Leading International Marathi News Daily

बुधवार, २२ जुलै २००९

भारत सरकारने त्यांना पद्मभूषण व पद्मविभूषण या नागरी सन्मानांनी अलंकृत केले होते. त्यांना एकूण पन्नासहून अधिक पुरस्कार मिळाले होते. त्यात संगीत नाटक अकादमी पुरस्कार, चार मानद डॉक्टरेट, २४ पुरस्कार यांचा समावेश आहे. किमान नऊवेळा पंतप्रधान व पाचवेळा राष्ट्रपतींकडून त्यांचा खास गौरव झाला होता. पाचवी इयत्ता शिकलेल्या गंगुबाईंनी संगीताच्या मानद प्राध्यापिका म्हणून काम केले. धारवाड येथील कर्नाटक विद्यापीठाच्या त्या सिनेट सदस्या होत्या. देशात व देशाबाहेर त्यांनी अनेक संगीत मैफली गाजवल्या. भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी त्यांनी देशभरातील सुमारे २०० शाळा-महाविद्यालयांतून कार्यक्रम केले. वयाच्या ९४ व्या वर्षी मार्च २००६ मध्ये त्यांनी शेवटची मैफल रंगवली.

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील ज्येष्ठ गायिका गंगुबाई हनगळ यांचे निधन
हुबळी, २१ जुलै/वृत्तसंस्था
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका गंगुबाई हनगळ यांचे आज सकाळी येथे हृदयविकाराने निधन झाले. त्या ९७ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनामुळे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील पंचाहत्तर वर्षे रंगलेल्या मैफलीची अखेर झाली. सोमवारी रात्री छातीत दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हृदयरोग व श्वसनाच्या विकाराने त्या आजारी होत्या. त्यांच्या पश्चात बाबुराव व नारायण हे दोन मुलगे आहेत. गंगुबाईंचे सुखनिधान - अग्रलेख

संगीत क्षेत्रातील मान्यवरांचा आठवणींना उजाळा
नागपूर, २१ जुलै / प्रतिनिधी

किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका पद्मविभूषण गंगुबाई हनगळ यांच्या निधनाने एका संगीतपर्वाचा अस्त झाल्याची प्रतिक्रिया संगीत क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त करून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. गंगुबाईंच्या आठवणींना उजाळा देताना ज्येष्ठ तबलावादक गोपाळराव वाडेगावकर म्हणाले, माझ्या आईशी त्यांची ओळख असल्यामुळे मुंबईला देशमुख लेनमध्ये राहत असताना त्या घरी येत असत. मुंबई आकाशवाणीला असताना त्यांना दोन वेळा साथसंगत केली होती. त्यावेळी त्यांनी कौतुक केले होते.

एका सुरील्या मैफलीची अखेर
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील ख्यातनाम गायिका गंगुबाई हनगळ यांचा जन्म तेव्हाच्या धारवाड (आताच्या हावेरी) जिल्ह्य़ात १९१३ मध्ये झाला. १९२८ मध्ये त्या हुबळीला आल्या, तेथे त्यांनी दत्तोपंत देसाई व कृष्णाचार्य यांच्याकडे काही काळ संगीताचे धडे गिरवले. नंतर त्या पं.रामभाऊ कुंदगोळकर म्हणजे सवाई गंधर्वाकडे आल्या, ते थोर संगीत शिक्षक होते. पंडित भीमसेन जोशी व फिरोज दस्तुरांसारखे शिष्य त्यांनी घडवले होते. सुमारे पंधरा वर्षे त्यांनी सवाई गंधर्वाकडे संगीताचे शिक्षण घेतले व किराणा घराण्याची शैली पूर्णपणे आत्मसात केली. चालू शतकात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात अग्रगण्य नाव असलेल्या गंगुबाईंची जीवनकहाणी ही धैर्य, समर्पण, एकात्म भाव व निष्कलंक जीवनाचा आदर्श होती. त्यांनी त्यांच्या यशाचे श्रेय आई व गुरूंना दिले होते.

झोपडपट्टीदादा झाले राजकीय पक्षांचे मसीहा!
संदीप प्रधान, मुंबई, २१ जुलै

मुंबईत एक जानेवारी १९९५ नंतर उभ्या राहिलेल्या झोपडय़ांची संख्या एक लाख ८१ हजार ५८७ आहे. एकूण अपात्र झोपडय़ा पाच लाख ४२ हजार ९२९ आहेत. मात्र १९९९ ते २००८ या दहा वर्षांत नव्याने उभ्या राहिलेल्या या लक्षावधी झोपडय़ांकरिता केवळ १२९ झोपडपट्टीदादांवर पोलिसांनी कारवाईचा उपचार केला आहे. यापैकी नव्वद टक्के झोपडपट्टीदादा न्यायालयात अथवा गृह खात्याच्या आदेशावरून मुक्त झाले आहेत. निवडणुकीत झोपडपट्टय़ांतील ‘मतपेटय़ा’ एकेका मतामागे पैसे फेकून विकत घेण्याची सवय सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना जडलेली असल्याने झोपडपट्टीदादा हे राजकीय नेत्यांना सच्चे मित्र वाटत आहेत! सरकारी आकडेवारीनुसार एक जानेवारी १९९५ पूर्वीच्या झोपडय़ांची संख्या सात लाख ९८ हजार ४८० आहे.

वीज कर्मचाऱ्यांचा संप मिटला
मुंबई, २१ जुलै / प्रतिनिधी

राज्य वीज मंडळातील कर्मचारी, अभियंते, अधिकारी संघटनांची कृती समिती आणि व्यवस्थापन यांच्यात आज वेतनवाढ आणि अन्य मागण्यांबाबत यशस्वी चर्चा झाल्याने काल मध्यरात्रीपासून कृती समितीने पुकारलेला संप आज तातडीने मागे घेतला. मंडळाचे व्यवस्थापन आणि कृती समितीचे प्रतिनिधी यांच्यात काल झालेल्या चर्चेत तोडगा न निघाल्याने राज्याचे ऊर्जामंत्री सुनील तटकरे यांनी आज मध्यस्थी केली.

कबुलीनाम्यानंतरही कसाबचा खटला सुरू राहणार?
मुंबई, २१ जुलै / प्रतिनिधी

पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब याने सोमवारी आपल्या गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम. एल. टहलियानी यांनी त्याचा तपशीलवार कबुलीजबाबही नोंदवून घेत तो स्वीकारणे अथवा नाकारण्याबाबत आज निर्णय देण्याचे स्पष्ट केले होते. मात्र त्याबाबतच्या युक्तिवादासाठी आपल्याला एक दिवसाचा वेळ हवा असल्याची विनंती अभियोग पक्षाचे वकील उज्ज्वल निकम यांनी केल्याने न्यायालयाने त्यावरील निर्णय उद्यापर्यंत तहकूब ठेवला. दरम्यान, याप्रकरणी सद्य:स्थितीला तीन पर्याय उपलब्ध असून त्यातील तिसरा म्हणजेच कसाबचा कबुलीनामा स्वीकारून खटल्याची सुनावणीही सुरू ठेवण्याचा पर्याय न्या. टहलियानी स्वीकारण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

खग्रास ग्रहणाच्या छायेखाली
नाशिकमध्ये मंत्रिमंडळाची बैठक
नाशिक, २१ जुलै / खास प्रतिनिधी

तोंडावर येवून ठेपलेली विधानसभेची निवडणूक आणि खग्रास सूर्यग्रहणाच्या छायेखाली येथे उद्या, २२ जुलै रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. नाशिक महसूल विभागासाठी या बैठकीत नेमके किती हजार कोटींचे पॅकेज मंत्रिमंडळाकरवी जाहीर केले जाते याकडे संपूर्ण उत्तर महाराष्ट्राचे लक्ष लागले असले तरी हे संभाव्य पॅकेज आगामी निवडणुकीची नांदी ठरणार आहे.

मराठी शाळांच्या मान्यतेसंदर्भात शिक्षणतज्ज्ञांचा खडा सवाल
मुंबई, २१ जुलै/ प्रतिनिधी

मराठी शाळांना मान्यता न देण्याच्या सरकारच्या धोरणाकडे लक्ष वेधणारी जी बातमी ‘लोकसत्ता’ने १८ जुलै रोजी प्रसिद्ध केली होती, त्या संदर्भात शासनाचा निषेध करणारे आणि थेट जाब विचारणारे पत्रक राज्यातील अनेक ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञांनी काढले आहे.

ढगांचे ग्रहण!
मुंबई, २१ जलै/ प्रतिनिधी

‘याचि देही याचि डोळा’ सूर्य ग्रहण पाहण्यासाठी खगोलप्रेमी, अभ्यासक देशात आणि परदेशातील विविध ठिकाणी रवाना झाले आहेत. पण या सर्वाच्या ग्रहणदर्शनात पावसाचा अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. असे असले तरी सूर्य ग्रहण पाहण्यासाठी गेलेल्या सर्व मंडळींनी अद्याप आशा सोडलेली नाही. मात्र चीनमध्ये पावसाचे सावट नसल्याने तेथे गेलेल्या खगोलप्रेमींना स्पष्टपणे ग्रहण पाहावयास मिळणार आहे. ग्रहण म्हणजे नेमके काय?, खग्रास ग्रहण कसे दिसते? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आणि ग्रहणाचा अभ्यास करण्यासाठी काही अभ्यासक आणि खगोलप्रमी मंडळी सर्व साधनसामग्री घेऊन वाराणसी, नंदूरबार, दोंडाइचा, भोपाळ, इटारसी आदी ठिकाणी गेले आहेत. पण या सर्व ठिकाणी आज सकाळपासून पावसाने हजेरी लावल्याने सर्वाना उद्या सकाळी होणारे ग्रहण दिसेल की नाही अशी शंका आहे.

एमबीएची पहिली प्रवेश यादी जाहीर
मुंबई, २१ जुलै / प्रतिनिधी

उच्च शिक्षण क्षेत्रातील सर्वात लोकप्रिया अभ्यासक्रम म्हणून नावलौकिक असलेल्या ‘मास्टर इन बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’ (एमबीए) या अभ्यासक्रमाची पहिली प्रवेश यादी जाहीर झाली आहे. नशीबवान ठरलेल्या केवळ १४ हजार ५८ विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळू शकले आहेत.तब्बल १ लाख १४ हजार विद्यार्थी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यास इच्छूक होते. परंतु, तंत्रशिक्षण संचालनालयाने छानणी करून त्यापैकी ४५ हजार ५४० विद्यार्थ्यांना पात्र केले होते. यांतील अवघ्या १४ हजार ५८ विद्यार्थ्यांना पहिल्या यादीत प्रवेश मिळाला आहे.

 

प्रत्येक शुक्रवारी