Leading International Marathi News Daily

शुक्रवार, २४ जुलै २००९

(सविस्तर वृत्त)

राजाराम तलाव परिसरातील वृक्षांचा पहिला वाढदिवस
कोल्हापूर, २३ जुलै / प्रतिनिधी

आपल्या पाल्यांचा वाढदिवस सर्वजण साजरा करीत असतात. वाढदिवसाच्या दिवशी फुलांचे गुच्छ दिले जातात. परंतु ज्या वृक्षांमुळे फुले मिळतात, त्या वृक्षांचा वाढदिवस कोणी साजरे करते का? पण आज जिल्हय़ातील लोकप्रतिनिधी व प्रमुख वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत राजाराम तलाव परिसरातील वृक्षांचा पहिला वाढदिवस औक्षण करून व ‘हॅपी बर्थडे टू यू’ असे गाणे म्हणून

 

साजरा करण्यात आला.
श्रावण महिना शुभारंभाच्या निमित्ताने सामाजिक वनीकरण विभाग व अर्थमूव्हर्स असोसिएशनच्या वतीने आज राजाराम तलाव परिसरात वृक्षारोपणाबरोबरच गेल्या वर्षी २२ जलै रोजी लावलेल्या वृक्षांचा प्रथम वाढदिवस साजरा करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. उपमहापौर स्मिता माने यांनी वृक्षांचे औक्षण केले. त्या वेळी उपस्थित अधिकारी, कर्मचारी व राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थिनींनी ‘हॅपी बर्थडे टू यू’ हे गाणे गाऊन वृक्षांना एक अनोखी भेट दिली.
या समारंभास आमदार मालोजीराजे छत्रपती, आमदार सतेज पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नानासाहेब गाठ, उप-महापौर स्मिता माने, जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख, विशेष पोलीस महानिरीक्षक अशोक धिवरे, कृष्णा खोरे महामंडळाचे मुख्य अभियंता एस. एल. पाटील, अधीक्षक अभियंता डी. जी. मळेकर, निवासी उपजिल्हाधिकारी अजित रेळेकर, कार्यकारी अभियंता संतोष शेलार, तसेच ‘अर्थ मूव्हर्स’चे सुनील घोरपडे व पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम, महसूल, जिल्हा परिषद, सामाजिक वनीकरण आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. उपस्थित सर्व अधिकाऱ्यांनी प्रत्येकी एक वृक्ष लावून पुढील वर्षी त्या वृक्षाचा वाढदिवस साजरा करण्याचा संकल्प सोडला. जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी हिरवळ आणि पाणी म्हणजेच जीवनसूत्र आहे असे सांगितले, तर विशेष पोलीस महानिरीक्षक अशोक धिवरे यांनी सामाजिक जाण असलेला हा कार्यक्रम आहे असे या वेळी सांगितले. आमदार मालोजीराजे छत्रपती व सतेज पाटील यांनी जिल्हय़ात मोठय़ा प्रमाणावर वृक्षारोपण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नानासाहेब गाठ, एस. एल. पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक दादासाहेब शेडगे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना बेलाची रोपे देऊन स्वागत केले.