Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २४ जुलै २००९

अखेर वाठारमध्ये बाटली आडवी
पेठवडगाव, २३ जुलै / वार्ताहर

वाठार गावातील पन्नास टक्क्य़ांपेक्षा अधिक महिलांनी गावातील देशी दारूचे दुकान बंद होण्याच्या बाजूने मतदान केल्याने अखेर हातकणंगले तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील वाठार या गावी देशी दारूची बाटली आज आडवी झाली. महिलांनी उस्फूर्तपणे मतदान केले. गुप्त मतदानाची प्रक्रिया शांततेने पार पडली. बाटली आडवी झाल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी जाहीर करताच गावच्या महिलांनी गुलालाची मुक्त उधळण करत एकच जल्लोष केला.

अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र
थेट द्वितीय वर्ष प्रवेशासाठी मल्टिपल राऊंड प्रक्रिया

जयप्रकाश अभंगे, सोलापूर, २३ जुलै

अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्षांसाठी असलेल्या सर्व रिक्त जागा मल्टिपल राऊंडद्वारे (तीन वेळा) केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे भरण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या २००९-१० मधील थेट द्वितीय वर्षांसाठी शासकीय/शासकीय अनुदानित/विनाअनुदानित संस्थांमधील सर्व रिक्त जागा आता अनेक फेऱ्यांद्वारे भरण्याचा निर्णय शासनाच्या तंत्रशिक्षण संचालनालयाने घेतला आहे.

आठ साठेबाजांवर साताऱ्यात गुन्हे दाखल
सातारा, २३ जुलै/प्रतिनिधी

जीवनावश्यक कायद्याचा भंग करून धान्य, तेल, साखरेचा साठा करणाऱ्या, तसेच परवाने नसलेल्या आठ व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तसेच तपासणीच्या धडक मोहिमेत कराडमधील १८, तर इतर जिल्ह्य़ांतील सहा व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी अपूर्वा वानखेडे यांनी दिली.

शिष्यवृत्ती गुणवत्तायादीत कोल्हापूरचे ९० विद्यार्थी
कोल्हापूर, २३ जुलै / विशेष प्रतिनिधी

राज्यात राजर्षी शाहू सर्वागीण शिक्षण कार्यक्रम व सर्वागीण शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत २००८-०९ मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षांचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. या परीक्षेत चौथीच्या राज्य गुणवत्तायादीत कोल्हापूर जिल्हय़ातील ३४ विद्यार्थी चमकले असून सातवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जिल्हय़ातील ५६ विद्यार्थ्यांना राज्याच्या गुणवत्तायादीत येण्याचा मान मिळाला आहे.

वाई मतदारसंघावरचा राष्ट्रवादीचा हक्क सोडणार नाही - मकरंद पाटील
‘अपक्ष आमदारांना आश्वासन संभ्रम करणारे ’

सातारा, २३ जुलै / प्रतिनिधी

सोनिया गांधी व शरद पवार यांच्या भूमिकेला कात्रजचा घाट दाखवून व आघाडीच्या सूत्राला मूठमाती देऊन बंडखोरी करणाऱ्या अपक्ष आमदारांना काँग्रेसचे तिकिट देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री अशोक चव्हाण व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिले. ते कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करणारे आहे. वाई विधानसभा मतदारसंघावरचा हक्क कदापि सोडणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे वाई, खंडाळा, महाबळेश्वर पुनर्रचित मतदारसंघाचे अध्यक्ष मकरंद पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

व्यापारी महासंघ प्रतिनिधींची आज राहुल गांधींशी चर्चा
कोल्हापूर, २३ जुलै/विशेष प्रतिनिधी

महाराष्ट्रातील जकातविषयक प्रलंबित प्रश्न व व्यापार उद्योग प्रश्नावरील अन्य प्रलंबित मागण्या यासंदर्भात चर्चेसाठी अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस खासदार राहुल गांधी यांनी महाराष्ट्र राज्य व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी शुक्रवार, २४ जुलै २००९ रोजी नवी दिल्ली येथे आमंत्रित केले असल्याची माहिती राज्य व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.
या बैठकीस राज्य व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अतुल शहा, उपाध्यक्ष ललित गांधी, अनिल पोखर्णा, कोल्हापूर चेंबरचे अध्यक्ष आनंद माने, महाराष्ट्र व्यापारी महासंघाचे सचिव पुरुषोत्तम टावरी हे तातडीने नवी दिल्ली येथे रवाना झाले आहेत. संपूर्ण देशात महाराष्ट्रातील २२ महानगरपालिकांमध्ये असलेल्या जकातीच्या प्रश्नांवर व्यापारी, उद्योजक व व्यावसायिक गेली २० वर्षे सातत्याने आंदोलन करीत आहेत. मात्र शासनाने या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, अशी भावना असल्याचे ते म्हणाले.

अकरावी प्रवेशासाठी देणगी मागितल्यास कारवाई होणार
कोल्हापूर, २३ जुलै/विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर शहरात ११ वी प्रवेशासाठी कोणत्याही महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने प्रवेशशुल्काखेरीज देणगीची मागणी केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाकडे त्याची थेट तक्रार करण्यात यावी. या तक्रारीची दखल घेऊन संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्याना बोलावून घेण्यात येईल आणि तक्रारीत तथ्य आढळल्यास थेट कारवाई केली जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी गुरुवारी विद्यार्थी पालकांच्या बैठकीत दिले.

शिक्षणाधिकार विधेयकाची होळी
कोल्हापूर, २३ जुलै / प्रतिनिधी

लोकशाहीविरोधी, शिक्षकविरोधी, बालकविरोधी आणि शिक्षणविरोधी असलेले ‘मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार २००८’ हे विधेयक आहे त्या स्वरूपात मंजूर करण्यात येऊू नये. या विधेयकावर देशभर व्यापक प्रमाणात चर्चा घडवून आणावी आणि १८ वर्षांपर्यंतच्या मुलांना समान दर्जाच्या सन्माननीय शिक्षणाची हमी देईल असे विधेयक आणावे या मागणीसाठी आज बालहक्क अभियानच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. या वेळी शिक्षणात विषमता आणणाऱ्या विधेयकाची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होळी करण्यात आली.
बालहक्क अभियान समितीच्या अनुराधा भोसले, प्रभाकर भोसले, आंबिका कांबळे, शकुंतला कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर निदर्शने करण्यात आली. या निदर्शनात महिला आणि मुली मोठय़ा संख्येने सहभागी झाल्या होत्या. निदर्शकांसमोर प्राथमिक शिक्षकांचे नेते प्रभाकर आरडे आणि अनुराधा भोसले यांची भाषणे झाली.

सोलापूरच्या शिवदारे महाविद्यालयात जैवतंत्रज्ञानाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम
सोलापूर, २३ जुलै/प्रतिनिधी

दक्षिण सोलापूर तालुका शिक्षण मंडळाच्या जुळे सोलापुरातील व्ही. जी. शिवदारे कला, वाणिज्य, शास्त्र महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून सोलापुरात प्रथमच जैवतंत्रज्ञान (बायोटेक्नॉलॉजी) पदव्युत्तर अभ्यासक्रमास मान्यता मिळाल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे यांनी पत्रकार परिषदेत दिली. चालू शैक्षणिक वर्षांपासून सुरू होणाऱ्या दोन वर्षांच्या या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ६० जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी कोणत्याही शाखेची पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल, असे शिवदारे यांनी स्पष्ट केले.

आजपासून ‘अक्षरमानव’चे ‘मी’ साहित्य संमेलन
सातारा, २३ जुलै/प्रतिनिधी

‘अक्षरमानव’ आयोजित ‘मी’ साहित्य संमेलन शुक्रवारपासून तीन दिवस पाचगणी परिसरातील खिंगर येथे होणार आहे. स्वागताध्यक्ष आमदार मदन भोसले आहेत. येत्या २४, २५, २६ जुलै २००९ रोजी पाचगणीजवळील खिंगर या निसर्गरम्य परिसरात ज्येष्ठ साहित्यिक राजन खान, नाटककार प्रा. दिलीप जगताप आणि आ. मदन भोसले यांच्या पुढाकाराने अक्षरमानवतर्फे एक साहित्य मेळावा आयोजित केला आहे. यात रंगनाथ पठारे, भारत सासणे, चं. प्र. देशपांडे, जयंत पवार, शफाहत खान, अविनाश सप्रे, दासू वैद्य, महावीर जोंधळे, महेश केळुसकर आदी मंडळी भाग घेणार आहेत. या संमेलनात ही मंडळी स्वत:, स्वत:चं लिखाण, अनुभव, इच्छा यावर आपले विचार मांडतील वा भाष्य करतील आणि उपस्थितांशी प्रश्नोत्तरी गप्पा मारतील.

जीप-दुचाकीच्या धडकेत पती-पत्नी जागीच ठार
सांगली, २३ जुलै/प्रतिनिधी

जीप व दुचाकीच्या धडकेत पती-पत्नी जागीच ठार झाल्याची घटना कसबे डिग्रज फाटय़ावर घडली. युवराज बाबुराव पाटील व त्यांची पत्नी उज्ज्वला युवराज पाटील अशी मृतांची नावे आहेत. युवराज पाटील हे कसबे डिग्रज येथील राहणारे असून, सोनार काम करतात. आज सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान हे दोघे पती-पत्नी सांगलीहून कसबे डिग्रजला (एमएच १५- एएक्स २२४१) या दुचाकीवरून निघाले होते. कसबे डिग्रज फाटय़ावर आले असताना समोरून येणाऱ्या महिंद्रा जीप (क्रमांक एमएच ११- एच ८७३६) बरोबर समोरासमोर धडक झाल्याने युवराज पाटील व त्याची पत्नी यांना जबर मार बसल्याने ते जागीच ठार झाले. या घटनेची नोंद सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात रात्री उशिरा झाली.

सोलापुरात उद्यापासून ‘एन्डोकॉन-०९’ परिषद
सोलापूर, २३ जुलै/प्रतिनिधी

डेक्कन सोसायटी ऑफ एन्डोस्कोपीची वार्षिक परिषद (एन्डोकॉन-०९) येत्या २५ व २६ जुलै रोजी सोलापूरच्या हॉटेल त्रिपुरसुंदरीमध्ये होत असून या परिषदेचे उद््घाटन जागतिक कीर्तीचे पोटविकार तज्ज्ञ डॉ. नागेश्वर रेड्डी यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती सोलापूर सर्जिकल सोसायटीच्यावतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली. या परिषदेत पोटविकाराच्या विविध विषयांवर अत्याधुनिक एन्डोस्कोपी व लॅपरोस्कोपी या तंत्रांवर चर्चासत्र होणार आहे. सोलापूरसह कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, बेळगाव, विजापूर, हुबळी, गुलबर्गा तसेच गोवा येथील एन्डोस्कोपी व लॅपरोस्कोपीचे सुमारे पाचशे तज्ज्ञ डॉक्टर्स उपस्थित राहणार आहेत. यात डॉ. जी. व्ही. राव, डॉ. अमित मायदेव, डॉ. दीपक अमरापूरकर, डॉ. विनय थोरात, डॉ. अभय दळवी, डॉ. दीपक पाटील, डॉ. सुरेश देशपांडे, डॉ. राजेश धरमसी आदींचा समावेश असल्याचे या परिषदेचे प्रमुख संयोजक डॉ. मनोज जैन यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस डॉ. सुजित जहागिरदार, डॉ. संजय देशपांडे, डॉ. शिरीष कुमठेकर, डॉ. अरुण मनगोळी, डॉ. प्रकाश घटोळे आदी उपस्थित होते.

टेक्निकल टेक्स्टाईल क्षेत्रात वस्त्रोद्योगाला संधी- आवाडे
इचलकरंजी, २३ जुलै/वार्ताहर

टेक्निकल टेक्स्टाईल या क्षेत्रात वस्त्रोद्योगाला प्रचंड संधी आहे. वस्त्रोद्योगात क्रांती घडवून आणणाऱ्या या क्षेत्रात कापड व्यापाऱ्यांनी प्रवेश करून आपली प्रगती साधावी, असे आवाहन माजी वस्त्रोद्योग मंत्री आमदार प्रकाश आवाडे यांनी केले. इचलकरंजी पॉवरलूम कापड मार्केट सहकारी हौसिंग सोसायटीची २४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या अनंतराव भिडे सभागृहात पार पडली. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष संजयकुमार मुनोत होते. प्रमुख पाहुणे आमदार आवाडे यांनी या वेळी वस्त्रोद्योगातील टेक्निकल टेक्स्टाईलचे महत्त्व व्यापारीवर्गाच्या निदर्शनास आणून दिले. केवळ कापडांचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन घेण्याऐवजी टेक्निकल टेक्स्टाईलचे कमी प्रमाणात उत्पादन घेऊन अधिक लाभ कसा मिळणे शक्य आहे हे आमदार आवाडे यांनी विविध उदाहरणांद्वारे स्पष्ट केले. या घटकांचे महत्त्व लक्षात घेऊन डीकेटीईमध्ये टेक्निकल टेक्स्टाईलचा एम.टेक. अभ्यासक्रम सुरू होत असल्याचे त्यांनी सांगितले.

बीएसएनएल मोबाईल टॉवर कार्यान्वित करण्याची मागणी
फलटण, २३ जुलै / वार्ताहर

फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील सरडे व गुणवरे येथील बीएसएनएलचा मोबाईल टॉवर कार्यान्वित करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. फलटणच्या पूर्व भागात विविध मोबाईल कंपन्यांनी टॉवर उभे केले आहेत. मात्र ‘भारत का सबसे बडा नेटवर्क’ असा दावा करणाऱ्या बीएसएनएलचे टॉवर उभे असूनही ते कार्यान्वित नसल्याने मोबाईलधारकांची कुचंबणा होत आहे.
या भागातील मोबाईल आऊट ऑफ कव्हरेज लागत असून, मोबाईल टॉवर कार्यान्वित करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

निळू फुले, कोळी यांना पेन्शनर्स संघाची श्रद्धांजली
सांगली, २३ जुलै / प्रतिनिधी

सांगली जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनच्या सभेत आपल्या चतुरस्र अभिनयाने दीर्घकाळ चित्रपट व रंगभूमी गाजवणारे डाव्या चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते निळू फुले व तासगावचे माजी आमदार भाई गणपतराव कोळी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. आटपाडी येथील पेन्शनर भवनासाठी २५ हजार रुपयांची देणगी देणाऱ्या डॉ. चंद्रकांत व डॉ. भास्कर देशमुख यांचा डोंगरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सहाव्या वेतन आयोगाच्या आदेशानुसार सुधारित निवृत्तिवेतन माहे जुलै महिन्याच्या पेन्शनबरोबर ऑगस्ट महिन्यात देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.