Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

वाई मतदारसंघावरचा राष्ट्रवादीचा हक्क सोडणार नाही - मकरंद पाटील
‘अपक्ष आमदारांना आश्वासन संभ्रम करणारे ’
सातारा, २३ जुलै / प्रतिनिधी

सोनिया गांधी व शरद पवार यांच्या भूमिकेला कात्रजचा घाट दाखवून व आघाडीच्या सूत्राला मूठमाती देऊन बंडखोरी करणाऱ्या अपक्ष आमदारांना काँग्रेसचे तिकिट देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री अशोक चव्हाण व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिले. ते कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करणारे आहे. वाई विधानसभा मतदारसंघावरचा हक्क कदापि सोडणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे वाई, खंडाळा, महाबळेश्वर पुनर्रचित मतदारसंघाचे अध्यक्ष मकरंद पाटील यांनी

 

पत्रकार परिषदेत सांगितले.
वाई पंचायत समितीचे सभापती प्रमोद शिंदे, खंडाळा पंचायत समितीच्या सभापती लताताई नरुटे, जि. प. सदस्य दिलीप बाबर, नितीन पाटील, हेमंत कदम, महादेव म्हसकर यांच्या उपस्थितीत मकरंद पाटील यांनी सांगितले की, कार्यकर्ते संभ्रमात राहू नयेत म्हणून आपण राष्ट्रवादीचा वाई मतदारसंघावरचा हक्क सोडणार नसल्याचा इशारा देत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत हा मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळाला असता आघाडीची शिस्त पायदळी तुडवून काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष मदन भोसले यांनी आघाडीच्या नेत्यांचा आदेश पायदळी तुडवत बंडखोरी केली होती. धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व सोडून शिवसेना-भाजपच्या पाठिंब्यावर ते आमदार झाले आहेत. त्यांना आघाडीने जागा सोडता कामा नये. राष्ट्रवादी व काँग्रेसमधील जागावाटपाचे सूत्र ठरलेले नसताना मुख्यमंत्री व काँग्रेस प्रदेशाध्यक्षांसारख्या जबाबदार नेत्यांनी अपक्ष आमदारांना कोणतेही आश्वासन देणे गैर आहे. आघाडीचे हित जपण्यासाठी आम्ही आक्षेप घेत आहाते. तो डावलण्यात आला तर कार्यकर्ते सहन करणार नाहीत. विधानसभा निवडणुकीनंतर गेल्या पाच वर्षांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विद्यमान आमदार मदन भोसले यांच्या विरोधात जनतेने कौल दिला आहे. विद्यमान आमदारांनी आश्वासनांचा झपाटा लावला आहे. कामांचा नाही. पक्षाची उमेदवारी मला किंवा अन्य कुणालाही मिळाली, तरी राष्ट्रवादी अंतर्गत बंडखोरी होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.