Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

‘पवारांचे साखर आयात धोरण साखर उद्योगाला हानिकारक’
सांगली, २३ जुलै / प्रतिनिधी

शरद पवार यांचे साखर आयात धोरण हे देशातला साखर उद्योग मातीत घालणारे आहे, अशी टीका करून साखरेचा साठा व्यापाऱ्यांनी केला. यात त्यांचे काहीच चुकले नसून साखरेच्या माध्यमातून भ्रष्टाचार करणाऱ्या साखरसम्राटांना शिक्षा झाली पाहिजे. तसेच याची चौकशी केंद्रीय गुप्तचर खात्यामार्फत करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी पत्रकार

 

परिषदेत केली.
रघुनाथ पाटील यांनी साखरेच्या सट्टेबाजीसंदर्भात बोलताना सांगितले, वायदे बाजारातून साखर वगळण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यातील साखरेचे दर कमी-जास्त होतील. यावर अवलंबून राहून व्यापाऱ्यांनी प्रचंड प्रमाणात साठे केले आहेत. यात त्यांची काहीच चूक नाही. साखर वायदे बाजारातून वगळली नसती, तर व्यापाऱ्यांना दोष देण्यात अर्थ होता. साखरेच्या गोडीचा फायदा घेणारे खरे साखरसम्राट आहेत. व्यापाऱ्यांपेक्षा जास्त साखरसाठा हा साखरसम्राटांनी केला आहे. साखर कारखान्याच्या माध्यमातून कोटय़वधींचा भ्रष्टाचार चालू आहे. शेतकऱ्याची मात्र पिळवणूक होते. भ्रष्टाचार करून तुंबडय़ा भरणाऱ्या साखरसम्राटांची नावे प्रशासनाची हिंमत असेल, तर त्यांनी जाहीर करावीत. साखर कारखान्यांच्या माध्यमातून होणारे भ्रष्टाचार व गब्बरगंड साखरसम्राट यांच्यावर कारवाई करण्यासाठी अगोदर त्यांची केंद्रीय गुप्तचर खात्यामार्फत चौकशी झाली पाहिजे. त्याशिवाय त्यांची प्रकरणे उघडकीस येणार नाहीत. शेतकऱ्यांच्या घामाच्या जिवावर आपल्या तुंबडय़ा भरणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे. या देशातला साखर उद्योग मातीत घालण्याचे काम केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे साखर आयात करून करीत आहेत. देशातील साखर उद्योगासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे गरजेचे असताना शरद पवार स्वहितासाठी साखर आयात करीत आहेत. हे आयात धोरणच मारक ठरत आहे. ऊसउत्पादकाला प्रतिटन २७०० रुपये दर मिळाला पाहिजे, यासाठी आगामी काळात लढा उभा करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या खत अनुदान योजनेचे पाटील यांनी स्वागत केले. थेट खत कंपन्यांना अनुदान देण्याऐवजी थेट शेतकऱ्यांना अनुदान देण्याची योजना चांगली आहे. परंतु हे अनुदान शेतकऱ्यांच्या हातात मिळाले पाहिजे. ११९ हजार कोटी रुपयांचे अनुदान खतासाठी सरकारने जाहीर केले आहे. याचा फायदा निश्चितपणे शेतकऱ्यांना होणार आहे.
राहतामध्ये शेतकरी परिषदेचे आयोजन
दि. ९ ऑगस्ट रोजी राहता येथे शेतकरी परिषदेचे आयोजन केली असल्याची माहिती रघुनाथ पाटील यांनी दिली. या परिषदेस पृथ्वीराज चव्हाण, एम. एस. स्वामिनाथन व अण्णा हजारे हे मेळाव्याला येणार आहेत. या मेळाव्यात दूरध्वनी तसेच इतर सेवांप्रमाणेच वीज व पाणी यांचेही खासगीकरण करण्यात यावे, हा विषय परिषदेत घेणार आहे. दूरध्वनीचे खासगीकरण झाल्यानंतर मोठय़ा प्रमाणात सेवा उपलब्ध झाली. त्याप्रमाणेच वीज व पाणी यांचे खासगीकरण झाल्यानंतर मुबलक प्रमाणात या गोष्टी उपलब्ध होतील, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.