Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

अरण येथे नारळहंडी फोडून सावता माळी पुण्यतिथीची सांगता
सोलापूर, २३ जुलै/प्रतिनिधी

संत सावता माळी यांच्या ७१४ व्या पुण्यतिथी सोहळ्याची सांगता जगातील सर्वात मोठी नारळहंडी फोडून करण्यात आली. नयनरम्य असा हा नारळहंडीचा सोहळा पाहण्यासाठी श्रीक्षेत्र अरण (ता.

 

माढा) येथे सुमारे एक लाख भक्तांनी उपस्थिती लावली होती.
संत तुकाराम महाराजांचे वंशज माऊली देहूकर यांचे बंधू बापूसाहेब, कान्होबाराय आणि विठ्ठल यांच्या हस्ते नवस फेडण्यासाठी भक्तांनी अर्पण केलेल्या १५ हजार नारळांची हंडी फोडण्यात आली. पुण्यतिथीदिनी पहाटे चार वाजता सावता माळींच्या संजीवन समाधीची पहिली महापूजा अखिल भारतीय माळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शंकरराव लिंगे यांनी केली. या वेळी सावता महाराजांचे वंशज पुजारी रमेश वसेकर, लक्ष्मण वसेकर, अंकुश वसेकर, दामू वसेकर, बळी माळी, गणेश वसेकर, जनार्दन पुजारी यांनी आरती सादर केली. दुपारी १२ वाजता संजीवन समाधीवर पुष्प वाहण्याचा कार्यक्रम झाला. सायंकाळी पंढरपूरहून आलेल्या पांडुरंगाच्या पालखीचे २१ तोफांची सलामी देऊन स्वागत करण्यात आले. दुसऱ्या दिवशी सायंकाळी देहूकर महाराज आणि अरणकर महाराज यांच्या काल्याचे कीर्तन झाल्यानंतर अखेर नारळहंडी फोडण्यात आली. यात्रेनिमित्त अरण येथे अनेक व्यावसायिकांचे स्टॉल्स आले आहेत. त्यात विविध करमणुकीची साधने आहेत. देवस्थानचे विश्वस्त अध्यक्ष विठ्ठल शिंदे, जि. प. सदस्य शिवाजी कांबळे, संत सावता माळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शंकरराव लिंगे, विठ्ठल गाजरे, तात्या पाटील, भारत शिंदे, विलास वसेकर यांनी यात्रेची चोख व्यवस्था केली आहे.