Leading International Marathi News Daily

मंगळवार, २१ जुलै २००९

व्यक्तिवेध

शाळेत असताना त्या छोटय़ा मुलीचा आवाज ऐकून हेडमास्तरीण बाईंनी तिला एका नाटिकेत भूमिका दिली. तिचे ते काम पाहून त्या वेळी उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने तिला सुवर्णपदक जाहीर केले. दुसऱ्या दिवशी ती व्यक्ती ते पदक घेऊन शाळेत हजर झाली, तेव्हा विस्फारलेल्या नजरेने हेडमास्तरीण बाईंनी त्यांचे स्वागत केले आणि या घटनेची बातमी दक्षिण भारतातील ‘द हिंदू’ या प्रतिष्ठित दैनिकाच्या पहिल्या पानावर झळकली. खरे तर या घटनेने आज कुणाही पालकांचे ऊर अभिमानाने भरून येईल. पण अलमेलू ऊर्फ पट्टा हिचे वडील अक्षरश: धास्तावले. आता आपल्या मुलीशी लग्न कोण करेल, ही त्यांची भीती होती. त्यामुळे या बातमीनंतर जेव्हा त्या वेळच्या म्हणजे

 

१९३०च्या सुमारास कोलंबिया ग्रामोफोन कंपनीने पट्टाला ध्वनिमुद्रिकेसाठी पाचारण केले, तेव्हा सामाजिक परिस्थितीमुळे घाबरलेल्या तिच्या वडिलांना त्यांचे मित्र आणि त्या काळातील काँग्रेसचे एक मोठे नेते डॉ. पी. एस. श्रीनिवासन यांनी धीर दिला आणि गायन हेच त्या मुलीच्या आयुष्याचे सार आहे, हे पटवून दिले. एवढेच करून ते थांबले नाहीत, तर आपल्या पुतण्याशी योग्य वयात विवाह करून देण्याचे वचनही दिले. (आणि ते वचन पाळलेही!) पट्टामल यांनी वयाच्या दहाव्या वर्षी म्हणजे १९२९मध्ये त्या वेळच्या नभोवाणीवर पहिल्यांदा गायन केले. त्यानंतर तीनच वर्षांनी त्यांचा पहिला जाहीर कार्यक्रम झाला आणि त्यानंतर त्या कर्नाटक संगीतातील एक अतिशय महत्त्वाच्या कलावंत म्हणून लौकिकास पात्र ठरल्या. एकूणच भारतीय संगीतात, म्हणजे उत्तर हिंदुस्तानी आणि कर्नाटक संगीतात त्या काळात पुरुष कलावंतांचे वर्चस्व होते. जन्मत: सुरेल आवाजाची देणगी लाभलेल्या स्त्रियांना गायनाच्या क्षेत्रात फारसा वाव नव्हता. जगात जेव्हा स्त्रीमुक्ती हा विषय ऐरणीवर आणण्याची कुणाची हिंमतही नव्हती, तेव्हा भारतात मात्र निदान कलेच्या क्षेत्रात एक प्रचंड मोठी सामाजिक क्रांती घडवून आणण्याचा चंग बांधला जात होता. गानहिरा हिराबाई बडोदेकर यांनी १९२८ मध्ये म्हणजे डी. के. पट्टामल यांच्या आधी चार वर्षे हिंदुस्तानी संगीताच्या मैफलीत मध्यभागी बसून गायनकला सादर करण्याचे धाडसी पाऊल टाकले होते. त्यांच्या मागे संगीताच्या प्रसारकार्यातील महर्षी विष्णू दिगंबर पलुस्कर आणि त्यांच्या मातोश्री ताराबाई माने यांचे पाठबळ होते. शालीन घराण्यातील स्त्रियांनी मैफलीत भाग घेण्यास मज्जाव असण्याच्या काळात हिराबाईंनी महाराष्ट्रात आणि डी. के पट्टामल यांनी दक्षिणेत एकाच काळात एक मोठी सांस्कृतिक क्रांती केली. पट्टामल यांचे वयाच्या नव्वदाव्या वर्षी निधन होणे ही कालसुसंगत घटना असली, तरी त्यामुळे संगीताच्या माध्यमातून झालेल्या एका मोठय़ा सामाजिक क्रांतीच्या इतिहासातील एक महत्त्वाचे पान गळून पडले आहे. कर्नाटक संगीतात मैफलीत रागम्, थानम्, पल्लवी ही संगीतरचना सादर करणे हे एक कलात्मक आव्हान असते. हे आव्हान स्वीकारणाऱ्या डी. के. पट्टामल या पहिल्याच स्त्रीकलावंत ठरल्या. मुथ्थुस्वामी दीक्षितार (१७७५-१८३५) हे कर्नाटक संगीतातील एक अतिशय महत्त्वाचे कलावंत होते. त्यांनी केलेल्या संगीतरचना आजही तेवढय़ाच लोकप्रिय आहेत. पट्टामल यांनी दीक्षितार यांच्या आणि इतर अनेकांच्या संगीतरचना आयुष्यभर सादर केल्या. भारतरत्न एम. एस. सुब्बलक्ष्मी, डी. के. पट्टामल आणि एम. एल. वसंतकुमारी या तीन कलावती या कर्नाटक संगीतातील सर्वात लोकप्रिय त्रयी ठरल्या होत्या. पद्मभूषण आणि पद्मविभूषण, गानसरस्वती, संगीत कलानिधी यांसारख्या किताबांबरोबरच संगीत नाटक अकादमीच्या निर्वाचित सदस्या म्हणूनही पट्टामल यांना मान मिळाला. स्वत: चित्रपटांसाठी पाश्र्वगायन केल्यानंतरही पतिराजांना चित्रपट आवडत नाही, म्हणून तो आयुष्यभर न पाहणाऱ्या या कलावतीने आपला संसार आणि आपले सारे आयुष्य केवळ संगीतालाच वाहिले. त्यांच्या निधनाने एक शालीन आणि अभिजात कलावती काळाच्या पडद्याआड गेली आहे.