Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

शिष्यवृत्ती गुणवत्तायादीत कोल्हापूरचे ९० विद्यार्थी
कोल्हापूर, २३ जुलै / विशेष प्रतिनिधी

राज्यात राजर्षी शाहू सर्वागीण शिक्षण कार्यक्रम व सर्वागीण शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत २००८-०९ मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षांचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. या परीक्षेत चौथीच्या राज्य गुणवत्तायादीत कोल्हापूर जिल्हय़ातील ३४ विद्यार्थी चमकले असून सातवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जिल्हय़ातील ५६ विद्यार्थ्यांना राज्याच्या

 

गुणवत्तायादीत येण्याचा मान मिळाला आहे.
शिष्टवृत्ती परीक्षेचा निकाल गुरुवारी सायंकाळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नानासाहेब गाठ यांनी जाहीर केला. जिल्हय़ात यंदा चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेस ग्रामीण (४२ हजार ६१०) व शहरी (६ हजार ८३२) असे एकूण ४९ हजार ४४२ विद्यार्थ्यांनी नावे नोंदविली होती. यापैकी ४७ हजार ८९३ विद्यार्थी परीक्षेला बसले. या विद्यार्थ्यांत ३६ हजार २१२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शेकडा उत्तीर्णाचे प्रमाण ७३.२४ इतके आहे. तर सातवीच्या परीक्षेत ग्रामीण, शहरी असे एकत्रित ३० हजार १८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यापैकी ९ हजार ७११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या परीक्षेचे शेकडा उत्तीर्णाचे प्रमाण ३१.२० टक्के इतके आहे.
चौथी व सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत कोल्हापूर जिल्हय़ातील एकूण ९० विद्यार्थ्यांनी राज्याच्या गुणवत्तायादीत येण्याचा मान मिळविला. यामध्ये ग्रामीण विभागातील विद्यार्थ्यांनी (७१) आपली आघाडी कायम ठेवली आहे. चौथीच्या परीक्षेत ग्रामीण भागातून २४ तर शहरी भागातून १० विद्यार्थी गुणवत्तायादीत आले. सातवीच्या परीक्षेत हे प्रमाण ग्रामीण ४७ तर शहरी ९ असे आहे. चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये राज्यस्तरीय गुणवत्तायादीत जिल्हय़ातील ६ विद्यार्थ्यांनी ३०० पैकी ३०० गुण मिळवून राज्यस्तरीय यादीत प्रथम येण्याचा मान्य मिळविला. यामध्ये ऋतुजा शिवाजी इंगळे, प्रियांका संजीव बाबर (विद्यामंदिर खोची, ता. हातकणंगले), हर्षदा शीतल हराळे (विद्यामंदिर नरंदे, ता. हातकणंगले), रणजित नामदेव आगळे (विद्यामंदिर साके, कागल), सुयश सर्जेराव पाटील (विद्यामंदिर कोलोली, ता. पन्हाळा), गुरुप्रसाद भांडवले (नूतन मराठी स्कूल गारगोटी, ता. भुदरगड) यांचा समावेश आहे.
चौथीच्या परीक्षेत राज्यस्तरीय गुणवत्तायादीत शहरी विभागात एकूण दहा विद्यार्थ्यांपैकी हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव येथील बळवंतराव यादव मराठी स्कूलचे नऊ विद्यार्थी चमकले आहेत. त्यांची नावे पुढीलप्रमाणे :- अनुष्का राजेंद्र भोसले (२९६), गौतमी मनोज ढवळे (२९६), प्रतीक प्रमोद महाजन (२९६), श्वेता शरद मोरे (२९६), कृष्णात शार्दूल बसर्गे (२९४), दीपाली विलास कोटकर (२९४), शुभांगी श्रीपती नाईकवडी (२९२), सिद्धी प्रशांत मोरे (२९२), पीयूष प्रभाकर पिसे (२९२) व बिपीन बंडोपंत महाडिक आदर्श मराठी प्राथमिक स्कूल जयसिंगपूर २९२ गुण.
सातवी परीक्षेत कोल्हापूर जिल्हय़ातील भुदरगड तालुक्यातील विद्यामंदिर कोनवडे येथील विनायक पांडुरंग पाटील व विद्यामंदिर लाटेवाडी येथील अक्षय तानाजी साठे या दोघांना प्रत्येकी २७८ गुण मिळाले. हे दोघेही राज्याच्या गुणवत्तायादीत पहिल्या स्थानावर आहेत. सातवीच्या शहरी गुणवत्तायादीमध्ये कोल्हापूरच्या श्रीराम विद्यालय राजारामपुरी येथील निखिल दिलीप बोंद्रे याला २७४ गुण मिळाले. तो शहरी विभागाच्या गुणवत्तायादीत पहिला तर राज्याच्या गुणवत्तायादीत पाचवा आहे.