Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

केशवराव भोसले नाटय़गृहात सव्वा कोटी खर्चानंतरही त्रुटी
कोल्हापूर, २३ जुलै / प्रतिनिधी

येथील केशवराव भोसले नाटय़गृहासाठी आतापर्यंत एक कोटी ३१ लाख रुपयांचा खर्च झाला असूनही या नाटय़गृहात आजही अनेक त्रुटी कायम आहेत. म्हणूनच आजपर्यंत झालेल्या खर्चाची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांची नेमणूक करावी अशी मागणी कोल्हापूर जनशक्तीच्या

 

वतीने करण्यात आली आहे.
कोल्हापूरचे एकेकाळचे भूषण असणारे हे नाटय़गृह राज्य शासनाने १९७८ साली महापालिकेकडे हस्तांतरित केले. गेल्या २९ वर्षांपासून हे नाटय़गृह महापालिकेच्या व्यवस्थापनाखाली चालू आहे. सध्या या नाटय़गृहाकडे तेरा कर्मचारी आहेत. नाटय़गृहाला स्वतंत्र व्यवस्थापक आजही मिळालेला नाही. प्रभारी व्यवस्थापक हे नाटय़गृहावर उपस्थित नसतात. त्यामुळे या नाटय़गृहासाठी स्वतंत्र व्यवस्थापक नियुक्त करण्यात यावा, गेल्या काही वर्षांपासून बंद असलेले कँटीन पुन्हा चालू करण्यात यावे, जनरेटरची सुविधा अनेक वर्षे बंद आहे. या जनरेटरचे सुटे भाग मिळत नाहीत असे सांगितले जाते. वातानुकूलित यंत्रणा बंद आहे. साऊंड ऑपरेटर आणि लाइट ऑपरेटर यांची कायमस्वरूपी नेमणूक करण्यात यावी अशा काही मागण्या जनशक्तीच्या वतीने करण्यात आल्या आहेत.
१९८० ते ८४ या कालावधीत १६ लाख रुपये खर्च करण्यात आले. २००३ ते २००५ या कालावधीत या नाटय़गृहाचे पुन्हा एकदा नूतनीकरण करण्यात आले. १ कोटी ३१ लाख रुपयांचा खर्च आतापर्यंत या नाटय़गृहावर करण्यात आला असून आजही या नाटय़गृहात अनेक त्रुटी आहेत. इतका अफाट पैसा खर्च करूनही समस्यांच्या गर्तेत हे नाटय़गृह सापडले असून आतापर्यंत झालेल्या खर्चाची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी सुभाष वोरा यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.