Leading International Marathi News Daily

गुरुवार, २३ जुलै २००९

गुजरात ते अरुणाचल प्रदेश या पट्टय़ातून सूर्यावर चंद्राची सावली पडत गेली, तिने नुकत्याच उगवत असलेल्या सूर्यबिंबाला ग्रासले व उजाडायच्या आधीच पुन्हा रात्र झाली. शतकातील सर्वात मोठय़ा खग्रास सूर्यग्रहणाची ही पर्वणी खगोलनिरीक्षकांनी साधली. सूर्य ६ मिनिटे व ३९ सेकंद इतका प्रदीर्घ काळ खग्रास स्थितीत राहिल्याने एकविसाव्या शतकातील हे मोठे ग्रहण होते. यापुढे एवढय़ा कालावधीचे ग्रहण व्हायला पुढचे शतक उजाडावे लागेल म्हणून या ग्रहणाचे वर्णन ‘वन्स इन लाइफ टाइम’ असे करण्यात आले होते..
६ मिनिटे व ३९ सेकंद ग्रहणाची कमाल खग्रास स्थिती
मुंबईकरांची घोर निराशा
वाराणसी व गुवाहाटीयेथून ग्रहणाचे उत्तम दर्शन
बिहारमध्ये तरेगनात जमलेल्या हजारो खगोलप्रेमींची ढगाळ हवामानाने निराशा
बिहारमध्ये भागलपूर, गया, औरंगाबाद, सासराम,मुझफ्फरपूर, मुंगेर व पुर्णिया येथे दर्शन
वाराणसीत चेंगराचेंगरीत एक मृत्युमुखी

पराग महाजनी
वाराणसी / २२ जुलै

वाराणसीत गंगाकिनारी जमलेल्या लाखो लोकांनी पूर्व क्षितिजाच्या रंगमंचावर सूर्य आणि चंद्राची प्रमुख भूमिका असलेला या शतकातील अभूतपूर्व असा खग्रास सूर्यग्रहणाचा नाटय़-सोहळा अनुभवला आणि हे ग्रहण पाहण्यास उपस्थित असलेल्या खगोलप्रेमींच्या, तसेच भाविकांच्या डोळ्याचे अक्षरश: पारणे फिटले! सुरतपासून गुवाहाटीपर्यंतच्या क्षेत्रात ढगाळ हवामानामुळे असंख्य खगोलप्रेमींना या खग्रास ग्रहणाचा आनंद नीट लुटता आला नाही पण वाराणसीतील जनता मात्र सूर्यग्रहणाचा आनंद पुरेपूर लुटू शकली. वाराणसीत सकाळी सहा वाजून २४ मिनिटांपासून ते सहा वाजून २७ मिनिटे सहा सेकंद इतका काळ म्हणजे तीन मिनिटे सहा सेकंद खग्रास ग्रहणस्थिती होती. ग्रहणाच्या आधी व नंतर वाराणसी परिसरात ढगाळ वातावरण होते; पण प्रत्यक्ष ग्रहण काळात वातावरण स्वच्छ असल्याने सर्वाना हा ‘अनुपम्य सोहळा’ ‘याचि देही, याचि डोळा’ नीट अनुभवता आला! आजचे खग्रास सूर्यग्रहण या शतकातील सर्वात मोठे सूर्यग्रहण होते.

सह्य़ाद्रीच्या डोंगररांगा दिल्या श्रीमंतांना आंदण!
प्रशांत मोरे, ठाणे, २२ जुलै

अवघ्या महाराष्ट्रीयांच्या अस्मितेचे प्रतीक आणि युगानुयुगे या प्रदेशातील पर्यावरण संतुलन राखण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या सह्य़ाद्रीलाही आता मूठभर धनिकांनी वेठीस धरले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या सह्य़ाद्रीच्या साथीने स्थानिकांना स्वाभिमानाने जगता येईल, असे स्वराज्य निर्माण केले, त्या डोंगररांगा या स्वार्थी मूषकांच्या बिळांनी आता अक्षरश: भुसभुशीत झाल्या आहेत. पैशाच्या लालसेने सारा सह्य़ाद्रीच सध्या श्रीमंतांना आंदण दिल्यात जमा आहे. शिवाजी महाराजांच्या पश्चात महाराष्ट्र जिंकण्याचे औरंगजेबाचे स्वप्न मराठय़ांनी ज्या पर्वताच्या साथीने धुळीस मिळविले, तो पर्वत आता हळूहळू श्रीमंतांच्या चैनीसाठी तुकडय़ा तुकडय़ाने गहाण ठेवला जात आहे. पैशाच्या जोरावर सारे काही विकत घेता येते, या मग्रुरीने बेधुंद झालेल्या परप्रांतीयांनी सह्य़ाद्रीला अक्षरश: बे‘सहारा’ करून टाकले असून, अशा प्रकारे महाराष्ट्राचे नाक कापले जात असूनही कोणताही राजकीय पक्ष, विचारवंत अथवा लेखक त्याबद्दल साधी खंतसुद्धा व्यक्त करताना दिसत नाहीत.

मुझे फाँसी दे दो!
‘मुझे खुदा नहीं, ये दुनिया ही सजा देगी..
मुंबई, २२ जुलै / प्रतिनिधी

‘खुदा क्यों मुझे सजा देगा, मैंने जो कुछ किया हैं वो इस दुनिया में किया हैं, मुझे खुदा की सजा नहीं चाहिए, मुझे यह दुनिया ही सजा देगी’, असे पश्चातापाचे बोल ऐकवत पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब याने ‘अगर जिनके दिमाग में शक हैं की मैं फाँसी से बचने के लिए बयान दे रहा हँू तो बेशक मुझे फाँसी दे दो’, असे विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम. एल. टहलियानी यांच्यापुढे आज स्पष्ट केले. गुन्हा कबूल करून त्याबद्दल तपशीलवार दिलेला कसाबचा कबुलीजबाब स्वीकारावा की स्वीकारू नये याबाबत युक्तिवाद करण्याआधी अभियोग पक्षाचे वकील उज्ज्वल निकम यांनी कसाबने हा कबुलीजबाब स्वेच्छेने, कुणाच्या दडपणाखाली दिलेला नाही ना? त्याला त्यातील गांभीर्य ठाऊक आहे ना? याबद्दल शहानिशा करणे तसेच त्यासाठी त्याला काय शिक्षा होऊ शकते, हे सांगणे गरजेचे असल्याचा प्रश्न उपस्थित केला. त्यावर न्यायालयाने सुरूवातीला कसाबच्या वकिलांना त्याविषयी विचारणा केली असता अ‍ॅड. अब्बास काझ्मी यांनी कसाबला त्यातील गांभीर्य माहीत असून दोन गोष्टींच्या पाश्र्वभूमीवर त्याने गुन्हा कबूल केल्याचे न्यायालयाला सांगितले.

नाशिक विभागासाठी ६,५०० कोटींचे पॅकेज
नाशिक, २२ जुलै / खास प्रतिनिधी

राज्य मंत्रिमंडळाने नाशिक महसूल विभागातील जळगाव, धुळे, नंदुरबार, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्य़ांसाठी तब्बल ६ हजार ५०० कोटी रुपयांचे पॅकेज आज जाहीर केले. अल्पसंख्याकासाठी घरकूल योजना, पर्यटनस्थळे व तीर्थक्षेत्राचा विकास, आदिवासी व बिगरआदिवासी भागातील रस्त्यांची बांधणी, वाइन उद्योगाचे संवर्धन, प्रलंबित सिंचन प्रकल्पासह राज्यभरातील उपसा सिंचन योजनांशी संबंधीत शेतकऱ्यांच्या थकीत १४०० कोटी कर्जापैकी जवळपास ५०० कोटींचे कर्ज माफ करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. त्यासाठी साधारणत: येत्या तीन वर्षांचा कालबद्ध कार्यक्रम निर्धारित केला असून या कालावधीत पॅकेजमध्ये समाविष्ट विकास कामे, प्रस्तावित प्रकल्प अन् दुरुस्तीची कामे पूर्णत्वास नेण्याचाही मनोदय मुख्यमंत्री अशोक चव्हाण व उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

दहा हजारांची लाच घेताना रेल्वे पोलीस अधिकाऱ्यासह दोघांना अटक
मुंबई, २२ जुलै / प्रतिनिधी

लोकल गाडय़ांमध्ये व्यावसायिक जाहिरातींची स्टिकर्स लावण्यासाठी इलेक्ट्रिशियनकडून १० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या आणि त्यापैकी काही रक्कम स्वीकारणाऱ्या रेल्वे पोलीस दलातील पोलीस निरीक्षक आणि हवालदारास आज केंद्रीय अन्वेषण विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली. पोलीस निरीक्षक ए. के. रॉय आणि हवालदार आर. एम. देशपांडे अशी या लाचखोर रेल्वे पोलिसांची नावे आहेत. प्रकरणातील फिर्यादी कारशेडमध्ये उभ्या असलेल्या लोकल गाडय़ांमध्ये व्यावसायिक जाहिरातींची स्टिकर्स चिकटवत असताना रॉय आणि देशपांडे त्याला पकडले. हे काम पुढेही सुरू ठेवायचे असेल तर १० हजार रुपये द्यावे लागतील, असेही धमकावले. वाटाघाटीनंतर रॉय आणि देशपांडे यांना चार हजार रुपये देण्याचे फिर्यादीने मान्य केले. त्यातील एक हजार रुपये फिर्यादीने आधी दिले. आज लाचेचा दुसरा हफ्ता त्यांना देणार होता.

 

प्रत्येक शुक्रवारी