Leading International Marathi News Daily

मंगळवार, २१ जुलै २००९

क्रीडा

क्रिकेटच्या पंढरीत इंग्लंडला फ्लिन्टॉफ पावला
लंडन, २० जुलै/ पीटीआय

क्रिकेटच्या पंढरीत रंगलेल्या अ‍ॅशेस मालिकेतील दुसऱ्या सामन्याच्या शेवटच्या दिवशी अष्टपैलू अ‍ॅन्ड्रय़ू फ्लिन्टॉफ इंग्लंडला पावला आणि त्यांनी येथील अ‍ॅशेस मालिकेत ७५ वर्षांंत पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाला धूळ चारण्याच्या पराक्रम केला. फ्लिन्टॉफने चौथ्या डावात पाच विकेट काढून लॉर्ड्सवर सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली आणि त्याच्या जोरावरच इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर ११५ धावांनी विजय मिळवित मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. येथे कारकीर्दीतील अंतिम सामना खेळणाऱ्या फ्लिन्टॉफने आपल्या चमकदार कामगिरीद्वारे इंग्लंडला विजयाची भेट दिली. त्याच्या या कामगिरीबद्दल त्याला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कारही

दोन दिवसांनी क्रीडामंत्र्यांना जाग; दुखापतग्रस्त बलजितची भेट
नवी दिल्ली, २० जुलै / पीटीआय

सरावादरम्यान डोळ्याला गंभीर दुखापत झाल्याने उपचार घेत असलेला भारतीय हॉकीपटू बलजित सिंग याची क्रीडामंत्री एम.एस. गिल याची भेट घेऊन मदतीचे आश्वासन दिले. पुण्यात सरावादरम्यान चेंडू डोळ्यावर आदळल्याने शुक्रवारी बलजित गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान बलजितला झालेल्या दुखापतीमुळे त्याची कारकीर्दच धोक्यात आली आहे. त्याला दुखापत झाल्यानंतरही त्याला मदत करण्यासाठी शासनाने कोणतेही पाऊल न उचलल्याने क्रीडाविश्वात रोष व्यक्त होत होता.

मन्झुर-महम्मद युसूफला शतकाची हुलकावणी; पाकिस्तान ७ बाद २८९
कोलंबो, २० जुलै / वृत्तसंस्था

खुर्रम मन्झुर (९३) आणि महम्मद युसूफ (९०) यांच्या झुंजार फलंदाजीनंतरही येथील तिसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात पाकिस्तानची पहिल्या दिवसाअखेर ७ बाद २८९ अशी अवस्था झाली आहे. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेणाऱ्या श्रीलंकेने नाणेफेकीचा कौल अनुकूल लागताच पाकिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरविले. कर्णधार संगकाराचा निर्णय योग्य ठरविताना तुषाराने डावातील बाराव्या षटकांत पाकिस्तानला दोन धक्के देत त्यांची २ बाद ३६ अशी अवस्था केली.

बांगलादेश ४ बाद ७१; डॅरेन सॅमीचे दोन बळी
सेंट जॉर्ज (ग्रेनाडा), २० जुलै / एएफपी
येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील चौथा दिवस दोन्हीही संघांच्या गोलंदाजांनीच गाजवला. दिवसाच्या सुरूवातीला बांगलादेशच्या गोलंदाजांनी वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना झटपट तंबूचा रस्ता दाखवला आणि त्यामुळे विंडीजने बांगलादेश समोर विजयासाठी २१५ धावांचे लक्ष्य ठेवले. अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा बांगलादेशची २२ षटकांत ४ बाद ७१ अशी अवस्था होती. पावसामुळे सामना थोडा उशिरानेच सुरू झाला.

ऑल टाईम ऑस्ट्रेलियन संघात पॉन्टिंग बारावा
मेलबर्न, २० जुलै/ पीटीआय

लॉर्ड्स येथील पराभवानंतर रिकी पॉन्टिंगच्या मागे शुक्लकाष्ट लागली आहेत. पान्टिंगला ऑस्ट्रेलियाचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणवण्यात येत असले तरी ‘ऑल टाईम’ ऑस्ट्रेलियन संघात त्याला बारावे स्थान देण्यात आले आहे. पण त्याच्या कप्तानीखाली खेळलेल्या ग्लेन मॅग्रा, अॅडम गिलख्रिस्ट आणि शेन वॉर्न यांना मात्र संघात स्थान देण्यात आलेले आहे. ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन, वेगवान गोलंदाज डेनिस लिली आणि शेन वॉर्न यांना दहा पैकी दहा मते मिळाली.

मेरी कोमला राजीव गांधी खेलरत्न
नवी दिल्ली, २० जुलै / पीटीआय

चारवेळा विश्व अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेचा मानाचा किताब पटकाविणारी एम. सी. मेरीकोम हिची राजीव गांधी खेलरत्न या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. या पुरस्कारासाठी खेळाडूची निवड करणाऱ्या समितीने एकमताने मेरी कोमची निवड केली. या समितीतील उच्चपदस्थ अधिकाऱ्याने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर सांगितले की, समितीने मेरी कोमची एकमताने निवड केली. तिच्या नावाची शिफारस क्रीडा मंत्रालयाकडे पाठविण्यात येईल आणि त्यावर लवकरच शिक्कामोर्तब होईल.

वादग्रस्त झेलांबाबत तिसऱ्या पंचांकडे दाद मागण्याचा अधिकार मैदानावरील पंचांचा - आयसीसी
लंडन, २० जुलै / पीटीआय

सध्या सुरू असलेल्या अ‍ॅशेस मालिकेतील झेलचीतच्या काही वादग्रस्त निर्णयासंदर्भात आयसीसीने स्पष्टीकरण केले आहे की, कोणत्या झेलांबाबत तिसऱ्या पंचांकडे दाद मागायची याची सर्वस्वी अधिकारी मैदानावरील पंचांचा असेल.

जागतिक युवा तिरंदाजी : भारताला सुवर्ण दीपिकाची ऐतिहासिक कामगिरी
कोलकाता, २० जुलै / पीटीआय

अकराव्या जागतिक युवा धनुर्विद्या स्पर्धेत आज सुवर्णपदक पटकावणारी दीपिका कुमारी दुसरीच भारतीय ठरली आहे. अमेरिकेत सुरू असलेल्या या स्पर्धेत झारखंडच्या चवथ्या मानांकित दीपिकाने काल ११५ गुण कमावत रशियाच्या सायना तेसिरेम्पीलोवा हिला मागे टाकले होते. उपांत्यपूर्व, उपांत्य फेरीतही दीपिकाने नेत्रदीपक कामगिरी केली होती. या दोन्ही फेऱ्यांमध्ये तिने १२० पैकी अनुक्रमे ११५ व ११२ गुणांची कमाई केली होती. मुलांच्या गटात संजय बोरो याने ब्राँन्झ पदक निश्चित केले आहे. दीपिकाच्या विजयाने २००६ मध्ये पाल्टोन हॅन्डस याने भारतासाठी केलेल्या कामगिरीची पुनरावृत्ती झाली आहे. त्याने मेक्सिकोत झालेल्या नवव्या जागतिक युवा धनुर्विद्या स्पर्धेत सुवर्ण पटकावले होते.

दक्षिण आशियाई टेबल टेनिस; दोन्ही गटात भारताची विजयी सलामी
जयपूर, २० जुलै/ पीटीआय

भारताने दक्षिण आशियाई टेबल टेनिस स्पर्धेतील पुरुष व महिला या दोन्ही गटात विजयी सलामी केली आणि उद्घाटनाचा दिवस गाजविला. भारताने १५ वर्षांखालील मुलांच्या गटात मालदीव संघावर ३-० असा दणदणीत विजय नोंदविला. त्यावेळी भारताकडून संदीपन डे व राजीव सरकार हे चमकले. त्यापाठोपाठ भारताने नेपाळला ३-१ असे हरविले. मुलींच्या गटात भारताने मालदीव व नेपाळ या दोन्ही संघांविरुद्ध ३-० असा सफाईदार विजय नोंदविला. त्यामध्ये मल्लिका भांडारकर या महाराष्ट्राच्या खेळाडूने कौतुकास्पद कामगिरी केली. भारताने १८ वर्षांखालील मुलींच्या गटात पाकिस्तान व मालदीव यांना ३-० अशाच फरकाने हरविले.मुलांमध्येही भारताने एकही लढत न गमावता नेपाळ व मालदीव यांना हरविले.

तिसऱ्या कसोटीतील पीटरसनच्या संघप्रवेशाबद्दल प्रश्नचिन्ह
लंडन, २० जुलै/ पीटीआय

इंग्लंडचा माजी कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज केव्हिन पीटरसन याची टाच दुखत असून त्यामुळे तिसऱ्या कसोटीतील त्याच्या संघप्रवेशाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या दुखऱ्या टाचेवर त्याला इंजेक्शन घ्यायचे असून त्यानंतर जर तो फिट ठरला तर त्याला संघात जागा देण्यात येईल. दुसरा सामना खेळण्यापूर्वीसुद्धा पीटरसनला चार इंजेक्शन घ्यावी लागली होती. या दुखापतीचा परिणाम त्याच्या फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणावर होत होता असे दस्तुरखुद्द पीटरसनने मान्य केले आहे. दुखापतीचा परिणाम नक्कीच खेळाडूवर होत असतो. सामन्याच्या प्रत्येक दिवशी मला दुखापतीची भिती होती. या दुखापतीचा विपरीत परिणाम फटके खेळताना होत नव्हता. पण धाव घेताना मात्र नक्कीच मला दुखापतीचा त्रास होत होता, असे पीटरसनने सांगितले आहे.

फ्लिन्टॉफ ऑन टॉप
लंडन, २० जुलै/ पीटीआय
पाचव्या आणि अखेरच्या दिवशी ब्रॅड हॅडिनला स्लिपमध्ये कॉलिंगवूडकरवी झेलचीत केल्यानंतर स्ट्रॉस आपल्याला गोलंदाजी करण्यापासून थांबविणे शक्यच नव्हते, अशी प्रतिक्रिया अ‍ॅशेस मालिकेत इंग्लंडला १-० अशी आघाडी मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या अ‍ॅन्ड्रय़ू फ्लिन्टॉफने व्यक्त केली. फ्लिन्टॉफने ९२ धावांत पाच बळी घेतले व अखेरच्या दिवशी आपल्या १० षटकांत तीन बळी मिळविले. इंग्लंडला ७५ वर्षांनी लॉर्ड्सवर हा ऐतिहासिक विजय मिळविता आला. फ्लिन्टॉफ म्हणाला की, हा सांघिक कामगिरीचा विजय होता. या सामन्यात खास अशी कामगिरी झालेली दिसून आली. पाच बळी घेणे म्हणजे विशेषच होते.

वीरधवल आणि संदीप शेजवळ यांचा विश्वक्रमवारीत प्रवेश
नवी दिल्ली, २० जुलै/ पीटीआय
भरताच्या वीरधवल खाडे आणि संदीप शेजवळ या दोन युवा गुणवान खेळाडूंनी २००९ च्या विश्व जलतरण क्रमवारीत पहिल्या दिडशे जणांमध्ये प्रवेश केला आहे. जर्मनी येथे झालेल्या स्पर्धेत या दोघांनी केलेल्या नेत्रदीपक कामगिरीच्या जोरावर त्यांना विश्व जलतरण क्रमवारीत स्थान देण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे. वीरधवलने या स्पर्धेतील ५० मी. प्रकारात सुवर्णपदक पटकाविले होते आणि त्यामुळेच त्याने १०७ वे स्थान पटकावले आहे. तर या स्पर्धेत ५० मी. ब्रेक स्ट्रोक प्रकारात रौप्य पदक पटकाविणाऱ्या संदीप शेजवळला १४२ वा क्रमांक देण्यात आला आहे. रोम येथे पढील आठवडय़ात होणाऱ्या फिना विश्व जलतरण अजिंक्यपद स्पर्धेत हे दोघेही सहभागी होणार आहेत.

स्केटिंग चॅम्पियनशिपसाठी रीना परब बेल्जियमला रवाना
मुंबई, २० जुलै/ क्री. प्र.
बेल्जियम येथे २४ ते २६ जुलै दरम्यान स्केटिंग ग्रां. पि. स्पर्धा खेळविण्यात येणार असून या स्पर्धेसाठी डी. जी. रूपारेल महाविद्यालयाच्या रीना परब हीची निवड झाली आहे. उद्या रीना स्केटींग चॅम्पियनशिपसाठी बेल्जियमला रवाना होणार आहे. ठाण्यातील रोलर अ‍ॅण्ड स्केटींग अकादमीमध्ये रीना प्रशिक्षण घेत असून यावेळी तिला राहुल पंदीरकर आणि अवधुत तावडे यांचे मार्गदर्शन मिळाले आहे. यावेळी स्केटींग चॅम्पियनशिपसाठी बेल्जियमला रीनाबरोबर पुण्याहून समीर गोळे आणि अवधुत देवधर तर डोंबिवलीहून लवेश वैद्य रवाना होणार आहेत.