Leading International Marathi News Daily

मंगळवार, २१ जुलै २००९

विविध

दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी भारताला सर्वतोपरी साह्य : क्लिंटन
नवी दिल्ली, २० जुलै/खास प्रतिनिधी

दहशतवादाचा मुकाबला करणे हे सर्वात मोठे आव्हान असून दहशतवादामुळे भारतासह सर्व देशांना अमेरिका सर्वतोपरी साह्य करेल, अशी ग्वाही आज अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांनी आज येथे दिली. भारत-अमेरिका द्विपक्षीय व्यापारात अमेरिका आपले हित जोपासण्यासाठी बचावात्मक पवित्रा घेत असून त्यामुळे भारतीय उद्योगसमुहांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असल्याची भावना पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी क्लिंटन यांच्यासोबत झालेल्या चर्चेत व्यक्त केल्याचे समजते.

पाकिस्तानच्या सत्ताकारणावर गिलानी यांचे वाढते वर्चस्व
इस्लामाबाद, २० जुलै/वृत्तसंस्था

भारताबरोबरच्या चर्चेत जड झालेले पारडे आणि काश्मीरप्रश्नाबाबत अमेरिकेने भारताला बोलणी सुरू करण्याचा दिलेला सल्ला यामुळे पाकिस्तानच्या राजकारणात पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांचा दबदबा वाढत असून अध्यक्ष असिफ अली झरदारी यांच्या मर्जीतल्या अधिकारी व मंत्र्यांबाबत स्वतंत्रपणे निर्णय घेत त्यांनी सत्ताकारणावरील आपली पकड दाखवून दिली आहे, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

शरीरातील रोगप्रतिकारक यंत्रणेचे गूढ उलगडले
वॉशिंग्टन, २० जुलै/वृत्तसंस्था

शरीरातील रोगप्रतिकारक यंत्रणेचे गूढ उलडवण्यात शास्त्रज्ञांना यश आले असून त्यामुळे औषधांना सकारात्मक प्रतिसाद देण्याची शरीराची ताकद कायम राखता येणार आहे. जेव्हा शरीरात विषाणू वा अन्य संसर्ग होतो तेव्हा शरीरातील ‘बी सेल्स’ या पेशी रोगप्रतिकारक प्रक्रिया सुरू करतात. काहीवेळा पेशी वेगाने तर काहीवेळा संथपणे ही प्रक्रिया करतात. मात्र ही प्रक्रिया वेगाने करायची की संथपणे, याची निवड या पेशी कशा करतात, हे गूढ उकलले नव्हते.

‘कसाबची कबुली हा पुरावा नव्हे!’ पाकिस्तानची कोल्हेकुई!!
नवी दिल्ली, २० जुलै/ वृत्तसंस्था

अजमल कसाबने ‘२६/११’ च्या हल्ल्यात आपला स्वत:चा प्रत्यक्ष सहभाग होता, त्याचप्रमाणे अबुहमजा, अबू जिंदाल, अबू काफा व झकीउरम् रेहमान लखवी यांचाही सहभाग होता याची कबुली दिली असली तरी कसाबची कबुली हा काही पुरावा ठरत नाही, अशी मल्लीनाथी पाकिस्तानचे संरक्षणमंत्री चौधरी अहमद मुख्तार यांनी केली आहे.

आणखी दोघे हल्लेखोर पाकिस्तानी असल्याची कबुली
नवी दिल्ली, २० जुलै / पी. टी. आय.

मुंबईतील ‘२६/११’च्या कटातील आणखी दोघे हल्लेखोर पाकिस्तानचे नागरिक असल्याची कबुली पाकिस्तानने दिली आहे. इम्रान बब्बर आणि अब्दुर रहमान छोटा अशी त्यांची नावे आहेत.

अपुऱ्या मान्सूनमुळे परिस्थिती गंभीर; राज्यांना मदतीची केंद्राची तयारी : पवार
नवी दिल्ली, २० जुलै/खास प्रतिनिधी

बिहार, पूर्व आणि पश्चिम उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरयाणा तसेच तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या काही भागांमध्ये अपुऱ्या मान्सूनमुळे उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्रातील युपीए सरकारला राज्यांना मदत करण्यासाठी अनेक निर्णय घ्यावे लागतील, असे केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी आज लोकसभेत सांगितले. शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून बियाणांची मदत करण्याचे निर्देश उद्या राज्यांना देण्यात येतील, असेही पवार यांनी जाहीर केले.

सूर्यनारायणाचा रथ कापतसे पाणी..
भुवनेश्वर, २० जुलै/वृत्तसंस्था

सूर्यनारायणाच्या रथासारखे भासणारे कोणार्क येथील जगविख्यात सूर्यमंदिर सध्या जलमय झाले आहे. जोरदार पावसामुळे या मंदिराच्या सभोवताली कालपासून दोन ते तीन फूट पाणी साचले असून त्यामुळे अनेक पर्यटकांना मंदिरापर्यंत पोहोचणेही कठीण झाले आहे. मंदिर परिसरातही पाणीच पाणी झाल्याने पर्यटकांना पूर्ण फेरफटका न मारताच परतावे लागत आहे. या पाण्याने या वास्तुशिल्पासही धोका पोहोचण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कोणार्क मंदिरालगत राहणाऱ्या लोकांनी मात्र गेली काही वर्षे सातत्याने हा भाग जलमय होत असल्याचे सांगितले. मंदिर व परिसरात साचणाऱ्या पाण्याचा निचरा करणारी योग्य यंत्रणाच नसल्याचेही त्यांनी सांगितले. या भागातील समाजसेवक रविंद्र कुमार बाहिनीपती यांनी सांगितले की, साचणाऱ्या पाण्याचा विपरीत परिणाम १३ व्या शतकातील या वास्तुवर होऊ शकतो. पुरातत्त्व खात्याचे अधिकारी प्रतिक्रियेसाठी उपलब्ध झाले नाहीत.

जिवाला धोका असल्याचा रिटा बहुगुणा यांचा दावा
लखनौ, २० जुलै / पी. टी. आय.

उत्तर प्रदेश गगच्या अध्यक्षा रिटा बहुगुणा यांनी आपल्या जिवाला आता अधिक धोका निर्माण झाला असल्याचे आज एका पत्रकार परिषदेत सांगितले.
गेल्या आठवडय़ात रिटा बहुगुणा यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर बसपच्या संतप्त समर्थकांनी त्यांचे घर आणि मोटारगाडी जाळून टाकली होती. आज पत्रकार परिषदेत बोलताना त्या म्हणाल्या, माझ्या जिवाला गंभीर धोका आहे. त्या (मायावती) माझ्यावर हल्ला करण्याचा आणखी एखादा कट रचतील, आता माझ्या जिवाला धोका आहे, पण मी भीत नाही. आपण खूप जगलो मात्र आता गोरगरिबांसाठी, निराधारांसाठी आणि महिलांच्या हक्कांसाठी आणि सत्यासाठी लढा द्यायचा आहे. आपल्या घराच्या जाळपोळीचा तपास सीबीआयतर्फे करावी, अशी मागणीही त्यांनी केली. राज्य सरकारने गुन्हा अन्वेषण खात्याच्या गुप्तचरांकरवी या प्रकरणी चौकशी करण्याची घोषणा केली होती. गगचे सरचिटणीस दिग्जिजय सिंह यांनी रिटा बहुगुणा यांच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. दरम्यान, मायावतींवर केलेल्या टीकेवरून आपल्यावर दाखल झालेला गुन्हा रद्द करावा, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

अमेरिकेतील रंगमंचावर ‘जिसने लाहोर नहीं देखा’
वॉशिंग्टन, २० जुलै/पी.टी.आय.

१९४७ सालच्या भारताच्या फाळणीवर आधारित ‘जिसने लाहोर नहीं देखा’ या नाटकाचा प्रयोग पुढील महिन्यात अमेरिकेतील विख्यात केनेडी सेंटरमध्ये होणार आहे. असगर वजाहत यांचे हे नाटक अलिकडेच निधन पावलेले लेखक-नाटककार हबीब तन्वीर यांनी सर्वप्रथम १९९२ साली प्रकाशात आणले. १९४७ साली फाळणीनंतर भारत-पाकिस्तान या दोन राष्ट्रांची निर्मिती झाली. त्यावेळी या दोन्ही देशांत मानवी इतिहासातील सर्वाधिक मोठे मानवी स्थलांतर झाले. ज्यांना भारतात राहावयाचे नव्हते ते पाकिस्तानात गेले आणि ज्यांना पाकिस्तानात राहावयाचे नव्हते ते भारतात परतले. या नाटकाचे चित्रपटातही रुपांतर होणार आहे. राजकुमार संतोषी हे चित्रपटाची निर्मिती करीत असल्याचे नाटय़निर्मात्या पुष्पा दशोत्तर यांनी सांगितले. येत्या १४ आणि १५ ऑगस्ट रोजी भारत-पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी या नाटकाचा केनिडी सेंटरमध्ये प्रयोग होत असून उभय देशांतील कलावंत या नाटकात सहभागी होत असल्याचे त्यांनी सांगितले.

बुलेटप्रुफ जॅकेट खरेदीच्या चौकशीची मागणी
नवी दिल्ली, २० जुलै/पी.टी.आय.

संरक्षण दलांच्या अधिकाऱ्यांसाठी जी बुलेटप्रूफ जॅकेट्स खरेदी करण्यात आली त्या व्यवहाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपने आज लोकसभेत केली. पक्षाचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी सांगितले की, बुलेटप्रूफ जॅकेट्स सदोष होती हे केवळ मंत्र्यांनी मान्य करून प्रश्न सुटणार नाही. ही जॅकेट्स खरेदी करण्याचा जो व्यवहार झाला त्याची चौकशी करून जबाबदारी निश्चित करणे गरजेचे आहे. लोकसभेत संरक्षण राज्यमंत्री एम.एम.पल्लम राजू यांनी हे मान्य केले की, बुलेटप्रूफ जॅकेट्समध्ये दोष होते पण ते कमी दर्जाचे नव्हते. सरकारवर या प्रकरणी टीकेची झोड उठवताना भाजपने असा आरोप केला की, जी बुलेटप्रूफ जॅकेट्स खरेदी करण्यात आली ती सगळीच कमी दर्जाची होती, त्यामुळे मुंबई हल्ल्यात पोलीस अधिकाऱ्यांना प्राणास मुकावे लागले. एकतर ही जॅकेट्स खरेदी करण्यात मोठा भ्रष्टाचार झाला आहे किंवा ती कमी दर्जाची तरी आहेत. जिवाचे रक्षण करण्यासाठी पोलिसांना ही जॅकेट्स दिली गेली होती पण त्यांनी त्यांचे जिवाचे रक्षण केले नाही उलट त्यांना मृत्यूस सामोरे जावे लागले, त्यामुळे या जॅकेट्सच्या खरेदी व्यवहाराची चौकशी करावी. दोषी व्यक्तींना वेळीच शिक्षा झाली नाही तर अशा प्रकारच्या घटना थांबणार नाहीत. त्यामुळे सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.

संजीव नंदाच्या शिक्षेत कपात
नवी दिल्ली, २० जुलै/पी.टी.आय.

आपल्या बीएमडब्ल्यू मोटरकारच्या धडकेने तीन पोलिसांसह सहा जणांना धडक देऊन फरारी झाल्या प्रकरणी संजीव नंदा यास दिल्ली उच्च न्यायालयाने दोन वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावली आहे. १९९९ साली माजी नौदलप्रमुख एस. एम. नंदा यांचा नातू संजीव नंदाने अपघात केला आणि पुन्हा आपली मोटार भरधाव नेली. त्याच्याबरोबर असलेल्या तिघांनी पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न केले. या सर्वाना न्यायालयाने सुनावलेली पाच वर्षांची शिक्षा रद्द करण्यासाठी संजीव नंदाने उच्च न्यायालयात अपील केले होते. मात्र उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कैलास गंभीर यांनी शिक्षा रद्द न करता नंदा याला पाच ऐवजी दोन वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावली. राजीव गुप्ता, भोलानाथ व श्यामसिंग या तिघांनाही पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अनुक्रमे सहा व तीन महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.

स्पर्धा परीक्षा महिलांना मोफत
नवी दिल्ली, २० जुलै/पी.टी.आय.

सरकारी नोक ऱ्यांमध्ये वाव मिळावा यासाठी सरकारने महिलांना स्पर्धा परीक्षांची फी माफ केली आहे. आता एमपीएससी, यूपीएससी या स्पर्धात्मक परीक्षांसाठी महिलांना शुल्क द्यावे लागणार नाही. सरकारने याबाबत सर्व मंत्रालये, केंद्र सरकारची खाती, यूपीएससी यांना हा निर्णय कळवला आहे. कर्मचारी निवड मंडळात एक महिला असणेही अनिवार्य करण्यात आले आहे. ३१ ऑगस्टपर्यंत कर्मचारी निवडीत किती महिलांना स्थान दिले याचे अहवालही मागवण्यात आले आहेत.

इराणच्या निवडणूक निकालांबाबत आक्षेप
तेहरान २० जुलै/पी.टी.आय.

इराणचे माजी अध्यक्ष मोहंमद खतामी यांनी देशातील सध्याच्या सरकारच्या वैधतेबाबत राष्ट्रीय सार्वमत घेण्यात यावे असे सांगून गेल्या महिन्यातील अध्यक्षीय निवडणुकीत जे प्रकार घडले त्यामुळे जनतेचा राजकीय नेत्यांवरचा विश्वास उडाला असल्याचे म्हटले आहे. त्यांचे हे आवाहन आज सुधारणावादी संकेतस्थळांवर प्रसारित करण्यात आले आहे. इराणचे अध्यक्ष महमूद अहमदिनेजाद यांनी अध्यक्षपदाची निवडणूक गैरप्रकार करून जिंकली असा तेथील विरोधी पक्षांचा आरोप असून त्यावरून तेथे प्रचंड मोठे आंदोलनही झाले. नेत्यांवरचा विश्वास उडाल्याने देशाच्या प्रगतीवर त्याचा परिणाम होणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

रिलायन्सप्रकरणी १ सप्टेंबरला सुनावणी
नवी दिल्ली, १९ जुलै/वृत्तसंस्था

मुकेश अंबानी यांच्या ‘रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड’ (आरआयएल) आणि अनिल अंबानी यांची ‘रिलायन्स नॅचरल रिसोर्सेस लिमिटेड’ (आरएनआरएल) या कंपन्या तसेच सरकारमध्ये नैसर्गिक वायूपुरवठय़ावरून सुरू असलेल्या वादंगांप्रकरणीची सुनावणी एक सप्टेंबरला घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाने आज जाहीर केले. ‘आरएनआरएल’ने अधिकृत दरापेक्षा ४४ टक्के कमी दराने नैसर्गिक वायूचा आपणास तात्काळ पुरवठा व्हावा, यासाठी याचिका केली आहे. सरकारच्या संमतीशिवाय आपण हा इंधन पुरवठा करू शकत नाही, असे ‘आरआयएल’ने म्हटले आहे. तर ‘आरआयएल’कडून ‘आरएनआरएल’ला गॅसपुरवठा करण्याबाबतचा अंबानी बंधूंमधील समझोता अवैध ठरवावा, अशी सरकारची मागणी आहे. नैसर्गिक वायूवर केवळ सरकारची मालकी आहे आणि अंबानी बंधू त्याला व्यक्तिगत वा कौटुंबिक मालमत्ता असल्याप्रमाणे वापरू शकत नाहीत, अशी सरकारची भूमिका आहे.

काश्मीर पोलिसांची नार्को चाचणी रोखली
नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरमधील शोपियाँ येथे दोन महिलांच्या बलात्कार व हत्येप्रकरणी अटक झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या नार्को चाचणीला सर्वोच्च न्यायालयाने आज स्थगिती दिली. पोलीस अधीक्षक जावेद इक्बाल मट्टू आणि उपअधीक्षक रोहित बसगोत्र या दोघांच्या चाचणीचे आदेश काश्मीर उच्च न्यायालयाने दिले होते. मात्र आपली बाजू मांडण्याचा हक्क डावलला गेल्याचे नमूद करीत या दोघांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

पुलित्झरविजेते लेखक फ्रँक मॅक् कोर्ट यांचे निधन
न्यूयॉर्क : अत्यंत प्रतिष्ठेच्या पुलित्झर पुरस्काराने गौरविल्या गेलेल्या ‘अँजेलाज् अ‍ॅशेस’ या कादंबरीचे लेखक फ्रँक मॅक् कोर्ट यांचे कर्करोगाने आज येथे निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. विशेष म्हणजे शिक्षकी पेशातून निवृत्त झाल्यानंतर आपल्या आयरिश बालपणीचे दिवस चितारणारी ही कादंबरी त्यांनी लिहिली आणि ती ख्यातकिर्त झाली.

लष्करप्रमुख दीपक कपूर अमेरिका दौऱ्यावर
वॉशिंग्टन : भारतीय लष्कराचे प्रमुख जन. दीपक कपूर हे आठवडाभराच्या दौऱ्यासाठी अमेरिकेत आले आहेत. ते अमेरिकेच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असून त्यात प्रामुख्याने पाकिस्तान व अफगाणिस्तानातील दहशतवादावर भर राहील, असा तर्क आहे.

अफगाणिस्तानातील विमान अपघातात १६ ठार
कंदहार : अफगाणिस्तानच्या ‘नाटो’ विमानतळावर रशियाचे ‘एमआय-एट’ हे मालवाहू नागरी विमान उड्डाणानंतर लगेचच तांत्रिक बिघाडापायी कोसळून चार नेपाळी कर्मचाऱ्यांसह १६ जणांचा मृत्यू झाला. ‘सुप्रीम फ्युएल’ या कंपनीतर्फे लष्करासाठी इंधन पुरवठा करण्याचे काम या विमानाद्वारे सुरू होते. कंदहार येथील नाटोच्या तळावर इंधन उतरवून मग विमानाने उड्डाण करताच हा अपघात झाला.