Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

पोकळ घोषणा न करता मैदानातच उतरा- जयंत पाटील
इस्लामपूर, २३ जुलै / वार्ताहर

‘केवळ पोकळ घोषणा न करता प्रत्यक्षात विधानसभा निवडणुकीच्या मैदानातच उतरा.. एकदाच काय तो सोक्षमोक्ष होऊन जाऊ द्या..!’ अशा शब्दांत गृहमंत्री जयंत पाटील यांनी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील आपल्या विरोधकांच्या आव्हानाला प्रतिआव्हान दिले.
निमित्त होते ताकारी (ता. वाळवा) येथील नूतन सरपंच विशाल विनायकराव पाटील यांच्या सत्कार

 

कार्यक्रमाचे! लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार श्रीमती निवेदिता माने यांच्या झालेल्या पराभवाच्या पाश्र्वभूमीवर जयंत पाटील यांचे विरोधक सातत्याने आव्हानाची भाषा बोलू लागले आहेत.
त्याचा समाचार घेताना जयंत पाटील म्हणाले, की विधानसभा निवडणुका जवळ आल्याने काहीजणांनी आपल्या नावाचा जप सुरू केला आहे. आपण त्याकडे आतापर्यंत फारसे लक्ष दिले नाही. परंतु दररोज उठून तेच तेच ऐकून मलाही कंटाळा आल्याने एकदाच काय तो कार्यक्रम होऊन जाऊ द्या.. मी केवळ बोलण्यातून उभा राहिलो नाही, तर मी कामातून उभा राहिलो आहे. वाळवा तालुक्याच्या विकासासाठी कोटय़वधी रुपयांचा निधी मी आणला आहे. याची जाणीव तालुक्यातील जनतेला आहे. विकासकामात आपण सातत्याने न्याय बुद्धीने वागलो, जनतेच्या हाताला काम दिले आहे व अधिकाधिक जनतेच्या हाताला काम कसे मिळेल, याचा प्रयत्न केला आहे.
आपली संघटना मजबूत आहे व अभेद्य संघटना हीच माझी ताकद आहे, असे ठणकावून सांगतानाच लोकसभा निवडणुकीचे संदर्भ व विधानसभा निवडणुकांचे संदर्भ वेगळे असतात. लोकसभा निवडणुकीचा संदर्भ घेऊन काहीजण आव्हानाची भाषा करीत असतील, तर तो त्यांचा संभ्रम असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, जलसंपदामंत्री अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेसला बदनाम करण्याची काहींनी सुपारीच घेतल्याचा आरोपही जयंत पाटील यांनी केला. राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सत्कार कार्यक्रमात राजारामबापू ज्ञान प्रबोधिनीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या सेतू कार्यालयाचे उद्घाटन, ४५ लाख रुपये खर्चून बांधलेल्या घाटाचे उद्घाटन व ७५ लाख रुपये खर्चाच्या पिण्याच्या पाण्याच्या भारत निर्माण योजनेचे भूमिपूजन जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पी. आर. पाटील व ‘महानंद’चे अध्यक्ष विनायकराव पाटील यांनी गृहमंत्री जयंत पाटील यांनी वाळवा तालुक्यात केलेल्या आदर्शवत विकासाचा आढावा घेऊन तालुक्यातील जनता सुज्ञ आहे, जाणती आहे, ती विकासाचा ध्यास घेतलेल्या जयंत पाटील यांच्याच पाठीशी ठामपणे उभी राहील, याची ग्वाही दिली.