Leading International Marathi News Daily

बुधवार, २२ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

‘गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या’ एक सामाजिक उपहासनाटय़
एखाद्या हॉस्पिटलमधून नवजात बाळ चोरीला गेल्याची बातमी अधूनमधून वर्तमानपत्रांतून येत असते. अशावेळी या कृत्यामागे एखादी संघटित टोळी कार्यरत असण्याचीच शक्यता व्यक्त केली

 

जाते. ती बऱ्याचदा खरीही ठरते. अशी मूलचोरीची प्रकरणे चिकाटीनं धसास लावल्यावर त्यात संबंधित हॉस्पिटलमधील डॉक्टरांपासून ते अगदी वॉर्डबॉय-नर्सेसपर्यंत सगळ्यांचेच हात गुंतलेले असल्याचं उघडकीस येतं. कधी कधी अपत्यासाठी भुकेली एखादी स्त्रीही कुणाच्याही नकळत बाळ चोरण्याचं असं कृत्य करते. अशा प्रकरणांत ज्यांचं बाळ चोरीला जातं त्यांची काय अवस्था होत असेल, याची खरंच कल्पनाही करवत नाही. सार्वजनिक हॉस्पिटलमध्ये बाळंतपणासाठी दाखल होणारी स्त्री ही सहसा गरीब वा कनिष्ठ मध्यमवर्गातलीच असते. कुठलीही ‘पहुॅंच’ नसलेल्या अशा माणसांना भ्रष्ट व निर्ढावलेल्या अशा संघटित टोळीकडून, तसंच मूलचोरीच्या प्रकरणाचा छडा लावण्याचं काम ज्यांच्यावर असतं, त्या पोलीस यंत्रणेच्या उदासीनतेमुळे आणि संवेदनाहीनतेमुळे चोरीला गेलेलं आपलं मूल परत मिळवणं ही जवळजवळ अशक्यकोटीतलीच गोष्ट असते. प्रसारमाध्यमंही एखाद् दिवस ही ‘स्टोरी’ लावून धरतात आणि दुसऱ्या दिवशी ‘रात गयी, बात गयी’ अशा प्रकारे नव्या ‘बातमी’च्या मागे धावू लागतात. त्यांच्या दृष्टीनं मूलचोरीची ‘बातमी’ आता शिळी झालेली असते. त्यांना सतत ‘ताज्या’च बातम्या हव्या असतात. लोकही ही बातमी वाचून वा पाहून एखाद् दोन दिवस हळहळतात आणि मग ती मनाआड करून पुनश्च आपल्या दैनंदिन व्यवहारांत व्यग्र होतात. ‘एक धक्कादायक बातमी’ यापलीकडे त्यांच्या लेखीही तिला फारसं महत्त्व उरत नाही. काहींच्या संवेदना तर इतक्या बोथट झालेल्या असतात, की अशा बातम्या वाचायच्या भानगडीतही ते पडत नाहीत. त्यावर प्रतिक्रिया द्यायची तर बातच सोडा. एकुणात आज आपल्या समाजाला जी ग्लानी आलेली आहे, त्याचंच हे दृश्य फळ आपण आज पाहतो, अनुभवतो आहोत. मात्र, ‘मला काय त्याचे?’ या वृत्तीनं त्याकडे आपण सरळसरळ काणाडोळा करतो. स्वत:लाच जोवर एखाद्या गोष्टीची झळ बसत नाही, तोवर आपल्याला त्याच्याशी काही देणंघेणं नसतं. आपल्यावर बेतलं की मात्र आपल्याला जाग येते. तेव्हा इतर माणसं आपल्या डोळ्यांवर कातडं ओढून घेतात. हे चक्र अव्याहत सुरू राहतं. समाजात घडणाऱ्या घटनांवर कोणताच प्रतिसाद न देणाऱ्या आपल्याला सामाजिक जडत्व आलेलं आहे. या रोगाचा फैलाव सार्वत्रिक आहे.
ज्यांचं मूल चोरीला गेलेलं असतं त्या कुटुंबाचं काय होत असेल, हा प्रश्न आपल्याला क्वचितच पडतो. ‘महाराष्ट्र रंगभूमी’ या नाटय़संस्थेचं प्रल्हाद जाधव लिखित आणि मंगेश कदम दिग्दर्शित ‘गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या’ हे नवं नाटक याच कथानकाभोवती फिरतं. भायखळ्याच्या भाजी मंडईत भाजी विकून आपलं पोट भरणाऱ्या एका भाजीवालीच्या मुलाला तब्बल बारा वर्षांनी मूल होतं. त्यामुळे ते कुटुंब भलतंच आनंदात असतं. हॉस्पिटलमधून कधी एकदा बाळाला घरी घेऊन जातो, असं त्यांना झालेलं असतं. मात्र, आई आणि बाळाचं आरोग्य नीट होईतो डॉक्टर त्यांना घरी पाठवायला तयार नसतात.
परंतु एके दिवशी अकस्मात हॉस्पिटलमधलं बाळ पाळण्यातून गायब होतं. त्याचे आई-बाबा आणि आजी भयंकर हवालदिल होतात. तेव्हा त्यांना हॉस्पिटलचे कर्मचारी व डॉक्टर शांत राहण्यास सांगतात. कारण पूर्वीही असंच एक बाळ हॉसिप्टलमधून गायब झालेलं असतं आणि नंतर ते हॉस्पिटलसमोरच्या कचऱ्याच्या डब्यात सापडलेलं असतं. तुमचंही बाळ सापडेल, काही काळजी करू नका, असं त्यांना सांगण्यात येतं. त्याप्रमाणे खरोखरच त्यांचं बाळ कचऱ्याच्या डब्यात सापडतं. परंतु बाळाच्या मांडीवर असलेला तीळ गायब झालेला असतो. बाळाची आई त्यामुळे हैराण होते. आजी मात्र, ‘हे बाळ आपलंच आहे,’ असं ठामपणे सांगून, ‘आता नस्त्या चौकशा नकोत,’ असं बजावून ते बाळाला घेऊन घरी येतात.
बाळाच्या बारशाच्या दिवशी एक पत्रकार, ‘हे बाळ तुमचं नाहीए.. हा पहा त्याचा डीएनए रिपोर्ट!,’ असं सांगून त्यांच्या आनंदावर विरजण टाकतो. बाळाची आजी मात्र त्याचं काहीएक ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नसते. ती म्हणते, ‘माझा असल्या डीएनए-फिएनए रिपोर्टवर विश्वास नाही. हे बाळ आमचंच आहे. जोवर तुमच्या म्हणण्याप्रमाणे असलेलं आमचं खरं बाळ तुम्ही आमच्यासमोर हजर करत नाही, तोवर हेच आमचं बाळ आहे.’ इतक्यात हॉस्पिटलचे डॉक्टरही ते बाळ दुसऱ्याच कुणाचं तरी असल्याचं सांगत येतात. आणि मग तिसरंच एक बाळ त्यांच्यासमोर ठेवलं जातं. या बाळाच्या दोन्ही मांडय़ांवर तीळ असतो. त्यामुळे ते सारे दुग्ध्यात पडतात.
हळूहळू या मूलचोरीच्या कटाशी संबंधित एकेकजण नवं नवं बाळ घेऊन त्यांच्याकडे येतात. पोलीसही या संभ्रमात भर घालतात. त्यातून एका भयानक रॅकेटचा प्रेक्षकांना वास येऊ लागतो. परंतु एवढय़ा मोठय़ा भ्रष्ट यंत्रणेशी आपण कसा लढा द्यायचा, आपण त्यांना पुरे पडू का, असा प्रश्न या गरीब कुटुंबाला पडतो. आणि खरंच, ते शक्यही नसतं.
पुढे काय होतं..?
‘हा विषय वरकरणी पाहता अतिशय गंभीर आहे. परंतु ‘गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या’ नाटकात तो उपहासात्मक रीतीनं हाताळलेला आहे. विनोदाच्या अवगुंठनातून नाटक पुढे सरकत जातं. लेखक प्रल्हाद जाधव यांनी अतिशय नाटय़पूर्णरीत्या आणि आवश्यक त्या धक्कातंत्रानं हा गंभीर विषय नाटकात विनोदाच्या अंगानं मांडला आहे. त्यात व्यावसायिकतेचं संपूर्ण भान दिसतं..’ दिग्दर्शक मंगेश कदम सांगतात.
तुमच्याकडे हे नाटक कसं आलं, असं विचारता मंगेश कदम म्हणाले की, ‘एकदा नाटकाच्या दौऱ्यावर जाताना प्रल्हाद जाधव यांनी हे नाटक मला वाचायला दिलं. मी ते उद्या वाचू, म्हणून ते पुढं ढकलण्याच्या बेतात होतो. पण कसं कुणास ठाऊक, माझ्या बेडशेजारचं ते स्क्रिप्ट माझा धक्का लागून दोन-तीनदा खाली पडलं. मला काय वाटलं- मी ते नाटक वाचायला घेतलं आणि मग मी त्यात गुंततच गेलो. नाटकाच्या विषयानं आणि ते ज्या प्रकारे लिहिलं होतं, त्यामुळे मी अक्षरश: झपाटला गेलो. आपण हे नाटक करायला हवं, असं तीव्रतेनं वाटू लागलं. नंतर माझं प्रल्हाद जाधवांशी त्यावर सविस्तर बोलणं झालं. व्यावसायिक रंगभूमीवर करण्याच्या दृष्टीनं नाटकात काही किरकोळ बदल करण्याची गरज होती. त्यांच्याशी बोलून मी ते त्यांच्याकडून करवून घेतले. मूलचोरीच्या प्रकरणात ज्यांचं मूल पळवलं गेलेलं असतं, त्यांची नेमकी मन:स्थिती तेव्हा काय असते, ते कुटुंब कशा प्रकारे त्या घटनेवर रिअ‍ॅक्ट होतं, हेसुद्धा ती माणसं समाजाच्या कोणत्या आर्थिक- सामाजिक स्तरातली आहेत, यावर अवलंबून असतं. नाटकातलं भाजीविक्री करून उदरनिर्वाह करणारं कुटुंब हातावर पोट असलेलं आहे. तशात बारा वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर त्या घरात मूल झालेलं आहे. त्यामुळे मुलाप्रतीच्या त्यांच्या भावना तीव्रच असणार. आपलं मूल चोरीला गेलंय, हे समजल्यावर त्या कुटुंबावर जोरदार आघात होतो. मात्र, ते ज्या प्रकारे या घटनेला सामोरे जातात, ते माझ्या दृष्टीनं जास्त महत्त्वाचं होतं. म्हणूनच मला हे नाटक आवडलं.. करावंसं वाटलं. ‘महाराष्ट्र रंगभूमी’चे निर्माते संतोष कोचरेकर यांना मी या नाटकाबद्दल बोललो तेव्हा ते लगेचच हे नाटक करायला राजी झाले.’
या नाटकात स्मिता तळवलकर या प्रमुख भूमिकेत आहे. पण त्या कनिष्ट वर्गातील भाजीवाली स्त्री वाटतील का, असा प्रश्न केला असता मंगेश कदम म्हणाले की, ‘त्यांना एखादं वेगळ्या प्रकारचं नाटक करायचं मनात होतंच. आणि त्यांना ही भूमिका जमणार नाही, असं तरी आपण का समजायचं? त्यांना स्वत:ला या भूमिकेतलं आव्हान पेलून पाहायचंय. आणि मला वाटतं, स्मिता तळवलकर ही भूमिका निश्चितच उत्तम करतील.’ त्यांच्याखेरीज किरण माने हे मुंबईबाहेरचे कलावंत यानिमित्तानं व्यावसायिक रंगभूमीवर प्रथमच येत आहेत. तसंच पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्राची विद्यार्थिनी असलेली अनिता दाते ही गुणी अभिनेत्रीही या नाटकात आहे. येत्या २६ जुलैला हे नाटक रंगमंचावर येत आहे. उपहासगर्भ आशय आणि एक महत्त्वाचा सामाजिक विषय हाताळणारं हे नाटक प्रेक्षकांना कितपत खिळवून ठेवतं, हे लवकरच दिसेल.
रवींद्र पाथरे