Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

वि. स. पागे यांचे विचार अद्याप पूर्णपणे स्वीकारले गेले नाहीत- आर. आर. पाटील
सांगली, २३ जुलै / प्रतिनिधी

वि. स. पागे यांनी ३० वर्षांपूर्वी पाहिलेले रोजगार हमी योजनेचे स्वप्न आज देशपातळीवर स्वीकारले गेले आहे. मात्र त्यांचे पूर्ण विचार अजूनही स्वीकारले गेले नाहीत, अशी खंत राष्ट्रवादी

 

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार आर. आर. पाटील यांनी व्यक्त केली.
तासगाव येथील जीवन विकास संस्थेच्या विद्यानिकेतन हायस्कूल येथे वि. स. पागे जन्मशताब्दी महोत्सवाचे उद्घाटन आर. आर. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबूराव गुरव होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक पोरे उपस्थित होते. वि. स. पागे यांच्या स्मृतिभवनासाठी पाच कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाला तत्त्वत: मान्यता मिळाल्याची माहितीही आर. आर. पाटील यांनी दिली.
सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून वि. स. पागे यांनी विधान परिषद सभापती असताना चांगले निर्देश दिले. देशातील गरिबीवर नियोजन चुकत असल्याचे सांगून लोकप्रतिनिधींच्या डोळय़ांत अंजन घालण्याचे काम त्यांनी नेहमीच केले. रोजगार हमी योजनेसारख्या महत्त्वपूर्ण कामाचा जन्मदाता असणाऱ्या महापुरुषाचे होणारे स्मृतिभवन देशाला मार्गदर्शक ठरेल, असेही आर. आर. पाटील म्हणाले. के. वाय. कोळेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. या वेळी सभापती चंद्रकांत पाटील, नगराध्यक्ष अमोल शिंदे, श्रीमती उज्ज्वला पवार, किशोर उनउने व प्रा. डी. ए. माने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मधुकर पागे यांनी आभार मानले.