Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र
थेट द्वितीय वर्ष प्रवेशासाठी मल्टिपल राऊंड प्रक्रिया
जयप्रकाश अभंगे
सोलापूर, २३ जुलै

अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्षांसाठी असलेल्या सर्व रिक्त जागा मल्टिपल राऊंडद्वारे (तीन वेळा) केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे भरण्याचा निर्णय शासनाने

 

घेतला आहे.
अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या २००९-१० मधील थेट द्वितीय वर्षांसाठी शासकीय/शासकीय अनुदानित/विनाअनुदानित संस्थांमधील सर्व रिक्त जागा आता अनेक फेऱ्यांद्वारे भरण्याचा निर्णय शासनाच्या तंत्रशिक्षण संचालनालयाने घेतला आहे. तद्वतच, मंजूर प्रवेशक्षमतेच्या लॅटरल एन्ट्रीद्वारे भरावयाच्या जागांसह प्रथम वर्षांमधून अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या रिक्त जागासुद्धा मल्टिपल राऊंडद्वारे केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे भरण्यात येणार आहेत.
ज्या संस्था दुसऱ्या वर्षांच्या जागा संचालक, तंत्रशिक्षण यांना कळविणार नाहीत अशा संस्थांविरुद्ध भारतीय दंडविधान संहिता १८६०मधील कलम १८८ नुसार कारवाई करण्यात येईल. तसेच राज्याच्या तंत्रशिक्षणाच्या संचालकांनी विहित केलेल्या मुदतीनंतर प्रवेश प्रक्रियेबाबतची माहिती उशिरा अपलोड करणाऱ्या संस्थांवर उशिरा अपलोड केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या गुणिले शिक्षणशुल्क गुणिले दोन एवढी रक्कम दंड म्हणून वसूल करण्यात येईल, असेही शासनाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
संचालनालयाच्या अधिनस्त असलेल्या शासकीय/शासकीय अनुदानित/विद्यापीठ व्यवस्थापित/विद्यापीठ संस्था/विनाअनुदानित अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयांनी थेट द्वितीय वर्ष पदवी अभ्यासक्रमाच्या केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेसाठी उपलब्ध असलेल्या जागांवर प्रवेश प्रक्रिया संपेपर्यंत कोणताही प्रवेश संस्थास्तरावर करू नये. तसे केल्यास सदर प्रवेशास मंजुरी देण्यात येणार नाही. शिवाय अशा संस्थांविरुद्ध वरीलप्रमाणे कारवाई करण्यात येईल. थेट द्वितीय वर्षांसाठीची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जागा शिल्लक राहिल्यास त्या जागा संस्थास्तरावर भरता येतील.
विद्यार्थ्यांनी थेट द्वितीय वर्ष पदवी अभ्यासक्रमाच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेसाठी उपलब्ध असलेल्या जागांकरिता थेट संस्थेकडे प्रवेश घेतल्यास सदर प्रवेशास मंजुरी देण्यात येणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीस संबंधित विद्यार्थी जबाबदार असेल. त्यास तंत्रशिक्षण संचालनालय जबाबदार राहणार नाही, असेही आदेशात म्हटले आहे.