Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

अखेर वाठारमध्ये बाटली आडवी
पेठवडगाव, २३ जुलै / वार्ताहर

वाठार गावातील पन्नास टक्क्य़ांपेक्षा अधिक महिलांनी गावातील देशी दारूचे दुकान बंद होण्याच्या बाजूने मतदान केल्याने अखेर हातकणंगले तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील वाठार या गावी देशी दारूची बाटली आज आडवी झाली. महिलांनी उस्फूर्तपणे मतदान केले. गुप्त मतदानाची प्रक्रिया शांततेने पार पडली. बाटली आडवी झाल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी जाहीर करताच गावच्या

 

महिलांनी गुलालाची मुक्त उधळण करत एकच जल्लोष केला.
पुणे-बेंगलोर या राष्ट्रीय महामार्गावरील वाठार गावच्या रहदारीच्या चौकातील देशी दारूचे दुकान बंद करण्यासाठी महिलांनी आंदोलनाचा मोठा रेटा लावला होता. यापूर्वी हे देशी दारूचे दुकान बंद करण्यासाठी उघड मतदान घेण्यात आले होते. त्या वेळी मतदान कमी झाल्यामुळे ही बाटली उभीच राहिली होती. त्यानंतर नव्या अध्यादेशाप्रमाणे गुप्त मतदान पद्धती प्रक्रिया अवलंबिण्यात यावी अशी मागणी महिलांनी केली होती. अखेर प्रशासनाने गुप्त मतदान पद्धतीने या देशी दारू दुकानाच्या संदर्भातील फैसला लावण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे आज प्रचंड पोलिस बंदोबस्तात गुप्त मतदान घेण्यात आले. या मतदानामध्ये २१०० पैकी १४७७ महिलांनी मतदान केले. त्यामध्ये देशी दारूचे दुकान बंद व्हावे म्हणून १२८० महिलांनी कौल दिला. ९५ मते बाद झाली. तर १०२ महिलांनी दारूचे दुकान बंद होऊ नये असे मत नोंदवले. गुप्त मतदान झाल्यानंतर सायंकाळी हातकणंगलेचे तहसीलदार समीर शिंगटे यांनी वाठार गावची दारूची बाटली बहुमताने आडवी झाल्याचे जाहीर केले. त्यानंतर महिलांनी घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला.
प्रजासत्ताक दिनी वाठार गावची ग्रामसभा झाली होती. त्यामध्ये आणखी १६ दारू दुकाने चालू करण्यासाठी ना हरकत देण्याबाबतचा निर्णय झाला होता.असा निर्णय होताच गावातील महिलांनी दारूबंदी विरुद्ध मोहीमच उघडली. सभा, मेळावे, निवेदने या मोहिमेतून दारूबंदी कृती समिती स्थापन करण्यात आली. यापूर्वी २९ जून रोजी देशी दारूचे दुकान बंद करण्यासाठी हात उंचावून महिलांचे मत आजमावण्यात आले. त्या वेळी १०५१ महिलांनी मतदान केले. केवळ १७ मते कमी पडल्यामुळे बाटली आडवी न होता उभीच राहिली होती. पण या अपयशाने खचून न जाता महिलांनी आंदोलनाचा रेटा वाढवला होता. दरम्यान संबंधित दारू दुकानदाराने न्यायालयात एकयाचिकाही दाखल केली होती. बुधवारीच ही याचिका फेटाळल्याने आज गुप्त मतदान घेण्यात आले आणि या मतदानाद्वारे वाठार गावची बाटली आडवी झाली. वाठार गावात असलेले चार बार, दोन दारू दुकाने, एक घाऊक दारूविक्रीचे दुकान आता बंद करावी लागणार आहेत.