Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

महावितरण कर्मचाऱ्यांच्या संपादरम्यान सांगलीत सुरळीत वीजपुरवठा!
सांगली, २३ जुलै/प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य वीज महावितरण कर्मचाऱ्यांनी सुरू केलेला बेमुदत संप सांगलीकर नागरिकांच्या पथ्यावर पडतो की काय, अशी स्थिती आज शहरात होती. एरव्ही भारनियमनामुळे मंगळवारी वीजपुरवठा होत नसल्यामुळे सर्वसामान्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. पण आज दिवसभर सुरळीत वीजपुरवठा सुरू होता. मात्र हा संप असाच सुरू राहिला, तर परिस्थिती आटोक्याबाहेर जाईल व सांगलीकरांची अवस्था ‘कुठे जाशी भोगा, तर तुझ्यापुढे उभा’ अशी

 

होण्याची भीती व्यक्त होत आहे.
वीज महावितरण कंपनींतर्गत विविध संघटनांनी पगारवाढ नाकारल्याने एकत्रित येऊन कृती समिती स्थापन केली आहे. वीज महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी राज्यात बेमुदत संपाची हाक दिली आहे. आज सांगली जिल्ह्य़ातही या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सांगली सर्कलमधील सुमारे दोन हजार कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत.
गेले अनेक महिने शहरात भारनियमनामुळे पाच ते सहा तास वीज गायब होत होती, तर ग्रामीण भागात सुमारे १२ ते १५ तास वीज नसायची. मंगळवारी तर जिल्ह्य़ात सर्वत्रच दहा ते बारा तास अंधार असायचा, हे जणू काही समीकरणच ठरून गेले होते. वीज कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर गेले खरे! पण जिल्ह्य़ातील वीजपुरवठा अखंडित कसा राहिला? याचेच कोडे कोणालाही उलगडत नव्हते. जिल्ह्य़ाला दररोज ४५० मेगावॉट विजेची गरज असते; परंतु प्रत्यक्षात केवळ २५० मेगावॉटचा वीजपुरवठा होतो. आज हा पुरवठा कायम कसा राहिला, याचे उत्तर मात्र कोणालाही शोधता आले नाही.
सांगली महावितरण विभागाच्या सर्कलमधील दोन हजार कर्मचारी संपावर होते. हजर होते ते केवळ मुख्य कार्यकारी अभियंता रमेश बुंदिले व त्यांचे मोजकेच तीन ते चार कार्यकारी अभियंता! आजपासून सुरू झालेल्या बेमुदत संपाबाबत बुंदिले यांच्याशी संपर्क साधला असता, ३३/११ केव्हीच्या ७८ सब स्टेशन व १५ अतिदाबाच्या स्टेशनमध्ये १७५ कंत्राटी कामगारांना घेऊन जिल्ह्य़ातील वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे त्यांनी दैनिक ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.