Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २४ जुलै २००९

लोकमानस

नांदगावकरांमधला नाटककार, नट व संपादकही..
कवी शांताराम नांदगावकर यांच्या निधनाने अनेक वर्षांचा जवळचा मित्र गमावला. शांतारामच्या भावगीतांनी गेली कित्येक वर्षे महाराष्ट्राला मोहित केले होते. त्यात भक्तिगीते, प्रेमगीते, सिनेगीते तर

 

होतीच, पण गजल, संगीतिका, बालगीतेही होती. ‘रामप्रहरी रामगाथा,’ ‘प्रथम तुला वंदितो कृपाळा’ सारख्या गीतांनी अनेक वर्षे लोकांचा दिवस सुरू होई. ‘रुपेरी वाळूत, माडांच्या बनात’, ‘ससा तो ससा’ अशी उडत्या चालींना योग्य शब्द असलेली गाणी तर श्रोत्यांची आजही आवडती आहेत. शांतारामशी माझी भेट १९६५ साली योगायोगाने झाली. ‘महाराष्ट्र टाइम्स’चा रविवार पुरवणीत त्याचे सहसंपादक माधव गडकरी यांनी माझा परिचय देणारा एक लेख प्रसिद्ध केला होता. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या सरकारी विमानाचा मी मुख्य वैमानिक होतो व महाराष्ट्रीय तरुणांना शासनातर्फे वैमानिक प्रशिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळवून देण्याची योजना मंजूर करून घेण्याच्या माझ्या प्रयत्नांची माहिती त्या लेखात होती. त्या वेळी कॉटन ग्रीनच्या एअर फोर्स डेपोमध्ये असलेल्या मेडिकल बोर्डात नांदगावकर क्लार्क होते. लेख वाचून ते मला भेटले व त्यांनी स्वत:चीही ओळख करून दिली, ‘माझी गाणी बऱ्याच वेळा रेडिओवर लागतात,’ असे म्हणाले. त्यांच्या टेबलावर एअर फोर्सचा जुना रेडिओ होताच. तो सुरू करताच ‘ही नव्हे चांदणी, ही तर मीरा गाते’ हे गीत लागले. नांदगावकर म्हणाले, हे गाणे माझेच.’ त्यानंतर लागोपाठ दोन-तीन गाणी त्यांचीच लागली. ती सर्व माझ्या आवडीची होती. त्यांच्यासारखा कवी मला भेटला, म्हणून मला आनंद झाला. पुढे आमचे एकमेकांच्या घरी जाणेयेणे होत राहिले. एकदा मी नांदगावकरांना विचारले की, तुम्ही हिंदू देवदवतांवर गाणी लिहिता, पण बौद्ध धर्मावर व डॉ. आंबेडकरांवर का लिहीत नाही? त्यांनी प्रामाणिकपणे सांगितले की, बौद्ध धर्माची त्यांना फारशी माहिती नाही व बाबासाहेबांवर नेमके काय लिहावे, हे समजत नाही. मी म्हणालो, ‘नामवंत दलित कवींनी बाबासाहेबांवर गाणी लिहिली आहेत, पण ती एक तर सिनेमाच्या गाण्यांच्या चालीवर किंवा कव्वालीच्या वळणावर आहेत. तबला, पेटी आणि बुलबुलतरंग ही वाद्ये साथीला असतात. गाणी भावगीतांसारखी नसतात. वास्तविक भगवान बुद्धांच्या आयुष्यात असे अनेक प्रसंग आहेत की ज्यावर सुंदर भावनात्मक व बोधपर गाणी लिहिता येतील.’ त्यावर त्यांनी एखादा प्रसंग सांगावयास सांगितले. मी बुद्धांच्या अंतकाळाचा प्रसंग सांगितला. बुद्धांना शिष्य म्हणाले, ‘भगवान, आपण गेल्यानंतर आमच्यासमोर पुरता अंध:कार होईल, आम्ही दिशाहीन होऊ, आम्हाला पुढचा मार्ग दिसणार नाही.’ तेव्हा भगवान म्हणाले, तुम्ही स्वयंप्रकाशित होऊन तुमचा मार्ग शोधा- ‘अत्त दीप भव’!दुसऱ्या दिवशी नांदगावकरांचा फोन आला, ‘कविता तयार आहे’! त्यांच्या सांगण्याप्रमाणे मी गोरेगावहून त्यांच्या खारच्या घरी गेलो. त्यांची कविता पाहिली व एकदम खूष झालो. त्यातल्या पहिल्या ओळी होत्या, ‘अत्त दीप भव, स्वयं दीप हो’ पुढे एक अतिशय अर्थवाही ओळ होती- ‘जळणाराचे तू सर्वाग हो’ ती कविता घेऊन आम्ही आकाशवाणीवर मधुकर गोळवलकर या संगीतकारांना भेटलो. त्यांनी त्या कवितेला चाल लावली व आकाशवाणीच्या कलावंतांकडून गाऊन घेऊन ते गीतही ध्वनिमुद्रित केले. दुसऱ्या दिवशी ते ‘मंगल-प्रभात’मध्ये ऐकविण्यात आले.
आम्ही नवोदितांना संधी देण्यासाठी ‘स्वर-सौरभ’ नावाची संस्था काढली. आमच्याबरोबर गायक परेश पेवेकर, संगीतकार अरुण पौडवाल व अनिल मोहिले व काही वादक होते. अरुण अ‍ॅकॉर्डियन फार सुंदर वागवायचा. १९६८ च्या धम्मचक्रप्रवर्तनदिनी संस्थेचे उद्घाटन झाले. त्या कार्यक्रमात अनेक नवे जुने गायक-गायिका गायले. शेवटचे गाणे रश्मी कदम या माझ्या मित्राच्या मुलीचे होते. रश्मीबरोबर अलका नाडकर्णी ही तिची मैत्रीण आली होती. तिला गाण्याची संधी द्यावी, अशी रश्मीने विनंती केली. ती ‘मेंदीच्या पानावर’ हे गीत अतिशय सुरेख गायली व त्याला ‘वन्स मोअर’ मिळाला. पुढे ही गायिका ‘अनुराधा पौडवाल’ या नावाने सुप्रसिद्ध झाली. प्रतिभा बर्वे ही दुसरी मुलगी लावण्या ठसक्यात गायची. तिलाही ‘वन्स मोअर’ मिळत असे. स्वर-सौरभतर्फे अनेक कार्यक्रम रवींद्र नाटय़मंदिर, दीनानाथ नाटय़मंदिर, रंगभवन, षण्मुखानंद सभागृह या ठिकाणी झाले. त्यातील काही बहुजन शिक्षण प्रसारक मंडळ व एअरलाइन्स मागासवर्गीय कर्मचारी संघटना या संस्थांना मदत करण्यासाठीही असत. नांदगावकरांनी ‘वसई गावचा धनगर राजा’ हे लोकनाटय़ लिहिले होते. ते आम्ही शाहीर खामकर पार्टीच्या सहयोगाने सादर केले. त्यात नांदगावकर नायकाची भूमिका करीत. त्याच्या लावण्याही नांदगावकरांनीच लिहिल्या होत्या व त्या प्रतिभा बर्वे गात असे. व्यावसायिकदृष्टय़ा ते लोकनाटय़ यशस्वी झाले नाही. मुळात नांदगावकरांनी ते मालवणी भाषेत लिहिले होते, पणसर्वाना समजेल अशा मराठीमध्ये ते पुन्हा लिहिण्यासाठी मी त्यांना भाग पाडले. नाही तर मच्छिंद्र कांबळींच्या अगोदर मालवणीचे नाटककार म्हणून नांदगावकर नावाजले गेले असते. बुद्धजयंतीनिमित्त आम्ही दर वर्षी ‘दीप’ नावाचे वार्षिक प्रसिद्ध करीत असू. शांताराम नांदगावकर त्याचे संपादक होते. त्या अंकात त्यांच्या कवितांशिवाय कथाही असायच्या व इतर लेखकांचे वाङ्मयही असे. नांदगावकरांनी केवळ कवी म्हणून नाही तर नाटककार, नट, लेखक, संपादक इ. भूमिकाही बजावल्या. त्यांनी मुंबई महापालिकेची नगरसेवकपदाची निवडणूक लढविली होती, पण त्यात ते हरले. निवडणूक लढण्यास मिळावे म्हणून त्यांनी नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. समरसता मंचाचे ते काही दिवस अध्यक्ष होते व त्यातून आंबेडकरवादी जनतेचा रोष त्यांनी पत्करला. पुढे शिवसेनेत त्यांना आमदारपद मिळाले. त्यामुळे त्या रोषात आणखीच भर पडली. या नाराजीबद्दल त्यांचे म्हणणे असे होते की, मी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढलो नाही. नंतर त्यांनी त्या पक्षाविरुद्ध तक्रारी करण्यास सुरुवात केली व शेवटी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झाले. काही काळ ते नाटय़ परीक्षण मंडळाचे अध्यक्षही होते. त्यांनी मंजूर केलेल्या ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’च्या संहितेवरून वादळ उठले. त्यांनी बँकेतून कर्ज घेऊन ध्वनिमुद्रण स्टुडिओ काढला, तोही चालला नाही. हळव्या माणसाला हा जबरदस्त धक्का होता.
कॅप्टन भाऊराव खडताळे, अंधेरी, मुंबई

..नजर विकू नका!
निळू दामले यांचा, ‘लवासा’तील संयोजकांनी आयोजित केलेल्या ‘गाइडेड टूर’चा (२१ जुलै) वृत्तान्त वाचला. एखाद्या कारखान्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाने त्रस्त झालेल्या आजूबाजूच्या ग्रामस्थांनी तक्रारी केल्यावर प्रदूषण मंडळाचे अधिकारी, अभ्यासकांची कारखान्याला दिलेली खास भेट जेव्हा तो कारखानाच प्रायोजित करतो, तेव्हा त्या दिवसाकरिता खास छोटे स्वच्छ पाण्याचे तळे, त्यात सोडलेली बदके पाहून, भेट देणारे पाहुणे खूश होतात व सारे काही आलबेल असल्याचा अहवाल देतात. त्याची आठवण झाली. दामले एक ज्येष्ठ पत्रकार आहेत. त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. त्यांनी आयोगाच्या सुनावणीबाबत मेधा पाटकरांवर एकपक्षी निष्कर्ष काढल्याचे आरोप केले आहेत ते त्यांना पण लागू होत नाहीत काय? मेधाताईंनी व आयोगाने निदान दुसरी बाजू ऐकून तरी घेतली, दामलेंनी तेही केलेले नाही. बंगालीमध्ये एक गीत आहे,
आलू बेचो, छोला बेचो, बेचो बाकोर खानी
बेचो ना बेचो ना बंधू, तोमार चोखेर मोनी।।
(तुम्ही बटाटे विका, छोले विका, बाकोर खानी हे फळ विका; पण तुमच्या डोळ्यांतील सुंदर मणी म्हणजे तुमची जगाकडे पाहण्याची नजर विकू नका.) आज देशातच दोन विषम विष्टद्धr(२२४)वे तयार होत असताना या गीताची आठवण करून द्यावीशी वाटत. पत्रकार दामलेंना नम्र आवाहन, तेथील शेतकरी व धनगर आदिवासींची बाजू ही ऐकून घ्या.
उल्का महाजन, पनवेल

खग्रास सूर्यग्रहणाविषयीच्या चौकटीत सूर्यावर चंद्राची सावली पडत गेल्याचा उल्लेख (२३ जुलै) झाला आहे. तो तसा नसून गुजरात ते अरुणाचल प्रदेश या पट्टय़ात चंद्राची सावली पृथ्वीवर पडत गेली, असा हवा होता. त्याचबरोबर २२ जुलैच्या अंकात पान ६ वर अ. पां. देशपांडे यांच्या लेखात आणि २३ जुलैच्या अग्रलेखात सूर्याचा जन्म साडेचार कोटी वर्षांपूर्वी झाल्याचा उल्लेख अनावधानाने आला आहे, वस्तुत: तो तसा नसून साडेचार अब्ज वर्षांपूर्वी, असा हवा होता. - संपादक