Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २४ जुलै २००९

हिंदी चित्रपटसृष्टीच्या कृष्णधवल जमान्यात आपल्या अप्रतिम आवाजाने गाण्यात रंग भरणारे गायक मुकेश यांच्या स्मृतिदिनानिमित्त आणि अभिनेता मनोज कुमार यांच्या वाढदिवासाचे औचित्य साधून इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ आर्किटेक्ट्स या संस्थेतर्फे विशेष संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला गीतकार अंजान यांचे चिरंजीव व आजचे आघाडीचे गीतकार समीर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यानिमित्त समीर यांच्या लेखणीतून साकारलेली गाणी बाबला मेहता यांनी सादर केली. मनोज कुमारचा अभिनय आणि मुकेशने पेश केलेल्या गाण्यांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने उजाळा मिळाला. प्रेक्षकही जुन्या जमान्यातील गीतांनी भारावले. या कार्यक्रमाला मुंबईचे माजी नगरपाल डॉ. जगन्नाथ हेगडे आणि अभिनेता अंजन श्रीवास्तव हेही उपस्थित होते. रेडिओ जॉकी अनुराग पांडे याने नेटके निवेदन केले.

‘फिटनेस’मध्ये ‘जय महाराष्ट्र’
फिटनेस ट्रेनर हे पद धारण करणारी व्यक्ती पूर्वी केवळ खेळांच्या चमूशी निगडित होती. आता मात्र चित्रपटाचा दिग्दर्शक, तंत्रज्ञ, लेखक, निर्माता, स्पॉटबॉय, कलावंत, सहकलाकार, पाहुणे कलाकार, असंख्य विभागांचे असिस्टंट्स या नामावलीत फिटनेस ट्रेनरही महत्त्वाचा ठरू लागला आहे. ‘ओम शांती ओम’मधील शाहरूखचे सिक्स पॅक अ‍ॅब्स, ‘गझनी’मधील आमीरने केलेली पिळदार शरीरयष्टी, ‘दोस्ताना’मध्ये असलेला जॉन अब्राहमचा सुडौल बांधा यामुळे या अभिनेत्यांप्रमाणेच त्यांच्या फिटनेस ट्रेनरचीही चर्चा होऊ लागली. या व्यवसायातील ९० टक्के फिटनेस ट्रेनर मराठी आहेत.

महेश कोठारे छोटय़ा पडद्यावर
मराठी चित्रपटांच्या तंत्रात विविध प्रयोग करणाऱ्या महेश कोठारे यांनी आता माध्यमाचाही बदल करण्याचे ठरविले आहे. ‘स्टार प्रवाह’ या वाहिनीवर येत्या २७ जुलैपासून सोमवार ते शनिवार सायंकाळी ७ वाजता प्रसारित होणाऱ्या ‘मन उधाण वाऱ्याचे’ या मालिकेच्या निमित्ताने छोटय़ा पडद्यावरील निर्मिती क्षेत्रात प्रवेश केला आहे. छोटय़ा पडद्यावर काम करावेसे का वाटले, असे विचारले असता ते म्हणाले की, या माध्यमात आजतागायत कधी काम केले नव्हते. त्यामुळे या सशक्त माध्यमात काही तरी करून पाहावे, असे मनात होते.

नशीब फळफळणार?
‘जाने तू..’ मध्ये चॉकलेट हिरोची भूमिका साकारलेला इम्रान खान ‘किडनॅप’मध्ये अगदी वेगळ्या भूमिकेत दिसला. आता पुन्हा एकदा तो ‘लक’ या अ‍ॅक्शनपॅक्ड चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येत आहे. हा चित्रपट ‘मूसा’ या माफियाच्या आयुष्याविषयी फिरतो. त्याचे आयुष्यच एक जुगार आहे. या चित्रपटातील प्रत्येकालाच पैशाची प्रचंड गरज असते. त्यासाठी प्रत्येकानेच आपले आयुष्यच पणाला लावले आहे. इम्रान खानने या चित्रपटात एका बँक कर्मचाऱ्याची व्यक्तिरेखा साकारली आहे.

इतिहास कच्चा असल्यास!
दिग्दर्शक शॉन लेव्हीचे सर्व चित्रपट ‘पूर्ण मनोरंजन’ या गटात मोडणारे असतात. ‘बिग फॅट लायर’, ‘चिपर बाय डझन’ची मालिका आणि ‘पिंक पँथर’ हे त्याचे चित्रपट आपल्या इंग्रजी चित्रपट वाहिन्यांवरही बरेच लोकप्रिय झाले आहेत. पण शॉन लेवीला सर्वाधिक लोकप्रियता आणि यश मिळवून देणारा चित्रपट होता बेन स्टिलर अभिनित ‘नाईट अ‍ॅट द म्युझिअम्’. (म्युझिअम के अंदर फस गया सिकंदर) ‘होम अलोन’च्या धाटणीच्या या विनोदीपटात एका रात्री नायक म्युझिअममध्ये अडकतो.

वरळीच्या नेहरू सेंटर येथील कलादालनातर्फे व्यावसायिक कलावंतांचे चातक हे पावसाळी प्रदर्शन सुरू आहे. ४३ कलावंत त्यात सहभागी झाले असून त्यांच्या प्रत्येकी दोन कलाकृतींचा प्रदर्शनात समावेश आहे. प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. या प्रदर्शनातील प्रदीप महाडिक यांच्या या दोन कलाकृती.