घेत नाही. विधानसभा अध्यक्षांच्या बाबतीत घडलेली घटना आणि त्यानंतर कुडाळच्या तरुणांनी केलेला आरोप, तसेच आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर कुपेकर यांचे पुतणे संग्रामसिंह यांनी, कुपेकर यांनी मारहाण केल्याचा एकतरी पुरावा दिल्यास प्रायश्चित घेण्याची दर्शविलेली तयारी पाहता आता राजकारण अधिक तापण्याची भीती व्यक्त होत आहे.

‘आजच्या काळात वर्तमानपत्रेच जनतेचे आधारवड’
अलिबाग, २० जुलै / प्रतिनिधी

आजच्या काळात न्यायव्यवस्था दिरंगाईची व खर्चिक झाली आहे. सरकार नावाची यंत्रणा बहुतेक क्षेत्रांतून अंग काढून घेत आहे. विधिमंडळात बहुतेकवेळा गोंधळ व सभात्याग होतो. अशावेळी वर्तमानपत्रेच जनतेचे आधारवड असतात, असे प्रतिपादन डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रपाठक प्रा.जयदेव डोळे यांनी केले. रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सुवर्ण महोत्सवी वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रा.डोळे बोलत होते.


कॅप्टन हेमंत कुलकर्णी यांच्या ‘बोटीवर घडले सारे..’ या पुस्तकाचे प्रकाशन प्रशांत दामले यांच्या हस्ते नुकतेच पुण्यात झाले. त्या वेळी डावीकडून अमृता कुलकर्णी, डॉ. वि. गो. वैद्य, प्रशांत दामले, कॅप्टन हेमंत कुलकर्णी व मंगेश तेंडुलकर.

‘‘बोटीवर घडले सारे..’ मध्ये चित्रपट कथेची क्षमता’
पुणे, २० जुलै/ प्रतिनिधी

कॅप्टन हेमंत कुलकर्णी यांनी लिहिलेल्या ‘बोटीवर घडले सारे..’ या पुस्तकातील प्रत्येक कथेमध्ये स्वतंत्र चित्रपट निर्माण होऊ शकेल, अशा पटकथेचे सामथ्र्य आहे, असे मत ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी व्यक्त केले. कॉन्टिनेन्टल प्रकाशनतर्फे कॅप्टन हेमंत कुलकर्णी यांच्या ‘बोटीवर घडले सारे..’ या कथासंग्रहाचे प्रकाशन नामवंत अभिनेते प्रशांत दामले यांच्या हस्ते झाले.

‘लोकसंस्कृतीच्या संशोधनातून जोडला महाराष्ट्राचा दक्षिण भारताशी सेतुबंध!’
पावलस मुगुटमल, पुणे, २० जुलै

‘‘महाराष्ट्राच्या संस्कृतीचे सेतुबंध दक्षिण भारताशी जोडलेले आहेत. राजकारण ते सेतुबंध तोडत असते. मात्र साठ वर्षांहून अधिक काळ लोकसंस्कृतीच्या संशोधनातून हे सेतुबंध जोडीत समाजबांधणीचे काम मला करता आले, याचे समाधान आहे,’’ अशा शब्दांत लोकसंस्कृतीचे ज्येष्ठ संशोधक-साहित्यिक डॉ. रा. चिं. ढेरे यांनी भावना व्यक्त केली. डॉ. ढेरे हे २१ जुलैला वयाच्या ऐंशीव्या वर्षांत पदार्पण करीत आहेत. त्यानिमित्ताने त्यांनी ‘लोकसत्ता’शी संवाद साधला.

‘‘जयजवान’चा भ्रष्टाचार जनता दरबारात मांडणार’
विधानसभेच्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर नळेगाव कारखान्यातील भ्रष्टाचाराचे प्रकरण लोकांसमोर जात असल्यामुळे माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांच्या गटाला लोकांच्या रोषास थेट सामोरे जावे लागणार आहे.

पालघरमधील खड्डय़ांच्या रस्त्याने महिलेचा बळी
पालघर, २० जुलै/ वार्ताहर
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यावरील खड्डय़ाने आज येथील ३४ वर्षीय महिलेचा बळी घेतला. या घटनेमुळे सार्वजनिक बांधकाम विभागासह नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे अक्षम्य दुर्लक्ष करणाऱ्या नगर परिषदेविरोधातही नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. सातपाटी रस्त्यावर फिलीया व धडा हॉस्पिटलदरम्यान सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. येथे गेल्या ७-८ दिवसापासून एकाच जागेत दोन-तीन भले मोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यावर पाणी साचून राहिल्याने खड्डय़ांचा कोणताही अंदाज येऊ शकत नाही. पालघर येथील सोनाली दीक्षित सकाळी आपल्या पाचवीतील कन्येला ट्टिंकल स्टार शाळेत सोडून अंबिकानगर येथील घराकडे परतत असताना, त्यांची दुचाकी या खड्डय़ात जोराने आदळली व दुचाकीवरून त्या खड्डय़ात आदळल्या. त्यांना जवळच्याच फिलीया हॉस्पिटलमध्ये व नंतर मुंबईला हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यानुसार मुंबईला हलविले जात असतानाच वाटेतच त्यांचा अंत झाला. सार्वजनिक बांधकाम विभागासह नगर परिषदेच्या अखत्यारितील रस्त्यांवरही अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत.

रसायनी परिसरात वृद्धेचा खून
खोपोली, २० जुलै/ वार्ताहर

रसायनी-मोहोपाडा येथील श्रीराम मंदिराजवळील बंगल्यात राहणाऱ्या सुनीता विनायक सोमण या ६२ वर्षांच्या वृद्ध महिलेचा अज्ञात इसमाने आज सकाळी खून केल्याचे आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली असून, नागरिक भयग्रस्त झाले आहेत. विनायक सोमण व त्यांच्या पत्नी सुनीता हे वृद्ध दाम्पत्य मंदिरालगतच्या या बंगल्यात गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्य करून आहेत. शनिवारी सोमण बाहेरगावी गेल्यामुळे सुनीता घरी एकटय़ाच होत्या. आज सकाळी दूधवाला आला तेव्हा ही घटना उघडकीस आली. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

दुचाकी अपघातात एक ठार
कल्याण, २० जुलै/वार्ताहर

मद्यधुंद अवस्थेत मोटारसायकल चालविणाऱ्या हवालदाराचा गाडीवरील ताबा सुटून झालेल्या अपघातात टिटवाळा येथे एक मोटार सायकलस्वार ठार झाला. टिटवाळा पोलीस ठाण्यात नेमणुकीत असलेले हवालदार अशोक शंकर गणगाव, खडवली ब्रीजवर डय़ुटीवर गेले होते. रात्री सव्वाआठ वाजता परत येत असताना टिटवाळा मंदिर रोडवर त्याचे मोटारसायकलवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे समोरून येणाऱ्या सुरेश देवचंद्र रजपूत यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. रुग्णालयात उपचार घेत असताना डोक्याला जबर मार लागलेल्या सुरेश रजपूत यांचे निधन झाले. याप्रकरणी हवालदार अशोक गणगाव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पतीस पाच वर्षे सक्तमजुरी
पुणे, २० जुलै / प्रतिनिधी

अनैतिक संबंधास विरोध करणाऱ्या पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त करून तिच्यासह दोन मुलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या पतीस पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. जोशी यांनी ठोठावली. दत्तात्रय रामभाऊ खळगे (वय ३०, रा. थेरगाव) असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे.त्याच्याविरोधात सोजरबाई विठ्ठल म्हस्के (वय ४५, रा. बीड) यांनी ही तक्रार दिली होती. स्वत:ला पेटवून घेऊन आत्महत्या करणाऱ्या आशा (वय २८) आणि त्यांचा पाच वर्षांचा मुलगा आणि दीड वर्षांची मुलगी या तिघांचा मृत्यू झाला. अतिरिक्त सरकारी वकील अ‍ॅड. शिवाजीराव जनार्दनराव पाटील यांनी या प्रकरणी युक्तिवाद करून दहा साक्षीदार तपासले. आरोपी दत्तात्रय याचे अन्य एका महिलेशी अनैतिक संबंध होते.

सातारा जिल्ह्य़ात धान्याच्या १७८ गोदामांवर छापे
सातारा, २० जुलै/प्रतिनिधी
सातारा जिल्हा प्रशासनाने साठेबाजीद्वारे कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या गोदामांवर धाडी टाकण्याची जोरदार मोहीम उघडली असून, जिल्ह्य़ात एकूण १७८ गोदामांवर धाडी टाकून १७ हजार क्विंटलच्यावर अन्नधान्य, साखर, तेलाचा अतिरिक्त साठा जप्त करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी अपूर्वा वानखेडे यांनी दिली. या धाडींमध्ये अतिरिक्त साठा करण्यात आलेल्या गोदामांना तसेच धान्याने भरून माल घेऊन जाणाऱ्या ट्रक्सना सील ठोकण्यात आले आहे. एकूण धाडींमध्ये सातारा शहरात १९, कोरेगावात २६, जावळीत १२, कराड ९, पाटण, २२, फलटण १७, वडूज १२, माण ३१, वाई १०, खंडाळा १, महाबळेश्वर १९ गोदामांचा समावेश आहे.